महत्त्व 'वडीलकी'चं (डॉ. श्रुती पानसे)

dr shruti panse
dr shruti panse

मोठं होत असताना त्याच्या जडणघडणीत आई आणि बाबा असा दोघांचाही वाटा असायला हवा. अनेकदा आईकडेच मुलांच्या संगोपनाची बहुतांश जबाबदारी असते. आपल्या लहानग्या मुलांच्या संगोपनात आपला काही वाटा असू शकतो हेच अनेक बाबांच्या लक्षात येत नाही. बाळाच्या जन्मानंतर पहिल्या दिवसापासून आईइतकाच सहवास बाबाचाही मिळाला तर चांगलं. त्याला जपणं, सांभाळणं, त्याची कामं करणं हे लहान वयात करता येईल. मूल मोठं होईल, तसं त्याच्याशी खेळण्यासाठी वेळ राखून ठेवणं हे बाबाला करता येईल. बाबाबरोबर असल्याचा वेगळा फायदा मुलांच्या मेंदूला मिळेल. मुलांच्या मेंदू-विकासाला वेगळे कंगोरे मिळतील.

मनीमाऊ तिच्या गोंडस पिल्लांना जन्म देते. ती स्वत: पहिलटकरीण असली, तरी तिच्या मेंदूमध्ये ज्या गोष्टी निसर्गानंच सेव्ह करून पाठवल्या आहेत, त्यानुसार ती पिल्लांना सांभाळते, त्यांना जगवते, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेते. यात पिल्लांचा बाबा कुठंही नसतो. मनीमाऊवर आपला वंश सांभाळण्याची मोठीच जबाबदारी असते. ती पार पाडण्याचा कसोशीनं प्रयत्न करते. ती पिल्लांवर प्रेम करते, त्यांना चाटते, भक्ष्याला पकडण्याच्या काही गोष्टी शिकवतेसुद्धा. जे तिच्या मेंदूत आहे, ते सर्व ती करते. वाघीण तिच्या बछड्यांना घेते आणि त्यांना आपलं अस्तित्व टिकवून टिकवण्यासाठी काही जीवनकौशल्यं शिकवते. त्यांच्यावर प्रेम करत, शिकार कशी करायची याची प्रात्यक्षिकं दाखवते. हे काम नीट न करणाऱ्या बछड्यांवर गुरगुरते. यात वाघाची काहीच भूमिका नसते. बोकाबाबा आणि वाघबाबा आपल्या पिल्लांची मुळीच काळजी करत नाहीत. आपली पिल्लं त्यांच्या गावीही नसतात.
पक्षी मात्र पक्षिणीला सगळी मदत करतो. तिच्या मनासारखं, बाळांसाठी सुयोग्य असं घरटं बांधणं, पक्षीण अंडी उबवायला बसली, की तिच्यापाशी असणं, पिल्लांना खाऊ घालणं इथपर्यंत पक्षीबाबा असतो.

मानव हा टोळीत फिरणारा प्राणी आहे. बाबा बरोबर असतो; पण मानव प्राण्याची पिल्लं बहुसंख्य वेळा आईलाच चिकटलेली असतात. बाळ जन्माला आलं, की बहुसंख्य घरांमध्ये बाळाभोवती स्त्रीवर्गाचा गराडा पडतो. बाबाला हे जमणारच नाही, असं गृहीत धरून कामाच्या सगळ्या जबाबदाऱ्या आई, आजी, मावशी, काकू यात वाटल्या जातात. "बाबा कामावर जातो म्हणून,' असं कारण दिलं तर या सर्व स्त्रियाही आपापली घरची आणि ऑफिसमधली कामं सांभाळून बाळाला सांभाळण्यासाठी रात्रीचा दिवस करतात. अशावेळी "मला त्यातलं काय करता येणार?' असा विचार बाबा करतो आणि बाळाच्या संगोपनापासून दूर राहतो. इथंच बाळाशी कनेक्‍ट होण्याच्या त्याच्या पहिल्यावहिल्या संधी निघून जातात.

