वेगळ्या मुलांना जपताना... (श्रुती पानसे)

डॉ. श्रुती पानसे drshrutipanse@gmail.com
रविवार, 16 डिसेंबर 2018

मुलं अनेकदा वेगळी असतात, वेगळी वागतात. त्याचा ताण आई-बाबा घेतात आणि तो पुन्हा वागण्यात दिसायला लागतो. अशा प्रकारे आई-बाबा जेवढा जास्त ताण घेतात, तेवढेच ते आपल्याच प्रिय मुलांपासून दुरावतात. असा दुरावा येऊ नये म्हणून काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. मन जागेवर ठेवायला हवं. मन जागेवर असेल, तर त्याच परिस्थितीमध्ये आपण अतिशय योग्य विचार करतो. अर्थात मुलं विचित्र वागत असतील, मुद्दाम वागत असतील तर त्यांचं काय बिनसलं आहे हेही बघायला हवं. अनेक घरांमध्ये अघटित घटना घडूनही आई-बाबा सावरतात. अशांची मुलं कितीही वेगळी असोत, त्यांच्यात दुरावा निर्माण होत नाही.

मुलं अनेकदा वेगळी असतात, वेगळी वागतात. त्याचा ताण आई-बाबा घेतात आणि तो पुन्हा वागण्यात दिसायला लागतो. अशा प्रकारे आई-बाबा जेवढा जास्त ताण घेतात, तेवढेच ते आपल्याच प्रिय मुलांपासून दुरावतात. असा दुरावा येऊ नये म्हणून काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. मन जागेवर ठेवायला हवं. मन जागेवर असेल, तर त्याच परिस्थितीमध्ये आपण अतिशय योग्य विचार करतो. अर्थात मुलं विचित्र वागत असतील, मुद्दाम वागत असतील तर त्यांचं काय बिनसलं आहे हेही बघायला हवं. अनेक घरांमध्ये अघटित घटना घडूनही आई-बाबा सावरतात. अशांची मुलं कितीही वेगळी असोत, त्यांच्यात दुरावा निर्माण होत नाही. मुलांना ते सतत तराजूत तोलत नाहीत.

छान कुटुंब, छानसं घर. त्यातली हुशार, शहाणी, गोजिरवाणी, समंजस मुलं-मुली. असं चौकटीतल्या घराचं चित्र प्रत्येकाचं नसतं. चौकटीच्या तीन बाजू व्यवस्थित असतात. चौथी बाजू लटकी नाही तर तुटकी असते, किंवा जागेवरच नसते. ही चौथी बाजू एकदाची नीट व्हावी, चौकटीत व्यवस्थित बसावी, म्हणजे संपूर्ण चौकटीला नीट रंग देता येईल, आतलं चित्र उठून दिसेल. सजेल. हे चित्र आपलं आपल्यालाच आवडेल, म्हणून तर आपली सगळी धडपड सुरू असते. विविध बाजूंनी आपण प्रयत्न करतो. "जसं आहे तसं स्वीकारावं... आणि पुढे जावं,' असं म्हणत राहावं. मात्र, आपले प्रयत्न सोडू नयेत. आपले प्रयत्न योग्य दिशेने आहेत का, याची मनाशी खात्री असणं फार आवश्‍यक.

मुलं हसरी असतात. निरागस असतात, खूप आनंद देतात. मात्र, कधी स्वप्न एक पडतं आणि प्रत्यक्षात वेगळंच घडतं. हसऱ्या बाळाचं चित्र डोळ्यांसमोर असतं; पण मुलं खूप रडतात. किरकिरी होतात. सकाळी उठतानाही रडत उठतात. सगळ्यांचाच दिवस मग तसाच वाईट जातो. ही आई-बाबांची परीक्षा असते. मुलांनी फार नाही; पण आपापला अभ्यास नीट करावा, इतकी सर्वसाधारण अपेक्षा असताना शाळेतून वर्तणुकीच्या तऱ्हेतऱ्हेच्या तक्रारी येतात. कधी अभ्यासाच्या तक्रारी सुरू होतात ः "एकाग्रता नाही... स्मरणशक्ती नाही. मुलांना करायला जमतं; पण करत नाही. मूल अभ्यास करतं; पण विसरून जातं. सगळं लक्षात राहतं, पण "सिली मिस्टेक्‍स' होतात.' या गोष्टी एकामागोमाग सुरूच राहतात. संपत नाहीत. ही परीक्षा, ती परीक्षा. हा अभ्यास ती स्पर्धा. यात जमेल तशी मुलं मोठी होतात. आई-बाबा परीक्षा देतच राहतात.

