ऑनलाईन ? कनक्‍टेड ऑर अलोन ? (डॉ. यशवंत थोरात)

डॉ. यशवंत थोरात ythorat@gmail.com
रविवार, 10 सप्टेंबर 2017

फार उशीर होण्याआधीच, सोशल नेटवर्कवरची आपण वाढवलेली मैत्री ही खरी मैत्री आहे का, हे आधी लक्षात घ्या. वेगानं मिळणाऱ्या प्रतिसादांतून निर्माण होणारी ही ‘फ्रेंडशिप’ भावनांच्या प्रतिबिंबातून फुलणाऱ्या मैत्रीपेक्षा वेगळं काही देऊ शकते का? की ती फ्रेंडशिप त्या प्रतिसादासारखीच वरवरची असते? सर्व नात्यांमध्ये जिला अत्युच्च स्थान दिलं जातं, त्या मैत्रीचा स्तर या ‘फ्रेंडशिप’मुळं खाली घसरत आहे का? यंत्रमानवाबरोबर जीवन व्यतीत करण्याच्या युगाकडं तर आपला प्रवास चाललेला नाही ना?

फार उशीर होण्याआधीच, सोशल नेटवर्कवरची आपण वाढवलेली मैत्री ही खरी मैत्री आहे का, हे आधी लक्षात घ्या. वेगानं मिळणाऱ्या प्रतिसादांतून निर्माण होणारी ही ‘फ्रेंडशिप’ भावनांच्या प्रतिबिंबातून फुलणाऱ्या मैत्रीपेक्षा वेगळं काही देऊ शकते का? की ती फ्रेंडशिप त्या प्रतिसादासारखीच वरवरची असते? सर्व नात्यांमध्ये जिला अत्युच्च स्थान दिलं जातं, त्या मैत्रीचा स्तर या ‘फ्रेंडशिप’मुळं खाली घसरत आहे का? यंत्रमानवाबरोबर जीवन व्यतीत करण्याच्या युगाकडं तर आपला प्रवास चाललेला नाही ना?

कोल्हापूरला परतताना नेहमीच्या सवयीनं मी पुण्यात एका हॉटेलात जेवणासाठी थांबलो. त्या डायनिंग हॉलमध्ये जेवणासाठी आलेल्यांमध्ये नेहमीच्याच ग्राहकांची सरमिसळ गर्दी होती. त्यातले काही प्रवासी होते, तर काही ‘चेंज’ म्हणून आलेले पुण्यातलेच रहिवासी. काही ऑफिसला जाणारे, तर काही विद्यार्थी. काही जण एकटेच आलेले, तर बरेचसे जोडीदाराबरोबर. सगळं वातावरण नेहमीसारखंच होतं. खास जाणवण्यासारखी  एकच गोष्ट होती व ती म्हणजे प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये मग्न होता. कुणी फोन करत होतं, तर कुणी आलेले फोन घेत होतं, तर काही जण मोबाईलवर तावातावानं किंवा अत्युत्साहानं कुठला तरी ‘मेसेज’ टाइप करत होते. एका टेबलावर एक तरुण जोडपं बसलं होतं. त्यांचं नुकतंच लग्न झालंय हे त्यांच्याकडं पाहताक्षणी कळत होतं. दोघांनी प्रेमभरानं एकमेकांचा हात हातात घेतला होता; अन्यथा त्यांचेही हात मोबाईलमध्येच गुंतले असते! पलीकडच्या टेबलावर एक मध्यमवयीन जोडपं बसलं होतं. त्या जोडप्याचं वय अशा गर्दीच्या डायनिंग हॉलमध्ये हात हातात घेण्याच्या पुढं सरकलं होतं. त्या दोघांनीही त्यांच्या हातातले मोबाईल अधिक प्रेमानं धरल्याचं जाणवत होतं. मनातलं प्रेम आता जोडीदाराऐवजी फोनपर्यंत पोचलं होतं. काउंटरवर बसलेल्या मालकाचंही अर्धं लक्ष गल्ल्याकडं आणि अर्धं लक्ष हातातल्या मोबाईलकडं होतं. जवळपास प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये गढलेला होता. ‘पाहा, जग कुठून कुठपर्यंत आलंय,’ असं म्हणत मी सुस्कारा सोडला. माझं जेवण आटोपलं. काउंटरवर पैसे दिले आणि माझ्या वाटेनं मी बाहेर पडलो. कारपर्यंत पोचेपर्यंत ते वातावरण माझ्या मनातून पुसलंही गेलं. कदाचित ते तसंच विस्मृतीतही गेलं असतं; पण अचानक आलेल्या एका मेलमुळं त्या आठवणी पुन्हा जागवल्या गेल्या. तो मेल पुढीलप्रमाणे होता ः