या वर्षांमध्ये बाळाशी कनेक्‍ट का व्हायचं यामागचं मेंदूशास्त्रीय कारण असं, की जन्मापासून बाळाला ज्यांचा स्पर्श होतो, ज्यांचा आवाज ऐकू येतो त्या सर्वांचे अनुभव बाळाच्या स्मरणक्षेत्रात जातात. तिथं त्या त्या आवाजाचे "सिनॅप्स' तयार होतात. "सिनॅप्स' म्हणजे न्यूरॉन्स या पेशींची मिळालेल्या अनुभवांच्या आधारे झालेली जोडणी. मेंदूमध्ये अशा असंख्य जोडण्या असतात. आपल्या समाजात आई, आजी, मावशी, काकू यांच्या स्पर्शामुळे, आवाजामुळे, त्यांच्या बाळावरच्या प्रेमाचे "सिनॅप्स' आपोआप तयार होतात; पण बाबाचे त्या प्रमाणात होत नाहीत. प्रेमाचा हा संबंध आयुष्यभर टिकणारा असतो.

बाळाच्या भाषाविकासाबद्दल बोलायचं, तर बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं, तेव्हा बाळाला आईचा आवाज स्पष्ट ऐकू येत असतो आणि बाकीचे आवाज थोडे अस्पष्ट ऐकू येत असतात. निदान बाळाच्या जन्मापासून बाबा बाळाशी गप्पा मारत राहिला, तर बाळाला त्याचा आवाजही तितकाच ओळखीचा वाटेल. बाळाच्या मेंदूतला "वर्निक' या नावाचा एरिया जन्मापासूनच कार्यरत असतो. ऐकलेल्या शब्दांचं आकलन हे या एरियाचं काम आहे. ऐकलेले शब्द स्मरणकेंद्रात जातात. साधारणपणे एक वर्षाच्या आसपास "ब्रोका' हा एरिया विकसित होतो. हा बोलण्याला मदत करणारा एरिया आहे. आजपर्यंत जे "वर्निक'मध्ये सेव्ह झालेलं आहे, थोडक्‍यात एका वर्षापर्यंत जे ऐकलेले आहेत तेच शब्द बाळ बोलतं. म्हणून बाबानीही बोलायला हवं. आईपेक्षा बाबाचे नवे शब्द, बोलण्यातले उतार-चढाव, काही गमतीजमती, या वेगळ्या असू शकतात आणि बाळाला त्यासुद्धा अवगत होऊ शकतात.

बाळ जन्मल्यापासूनच्या पहिल्या दोन वर्षांत बाळाचा मेंदू खूप तल्लख असतो. बाळ खूप छोटं असलं, तरी त्याचा मेंदू या काळात खूप चालतो. आसपासच्या वातावरणातले सर्व स्पर्श, आवाज, दृश्‍य तो टिपून घेत असतो. त्याची पंचेंद्रियं मिळालेल्या सर्व माहितीला न्यूरॉन्सपर्यंत जोडण्याचं काम अव्याहत आणि वेगाने करत असतात. म्हणूनच, बाबाचा आवाज, बाबाचा स्पर्श बाळापर्यंत- त्याच्या न्यूरॉन्सपर्यंत फारसा पोचत नाही आणि बाळाच्या मेंदूत बाबाविषयीचे "सिनॅप्स' तयार होत नाहीत. आईची काळजी इतर स्त्रीवर्गानं घ्यावी आणि बाळाच्या काळजीत स्त्रीवर्गानं बाबाचा पुरेसा समावेश करायला हवा. हे त्यातलं महत्त्वाचं!

जे बाबा काही कारणांनी बाळापासून दूर, परगावी किंवा दूरदेशी असतात, त्यांनी वेळात वेळ काढून बाळाशी बोलायला हवं. जेव्हा जमेल तेव्हा बाळाबरोबर वेळ काढायला हवा. इतर बहुसंख्य बाबा घरात असूनही बाळापासून लांब असतात. त्यांनी ही काळजी घ्यायला हवी. ज्या घरात आई सिंगल पेरेंट असते, तिथं बाबाचा कप्पा रिकामाच राहतो. ती जागा आजोबा, मामा, काका, मित्र यांनी भरून काढायला हवी. ज्या घरात आई बाळापासून दूर असेल, आई या जगात नसेल, ती दूरदेशी असेल, तर इतरांनी हीच काळजी घ्यायला हवी.

