नकारायण (डॉ. वैशाली देशमुख)

dr vaishali deshmukh write article in saptarang
dr vaishali deshmukh write article in saptarang

पालकत्वामध्ये नकार ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. विविध रोगांना तोंड देण्यासाठी आपण लस देतो, तसं नकारांचंही ‘लशीकरण’ करता येईल का, गोष्टी आवाक्‍याच्या पलीकडं जायच्या आत त्यांच्यावर नियंत्रण मिळवता येईल का, काही वेळा नुसता तोंडदेखला होकार देऊन प्रत्यक्षात मात्र स्वतःचंच खरं करण्याच्या मुलांच्या ‘गनिमी काव्या’ला तोंड कसं द्यायचं आदी गोष्टींबाबत चर्चा.

मागच्या वेळच्या लेखात आपण नकार देण्याविषयी काही चर्चा केली. हा विषय इतका मोठा आणि कळीचा आहे, की एका लेखात सर्व गोष्टी स्पष्ट होणं शक्‍य नाही, याची मला कल्पना आहे. दोन गोष्टी तरी करून पाहायचं आपण ठरवलं होतं. नकार देण्याआधी त्याविषयी नीट विचार करून तो ठामपणे देणं आणि ‘नाही’ या शब्दाला फाटा देऊन तेच वाक्‍य अर्थ न बदलता होकारात्मक बनवणं. आपला शेवटचा मुद्दा होता, एवढं करूनही मुलांनी ऐकलं नाही तर काय?

आपला मेंदू फार हट्टी असतो. एखाद्या गोष्टीला नाही म्हटलं, की तिनं आपल्या मेंदूचा ताबा घेतलाच म्हणून समजा. ती एका साधूबुवांची गोष्ट वाचलीये का तुम्ही? एक तरुण एकदा त्यांच्याकडं गेला आणि त्यांना म्हणाला, की मला असा एक मंत्र सांगा, की ज्यामुळं मला भरपूर संपत्ती मिळेल. साधूबुवांनी त्याच्या कानात एक मंत्र सांगितला. जाताजाता ते सहज त्याला म्हणाले ः ‘एक लक्षात ठेव, काही झालं तरी मंत्र म्हणताना माकडांचा विचार करू नकोस. नाहीतर त्याचा काही उपयोग होणार नाही.’’ झालं! जितक्‍या वेळा त्या तरुणानं मंत्र म्हणायचा प्रयत्न केला, तितक्‍या वेळा त्याच्या मनात माकड आलंच. आता हेच पहा ना, समजा मी तुम्हाला म्हटलं, की ‘दुसरं काहीही चालेल; पण पिवळ्या चोचीचं काळं बदक डोळ्यासमोर आणू नका’, तर हटकून तेच आठवणार की नाही? त्यामुळं आपल्याला हवा तो परिणाम साधण्यासाठी ‘नाही’ हा शब्द फार नेमकेपणानं, जपून वापरायला लागतो.

