हार्मोनिअमचा 'डॉक्‍टर'! (डॉ. विद्याधर ओक)

dr vidyadhar oke
dr vidyadhar oke

प्रचलित संगीत हे त्या त्या वेळच्या सामाजिक मन:स्थितीचं प्रतिबिंब असतं म्हणूनच आज शांत व सुरेल संगीत लुप्त झालेलं आहे. गुणांहून वेशभूषेचं आणि ज्ञानाहून बडबडीचं महत्त्व वाढलं की गाण्यापेक्षा वाद्ये व सुरापेक्षा भपका वाढतो; परंतु स्वरवैचित्र्याचे, वाद्यकल्लोळाचे वा परंपरासंगमांचे कितीही मुलामे चढवले तरी गाण्यातली "दुर्गुणवत्ता' काही लपत नसते!

हार्मोनिअम या वाद्याशी माझी गट्टी लहानपणीच जमली. कारण, माझी आई शांताबाई (तिच्या वडिलांप्रमाणेच) उत्तम हार्मोनिअमवादक असून नारायणराव व्यास यांच्याकडं गाणं शिकलेली होती. साहजिकच, मी पेटी वाजवायला कधी शिकलो हे आठवतही नाही. संगीताचा काहीच पत्ता नसतानाही कोणतंही ऐकलेलं गाणं माझ्या बोटांतून निघत असे. अवघा तीन वर्षं चार महिने वयाचा असताना शाळेच्या रिपोर्टमध्ये "हा मुलगा उत्तम गाणं म्हणतो, दुसरा चुकला असेल तर त्या चुकलेल्याला शिकवायला याला आवडतं आणि याला 15-20 गाणी येतात,' असं लिहिलं आहे. म्हणजे, माझ्या पुढच्या आयुष्यातल्या संगीतक्षेत्रातल्या भूमिकांची नांदी तेव्हाच झाली होती.

ऐकलेले स्वर वाद्यात कुठं येतात हे कळण्यास नुसतं स्वरज्ञान नव्हे, तर त्या वाद्याशी मैत्री व्हावी लागते. पेटीवर माझी बोटं आपोआपच फिरल्यामुळं "बोटेगिरवणी'च्या धड्यांची मला गरजच भासली नाही. रेडिओवरची गाणी, भावगीतं, भक्तिगीतं व नाट्यसंगीतासारखं सुरेल व शालीन संगीत लहानपणीच अंगात मुरलं. आमच्या शेजारी विजया जोगळेकर (आता धुमाळे) यांच्या गाण्याच्या क्‍लासमध्ये मुलींना मी पेटीची साथ करत असे. आरती अंकलीकर या छोट्या; पण बुद्धिमान मुलीच्या गळ्यात श्रीनिवास खळे यांची व यशवंत देव यांची गाणी अचूक बसवून, तिला पहिली बक्षिसं मिळवून देण्यात तेव्हा माझा सहभाग असायचा.