काही मुलं लहानपणापासून अव्यक्त असतात. कारण अशी मुलं अंतर्मुख असतात. इन्ट्रोव्हर्ट असतात. अंतर्मुख असणं हा त्यांच्या स्वभावाचा एक नैसर्गिक भाग असतो. ही मुलं मंद नसतात. ही मुलं पुरेशी हुशार नाहीत, असं काही नसतं; पण त्यांना गप्प राहायला आवडतं. शांत राहणं, पटकन्‌ मत न देणं हा स्वभावाचा एक भाग आहे. तो आई-बाबांनी समजून घ्यायला हवा. कदाचित अशी मुलं "झाकलं माणिक' असू शकतात.

मुलांचा नकारात्मकतेकडं झुकणारा स्वभाव हा आई-बाबांसाठी एक ताणाचा विषय. कधी हट्टी, कधी खूप तापट, अहंकारी आणि उद्धट. काही मुलं आई-बाबांना गुंडाळण्यात पटाईत. खोटं बोलण्यात सराईत. काही घरांमध्ये मुलांना वाट्टेल तसं बोलतात, त्यांचा सतत अपमान करतात. मुलं लहान असेपर्यंत ऐकून घेतात. जरा मोठं झालं, की ते आई-बाबांच्या अंगावर ओरडतात. लहानपणापासून फक्त मुलांच्या हिताचा विचार करणाऱ्या आई-बाबांना हे कसं सहन होईल? ही आई-बाबांची अजून एक परीक्षा.
काही वेळा मुलं आई-बाबांचं ऐकून ऐकून इतकी वैतागतात, की स्वत:ला घरापासून दूर करतात. घराकडं कमीच फिरकतात, बाहेरच राहतात. अठरा वर्षांच्या आत असं काही घडणं वाईटच! आई-बाबा रागावतात, म्हणून आईबाबांनाच नाकारायचं ही मोठीच समस्या आहे; पण एक लक्षात घ्यायलाच हवं, की मुलांच्या सहनशक्तीलादेखील मर्यादा असतात. मुलांना किती बोलायचं? काय बोलायचं? किती वेळा बोलायचं? आपण मुलांना बोलतो तेव्हा त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल? काहीही परिणाम होत नसेल का? आपल्या रागावण्यातल्या किती गोष्टी त्यांच्या सुप्त मनात शिरकाव करून बसल्या असतील? हे बघायला नको का?
अनेक आई-बाबा मुलांच्या वागण्याचा ताण घेतात म्हणून ते बोलतात. स्वत:चा ताण मुलांच्या मनावर टाकतात. अशा प्रकारे आई-बाबा जेवढा जास्त ताण घेतात, तेवढेच ते आपल्याच प्रिय मुलांपासून दुरावतात. असा दुरावा येऊ नये म्हणून काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. "माझं काम, माझी नोकरी- व्यवसाय, माझं अपयश, माझी अर्थिक परिस्थिती याचा खूप जास्त ताण माझ्या मनावर आहे का? मुलं जर माझ्याशी उद्धटपणानं वागत असतील, वेगळीच वागत असतील, मला त्रास होईल असं बोलत असतील, तर आपण आपल्यावरचा ताण त्यांच्यावर लादलाय का,' हे तपासायला हवं.

