ऑक्‍सिजनचा मास्क (डॉ. वैशाली देशमुख)

dr vaishali deshmukh write article in saptarang
dr vaishali deshmukh write article in saptarang

पालकत्व हा एक "डिमांडिंग जॉब' आहे. त्यासाठी आई-बाबा शरीरानं आणि मनानं कणखर असायला हवेत. पालक निरोगी, आनंदी, समाधानी असतील, तर मुलांना सांभाळण्याचं शारीरिक आणि मानसिक बळ त्यांना मिळेल. अनेक पालक मात्र मुलांची लग्नं झाली, त्यांना मुलं झाली तरी त्यांची काळजी वाहणं सोडत नाहीत. मुलांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी तरी आपण त्यांच्या आयुष्यातून थोडं बाजूला होऊन स्वत:कडं बघायला हरकत नाही. आपल्या आवडीच्या गोष्टींना अधूनमधून खतपाणी घालत राहायला हवं, त्या जिवंत ठेवायला हव्यात. पालकांनी त्यांच्या मित्र-मैत्रिणींबरोबर सकारात्मक वेळ घालवताना, त्यातून ऊर्जा घेताना मुलांनी पाहायलाच हवं.

""मला वाटतंय मला मिडलाईफ क्रायसिस झालाय...'' स्वप्ना उसासून म्हणाली.
""काहीतरीच बोलू नकोस. उगीच आपले क्रायसिस वगैरे शब्द कशाला वापरायचे? सुख खुपतंय झालं तुला!'' अभयनं तत्परतेनं आपला निषेध नोंदवला आणि हातातल्या कामात- म्हणजे लॅपटॉपमध्ये- डोकं खुपसलं. मात्र, स्वप्नाचं मन खदखदत होतं. अभयचे शब्द दिवसभर तिच्या डोक्‍यात पिंगा घालत राहिले. हल्ली सारखी कसली तरी हुरहूर दाटून यायची. किती कायकाय करायचं राहून गेलंय असं काहीतरी मनात येत राहायचं, काहीतरी हातातून सुटल्यासारखं वाटत राहायचं.

स्वप्नाचं बोलणं अभयनं उडवून लावलं होतं खरं; पण त्याच्याही मनात विचारचक्र चालू झालं होतं. आजकाल संध्याकाळपर्यंत तो अगदी थकून जायचा. घरी आल्यावर कुणाशी बोलावंसंही वाटायचं नाही. काही वेळा त्याला वाटायचं आपण म्हणजे एक काम करून पैसे मिळवणारं मशीन झालोय. आपण हे सगळं का आणि कशासाठी करतोय असा प्रश्न पडायचा. ट्रिप्स, पार्ट्या, बाहेर जेवायला जाणं, हे सगळं व्हायचं- नाही असं नाही; पण त्यातून रिलॅक्‍स होण्याऐवजी दमूनच जायचा तो. मजेपेक्षाही त्यात कामाचा, नेटवर्किंगचा भाग अधिक असायचा म्हणून असेल. कामातून त्याच्या आवडत्या गिटारला द्यायला वेळ होत नव्हता आणि कित्येक दिवसात त्यानं एकही पुस्तकं वाचलं नव्हतं. अधूनमधून तब्ब्येतीच्या थोड्या थोड्या कुरकुरीही व्हायला लागल्या होत्या.
***