संगीतदिग्दर्शनाचं कौशल्यही मला तेव्हाच नकळत अवगत झालं, असं आता जाणवतं. माझा शाळकरी मित्र अनिल तेंडोलकर (सध्याचा ज्येष्ठ हृदयशल्यविशारद) याच्या घरी नाट्यसंगीताच्या ध्वनिमुद्रिकांमध्ये गोविंदराव पटवर्धन यांचं अप्रतिम ऑर्गनवादन मी प्रथम ऐकलं तेव्हा, एवढे मोठे गुरू मला लाभतील, असा विचारही मनात आला नव्हता; पण त्यांचं वादन ऐकून तसं वाजवण्याचा मी प्रयत्न करू लागलो. एकदा विजयाबाईंचे गुरुजी वसंतराव कुळकर्णी यांच्या क्‍लासच्या ठिकाणी वार्षिक संमेलनात मध्यंतरानंतर प्रत्यक्ष गोविंदरावांचं स्वतंत्र वादन होतं. मी केलेली मुलींची साथ ऐकून ते मला म्हणाले ः ""बस माझ्याबरोबरसुद्धा साथीला.'' मला आकाश ठेंगणं झालं. बालसुलभ वृत्तीमुळं व अज्ञानामुळं मी कार्यक्रमात दोन-चार जागाही वाजवल्या! तरीही आश्‍चर्य म्हणजे, नंतर ते मला म्हणाले ः ""आता माझ्याकडं येत जा शिकायला.'' "आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन,' अशी माझी अवस्था झाली. पुढं त्यांच्याकडं 25 वर्षं हार्मोनिअमवादन शिकण्याचा माझा योग होता. आमची शिकवणी मात्र जगावेगळी होती. त्या वेळी गोविंदराव दिवसभर पोलिस खात्यात नोकरी करून रात्री मैफली व संगीतनाटकांच्या साथी करत असत. त्यानंतर स्वारी रात्री साडेबारा-एकच्या सुमाराला आमच्या घरी येई. भुकेलेली असे. माझी सोवळी आजी त्यांना गरम जेवण वाढी. रात्री दोन वाजता शिकवणी सुरू होई. दोन पेट्यांवर आम्ही दोघं आणि (तंबोरा नसल्यामुळं) तिसरीवर स्वर धरून चक्‍क आजी बसे. जे सांगावं ते गोविंदराव शिकवत. राग, पदं, गती, ताना, पलटे, झाले...असं काहीही. कठीण जागांना मी, "तुम्ही अमुक स्वरावर कुठलं बोट घेताय,' असं विचारल्यावर, "मला माहीत नाही, तू काय ते पाहून घे', असं ते म्हणत. पेटीच्या या जादूगाराला आपलं कोणतं बोट कोणत्या स्वरावर येतं आहे, हेच ठाऊक नसे! मग स्लो मोशनमध्ये ते न कंटाळता मला पुनःपुन्हा वाजवून दाखवत तेव्हा उलगडा होई. पहाटे तीन वाजता माझे डोळे मिटत व सकाळी सहा वाजता गोविंदराव चहा घेऊन घरी जात. त्यांच्या कृपेमुळं हार्मोनिअमचं उत्तम वादनतंत्र अंशत: तरी माझ्या हातात उतरलं.

सन 1972 मध्ये मी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात असताना मुंबईत दूरदर्शन केंद्र सुरू झालं. तिथं विजयाबाईंनी मला "युवदर्शन'मध्ये पेटीसाठी बोलावलं आणि माझ्या संगीतकारकीर्दीचा अधिकृत आरंभ झाला. त्या काळी दूरदर्शनचा पसारा नव्हता. एक वाहिनी असे. कार्यक्रम अचानक ठरत आणि केईएम हॉस्पिटलच्या ऑफिसमध्ये फोन येई व मला वर्गात बोलवायला शिपाई येई. मोठी ऐट वाटे! परळहून मी अर्ध्या तासात दूरदर्शन केंद्रावर पोचायचो. तेव्हा तिथं पेटीसाठी सरकारी वादक नव्हता (मला वाटतं, अजूनही नाही); त्यामुळं 1972 ते 1982 या काळात मी "मेडिकल'पेक्षा "म्युझिकल इमर्जन्सी'च जास्त केल्या! 100 हून जास्त कार्यक्रमांत पेटीवर साथ केली. बिदागी (कॉंट्रॅक्‍टवर) 50-75 रुपये मिळत असे. मोठमोठ्या कलाकारांना लहान वयात साथ केल्यामुळं संगीतक्षेत्रात उत्तम नाव झालं.

