माझा बोटीचा प्रवास (डॉ. वर्षा जोशी)

डॉ. वर्षा जोशी
रविवार, 5 मार्च 2017

कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या आणि एसटीगाड्या यांच्यावर पडणारा प्रवाशांचा ताण लक्षात घेता तो हलका करण्यासाठी पुन्हा समुद्रमार्गे जलवाहतूक सुरू करण्याचा विचार सरकारनं नुकताच बोलून दाखवला आहे. पूर्वीच्या काळी कोकणात जाण्यासाठी एकमेव मार्ग असे व तो म्हणजे समुद्रमार्ग. बोटीनं करावा लागणारा हा प्रवास सोपा मुळीच नसे; पण त्यातही एक प्रकारची मजा अनुभवायला मिळे. सुमारे ५०-६० वर्षांपूर्वी कसा होता कोकणात घेऊन जाणाऱ्या बोटींचा प्रवास? अनोखा अनुभव देणाऱ्या त्या प्रवासाच्या आठवणींची ही सफर...

कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या आणि एसटीगाड्या यांच्यावर पडणारा प्रवाशांचा ताण लक्षात घेता तो हलका करण्यासाठी पुन्हा समुद्रमार्गे जलवाहतूक सुरू करण्याचा विचार सरकारनं नुकताच बोलून दाखवला आहे. पूर्वीच्या काळी कोकणात जाण्यासाठी एकमेव मार्ग असे व तो म्हणजे समुद्रमार्ग. बोटीनं करावा लागणारा हा प्रवास सोपा मुळीच नसे; पण त्यातही एक प्रकारची मजा अनुभवायला मिळे. सुमारे ५०-६० वर्षांपूर्वी कसा होता कोकणात घेऊन जाणाऱ्या बोटींचा प्रवास? अनोखा अनुभव देणाऱ्या त्या प्रवासाच्या आठवणींची ही सफर...

‘कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप असल्यानं रेल्वेगाड्या आणि एसटीच्या गाड्यांवर खूपच ताण येतो. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी  समुद्रमार्गे जलवाहतूक सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे,’ अशा आशयाची बातमी काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रांत वाचली. ही बातमी वाचून माझं मन थेट ५०-६० वर्षं मागं गेलं. त्या वेळी मी लहान होते. चौदावं वर्ष ते अठरावं-विसावं वर्ष या माझ्या वयात मी कोकणात जाण्यासाठी बोटीनं प्रवास करत असे. देवगड तालुक्‍यातल्या नारिंग्रे या गावी माझी आई, आत्या आणि लहान भाऊ हे राहत असत. नारिंग्र्याला सातवीनंतर शाळा नसल्यानं शिक्षणासाठी मी मुंबईत असे. उन्हाळ्याच्या शाळेच्या सुटीत मी कोकणात आपल्या घरी जात असे. कोकण रेल्वे तर तेव्हा अर्थातच नव्हती; पण कोकणात थेट जाणारी एसटीसुद्धा त्या वेळी नव्हती. त्यामुळं ‘बोटीनं प्रवास’ हाच एक पर्याय होता. त्या प्रवासाचेच हे काही अनुभव.

त्या वेळी प्रथम ‘सिंदिया स्टीम नेव्हिगेशन’च्या बोटी असत. ‘चंद्रावती’, ‘चंपावती’ अशी त्यांची नावं होती. बोटीला लोअर क्‍लास, अप्पर क्‍लास आणि केबिन असे भाग असत. केबिनमध्ये पाच-सहा जणांनी सोय असे आणि केबिननं जाणं आम्हाला आर्थिकदृष्ट्या परवडत नसे. लोअर क्‍लासमध्ये साधारणतः मुंबईच्या गिरण्यांमध्ये काम करणारे चाकरमानी असत. मला बोट लागत असे, म्हणजे बोटीत बसून समुद्राकडं नुसतं पाहिलं तरी पोटात डचमळू लागे आणि उलटी होईल असं वाटे. यावर उपाय एकच होता व तो म्हणजे झोपून राहणं. आतासारख्या त्या वेळी उलटी होऊ नये म्हणून गोळ्या उपलब्ध नव्हत्या. अप्पर क्‍लासमधे पथारी पसरणं जास्त सोपं आणि गर्दीही जरा कमी म्हणून तुलनेनं पैसे जरा जास्त पडले तरी मी अप्पर क्‍लासनं प्रवास करत असे.