नकाराचं ‘लशीकरण’
वैद्यकीय क्षेत्रात प्रतिबंधाला खूप महत्त्व आहे. त्याचा भाग म्हणून आपण सगळ्या लहान बाळांना लस देतो. या कमकुवत केलेल्या जंतूंना तोंड देणं सोपं असतं शरीराच्या प्रतिकारसंस्थेला. मग जेव्हा खऱ्या प्राणघातक जंतूंचा हल्ला होतो तेव्हा त्याचा यशस्वीपणे सामना करता येतो. नकाराच्या बाबतीत असं काही करता येईल का?
मुलांना नकार पचवायची सवय हवी, हे आपल्याला शंभर टक्के पटलेलं असलं, तरी मुलांना समजेलच असं नाही. नाही म्हणणं आणि नाही ऐकणं दोन्हीही तशा त्रासदायक भावना, आणि त्यामुळं अर्थातच नकोशा वाटणाऱ्या! मात्र, जेवणात जसं गोड-तिखट दोन्ही लागतं, तशाच कडू-गोड भावना आयुष्यात आवश्‍यक. ‘लाइफ इज नॉट फेअर’ असं म्हणतात. या ‘अनफेअर’ जीवनाला तोंड देण्यासाठी रोजचे छोटेछोटे नकार झेलणं हे त्यांच्यासाठी भावनिक लशीकरणच आहे की एक प्रकारचं!
आम्ही आमच्या क्‍लिनिकमध्ये छोट्या बाळांना तपासतो, तेव्हा फार गंमतशीर अनुभव येतात. त्या चिमुकल्या जीवाला रडू नये म्हणून प्रलोभन कसलं दाखवलं जातं? बरोबर ओळखलंत, मोबाईलचं! कालांतरानं हाच मोबाईल ‘बेबीसीटर’ बनायला कितीसा वेळ? मग सहावी-सातवीत असताना वेगवेगळ्या कारणांसाठी मुलांना स्वत:चा फोन मिळतो. कधी मुलं दुपारी एकटीच घरी असतात म्हणून, कधी ती आपापली शाळेत, क्‍लासला जातात तेव्हा त्यांच्याशी संपर्क असावा म्हणून. बहुतेकदा हा असतो जुना स्मार्टफोन. घरात वाय-फाय असतं. दुनियेतल्या तमाम बऱ्या-वाईट गोष्टींचा खजिना त्यांना विनासायास उपलब्ध होतो. मुलं आठवी-नववीत जायच्या वयाची होतात तोपर्यंत ती आईबाबांच्या याबाबतीतल्या आरडाओरड्याला न जुमानता फोनमध्ये डोकं खुपसून बसायला लागतात. मग येते दहावीची परीक्षा. आता मात्र सगळे हातघाईवर येतात. ‘महत्त्वाचं वर्ष आहे, फोन काढूनच घ्यावा,’ अशा निर्णयापर्यंत आईबाबा पोचतात. आजाराची ही फारच गंभीर स्थिती झाली. या स्टेजला उपचार अवघड असतात आणि साइड इफेक्‍ट्‌स होण्याची, उपचार निरुपयोगी ठरण्याची शक्‍यता फार. मग त्यापेक्षा प्रतिबंध करणं अधिक सोपं नाही का? त्यासाठी सहावी-सातवीत स्मार्टफोन देण्याआधी, लहानग्या बाळाची करमणूक करण्याचं कार्य फोनवर सोपवण्याआधी, शंभर वेळा विचार करायलाच हवा ना!

मॉल, रस्ता, बाग अशा सार्वजनिक ठिकाणी एक चित्र नेहमी दिसतं. हट्ट करणारं मूल आणि कुचंबलेले, बेजार झालेले पालक. वेळ ऐन आणीबाणीची असते, प्रसंग बाका असतो. मुलं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. अशा त्रस्त करणा-या अनुभवातून एकदा-दोनदा गेल्यावर त्यातून शहाणं होता येईल का? पुढची वेळ येण्याआधी त्यावर लस देता येईल का? यासाठी माझ्या एका पेशंटच्या आईनं, अश्विनीनं काय केलं माहितेय? नऊ वर्षांचा तिचा मुलगा विराज आणि ती, एकदा कशासाठी तरी दुकानात गेले. विराजनं तिथे अतिशय हट्ट केला. त्याला तिथल्या बऱ्याच गोष्टी हव्या होत्या. अश्विनीनं खरेदीचा बेत रद्द केला आणि ते घरी गेले, विराजच्या हट्टाला भीक न घालता! एक-दोन दिवसांनी गप्पा मारत असताना तिनं त्याला विचारलं ः ‘‘विराज, मी तुला कध्धीच, कशालाच ‘नाही’ म्हटलं नाही, तर?’’ विराज अर्थातच खूष झाला. ‘‘मज्जा येईल खूप.’’  

‘‘तुला सांगू, मला पण मज्जा येईल; पण मला खूप काळजीही वाटेल तुझी. म्हणजे समजा तू रस्त्यावरून वेडावाकडा पळत सुटलास आणि मी काहीच म्हटलं नाही, तर? मला भीती वाटेल तुला अपघात होईल की काय म्हणून! किंवा तू हट्ट केलास म्हणून मी तुला हवी तितकी चॉकलेट्‌स आणि बिस्किट्‌स खाऊ दिली तर? तुझे दात किडून दुखतील आणि तुला खूप त्रास होईल.’’
विराज म्हणाला ः ‘‘हं, त्यावेळेला सांग गं; पण सारखं सारखं नको सांगूस.’’
‘‘बरं, मग आपण एक लिस्ट करायची का?’’
मग दोघांनी मिळून ‘नाही’ कधी म्हणायचं याची यादी केली. अश्विनीनं आपल्याला हवे असलेले प्रसंगही हुशारीनं गोवले. त्यात दुकानात गेल्यावर कसं वागायचं याचाही समावेश होता. अजूनसुद्धा प्रत्येक वेळी विराजला पटतंच असं नाही; पण हळूहळू त्याला आईचा आणि आईला त्याचा अंदाज यायला लागलाय. बाहेर कुठं जायचं असेल, तर खुंटी बळकट करायला अश्विनी नियमांची उजळणी करते. विराज त्याप्रमाणं वागला नाही तर त्याला त्यानंच सुचवलेला एखादा परिणाम भोगायला लागतो; पण अशा वेळा कमी येतात आजकाल. आणि हो, सारखंसारखं न सांगण्याची विराजची फर्माईश तीसुद्धा पाळतेय.  