एमडी करताना मी कॉलेजात औषधशास्त्र शिकवू लागलो व मुंबई विद्यापीठातले संगीतविभागप्रमुख डॉ. अशोक दा. रानडे यांच्या निमंत्रणामुळं मी तिथं चोविसाव्या वर्षीच हार्मोनिअमही शिकवू लागलो. अनेक ज्येष्ठ कलाकार असूनही ते मला बोलावत. कारण, "आविष्कार' व "शास्त्र' या दोहोंवर माझा भर असे. माझ्या वर्गांना डॉ. रानडे स्वत: उपस्थि राहत, हा माझा फारच मोठा मान होता. कालांतरानं ते एनसीपीएमध्ये रुजू झाल्यावर तिथंही पु. ल. देशपांडे यांच्यासमवेत केलेल्या अनेक कार्यक्रमांत ते मला पेटीसाठी बोलावत असत. "संगीत' व "वैद्यकीय' ही अतिशय भिन्न क्षेत्रं असल्यामुळं, मी डॉक्‍टर आहे, हे लोकांना ठाऊक नसे (आजही हीच स्थिती आहे!). स्वत: पुलं "आज पेटीवर आपल्या गोविंदाचे (पटवर्धन) पट्टशिष्य विद्याधर ओक आहेत आणि ते मधून मधून त्यांच्या दवाखान्यातसुद्धा जातात असं ऐकलंय' अशी मल्लिनाथी करत असत! हे सगळं करता करताच मी एमडी पास झालो. त्यानंतर औषध-व्यवसायातल्या जबाबदाऱ्या पार पाडताना मात्र "कलाकार' म्हणून टिकणं अजिबात सोपं नव्हतं. सकाळी आठ ते संध्याकाळी सात व प्रसंगी उशिराच्या व्यावसायिक बैठकींमुळं रात्री 12...अशा कामात पेटीचा सराव कसा व कुठं करायचा हा मोठा प्रश्‍नच होता; परंतु गरज असली की मार्ग निघतो. रोज ठाणे ते वरळी या सकाळ-संध्याकाळच्या दीर्घ प्रवासात ड्रायव्हरच्या मागं नुसतं का बसावं? मी एक लॅपटॉप हार्मोनिअम बनवून घेतली व गाडीत रोज दोन-तीन तास रियाज होऊ लागला! वाहतूककोंडी असली की मी खूशच व्हायचो! परदेशातही मी ही पेटी नेत असे, म्हणजे कुठंही (हॉटेलच्या खोलीत, विमानतळावर इत्यादी) रियाज सुरू. एकदा बाहरीन विमानतळावर तिथला पियानोवादक फर्नांडिस याने व मी दोन तास वादन करून, विमानाच्या उशिरामुळे कंटाळलेल्या प्रवाशांना खूश केलं होतं. थोडक्‍यात, पेटीवरची माझी बोटं अव्याहत सुरू राहिली, आजही आहेत. स्वतंत्र वाद्यवादन करण्यासाठी वादकाला आधी गाणं यावं लागतं. रागांचं ज्ञान, बोटांची तयारी तर हवीच.

