समकालीन जर्मन साहित्य

आधुनिक जर्मन साहित्याचा विषय निघाला की बऱ्याच रसिक आणि दर्दी वाचकांना बेर्टोल्ट ब्रेष्ट, थोमास मान, हरमन हेस, ग्युंथर ग्रास अशी काही मोजकी नावं आठवतात.
समकालीन जर्मन साहित्य
Summary

आधुनिक जर्मन साहित्याचा विषय निघाला की बऱ्याच रसिक आणि दर्दी वाचकांना बेर्टोल्ट ब्रेष्ट, थोमास मान, हरमन हेस, ग्युंथर ग्रास अशी काही मोजकी नावं आठवतात.

- डॉ. सुनंदा महाजन mahajan.sunanda@gmail.com

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळ्या भाषांमधल्या समकालीन साहित्यप्रवाहांचा परिचय या साप्ताहिक सदरातून विविध लेखक करून देतील.

आधुनिक जर्मन साहित्याचा विषय निघाला की बऱ्याच रसिक आणि दर्दी वाचकांना बेर्टोल्ट ब्रेष्ट, थोमास मान, हरमन हेस, ग्युंथर ग्रास अशी काही मोजकी नावं आठवतात. त्यांचं साहित्यही त्यांनी जर्मनमधून अथवा इंग्लिशमधून, क्वचित् मराठीतून वाचलेलं असतं. आजच्या जर्मन साहित्यावर नजर टाकली असता एक खूपच मोठा व्यापक पट डोळ्यांसमोर उलगडतो. जर्मनी, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड या तिन्ही जर्मनभाषक देशांतील लेखक-कवी-नाटककार यांनी लिहिलेलं साहित्य यांत अभिप्रेत आहे.

यातील काही लेखकांचं साहित्य मी अभ्यासाच्या निमित्तानं वाचलं, तर बरचसं साहित्य आवडीनं वाचल्यानं परिचयाचं झालं. त्या वाचनातून आणि मी केलेल्या काही जर्मन पुस्तकांच्या भाषांतरांमधून मला उमगलेल्या आजच्या जर्मन साहित्याची एक झलक या लेखातून मांडायचा प्रयत्न करते.

गेल्या दोन-तीन वर्षांत प्रामुख्यानं कथा-कादंबऱ्यांमधून शहरांमधील नागरी संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर घडणारी कथानकं लहान गावांत किंवा खेड्यांमध्ये घडताना दिसू लागली आहेत, असं दोन चार बेस्टसेलर ठरलेल्या कादंबऱ्यांवरून दिसून येत आहे, तर काही कादंबऱ्यांमधून शारीरिक किंवा मानसिक दुर्धर आजारांशी लढताना कथानायक मृत्यूच्या अगदी जवळ जात आपला अनुभव कथन करताना दिसतात. काही कादंबऱ्यांचा विषय अजूनही ‘जुन्या किंवा नजीकच्या इतिहासातील घटना’ असा असतो, म्हणजे हिटलरच्या हुकूमशाहीत ज्यूधर्मीयांची झालेली ससेहोलपट असो किंवा जर्मनीचं एकीकरण होण्याच्या आधी पूर्व जर्मनीतील कम्युनिस्ट दडपशाहीतील अनुभव असोत किंवा एकीकरणानंतरचं बदललेलं आयुष्य असो...तर काही लेखक इतरही काही ऐतिहासिक घटना वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून भूतकाळाचा वेध घेत मांडतात.

स्त्रियांच्या प्रश्नांना भिडणाऱ्याही आन्टए राविक श्टूबेलसारख्या काही लेखिका आपला वेगळा ठसा उमटवताना दिसतात. जर्मनीत काही साहित्यिकांना स्थलांतराची पार्श्वभूमी आहे, काही लेखक मूळचे तुर्कस्तानातील आहेत, ते आपली धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक ओळख कोणती हा शोध घेताना दिसतात, तर काही लेखक पूर्व युरोपातील काही देशांतून, म्हणजे युगोस्लाव्हिया, हंगेरी, रूमानिया, झेक रिपब्लिक इत्यादी देशांतून जर्मनीत स्थलांतरित होऊन आले आहेत व आधीच्या आणि स्थलांतरित म्हणून आत्ताच्या आयुष्यातील आपले अनुभव शब्दबद्ध करताना ते दिसतात.

जगाच्या कानाकोपऱ्यातून जर्मनीत पूर्वी आणि नव्यानं आलेल्या, कालांतरानं जर्मन भाषा नुसतीच आत्मसात नव्हे तर, त्या भाषेत समर्थपणे लेखन करू शकणाऱ्या, अशा काही लेखकांनी जर्मन साहित्यात मोलाची आणि महत्त्वाची भर घातली आहे.