सुमेधाची दोन्ही मुलं शिकायला आणि नोकरीला बाहेर पडली तेव्हा तिची अवस्था अगदी केविलवाणी झाली. तिचं आयुष्य इतकं मुलांभोवती फिरत होतं, की स्वत:च्या आवडीनिवडी, छंद हे सगळे ती विसरूनच गेली होती. तिच्या उच्चशिक्षणातलं "अ, आ, इ, ई'सुद्धा तिला आठवेना. कशातच रस वाटेनासा झाला. एक मोठ्ठी पोकळी तयार झाल्यासारखी वाटली. नैराश्‍यानं तिला घेरून टाकलं.
***
ही झाली दोन प्रातिनिधिक उदाहरणं. बहुतेक पालकांनी आपलं आयुष्य मुलांना केंद्रबिंदू धरून त्यांच्याभोवती आखलेलं असतं. त्यांची बदलणारी वेळापत्रकं, वाढत जाणारा अभ्यास, हरतऱ्हेच्या मागण्या, या सगळ्याशी जमवून घेणं ही कसरतच असते एक. मात्र, ही कसरत पालक थोड्याफार वैतागानं; पण बहुतांशी आनंदानं करत असतात. टीनएजमध्ये मुलं शिरतात, तशा या चॅलेंजेसच्या तऱ्हा बदलतात. मग येतात अनाकलनीय भावनिक उद्रेक, केसांच्या आणि कपड्यांच्या चित्र-विचित्र तऱ्हा, नवनवीन मित्रमैत्रिणी आणि भविष्याच्या चिंता! मुलांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू त्यांचा स्वत:चा, वेगळा असतो. त्यांचं वर्तुळ वेगळं असतं. मुलं मोठी होतात, तसे त्यात आईबाबा हळूहळू बाजूला, परिघाकडं सारले जातात. पालकांसाठी मात्र त्यांचं मूल हे आयुष्यभर मूलच राहतं. खरंतर जगण्याच्या भयानक वेगाचा परिणाम आईबाबांच्या आयुष्यावर होत असतो; पण या सगळ्या गदारोळात आपलंही वय होतय, आपल्या काही नवीन गरजा निर्माण होतायत, मुलांपलीकडंही आपलं एक जग आहे, या सत्याकडं त्यांच्याकडून काणाडोळा केला जातो. पालकांना स्वत:कडं लक्ष देणं म्हणजे फार स्वार्थीपणा वाटतो. इतकंच नव्हे, तर स्वत:ला पीडा देण्यात एक छुपं समाधान मिळतं. आपल्याला शक्‍य आहे ते सगळं आपण मुलांसाठी केलं, अशा कृतार्थतेच्या भावनेसाठी कितीही त्रास सहन करायची त्यांची तयारी असते.

...पण पालकत्व हा एक "डिमांडिंग जॉब' आहे. त्यासाठी आईबाबा शरीरानं आणि मनानं कणखर असायला हवेत. विमानात ज्या सुरक्षेच्या सूचना देतात त्यातली एक महत्त्वाची सूचना असते, की "आणीबाणीच्या काळात वरून पडणारा ऑक्‍सिजनचा मास्क आधी तुम्ही स्वत:च्या नाकाला लावा आणि मग इतरांना मदत करायला जा.' तुम्ही स्वत: आधी सुरक्षित आणि शुद्धीवर असल्याशिवाय बाकीच्यांना मदत कशी करणार? तसंच, पालक निरोगी असतील, आनंदी असतील, समाधानी असतील तर मुलांना सांभाळण्याचं शारीरिक आणि मानसिक बळ त्यांना मिळेल. आपल्या भावना नियंत्रित करणं जमेल. ताणतणाव, ब्लड प्रेशर, प्रतिकारशक्ती कमी होणं, सततची आजारपणं, नैराश्‍य, संताप, मानसिक आजार हे दुष्परिणाम टाळता येतील. नाहीतर थकून जायला होईल, चिडचिड होईल, आपण चुकीचे वागलो की काय अशी भावना मन पोखरून काढेल. खूप घाई-गडबडीच्या वेळी, वैतागलेलो-दमलेलो असताना आपला मुलांशी जो काही संवाद होतो त्याचा नंतर पश्‍चाताप होतो, असा किती तरी वेळा असा अनुभव येतो.