हार्मोनिअमचे स्वर वेगवेगळे असूनही वादनात सलगता हवी. लयीशी व तालाशी स्वरांचा सुसंवाद हवा आणि वादन कंटाळवाणं कसं होणार नाही, याचं भान हवं. गोविंदरावांना या सगळ्या गोष्टी जन्मत:च मिळालेल्या होत्या. शिवाय, साथ-संगतीचं "गोविंदरावी' तंत्र म्हणजे "साथ चालली आहे' हे समजूही नये! गायकाबरोबर व त्याला विश्रांती देण्याइतकंच वाजवायचं...गायकाशी व त्याच्या शैलीशी मैत्री झाली असल्यासच त्याला, पुढं काय गायचं, हे सुचवायचं...जागा गायकाच्याच अंगानं व वजनानं वाजवून रंग भरायचा...असं ते तंत्र होतं आणि हे सगळं सुरू झालं की "वा, गोविंदराव' किंवा (सलगीतली मंडळी असतील तर) "वा, गोविंदा' अशा दादेच्या लाटा श्रोत्यांमधून उसळत. आजही गोविंदराव हे आमच्यासाठी "हार्मोनिअममधला अढळ ध्रुवतारा' आहेत. संगीतदिग्दर्शन करताना परंपरा व नावीन्य यांचा समतोल ठेवावा लागतो. "संन्यस्त ज्वालामुखी' व "ज्ञानोबा माझा' या दोन नाटकांचं संगीतदिग्दर्शन करताना याचा अनुभव आला. प्रचलित संगीत हे सामाजिक मन:स्थितीचं प्रतिबिंब असतं म्हणूनच आज शांत व सुरेल संगीत लुप्त झालेलं आहे. गुणांहून वेशभूषेचं आणि ज्ञानाहून बडबडीचं महत्त्व वाढलं की गाण्यापेक्षा वाद्ये व सुरापेक्षा भपका वाढतो; परंतु स्वरवैचित्र्याचे, वाद्यकल्लोळाचे वा परंपरासंगमांचे कितीही मुलामे चढवले तरी गाण्यातली "दुर्गुणवत्ता' काही लपत नसते! समाज बदलला तरच हे चित्र बदलेल. माझ्या 60 वर्षांच्या हार्मोनिअम-कारकीर्दीत वसंतराव देशपांडे, राशिद खॉं, सुधीर फडके, आशा भोसले व इतर अनेक दिग्गजांना, तसंच अलौकिक गायिका माणिक वर्मा यांच्याबरोबर तर अमेरिकेत सलग 22 शहरांतल्या कार्यक्रमांना मी हार्मोनिअम-संगत केली. भारतात अनेक ठिकाणी, तसंच सन 1993 लातूरच्या भूकंपनिधीसाठी लंडन इथं आणि सन 1995 मध्ये अमेरिकेच्या महाराष्ट्र मंडळात मी "हार्मोनिअम ः एक रसास्वाद' हा कार्यक्रम केला होता.

