अपराध मीच केला? (डॉ. वैशाली देशमुख)

अपराध मीच केला? (डॉ. वैशाली देशमुख)

आजच्या पालकांची पिढी ही ‘सॅंडविच’ पिढी. अनेक गोष्टी पाहून आपल्यातली कमीपणाची भावना अजून जोमानं मूळ धरते, पालक म्हणून आपला जन्म व्यर्थ आहे की काय असं वाटायला लागतं. मध्येच एखादा संवादी सूर सापडतो. कुणीतरी धीर देतं. मग जरा आत्मविश्वास वाटायला लागतो; पण हे असं हुश्‍श वाटतं न वाटतं तोपर्यंत आदर्श पालक बनण्याचा एखादा नवा फॉर्म्युला येतो आणि सगळा कमावलेला आत्मविश्वास आपण गमावून बसतो, पुरे ढेपाळतो. आपल्या भूमिकांविषयी, आपल्या निर्णयांविषयी, नात्यांविषयी, कुवतीविषयी शंका घेत अस्वस्थ होत राहतो. त्यामुळं पालकांच्या या पिढीला सतत तोंड द्यायला लागणारी एक ठळक भावना आहे अपराधीपणाची.

‘‘डॉ  क्‍टर, मला काय करू सुचत नाहीये. सगळीकडं अपयश हाती लागतंय. मुलं अजिबात सांगितलेलं काही ऐकत नाहीत. उलटं बोलतात, घरात प्रचंड पसारा करून ठेवतात. बरं, एकवेळ शाळेत चांगले मार्क्‍स मिळवले तर हे सगळं सहन करायला तयार आहोत आम्ही; पण तेही नाही. आम्ही लहान होतो तेव्हा कधीच आईबाबांना इतका त्रास दिला नाही. ते काय सांगतील ते मुकाट्यानं ऐकायचो. तरी बरं, मुलांसाठी मी सगळ्या हौशी-मौजी बाजूला ठेवल्या, कधी कुठं मैत्रिणींबरोबर उनाडायला गेले नाही की काही नाही...पण सगळं बिघडतच चाललंय. आपल्यामुळं मुलांचं भविष्य वाया जाणार की काय असं वाटायला लागलंय...’’ डोळ्यांत जमा होणारं पाणी निकरानं थोपवत मेघा सांगत होती. ‘‘कधी कधी वाटतं, मी फार स्वार्थी आहे. सगळे सांगत होते, तरी नोकरी सोडली नाही; पण मला आवडतं माझं काम. खूप समाधान मिळतं तिथं...आणि आईबाबांनी इतकं शिकवलं त्याचा उपयोग काय मग? माहेरी असताना कधी घरातल्या कामांना हात लावू दिला नाही आईनं; पण आता सगळ्यांची अपेक्षा अशी, की जे काही करीन ते घर सांभाळून करायला हवं. मृदुंग झालाय माझा. दोन्हीकडून थपडा बसतायत. मुलांचे आजी-आजोबा आम्हांलाच दोष देतात. आजकाल तर माहेरीही जावंसं वाटत नाही. कारण तिथंही मुलांच्या वागण्याचे, आणि पर्यायानं आम्ही (न) केलेल्या संस्कारांचे, वाभाडे निघतात. कधी कधी वाटतं, ना धड आई म्हणून घ्यायला लायक आहोत आपण, ना धड मुलगी, ना धड सून!  सॉरी, माझं बोलणं फारसं मुद्देसूद नाहीये; पण मला खरंच खूप आघाड्यांवर प्रश्न पडलेत. तुम्ही सांगा, मी काय करायला हवंय?’’

मेघाची नोकरी जबाबदारीची, त्यात शाळेत जाणारी दोन मुलं, सतत दौऱ्यावर असलेला पती. चाळीशी जवळ आल्यामुळं पाळीच्या वगैरे बारीकसारीक तक्रारी सुरू झाल्या होत्या. वयोपरत्वे सासू-सासऱ्यांच्या तब्येतीत चढ-उतार चालू असायचे. एकुलती एक मुलगी असल्यामुळं तिच्या आईबाबांची जबाबदारीही तिच्यावर होती. एका मल्टीनॅशनल बॅंकेत अधिकाराच्या पदावर असलेली मेघा अगदी हताश दिसत होती. आपलं काहीतरी भयंकर चुकलंय या कल्पनेनं धास्तावली होती.