याचं उदाहरण द्यायचं झाल्यास, बालपण पूर्वीच्या युगोस्लाव्हियातील एका खेड्यात घालवलेल्या, तिथं उसळलेल्या भीषण वांशिक युद्धानंतर जर्मनीत विस्थापित झालेल्या कुटुंबातून आलेल्या साशा स्टानिचिक नावाच्या लेखकाचं देता येईल. आज एक प्रस्थापित जर्मन लेखक म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. ‘हेरकुन्फ्ट’ (२०१९) म्हणजे ‘मायदेश’ या अर्थाचं शीर्षक असलेल्या कादंबरीत आपल्या मूळ गावाची, मायदेशाची, विस्थापनाची आणि जर्मनीत १९९२ पासून एक नवीन आयुष्य सुरू करण्याच्या धडपडीची गोष्ट तो सांगतो. बाल्कन युद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या या पुस्तकाला २०१९ चा जर्मन बुकप्राईझ हा प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार मिळाला आहे.

एव्हा मेनासे या ऑस्ट्रियन लेखिकेची व्हिएन्ना ही २००५ मधील कादंबरी एका ज्यू-कुटुंबाची तीन पिढ्यांची कहाणी सांगते. ज्यू-धर्मीय असल्यानं दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना इंग्लंडला तात्पुरतं स्थलांतर करावं लागतं, युद्ध संपल्यावरचं बदललेलं व्हिएन्नातील आयुष्य, इतरत्र केलेली भ्रमंती यांतून युरोपातील विसावं शतकच उभं राहतं. ऑस्ट्रियातील प्रसिद्ध लेखक डॅनिएल केलमान त्याच्या ‘रूम’ (२००९) म्हणजे ‘प्रसिद्धी’ या पुस्तकामुळे चर्चेत होता. नऊ वेगवेगळ्या; परंतु एकमेकींत गुंतलेल्या गोष्टींची मिळून ही कादंबरी होते. आधुनिक तंत्रज्ञान आणि माणसांमधील परस्परसंवादाची डिजिटल माध्यमं यांविषयीची धास्ती तीतून व्यक्त होते.

सन २०१३ मध्ये लाईपत्सिग पुस्तकजत्रेचा पुरस्कार मिळालेली, स्वानुभवावर आधारलेली, यकृताच्या प्रत्यारोपणासारखा विषय हाताळणारी डाण्डिड वाग्नरची ‘लेबेन’ (२०१३) (मराठीत ‘स्वीकृत’ या नावानं उपलब्ध) ही कादंबरी आयुष्याविषयीचं, मृत्यूबद्दलचं चिंतन एका निराळ्या दृष्टिकोनातून करते, तर थोमास मेले या लेखकाची ‘द वेल्ट इम युकन’ (२०१६) ही आत्मकथनात्मक कादंबरी (‘आकाश-पाताळ’ या नावानं मराठीत उपलब्ध) ‘उभयावस्था’ म्हणजे ‘बायपोलर डिसऑर्डर’ हा मनोविकार जडलेल्या तरुणाची गोष्ट सांगत आपल्याला सुन्न करून सोडते.

निसर्गाच्या सान्निध्यात बर्लिनसारख्या मोठ्या शहराजवळ उंटरलॉयटन हे एक छोटंसं कल्पित गाव युली त्से या लेखिकेच्या कादंबरीत आहे. गावात शेती, तसंच दुर्मिळ होत चाललेल्या पक्ष्यांची कुरणांवर वस्ती असते...आता नव्यानं घोड्यांची पैदास करायला कुणी जागा घेऊ पाहतं...तर कुणी बर्लिनला कंटाळून तिथं येण्याचं ठरवतं...पूर्व जर्मन भागातील या गावातील बुजुर्गांनी वेगळीच राजकीय व्यवस्था अनुभवलेली असते...आता गावात पैसा, भांडवल येतं, जमिनीची खरेदी-विक्री करायला लोक येतात...एक कंपनी पवनचक्क्या उभ्या करायला जागेसाठी भरपूर किंमत मोजायची तयारी दाखवते...असा पैसा दिसायला लागल्यावर इतके दिवस छुप्या स्वरूपात असलेले गावातील मतभेद उघड होतात...तंटे, विश्वासघात होऊ लागतात आणि बाहेरून आलेले लोक त्या स्वप्नवत् वाटणाऱ्या गावाची वाट लावतात...युली त्से हिनं ते ‘उंटरलॉयटन’ (२०१६) या कादंबरीतून अतिशय प्रभावीपणे दाखवलं आहे. तब्बल ६३५ पानांचा भरभक्कम ऐवज असलेली ही कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते.

(सदराच्या लेखिका जर्मन भाषेच्या प्राध्यापिका आहेत, तसंच भाषांतरित साहित्याला वाहिलेल्या ‘केल्याने भाषांतर’ या त्रैमासिकाचं संपादन त्या करतात.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com