अवघड ‘वळण’ (डॉ. श्रुती पानसे)

dr shruti panse write article in saptarang
dr shruti panse write article in saptarang

विघातक गोष्टींत गुंतलेली मुलं सर्व स्तरांतली, सर्व वर्गांतली, कोणत्याही घरातली आहेत, हे वास्तव आहे. आज जी मुलं चौदा वर्षांच्या पुढं आणि अठराच्या आसपास आहेत, त्या वयात ‘हे कुठलं वळण?’ असं म्हणण्याची वेळ आई-बाबांवर आणि शिक्षकांवर आलेली आहे. कारण टीनएजमधलं मूल घर-कुटुंब आणि शाळेपेक्षा अगदीच वेगळं वागताना दिसत आहे. विविध प्रश्नांमुळे तुम्ही अतिशय काळजीत असाल तर लक्षात घ्या, की हे केवळ आपल्याच घरातल्या मुलग्याबद्दल आणि मुलीबद्दल घडलेलं नाही. आसपासच्या बऱ्याच घरांमध्ये कमी-अधिक फरकानं अशाच गोष्टी होताहेत.

‘‘ही  अमुक घरातली मुलगी म्हणजे त्यांच्या अमुक पद्धतीनंच वागणार.’’
‘‘हा अमुक शाळेतला मुलगा त्या शाळेच्या शिस्तीची छाप त्याच्यावर जाणवतेच आहे.’’
असा काही एक अंदाज बांधला जायचा; पण आता ही गोष्ट हळूहळू मागे पडणार अशी चिन्हं आहेत.
‘‘हा त्या ‘क्ष’ व्यक्तीचा मुलगा आहे, पण व्यसनानं पूर्ण पोखरलेला आहे,’’ अशी वाक्‍यं कानावर येऊ शकतात.
जोपर्यंत मुलं नऊ-दहा वर्षांची असतात, तोपर्यंत ती खरंच आई-बाबांच्या बरोबर असतात आणि आईबाबांसारखीच असतात; पण टीन एजमध्ये येईपर्यंत आणि त्यानंतरच्या काळात त्यांचं विश्व स्वतंत्र होतं. वास्तविक हे अपेक्षितच आहे. मुलामुलींची विश्वं स्वतंत्र व्हायलाच हवीत. मुलंमुली आपल्या आयुष्याचा माग काढत, स्वत:ला योग्य अशा भविष्याचा शोध घेत राहतात. पुढे जात राहतात. कधी हा शोध त्यांना आवडीच्या; पण इतरांना बिनमहत्त्वाच्या वाटलेल्या क्षेत्राकडे घेऊन जातो. (पण ते इतरांना काय वाटतं आहे याची फिकीर करत नाहीत.) कधी वेगळ्याच एखाद्या देशा-प्रदेशात शिक्षण-नोकरीसाठी घेऊन जातो, तर कधी वेगळ्या देशात करिअर घडवण्याची पुरेपूर संधी असतानाही स्थानिक प्रश्नांकडे वळवतो. काही दुर्दैवी वेळा अशाही येतात, की मुलामुलींची पावलं विधायक गोष्टींकडे न वळता विघातक आणि विशेषत: स्वयंघातक गोष्टींकडे वळतात. गेल्या काही वर्षांत परदेशी शिक्षण - करिअर करू पाहणाऱ्या मुलांच्या संख्येत सातत्यानं वाढ होताना दिसते आहे. सरधोपट काही न करता स्वत:च्या, वेगळ्या वाटा निवडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. आजवर घरात चालत आलेल्या गोष्टींसारखंच पुढे सरळ रेषेत न धावता कधी तीस अंशात, नव्वद अंशात, तर अजून विस्तारित म्हणजे एकशे वीस अंशात  किंवा थेट एकशे ऐंशी अंशात विरुद्ध दिशेनं धावताना दिसताहेत.

गंभीर होण्याची गरज
सगळंच काही सोपं नाही. समीकरण सोडवताना अचानक उणे (-) चिन्हं दिसू लागताहेत. या सगळ्याचं कारण गेल्या काही महिन्यात वाचनात- चर्चेत आणि टीव्हीवरून प्रसारित झालेल्या बातम्या आणि टॉक शोमधून समोर आलेली आकडेवारी. काही घटना गंभीरपणे विचार करायला लावत आहेत. आपलं मूल कोणत्याही वयाचं असो; या परिस्थितीकडे बघायला हवं. कारण हा प्रश्न आज ना उद्या आपल्याही घरात डोकवणार आहे. अशाच संदर्भात बोलताना ‘अ-भय अभियाना’च्या कर्त्या आणि अभ्यासक गौरी देशमुख म्हणाल्या होत्या, की ‘आपली मुलं याच समाजाचा भाग आहेत. आपण त्यांना बंद दाराआड वाढवू शकत नाही.’ या विधानाचा संदर्भ घेत असं वाटतं, की पालककट्ट्यावर या विषयांची चर्चा व्हायला पाहिजे.