माझा मुलगा चि. आदित्य याचा श्रीगणेशाही त्यामुळं यशस्वी झाला. मात्र, माझ्या संशोधकवृत्तीमुळे भारतीय शास्त्रीय संगीताबाबत अनेक प्रश्‍न मला भंडावत असत. स्वरांना सा, रे, ग, म, प हीच नावं का? "नाद', "श्रुती', आणि "स्वर' यांच्यात नेमका फरक काय ? श्रुती 22 च का? हिंदुस्थानी व कर्नाटक स्वर निराळे असतात का ? इत्यादी इत्यादी... या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी वयाच्या 52 व्या वर्षी मी ---अध्यक्षपदाचा---राजीनामा देऊन संगीत-संशोधनाकडं वळलो. माझ्या संगीताच्या खोलीचं "संशोधनकेंद्र' झालं. तंबोरे, तंतुवाद्यं, पेट्या, कॉम्प्युटर, नोंदवह्या यांच्या गराड्यात तीन वर्षं एखाद्या कैद्याप्रमाणे घालवल्यानंतर तारेवर "नाद', "श्रुती' व "स्वर' यांतला फरक आणि "1 षड्‌ज ते 22 श्रुती' या नैसर्गिक निर्मितीप्रक्रियेचा शोध लागला. तारेवरच्या अगणित नादांपैकी फक्त 22 नादांवरच "स्वरबदल' होतो. 12 स्वरांची निवड करण्यासाठी याच 22 "सूक्ष्मस्वरांचा म्हणजे श्रुतींचा' वापर होतो. या 22 पैकी प्रत्येकीची सतार, सरोद, वीणा, व्हायोलिन आदी कोणत्याही तंतुवाद्यावरची टक्‍केवारी "समान' आहे! गणित सुटलं. नाट्यशास्त्रातल्या भरतमुनींच्या संस्कृत श्‍लोकांनुसार षड्‌ज व मध्यम ग्राम आणि पूर्ण, प्रमाण व न्यून श्रुत्यंतरे आपण आजही तशीच्या तशी वापरतो, हे जगाला श्रुतिवीणेवर दाखवलं. ही अचूकता पाहून व ऐकून विश्वमोहन भट्ट यांनी "हे संशोधन नोबेल पारितोषिकपात्र आहे,' असं म्हटलं आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी "ते असामान्य आहे,' असं लिहिलं. 22 श्रुतींचा जगातला पहिला तंबोरा मी तयार केला. "22 श्रुती' या माझ्या पुस्तकावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ गो. के. भिडे यांनी परीक्षण लिहिलं. "मराठी विज्ञान परिषदे'च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या त्या परीक्षणात त्यांनी या पुस्तकाविषयी म्हटलं आहे ः "भारतीय श्रुतिसिद्धान्ताची यथार्थ ओळख'. या संशोधनादरम्यान मला 555 ओव्यांचं "श्रुतिगीता' हे दीर्घकाव्यही स्फुरलं आणि समीक्षक व गायक सदाशिव बाक्रे यांच्यासमवेत लिहिलेल्या "श्रुतिविज्ञान व रागसौंदर्य' या पुस्तकाला पुण्याचे "मराठी ग्रंथालय' व "ग्रंथोत्तेजक सभा' यांचे दोन पुरस्कार मिळाले. यूट्यूबवर अनेक व्हिडिओ, अजय चक्रवर्ती आणि प्रभा अत्रे यांच्या संगीतसंस्थांमध्ये, तसंच मुंबई, दिल्ली, बनस्थली आदी विद्यापीठांमध्ये मी व्याख्यानं दिली आणि प्रसिद्धिमाध्यमांमध्ये यासंदर्भात माझ्या मुलाखतीही झाल्या. 22 श्रुतींच्या आमच्या वेबसाईटला (22श्रुती.कॉम) गूगलवर गेली 10 वर्षं, "प्रथम पृष्ठावर प्रथम' असण्याचा व विकिपीडियावर झळकण्याचा मान मिळत आहे. विद्यार्थ्यांसाठी अँड्रॉईड फोनवर "22 श्रुतीज्‌ इन 500 रागाज्‌' हे ऍप मोफत उपलब्ध करून देण्यात आलं आहे. माझ्या मते, गेली दोन हजार वर्षं रेंगाळलेलं भारतीय शास्त्रीय संगीतातल्या 22 श्रुतींच्या प्रमाणीकरणाचं मोठंच काम या सगळ्यातून झालं. हार्मोनिअम या वाद्यातल्या 12 युरोपीय स्वरांमुळे सर्वच रागांचे स्वर चुकीचे वाजत. आता तंतुवाद्यजन्य 22 श्रुतींच्या नैसर्गिक व प्रमाणित ट्रीटमेंटमुळे तिचं संपूर्ण भारतीयीकरण झालं आहे. अशी हार्मोनिअम बनवण्याच्या गेल्या 100 वर्षांतल्या सर्व प्रयत्नांत त्रुटी होत्या त्या दूर झाल्या. चला; देर आए, दुरुस्त आए!

जगात एकमेव पेटंट असलेल्या या हार्मोनिअमविषयीची संगीतक्षेत्रातल्या काही दिग्गजांची मतं इथं द्यावीशी वाटतात.
"ही हार्मोनिअम न पाहणारे मोठीच चूक करत आहेत' ः नयन घोष "ती गायकांसाठी अनिवार्य केली पाहिजे' ः विश्वमोहन भट्ट
"इतकं अचूक काम आजवर झालेलं नाही,' ः अजय चक्रवर्ती.
शिवाय, तीमधल्या ऍकॉर्डियनच्या अतिरिक्त आश्‍चर्यकारक आवाजामुळं मी विनोदानं म्हणत असतो ः "ही हार्मोनिअम घेणाऱ्याला ऍकॉर्डियन मोफत मिळतो!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com