बोट सकाळी दहा वाजता सुटे आणि मुंबईहून पणजीला जात असे. घरून सर्व सामान घेऊन बसनं ‘भाऊच्या धक्‍क्‍या’वर जावं लागे. तिथं गेल्यावर तिकीट काढून एक हमाल ठरवून त्याच्याकडं सर्व जड सामान (बॅग, होल्डॉल वगैरे) देऊन एक सतरंजी घ्यावी लागे. प्रवाशांना बोटीत प्रवेश द्यायला सुरवात झाली, की हमाल त्वरा करून सामान अप्पर क्‍लासमधे ठेवून सतरंजी पसरून ठेवत. म्हणजे आता आपली जागा निश्‍चित झाली. हमालाला पैसे दिल्यावर मी त्या सतरंजीवर जी आडवी व्हायची, ती देवगड बंदर येईपर्यंत तशीच आडवी असे. कोकणातल्या कुठल्याही बंदराला धक्का नव्हता. बोट बंदरापासून लांब उभी राही. बोटीचा भोंगा वाजला, की बंदरावरून पडाव निघत असत आणि मग बोटीतून पडावात उतरून पडावातून बंदरावर जावं लागे. बोट सुरू झाली, की संध्याकाळच्या सुमारास पालशेत बंदर येई. मग जयगड आणि त्यानंतर रत्नागिरी बंदर येई. एकदा बोट रत्नागिरी बंदराजवळ आली आणि वादळाला सुरवात झाली. त्या वेळी वादळाच्या सूचना देणारे उपग्रह नव्हते. घोंघावणाऱ्या वाऱ्याचा थरकाप उडवणारा आवाज, खवळलेला समुद्र आणि मुसळधार पाऊस अशी एकूण परिस्थिती होती. पावसाच्या झडीबरोबर पाणी आत येत होतं. ते खलाशी बाहेर टाकत होते. पावसाची झड ज्या बाजूनं येत होती, त्या बाजूचे लोक दुसऱ्या बाजूला जाऊ लागले. मग कॅप्टननं सगळ्यांना यापासून परावृत्त केलं. तो ओरडून म्हणाला ः ‘तुम्ही सगळे बोटीच्या एकाच बाजूला आलात तर वजन त्या बाजूला जास्त होऊन बोट बुडेल. त्यामुळे असं करू नका.’ सर्व लोकांनी कॅप्टनचं ऐकलं. रत्नागिरी बंदरात बोट नांगर टाकून नुसती उभी होती. दूरवर रत्नागिरी बंदराचे दिवे दिसत होते; पण तिथून पडाव येणंच शक्‍य नव्हतं. खवळलेल्या समुद्रामुळं अनेकांना उलट्या होत होत्या. मी आपली निपचित पडून होते. उठून बसलं तर उलटी होईल, अशी भीती वाटत होती. पोटात अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंब गेलेला नव्हता. बोट बुडून आपल्याला जलसमाधी मिळणार असंच सगळ्या लोकांना वाटत होतं. माझ्या शेजारी एक १०-१२ वर्षांची मुलगी तिच्या वडिलांबरोबर बसली होती. त्यांना मालवणला उतरायचं होतं. मुलगी एकदम मजेत होती. तिला काहीच त्रास होत नव्हता. तिच्या आईनं तिला डब्यात दुधी हलवा दिला होता, तो तिचा आवडता होता. बोट बुडण्यासंबंधी सतत ऐकून ती वडिलांना म्हणाली ः ‘‘बाबा, बोट बुडणार असेल तर मी निदान माझा दुधी हलवा खाऊन तरी घेते.’’ यावर अर्थातच बाबा काय बोलणार? तिनं डबा उघडला आणि सर्व दुधी हलवा चाटून-पुसून खाल्ला. तिच्या निरागसपणाचं त्याही स्थितीत सगळ्यांना हसू आलं. अखेर तीन तासांनी वादळ शमलं. रत्नागिरी बंदरातून पडाव आले आणि तिथे जाणारे लोक उतरून गेले.

बोट मार्गस्थ झाली. रत्नागिरीनंतर बंदर यायचं जैतापूर. तिथून तीन पडाव निघत. एक जाई जैतापूरला, एक मूसाकाजीला आणि एक राजापूरला. ज्यांचं गाव जिथून जवळ असे त्या त्या पडावात लोक बसत. पडाव आले की खलाशी ओरडत यायचे. माझ्या मावशीचं गाव राजापूरजवळ होतं; त्यामुळं ती नेहमी राजापूरला जाणाऱ्या पडावात बसत असे.