अशा आवर्तात गरगरणारी मेघा काही एकटी नाही. साधारणपणे साठ-सत्तरच्या दशकात जन्मलेल्या पिढीला कुणीतरी नाव दिलं ‘जनरेशन एक्‍स!’ आता पन्नाशी-साठीत असलेली ही पिढी वैद्यकीय क्षेत्रातल्या क्रांतिकारी शोधांमुळं दीर्घायुषी आणि आरोग्यदृष्ट्या सुस्थितीत आहे. शिवाय आर्थिकदृष्ट्याही बऱ्यापैकी स्थिरावलेली आहे. काही काळानं, नवीन सहस्रकात जन्मलेल्या आजच्या पिढीला ‘जनरेशन झेड’ म्हटलं गेलं. ही म्हणजे तंत्रज्ञानाचं बाळकडू प्यायलेली आणि तंत्रज्ञानाच्या जंगलात हरवलेली पिढी! आणि या दोन्हींच्या मध्ये कडबोळं झालेली पिढी म्हणजे ‘जनरेशन वाय’! आता तिशी-चाळीशीत असलेली, मेघासारख्या तरुण पालकांची पिढी. त्यांची खासियत अशी, की त्यांच्या लहानपणी तंत्रज्ञानानं हातपाय पसरायला सुरुवात केली होती; पण आजच्यासारखं ते सर्वव्यापी नव्हतं. व्यक्तिस्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. मुलींनी शिकावं, आपल्या पायावर उभं राहावं, याची जाणीव जोर धरायला लागली होती. फक्त हे सगळं प्रत्यक्षात कसं हाताळायचं आणि पेलायचं याविषयी सगळेच अनभिज्ञ! त्यातून तयार झाली ही सॅंडविच पिढी. पुढच्या-मागच्या दोन्ही पिढ्यांची जबाबदारी पेलणारी. आईबाबांचे संस्कार अजूनही कानात घुमत असलेली; पण ते मुलांपर्यंत पोचवण्यात अपयशी ठरल्याच्या कल्पनेनं अस्वस्थ झालेली. पालकत्वाच्या पारंपरिक कल्पनांच्या पलीकडं जाऊन विचार करणारी, मुलांच्या संगोपनात मानसशास्त्रीय संकल्पनांचा वापर करणारी, त्याबाबतीतलं नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करणारी.
पण मग या अभिनव पद्धतींचा उपयोग होतोय का अशी शंका का येते सतत मनामध्ये? प्रत्येक पिढीच्या बालपणात काळानुसार फरक असतात, तसे या दोन पिढ्यांमधेही आहेत. फक्त आजच्या वेगवान जीवनशैलीमुळं हा फरक आव्हानात्मक वाटावा इतका वाढलाय. समाजाची रचनाच समूळ बदलतेय. समाजाचं एकक असलेल्या कुटुंबसंस्थेचं उदाहरण घेऊ. आजच्या कुटुंबाची ठेवण ठराविक परिघाच्या बाहेर गेली आहे. आई-बाबा-मुलांची पूर्वी अशक्‍यप्राय वाटणारी वेगवेगळी संयुगं बघायला मिळतायत.

शिवाय आजच्या मुलांचं विश्व खरंच कल्पनेच्या पलीकडचं, अतिवेगवान आहे. त्यांच्या अवतीभवती असतो माध्यमांचा मारा, आकर्षक, खुणावणारं तंत्रज्ञान आणि चोवीस तास माहितीचा रतीब! कालची घटना आज सातशिळी होते आणि आज घेतलेला महागडा फोन वर्षभरात कालबाह्य होणार असतो. आपण लहानपणी कधीही करायला न धजावलेल्या अनेक गोष्टी मुलं करतात आणि ते आपलं पालक म्हणून सगळ्यात मोठं अपयश आहे असं आपण समजतो.   
काही दिवसांपूर्वी एक वाक्‍य वाचलं ः ‘मी एक अगदी आदर्श पालक होते, कुणाच्या पालकत्वाच्या पद्धतींमध्ये काय खोट आहे हे मला बघितल्या बघितल्या चटकन कळायचं.... आणि मग मला मुलं झाली!’ जोपर्यंत प्रत्यक्ष मुलं वाढवण्याची वेळ येत नाही, तोपर्यंत त्यातल्या कुठल्याही समस्येवर चुटकीसरशी उपाय सुचत असतो; पण ते प्रत्यक्षात आणण्याची वेळ येते तेव्हा त्यातल्या इतक्‍या अडचणी ध्यानात यायला लागतात, की आपली अगदी पंचाईत होते. खरंच मुलं झाल्यावर सगळं आयुष्य एकशे ऐंशी अंशातून गिरकी घेतं. वेळेचा काही हिशेब लागेनासा होतो. या सगळ्यासाठी प्रत्येकाची शारीरिक, मानसिक तयारी असेलच असं नाही. मग लक्षात येतं, वाटलं होतं तितकं हे सोपं नाहीये!