ताज्या आकडेवारीतून एकूण मुलग्यांमध्ये व्यसनं वाढताना दिसत आहेत, तशीच व्यसनं करणाऱ्या मुलींचं प्रमाणही चांगलंच वाढल्याचं आकडेवारीत दिसून आलेलं आहे. हेच टीन एजमधल्या मुलांच्या हातून घडणाऱ्या हिंसेबद्दलही म्हणता येईल. खून, बलात्कार, मैत्रिणीचं वाईट व्हिडिओ शूटिंग, हातात सदैव असणाऱ्या मोबाईल्समधून वाहणाऱ्या अश्‍लील क्‍लिप्स, हुक्का पार्लर हे सगळे शब्द आजच्या टीन-एजसंदर्भात बोलले जातात, ही मोठीच धोक्‍याची घंटा आहे. अशा विघातक गोष्टींत गुंतलेली मुलं सर्व स्तरांतली, सर्व वर्गांतली, कोणत्याही घरातली आहेत हे वास्तव आहे.आज जी मुलं चौदा वर्षांच्या पुढे आणि अठराच्या आसपास आहेत त्या वयात ‘हे कुठलं वळण?’ असं म्हणण्याची वेळ आई-बाबांवर आणि शिक्षकांवर आलेली आहे. कारण टीनएजमधलं मूल घर-कुटुंब आणि शाळेपेक्षा अगदीच वेगळं वागताना दिसत आहे. जर विविध प्रश्नांमुळे तुम्ही अतिशय काळजीत असाल तर लक्षात घ्या, की हे केवळ आपल्याच घरातल्या मुलग्याबद्दल आणि मुलीबद्दल घडलेलं नाही. आसपासच्या बऱ्याच घरांमध्ये कमी-अधिक फरकानं अशाच गोष्टी होताहेत.

वयाचं नाजूक वळण
वास्तविक आजच्या मुलांना त्यांच्या आई-बाबांनी पूर्वीच्या हुकूमशाही पद्धतीनं वाढवलेलं नाही. बऱ्याच अंशी मुलांच्या कलानं वाढवलं आहे. त्यांच्यावर प्रेम करत, कल लक्षात घेत आणि त्यांचं म्हणणं ऐकत, त्यांना घरात बरोबरीचं स्थान देत, आधुनिक पद्धतीनं वाढवलं आहे. यासाठी कित्येकदा दोन्हीकडच्या आजी-आजोबांशी वादही घातलेला आहे. खर्च तर भरपूरच केलेला आहे; पण तरीही या आधीच्या काळात सहज-शांत असलेलं घर मुलांच्या या वयाच्या वळणावर अचानक अशांत आणि धुमसतं होतं. घरात कोणत्याही वेळेला पहाटेपासून ते रात्रीपर्यंत कधीही युद्धजन्य परिस्थिती उद्भवू शकते. यात अनेकदा मुलांचा आवाज वरचढ असतो आणि आईबाबांनी स्वत:च्या म्हणण्यानुसार गोष्टी रेटायचा प्रयत्न केला, तर वातावरण जास्त तापतं.  शंभर टक्के चुकत असली, तरी मुलं जाम क्‍लिअर आणि सॉर्टेड (त्यांच्याच भाषेत) असतात आणि आईबाबा कन्फ्युज्ड- जास्त कन्फ्युज्ड आणि शेवटी दमलेले आणि थकलेले असतात.   

मुलांना झेलणं हे दिवसेंदिवस अवघड का होत चाललं आहे? मुलांना हे वळण कोण लावतंय याचा विचार करायलाच हवा आहे.  मुलं टीन एजमध्ये येतात तेव्हा त्यांच्यात थोडा नाठाळपणा वाढतो. थोडी बेफिकिरी वाढते. आपलंच म्हणणं खरं करण्याची वृत्ती वाढते. त्यांच्या मेंदूत होणाऱ्या रासायनिक बदलांमुळे अव्यवस्थितपणा वाढतो. याचा परिणाम निर्णयक्षमतेवर होतो. हे सर्व आई-बाबांनाही वाचून माहिती आहे. परंतु यापलीकडे जाऊन मुलं जेव्हा असंस्कारित पद्धतीचं वर्तन करतात, रस्त्यावरच्या भांडणातल्या शिव्या घरात येतात, मुलांच्या आणि मुलींच्याही दप्तरात सिगरेटची पाकिटं दिसतात, तेव्हा यावर मार्ग काढायचा कसा हा प्रश्न भंडावून सोडतो.

