एकमेकां साह्य करू... (डॉ. वैशाली देशमुख)

dr vaishali deshmukh write article in saptarang
dr vaishali deshmukh write article in saptarang

पूर्णपणे स्वत:वर अवलंबून राहण्यापासून ते दुसऱ्याच्या मदतीशिवाय काहीच करता न येणं या दोन टोकांचा सुवर्णमध्य म्हणजे परस्परावलंबन. तराजूच्या तोलकाट्यात एका बाजूला संपूर्ण स्वावलंबन आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण परावलंबन घातलं, तर जेव्हा तो समतोलात येईल तेव्हा ते असेल परस्परावलंबन. मोठं होणं म्हणजे परावलंबनाकडून संपूर्ण स्वावलंबनाकडं होणारा प्रवास; पण खरं बघायला गेलं, तर जेव्हा तो प्रवास परस्परावलंबनाचं स्टेशन गाठतो, तेव्हाच तो पूर्णत्वाला जातो. पालक-मुलांचं नातं हे असं एकमेकांवर अवलंबून असलेलं, एकमेकांना समृद्ध करणारं असतं. म्हणूनच ते अर्थपूर्ण आणि हवंहवंसं वाटतं.

एक साधूपुरुष एकदा देवाला म्हणाला ः ""स्वर्ग आणि नरकामध्ये काय फरक आहे?'' देव म्हणाला ः ""चल, तुला दाखवतो.'' पहिल्यांदा "नरक' अशी पाटी असलेल्या दारातून आत गेल्यावर त्याला दिसलं, की एका मेजावर एक पातेलं होतं आणि त्यात खीर होती. त्याचा मस्त दरवळ पसरला होता. मेजाभोवती बसलेल्या माणसांच्या हाताला लांब चमचे बांधलेले होते. ती काही खात नव्हती- कारण ते लांबुळके चमचे हात वाकवून तोंडापर्यंत नेणं त्यांना शक्‍यच होत नव्हतं. त्यामुळं समोर सुग्रास खीर असूनही ती माणसं अगदी वखवखलेली, अतृप्त दिसत होती. मग तो शेजारच्या "स्वर्ग' असं लिहिलेल्या दरवाज्यातून आत गेला. तिथंही तसंच चित्र! फरक इतकाच होता, की इथली माणसं अगदी तृप्त आणि आनंदी दिसत होती. बारकाईनं पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं, की मेजाच्या एका बाजूचा माणूस समोरच्या व्यक्तीला खीर खिलवत होता, आणि समोरची व्यक्ती याला! त्यामुळं हात न दुमडताही दोघांचं पोट भरत होतं.

एकूण हे असं एकमेकांना मदत करणं माणसाला स्वर्गसुखाचा आनंद देऊ शकतं! पूर्णपणे स्वत:वर अवलंबून राहण्यापासून ते दुसऱ्याच्या मदतीशिवाय काहीच करता न येणं या दोन टोकांचा सुवर्णमध्य म्हणजे परस्परावलंबन. तराजूच्या तोलकाट्यात एका बाजूला संपूर्ण स्वावलंबन आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण परावलंबन घातलं, तर जेव्हा तो समतोलात येईल तेव्हा ते असेल परस्परावलंबन. यामुळं होतं काय, की दोन्ही घटक अधिक आनंदी, अधिक समाधानी होतात, एखादी गोष्ट करण्यासाठी लागणारा वेळ, लागणारे कष्ट कमी होतात आणि काम अधिक सफाईदार होतं. फक्त मदत करायलाच नाही, तर ती नजाकतीनं स्वीकारायलासुद्धा यातूनच शिकतो आपण. एकत्र कुटुंबामध्ये हे फार प्रकर्षानं जाणवतं. गायक आणि वादकांमध्ये जमणारा मेळ, वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये जुळणारी लय, दोस्तांमध्ये गुंफले जाणारे बंध यांत जे घडतं ते तरी याहून वेगळं काय असतं? हेच आणखी विस्तारित स्वरूपात सगळ्या समाजामध्ये दिसतं. एकमेकांना आदर देणं, मदत करणं आणि मदत घेणं हे सगळं करता आल्याशिवाय एकत्र, सौहार्द्रानं राहणं कठीण. फक्त, दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांना फायदेशीर ठरतात, तेव्हा त्या नात्यात असलेलं सूक्ष्म संतुलन बिघडता कामा नये. नाही तर ताबडतोब एक जण दात्याच्या, तर दुसरा घेत्याच्या भूमिकेत जायला वेळ लागत नाही. त्यासाठी आवश्‍यक असतं स्वत:ला बारकाईनं निरखणं, स्वत:च्या क्षमतांचा अंदाज घेणं आणि आपल्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर करून घेणं.
आपल्याला वाटतं, पालक-मुलांच्या नात्यात कसलं आलंय परस्परावलंबन? मुलांची सगळी जबाबदारी पालकांवरच असते. नवजात मूल तर किती असहाय असतं! जगण्यासाठी लागणाऱ्या अगदी मूलभूत गरजांसाठीसुद्धा त्याला आई-बाबा लागतात; पण म्हणून हे नातं पूर्णपणे एकांगी असतं का? आई-बाबांना त्या बाळाची काहीच गरज नसते का? तसं असेल तर मूल होण्यासाठी आपण जीवाचा इतका आटापिटा का करतो? आठवून बघू या, बाळाचं एखादं हसू, त्याच्या बाललीला आपला थकवा क्षणात घालवतात आणि चेहऱ्यावर हसू फुलवतात की नाही? घरात बाळ आलं, की सारं घरदार त्याच्याभोवती फिरतं की नाही? मुलं मोठी झाली तरी पालकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे किती तरी देत असतात, शिकवत असतात. अगदी घरातली कामं करायला आणि पैसे मिळवायला जरी काही उपयोग नसला, तरी कुटुंबीयांच्या किती तरी मानसिक, भावनिक आणि सामाजिक गरजा मुलं भागवत असतात. म्हणजे एकमेकांची गरज दोघांनाही असते.