मुलांच्या आयुष्यात पालक म्हणून आपण इतके गुंतलेले असतो, की हळूहळू निसर्गाचा मूळ उद्देश विसरून जातो. निसर्गानं आपल्यावर मुलांना जन्म देण्याचं आणि त्याचं पालन-पोषण करण्याचं काम सोपवलंय हे खरंय; पण ते कशासाठी? तर मुलांना स्वतंत्र, स्वावलंबी बनवण्यासाठी! पालक मात्र मुलांची लग्नं झाली, त्यांना मुलं झाली तरी त्यांची काळजी वाहणं सोडत नाहीत. मुलांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी तरी आपण त्यांच्या आयुष्यातून थोडं बाजूला होऊन स्वत:कडे बघायला हरकत नाही, हो ना? म्युझिक, डायरी लेखन, शांत बसून चहा पिणं, एखादं पुस्तक वाचणं, मित्र-मैत्रिणींबरोबर वेळ घालवणं, फिरायला जाणं, व्यायाम, कुणाबरोबर तरी गप्पा, समाजसेवा, मेडिटेशन अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून किती तरी आनंद घेता येतो. केलं नाही तरी फारसं बिघडणार नाही, असं एखादं काम टाळलं तर काही आकाश कोसळत नाही! आपल्या आवडीच्या गोष्टींना अधूनमधून खतपाणी घालत राहायला हवं, त्या जिवंत ठेवायला हव्यात. मग सुमेधासारखी पोकळी तयार होणार नाही. मनाच्या गरजांप्रमाणंच आपल्या शरीराच्या यंत्राला वयाप्रमाणे अधिक देखभालीची, डागडुजीची गरज लागणार. त्याकडं दुर्लक्ष करून कसं चालेल?

वेळेवर घेतलेला चौरस आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप अशा आरोग्यदायी सवयींचं आपले आईबाबा नेमानं पालन करतायत, हे मुलांनी पाहिलं तरच त्यांना त्या सवयी लागणार ना! पालकांनी त्यांच्या मित्र-मैत्रिणींबरोबर सकारात्मक वेळ घालवताना, त्यातून ऊर्जा घेताना मुलांनी पाहायलाच हवं. निरोगी मैत्री कशी असावी, समाजातल्या इतरांना मदत कशी करावी, त्यांच्याशी कसे संबंध ठेवावेत, मजा का करायला हवी आणि ती योग्य प्रकारे कशी करता येते या सगळ्याचा जिवंत वस्तुपाठ आईबाबांकडूनच तर घेणार मुलं! आणि आईबाबा आपापले छंद जोपासत असतील, नवनवीन गोष्टी शिकत असतील तर प्रौढपण कंटाळवाणं न वाटता जरातरी आकर्षक वाटेल त्यांना.

प्रश्न येतो वेळेचा! पण खरंच आपण एवढाही वेळ काढू शकणार नाही का? समजा आपण हायवे वरून चाललोय आणि पेट्रोल संपत आलंय, तर वेळ नाही म्हणून आपण पेट्रोल भरायचं टाळू का? नाही ना? मग आईबाबांनाही हे असं अधूनमधून इंधन भरणं गरजेचं नाही का? आपल्या स्वत:साठी हे करायला नको वाटतंय ना? मग मुलांसमोर सकारात्मक उदाहरण ठेवण्यासाठी, त्यांना स्वावलंबी करण्यासाठी, कणखर बनवण्यासाठी, मुलांबरोबरचं आपलं नातं निरोगी ठेवण्यासाठी, आपलं मानसिक संतुलन शाबूत ठेवण्यासाठीतरी आपला स्वत:चा हा खास "मी टाइम' महत्त्वाचा आहे. एखाद्या गोष्टीकडं भिंगातून पाहिलं तर इतर काहीही न दिसता फक्त ती गोष्टच भल्या मोठ्या स्वरूपात दिसते. ते भिंग बाजूला केलं, तर मात्र त्याचा संदर्भ समजतो, आजूबाजूच्या इतर अनेकविध घटकांचं भान येतं. डोळ्यांसमोरचं मुलांकडं पाहण्याचं भिंग जरा दूर केलं, तर आपल्याही नजरेत थोडी विशालता आणि विविधता येईल. आपल्याला आणि मुलांनाही थोडा मोकळा श्वास घ्यायला अवकाश मिळेल, नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com