टेक्‍नॉलॉजीचा भयंकर पगडा
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पिढीवर बसलेला टेक्‍नॉलॉजीचा भयंकर पगडा. लहानपणी पुंगीवाल्याची आणि त्याच्या मागोमाग जाणाऱ्या उंदराची गोष्ट ऐकली होती. आता सोशल मीडियाच्या मागंमागं जाणारी आपली मुलं बघून या गोष्टीची आठवण येते. स्वतः टेक्‍नॉलॉजीचा कामासाठी वापर करणाऱ्या आई-बाबांच्या समोर हा आजच्या युगाचा कळीचा प्रश्न तयार झाला आहे- ज्याचं उत्तर आज कोणाकडेच नाही. हुकूमशहासारखी मोबाईलबंदी करावी, तर शाळा-कॉलेजमध्ये शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे समूह असतात- त्यामुळे कोणतीही टेक्‍नॉलॉजिकल वस्तू बंद करू शकत नाही आणि अर्धवट चालू ठेवू शकत नाही. मुलं आपली आहेत, त्यामुळे मुलांवर शंभर टक्के विश्वास ठेवायला हवा, मात्र तो विश्वास अंधविश्वास नाही ना, याची खात्री मात्र करून घ्यायला हवी.

संवादाचा ‘गुरू’मंत्र
शाळा कोणतीही असो; शाळेच्या मधल्या सुटीत, व्हॅनमध्ये किंवा शाळांमध्ये जाता-येता सर्व वयाची मुलं एकत्र असतात आणि तिथूनही लहान मुलांना बरंच ‘महत्त्वाचं’ शिक्षण मिळतं हे सहजी लक्षात येत नाही. मुलांच्या बदललेल्या सवयी,  मुलांच्या तोंडात अचानक येणारे शब्द,  त्यांना कळत किंवा नकळतपणे मिळणारं बरंच ज्ञान या मार्गातून मिळत असतं. जेव्हा पहिल्यांदा- दुसऱ्यांदा असं घडतं तेव्हाच या विषयावर चिडणं, रागावणं नाही, तर एकत्र बसून बोलायला हवं. असे शब्द वापरणं फारसं चांगलं समजत नाहीत, हे सहजपणे सांगितलं गेलं पाहिजे.

दहा वर्षांपर्यंतच्या मुलांचा सर्वात मोठा गुरू म्हणजे घरात ठाण मांडून बसलेला टीव्ही. घरामध्ये अखंड आणि अव्याहतपणे वाहणाऱ्या मालिका कधी सुरू असतात, तर कधी जाहिराती. या सगळ्यामुळे अतिशय संवेदनशील मनाच्या मुलांवर विविध प्रकारचे किंवा चित्र-विचित्र प्रकारचे परिणाम होत असतात. मुलांचं मन सर्व काही टिपून घ्यायला उत्सुक असल्यामुळे या सगळ्याचा परिणाम त्या बालमनावर होत असतो. आई-बाबा मुलांबरोबर घरात आहेत असं म्हटलं, तरीही टीव्ही चालू असेल तर तोही वळण लावण्याचं काम करतो आहे, हे अजिबातच विसरून चालणार नाही. पूर्वीच्या काळाशी तुलना करायची झाली, तर असे विविध गुरू घरांत नसायचे. त्यामुळे काही अपवाद वगळता हे आई-बाबांचं मूल आहे हे बऱ्याच अंशी ओळखून यायचं. आता तसं होताना दिसत नाही.

मुलं वाट्टेल त्या वेळी, वाट्टेल ते प्रश्न विचारतील, या प्रश्नांचा धाडसानं सामना करा. तुम्ही तुमच्या आई-बाबांना असे प्रश्न कधीही विचारले नसतील तरीही. काँडोम्सविषयक एखाद्या प्रश्नाचा गुगली सकाळी प्रसन्न मनानं चहाचा कप हातात असतानाही विचारला जाऊ शकतो, किंवा एखाद्याच्या लग्नप्रसंगी मुलांना मनातली उत्सुकता अचानक जाहीररीत्या प्रदर्शित करावीशी वाटेल, तेव्हा त्यासाठी तयार राहा. आज संवाद टाळू नका; कारण पुढे जाऊन कदाचित तो पूर्णच थांबू शकतो.
दहा-बारा वयापर्यंतची मुलं अजूनतरी खरंच निरागस असतात. या प्रश्नांची उत्तरं दिलीत तर त्यांच्या मनातली वाफही बाहेर पडेल आणि आपसातलं नातं जास्त घट्ट आणि निकोप होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com