मुलांनी स्वावलंबी व्हावं असा पालक म्हणून आपला सार्थ आग्रह असतो; पण त्यासाठी लागणारं स्वातंत्र्य किती द्यावं आणि त्यांच्यावर किती ताबा ठेवावा याबाबत आपण दुग्ध्यात असतो. कारण मुलं अनेकदा त्यांच्या कुवतीपेक्षा आणि विकासाच्या पातळीपेक्षा अधिक अधिकार मागत असतात. बरं, मुलांना स्वातंत्र्य देण्यापायी आपली सत्ता, मुलांवरचा आपला ताबा सोडायचा का? अशी ही "धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं' परिस्थिती असते. स्वावलंबनात हक्क कुरघोडी करतात, तर परस्परावलंबनात जबाबदारी वरचढ ठरते. त्यामुळं मुलांना मर्यादित स्वातंत्र्य आणि मर्यादित पर्याय यांच्याबरोबरच जबाबदारी दिली तर? मुलं कदाचित आपोआपच स्वत:बरोबर इतरांचा विचार करायला लागतील आणि समाजात अधिक एकसंधपणे सामावून जातील. इतरांकडं स्वामित्वाच्या नजरेनं नव्हे, तर बरोबरीच्या नजरेतून पाहतील आणि परस्परावलंबनाच्या दिशेनं त्यांची वाटचाल सुरू होईल. वर्चस्ववादी पालकत्वामध्ये (Authoritarian parenting) मुलांना दुय्यम स्थान असतं. इथं मुलं पालकांवर पूर्णत: अवलंबून आहेत अशी भूमिका असते. काय करायचं हे सतत कुणी तरी सांगत राहिलं, तर स्वत:हून काही विचार केला जात नाही. स्वतंत्र निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा ही मुलं ते घेऊ शकत नाहीत. स्वत:च्या पायावर उभं राहणं त्यांना अवघड जातं. त्याउलट दुर्लक्षित (Neglectful parenting) पालकत्वामध्ये मुलांना त्यांच्या त्यांच्या भरवशावर सोडून दिलेलं असल्यामुळे अमर्याद स्वातंत्र्य मिळतं; पण ते अनाठायी असतं, कारण त्याचा सुयोग्य वापर करण्याइतकं सक्षमीकरण कुठं झालेलं असतं? पतंगाच्या दोरीला आवश्‍यक तितकी ढील दिली, तर तो आकाशात उंच उडतो; पण नियंत्रणाची दोरी काटली तर मात्र भिरभिरून खाली पडतो. Authoritative किंवा समतोल प्रकारच्या पालकत्वामध्ये मात्र देवाणघेवाण दिसते, मुलांना योग्य ते स्थान आणि योग्य तो आदर दिलेला दिसतो आणि साहजिकच परस्परावलंबनाचे सुपरिणाम मिळतात.

अशी व्यक्ती-व्यक्तींमध्ये देवघेव होत राहणार, व्हायलाही हवी. आणि ही फक्त चांगल्या गोष्टींचीच नव्हे, तर दोषांचीही. जेव्हा आई-बाबा नेहमी त्याचं एकदम परफेक्‍ट व्यक्तिमत्त्व मुलांसमोर ठेवतात, तेव्हा त्यांना ते अधिकार गाजवण्याच्या दृष्टीनं सोयीचं वाटतं; पण कधी न कधी आपल्या पालकांचं अधुरेपण मुलांच्या लक्षात येतं, आणि जेव्हा हे घडतं, तेव्हा मुलांच्या मनातली त्यांची प्रतिमा कोसळते, कारण ती खोटेपणाच्या पायावर उभी असते, मुखावट्याच्या मागं दडलेली असते. हे जाणून असल्यानं अमिता आणि शेखरनं पहिल्यापासून मुलांबरोबर आपल्या कमतरताही शेअर केल्या. अतिशय संतापी असलेल्या अमितानं तिच्या मुलीला सांगितलं ः ""स्वरा, मला खूप पटकन राग येतो गं. मी प्रयत्न करतेय त्यासाठी; पण कधी तुला असं वाटलं, की माझा राग प्रमाणाबाहेर चाललाय, तर सांगशील का?'' आईला आपलं मत आणि मदत महत्त्वाची वाटतेय हे जाणून स्वराला खरंच खूप बरं वाटलं. मुख्य म्हणजे आपण एकमेकांच्या आयुष्यात आवश्‍यक आणि महत्त्वाचे आहोत ही भावना ते नातं घट्ट करायला खतपाण्याप्रमाणे फायद्याची ठरली.

मोठं होणं म्हणजे परावलंबनाकडून संपूर्ण स्वावलंबनाकडं होणारा प्रवास; पण खरं बघायला गेलं, तर जेव्हा तो प्रवास परस्परावलंबनाचं स्टेशन गाठतो, तेव्हाच तो पूर्णत्वाला जातो. पालक-मुलांचं नातं हे असं एकमेकांवर अवलंबून असलेलं, एकमेकांना समृद्ध करणारं असतं, आणि म्हणूनच ते अर्थपूर्ण आणि हवंहवंसं वाटतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com