‘इट इज नेव्हर टू लेट’
काही पालक म्हणतात ः ‘नाही हो, आम्ही खूप प्रयत्न केलेत; पण उपयोग होत नाहीये. अगदी कोडगी झालीयेत ती. आता काय फरक पडणार आहे?’ अशा वेळी मला थॉमस अल्वा एडिसनची आठवण येते. त्यानं म्हणे विजेचा बल्ब बनवण्याचा अयशस्वी प्रयोग हजारदा केला; पण घेतला वसा सोडला नाही. शिवाय त्या हजार वेळा तेच तेच तंत्र नाही वापरलं. दर वेळेला नवीन पद्धत वापरून पहिली. शेवटी त्याला यश लाभलं. नकार परिणामकारक ठरत नसेल, तर असे वैविध्यपूर्ण प्रयोग चिकाटीनं करत राहायला लागतं. वेगवेगळे शब्द, ते बोलण्याच्या निरनिराळ्या ढबी वापरून बघायला लागतात. त्याच त्याच शब्दांची ठराविक प्रकारे पुनरावृत्ती होत राहिली, तर ते मुलांच्या कानी पोचतच नाहीत. विमानतळाजवळ राहणाऱ्यांना रोज रोज ऐकून काही काळानं विमानाची कर्कश्‍य घरघर ऐकू येणंसुद्धा बंद होतं, मग आपल्या शब्दांची काय कथा?

मुलांचा गनिमी कावा
काही वेळा आपल्याला आश्‍चर्याचा धक्का बसतो. मुलं चक्क आपलं ऐकतात. उदाहरणार्थ ः
‘‘रावी, फोन देतेय मी तुला; पण व्हॉटसॲपवर अजिबात गप्पा मारत बसायचं नाही हं’’ ः आई.
‘‘हो आई’’ ः रावी.
इतक्‍या सहजपणे आपलं म्हणणं मान्य झालेलं पाहून आई अवाक! ‘तशी गुणाची आहे आमची रावी!’ असं मनातल्या मनात म्हणून ती कामात गढून जाते. इकडं रावी मैत्रिणींशी मनसोक्त गप्पा मारते, शांतपणे सगळी चॅट डिलिट करून टाकते आणि फोन आईला परत देते.
आपला नकार असा फारच सहज स्वीकारला जातोय का? मग सावधान! आईबाबांची सो-कॉल्ड कटकट तात्पुरती टाळायचा तो एक उपाय असू शकतो! विशेषतः जशी शिंगं फुटायला लागतात तसा हा गनिमी कावा वापरला जातो, तोंडदेखलं हो म्हणून स्वत:ला हवं तेच करायचा! घडलेल्या गोष्टी आईबाबांपासून लपवून ठेवण्याची काळजी मात्र आवर्जून घेतली जाते.

आईबाबांचंही ‘होमवर्क’
एक होमवर्क करायचं? आपण दिवसातून किती वेळा, कसं आणि कशासाठी ‘नाही’ म्हणतोय याची डायरी ठेवायची? मग एक आठवडा झाला, की ते कागद खासगीत वाचून फाडून टाकूया. आणखी एक गोष्ट करू. आपलं मुलांबरोबरचं एखादं संभाषण त्यांच्या नकळत मोबाईलवर रेकॉर्ड करून नंतर शांतपणे ऐकू या. आपला नकार आपल्या कानाला, मनाला कसा वाटतोय? बघूया तरी! आपलं आपल्यालाच काहीतरी पटेल, काहीतरी खटकेल. हे सगळं यशस्वीपणे हाताळण्याचा एखादा रामबाण मार्ग त्यातून सापडूनही जाईल कदाचित!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com