तसं जाणवलं, तर स्वत:ला सावरायला हवं. आपलं मन जागेवर नसेल तर- आपण कितीही शहाणे, सुशिक्षित असलो तरी- या मनाकडून काहीच चांगलं घडत नाही. विचार न करताच अचानक तीव्र प्रतिक्रिया दिल्या जातात. मात्र, हेच मन छान जागेवर असेल, तर त्याच परिस्थितीमध्ये आपण अतिशय योग्य विचार करतो. विचार जागेवर असणं ही केव्हाही चांगली गोष्ट आहे आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे ती आपल्या हातातली गोष्ट आहे.

मात्र, मुलं विचित्र वागत असतील, मुद्दाम वागत असतील तर त्यांचं काय बिनसलं आहे हे बघायला हवं. तिथंही काही सापडलं नाही, हा उगाचच हट्टीपणा चालला आहे असं लक्षात आलं तर योग्य शब्दांत समज द्यावीच लागेल. काही वेळा आपल्या प्रिय मुलांमुळं आपल्या मनात एक असमाधानाची भावना जन्म घेते. आपणच चांगले आई-बाबा नाही असं वाटायला लागतं. या अपराधी आणि अपयशी भावनांमुळं आपण हेलावून जातो. स्वत:च्या क्षमतांबद्दल शंका निर्माण होते, ही भावना कधी रागामध्ये बदलते. संतापानं व्यक्त होते, तर कधी उलट दिशेनं प्रवास करत आपल्याला नैराश्‍याकडं नेते. दोन्ही गोष्टी वाईटच. म्हणून मन जागेवर पाहिजे.

असं शोधायला हवंय की, कदाचित आपल्यातल्या आई-बाबांचा जन्म व्हायच्या आधी खरंच हसरे, खेळकर होतो. आयुष्याचा आनंद घेत होतो; पण आता ते जमत नाहीये. कोणीतरी शिरावर मोठ्ठी जबाबदारी टाकल्यासारखं झालं आहे आणि म्हणून साध्या साध्या गोष्टींचाही आनंद घेता येत नाहीये. मुलांबरोबर आनंदाचे क्षण घालवता येत नाहीयेत. स्वत:बद्दल असं काही लक्षात आलं, तर मनाला जागेवर आणलं पाहिजे. ते आनंदाचे क्षण परत आणायला हवेत. हे काम आपणच करायला हवं. आपल्या आनंदाचे मार्ग आपल्याला नीटच माहीत असतात. अशी अनेक घरं आहेत, ज्यांच्या आयुष्यात अघटित घटना घडूनही ते सावरतात. त्यांची मुलं कितीही वेगळी असोत, त्यांच्यात दुरावा निर्माण होत नाही. मुलांना ते सतत तराजूत तोलत नाहीत. उलट मुलांना त्यांच्या सर्व "सिली मिस्टेक्‍स'सह समजून घेतात. याचा अर्थ त्यांची मुलं फार चांगली वागतात, सुतासारखी सरळ असतात किंवा चौकटीत असतात, असं नाही. विविध प्रकारे ती वेगळीच असतात. कधी बुद्धीनं वेगळी, कधी मेंदूनं वेगळी, कधी अक्षम असतात. स्वभावानं विचित्र असतात. कधी ही मुलं "कुरूप, वेडी पिल्लं' नसून "राजहंस' असतात; पण या राजहंसाची खूणच पटलेली नसते. त्या मुलांनाही हे माहीत नसतं आणि आई-बाबांनाही! हे उशिरा समजतं; पण तोपर्यंत या घरांची- आई-बाबांची मुलांबद्दल असलेली जवळीक सततच परीक्षा देत असते. ही जवळीक कधी ताणली जाते, कधी अतिसैल पडते; पण तुटत मात्र नाही. उलट नातं अजून घट्ट होतं. संकटांना तोंड देत हे एकमेकांनाही जपतात. आपल्या वेगळ्या मुलांचं वेगळेपण स्वीकारत, जपत!

Web Title: dr shruti panse write article in saptarang