पालकाची भूमिका खरंच सोपी नाहीये. तिला जितक्‍या शक्‍यता असतात तितक्‍या मर्यादा असतात, समाजानं आखून दिलेल्या चौकटी असतात. दडपणं असतात. ही दडपणं कधी लोकांच्या अनाहूत शेऱ्यांच्या स्वरूपात असतात, तर कधी आपल्या स्वत:च्या अपेक्षांच्या स्वरूपात असतात. भरीला मुलांच्या भविष्याची चिंता असते, खूप सारी भावनिक गुंतवणूक असते. ओळखी-अनोळखीतले कित्येक घटक टिप्पणी करायला, आगंतुक सूचना द्यायला तयार असतात. इतरांचं जाऊद्या, आपल्या मुलांची वक्तव्यं आठवून बघा. त्यांचं दिसणं, परीक्षेतलं अपयश, मित्रमैत्रिणी नसणं अशा कुठल्याही गोष्टींसाठी ती तुम्हाला जबाबदार धरायला एका पायावर तयार असतात. एक प्रकारची भावनिक खंडणीच वसूल करत असतात ती. यात त्यांची चूक असते असं नाही, आपली कामं करून घ्यायचा, लक्ष वेधून घ्यायचा त्यांचा हा एक निरागस प्रयत्न असतो इतकंच.

या सगळ्या परिस्थितीत यशस्वी (?) पालक होणं अवघड असलं, तरी अपरिहार्य झालंय आजकाल. बरोबरचे पालक आपलं मूल आईनस्टाईन व्हावं यासाठी पोटात असताना गर्भसंस्कार करण्यापासून ते वेगवेगळे छंदवर्ग, स्पर्धा परीक्षा, महागड्या शाळा...काही म्हणून करायचं शिल्लक ठेवत नाहीत. ते पाहून आपल्यातली कमीपणाची भावना अजून जोमानं मूळ धरते, पालक म्हणून आपला जन्म व्यर्थ आहे की काय असं वाटायला लागतं. मध्येच एखादा संवादी सूर सापडतो. कुणीतरी धीर देतं. मग जरा आत्मविश्वास वाटायला लागतो; पण हे असं हुश्‍श वाटतं न वाटतं तोपर्यंत आदर्श पालक बनण्याचा एखादा नवा फॉर्म्युला येतो, आणि सगळा कमावलेला आत्मविश्वास आपण गमावून बसतो, पुरे ढेपाळतो. आपल्या भूमिकांविषयी, आपल्या निर्णयांविषयी, नात्यांविषयी, कुवतीविषयी शंका घेत अस्वस्थ होत राहतो. त्यामुळं मला वाटतं पालकांच्या या पिढीला सतत तोंड द्यायला लागणारी एक ठळक भावना आहे अपराधीपणाची!

आपलं काहीतरी चुकतंय याची जाणीव होणं आणि स्वत:ला गुन्हेगार समजणं या दोन्हींत जमीनअस्मानाचा फरक आहे. एकात आपण स्वत:च्या कमतरतांबद्दल जागरूक होतो, त्यावर उपाय शोधायला लागतो. तर दुसऱ्या विचारपद्धतीत स्वत:वरच फुली मारून मोकळे होतो. ही नकोशी भावना आतून पोखरून काढते, आपली नाती कुरतडत राहते; पण मदत काहीच करत नाही. मग स्वत:ला असं गुन्हेगार का समजायचं? मला नाही वाटत असं काही हमखास यशस्वी सूत्र असतं जोपासनेचं. कदाचित फक्त काही कानमंत्र असतात. ‘पालककट्‌टा’ या सदरातून आपण हेच कानमंत्र मिळवायचा प्रयत्न करणार आहोत... आणि आपल्या अनुभवांची देवाणघेवाणसुद्धा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com