जैतापूरनंतरचं बंदर विजयदुर्ग आणि त्यानंतर देवगड. देवगड बंदर पहाटे अडीच वाजता येई. आपलं सगळं जड सामान खलाश्‍याकडं देऊन खांद्यावर पर्स आणि एक छोटी बॅग घेऊन अस्मादिकांची उतरण्याची तयारी होई. उतरण्यासाठी एकच झुंबड उडे. एक पडाव भरला, की दुसरा पडाव बोटीच्या दाराशी लागत असे; पण त्या पडावात उतरणं म्हणजे तारेवरची कसरत असे. आपण पडावात पाऊल ठेवू लागलो, की तो लाटेसरशी लांब जाई. तो पुन्हा जवळ येण्याची वाट पाहावी लागे. शेवटी खलाशी/तांडेल मला माझ्या दंडाला धरून पडावात उतरवत. एक पाऊल पडावात ठेवलं, की बोटीतलं पाऊल झटकन उचलून पडावात ठेवून त्याच्या फळीवर बसावं लागे. कधी कधी उभंही राहावं लागे. पडाव भरला की बंदराकडे निघे. वर चांदण्यांनी लखलखणारं आकाश आणि खाली अथांग समुद्र... निसर्गाचं विराट; पण सुंदर दर्शन आम्हाला लहानपणापासूनच होत होतं. त्या नीरव शांततेत तांडेलांच्या वल्ह्यांचा चुबुक्‌ चुबुक्‌ आवाज तेवढा ऐकू येई. कधी कधी तांडेलाला गाण्याची लहर येई. मग मालवणी भाषेत त्या गाण्याची साथ वल्ह्यांना मिळे.

पडाव बंदराच्या जवळ आला, की ढोपरभर पाण्यातच उतरावं लागे. मग त्या पाण्यातून चालत किनाऱ्यावरच्या पुळणीवरून जमिनीवर जाता येत असे. पुढं अनेक वर्षांनी देवगड बंदरात जेटी बांधली गेली आणि मग तीवर उतरता येत असे. बंदरात एकमेव धर्मशाळा होती. आपलं सामान घेऊन तिथं सकाळी साडेसहा वाजता मिठबावला जाणाऱ्या एसटीची वाट पाहत बसावं लागे...पण तो काळच वेगळा होता. एकटी मुलगी पाहून कुणीही कधी मला त्रास दिला नाही. उलट, लोक मदतच करत असतं. तिथं चहाची एक टपरी होती. चहात दूध कधीच नसे. पु ल. देशपांडे यांच्या ‘अंतू बर्वा’ या लेखात लिहिल्याप्रमाणे ‘तूर्तांस सगळ्या म्हशी गाभण’ अशी परिस्थिती कायम असे. स्पेशल चहा मागवला, की पावडर खूप आणि साखर खूप असा येई; पण तेवढ्यानंही जरा तरतरी येत असे.

‘सिंदिया’च्या बोटी हळूहळू बंद पडल्या. त्यांच्या रेवस-धरमतरकडं जाणाऱ्या ‘संत तुकाराम’ आणि ‘रामदास’ या बोटी बुडाल्या. हजारभर माणसांची जीवितहानी झाली. कंपनीचंही नुकसान झालं. ‘सिंदिया’नंतर चौगुल्यांच्या बोटी जलवाहतूक करू लागल्या. त्यांच्या एका बोटीचं नाव होतं ‘कोकणसेवक’. बोट मोठी होती. बऱ्याच सोई होत्या. मात्र, अप्पर क्‍लास, लोअर क्‍लास आणि केबिन अशीच विभागणी होती. पूर्वीच्या बोटींमध्ये अप्पर क्‍लासमधून लोअर क्‍लासमधे जिन्यानं उतरावं लागे आणि मग बोटीच्या दारातून पडावात उतरावं लागे; पण ‘कोकणसेवक’मध्ये अप्पर क्‍लासमधून थेट शिडीवरून पडावात उतरता येई. ती शिडी भन्नाटच होती. तिच्या कुठल्याही दोन पायऱ्यांच्या मधून खाली समुद्र खळाळताना दिसे आणि उतरताना जबरदस्त भीती वाटे. एकदा पडावात उतरलं, की जीव भांड्यात पडे. बंदरावर गेल्यावर एसटीची वाट पाहत बसावं लागे. बोटी बदलल्या तरी प्रवासाला तेवढाच वेळ लागत असे. त्या काळी नारिंग्र्याला एसटी बस जात नसे. कारण गाव आणि एसटीचा रस्ता यामध्ये खाडी होती. मिठबावला जाणाऱ्या एसटीनं बागमळ्यात उतरावं लागे. तिथं सामान घ्यायला आई आमच्या गड्याला पाठवत असे. सामान घेऊन पाण्यातून खाडी पार करावी लागे. भरती असेल तर कंबरभर पाण्यातून जावं लागे; पण खाडी ओलांडली, की घर अगदी जवळ होतं. आई माझी वाट पाहत घराच्या पायरीवर उभीच असे.

घरात गेलं, की ती म्हणे ः ‘दमलीस हो... कसला गो तो प्रवास? हात-पाय धू. कपडे बदल. मग तुला सुरेख चहा देते ताज्या दुधाचा.’ आईसमोर बसून मायेने पुरेपूर भरलेला तो चहा पिताना तिनं जवळ घेतलं, की प्रवासाचा सगळा शीण निघून जाई आणि पुन्हा पुढच्या उन्हाळ्याच्या सुटीत हाच प्रवास करण्यासाठी बळ मिळे.

Web Title: dr varsha joshi's article in saptarang