मूल मोठं होत असताना त्याच्या जडणघडणीत आई आणि बाबा असा दोघांचाही वाटा असायला हवा. काही घरांमध्ये बाबाचा असा सहभाग असतोही; पण अशी घरं फार थोडी! बहुतेक वेळा ज्या घरामध्ये आई-बाबा दोघंही नोकरी करतात, त्या घरात मुलांची, त्यांच्या आजारपणाची, अभ्यासाची, वागण्याची, मुलांच्या मित्रमैत्रिणींची, त्यांना आणण्या-नेण्याची, त्यांची सिक्रेट्‌स जपण्याची, मुलांच्या वाढत्या वयात घरात शांतता टिकवून घेण्याची अशी बऱ्याच प्रकारची बहुतांश जबाबदारी आईच उचलताना दिसते. काही घरांमध्ये बाबाकडे घराबाहेरची आणि आईकडे घराची जबाबदारी अशी विभागणी असते, तिथंही आणि बऱ्याच घरांमध्ये जिथं अशी विभागणी नाही, आईसुद्धा दिवसभर नोकरी/व्यवसायात असते. तिथंही आईच मुलांबरोबर असते. आपल्या लहानग्या मुलांच्या संगोपनात आपला काही वाटा असू शकतो हेच त्यांच्या लक्षात येत नाही.

निदान बाळाच्या जन्मानंतर पहिल्या दिवसापासून आईइतकाच सहवास बाबाचाही मिळाला तर चांगलं. त्याला जपणं, सांभाळणं, त्याची कामं करणं हे लहान वयात करता येईल. मूल मोठं होईल, तसं त्याच्याशी खेळण्यासाठी वेळ राखून ठेवणं हे बाबाला करता येईल. गोष्टी सांगणं, वाचून दाखवणं, स्वत:बरोबर फिरवणं, कामाच्या ठिकाणी घेऊन जाणं- किमान काही गोष्टी दाखवणं, जगातल्या वाईट गोष्टींचीही ओळख करून देणं अशा गोष्टी केल्या, तर बाबाकडून मुलं-मुली कित्येक गोष्टी शिकतील. बाबाबरोबर असल्याचा वेगळा फायदा मुलांच्या मेंदूला मिळेल. मुलांच्या मेंदूविकासाला वेगळे कंगोरे मिळतील.

आजवरच्या बहुसंख्य घराचा विचार करता बाबा हा आईपेक्षा थोडा लांबचा असतो. ज्याचा धाक वाटावा असा तो असतो. काही घरांमध्ये तर फक्त पैसे मागण्यापुरताच बाबाचा उपयोग असतो, तर काही घरांमध्ये चिडका, तापट असल्यामुळे बाजूला पडतो. काही घरांमध्ये व्यसनी असल्यामुळे घरचे त्याला लांब ठेवतात. कित्येक घरांमध्ये कामानंतरचा वेळ बाबा मित्रांबरोबर घालवतात, आई मात्र काम झाल्यावर लगेच पिल्लांपाशी पोचते. कोर्टदेखील आईलाच झुकतं माप देतं. आईचा सहवास महत्त्वाचा असतो, तसा बाबाचाही असतो. हे बाबाला कळून वळायलाही हवं. आपण बोकाबाबा आणि वाघबाबाच्या जवळचे, की आपण पक्षीबाबाच्या कुळातले, याचा निर्णय बाबावर्गानं घ्यायला हवा. आपली मुलं कोणत्याही वयाची असली तरी संवाद साधायला हवा. उशीर झाला असला आणि मुलांच्या आयुष्यातली ती महत्त्वाची वेळ निघून गेलेली असली, तरी मेंदू या प्रयत्नांची दखल नक्की घेईल. "सिनॅप्स' नक्कीच तयार होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com