प्रिय डॉ. थोरात,
दर १५ दिवसांनी प्रसिद्ध होणाऱ्या तुमच्या सदराची मी एक नियमित वाचक आहे. गेल्या सुमारे वर्षभरापासून मी हे सदर नियमितपणे वाचतेय. त्यापैकी काही विषयांवरच्या माझ्या प्रतिक्रियाही मी तुम्हाला वेळोवेळी पाठवल्या आहेत. त्या प्रतिक्रियांना तुम्ही अतिशय आत्मीयतेनं दिलेल्या उत्तरांमुळं थोड्याशा धिटाईनंच हा थोडा वेगळ्या संदर्भातला मेल मी तुम्हाला पाठवतेय. मला तुमचा सल्ला हवा आहे. तशी ही माझी खासगी बाब आहे; पण शक्‍य झालं तर कृपया मला मदत करा.
गेल्या डिसेंबरमध्ये म्हणजे सुमारे आठ महिन्यांपूर्वी माझं लग्न झालं आणि आज मी घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभी आहे. आमचं लग्न ‘ठरवून’ म्हणजे अगदी बघण्याचा कार्यक्रम वगैरे करून झालं. दोघांच्याही घरच्यांची पसंती मिळाली आणि आम्ही विवाहबद्ध झालो. आम्ही दोघंही नोकरी करतो. तो एका सॉफ्टवेअर कंपनीत आहे, तर मी कॉलसेंटरमध्ये. लहानपणापासून मी अगदी मोकळ्या वातावरणात वाढलेली. त्यामुळं माझा मित्रपरिवार खूप मोठा आणि ओळखीही खूप जास्त. सगळ्याच तरुण मुला-मुलींप्रमाणे मी सोशल मीडियावर अतिशय सक्रिय होते. अनेक ग्रुपबरोबर माझा डायलॉग होता. आपले विचार आणि अनुभव मी माझे सहकारी, मित्र आणि अन्य परिचितांबरोबर ‘शेअर’ करत असे आणि त्यात मला आनंद वाटत होता.
दोन महिन्यांपूर्वी आम्ही असंच एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. त्या वेळी अचानक त्याला कुणाला तरी फोन करण्याची आठवण झाली. योगायोगानं त्याचा फोन त्याच्याजवळ नव्हता. त्यानं सहजपणे माझा मोबाईल मागितला. मला आश्‍चर्यच वाटलं. फोन द्यायला मी थोडे आढेवेढे घेतले. मला काही लपवायचं होतं म्हणून नव्हे किंवा आपलं एखादं गुपित उघड होईल, अशा भावनेतूनही नव्हे; पण सोशल मीडियावरचं माझं फ्रेंड सर्कल खूप मोठं होतं आणि त्यातले सगळेच जण एकमेकांशी अतिशय मोकळेपणानं बोलत असत. अशा ‘चॅट’मध्ये कुणी फारशी सावधगिरी बाळगत नसत. मला भीती वाटत होती, की हे संभाषण त्याच्या नजरेस पडलं, तर संदर्भ माहीत नसल्यामुळं त्याचा गैरसमज होईल. तो त्यातून काही तरी भलताच अर्थ काढेल. त्या वेळी हे सगळं त्याला समजावून सांगण्याइतका वेळही नव्हता. म्हणून मी थोडी गडबडले. घाईघाईत मी पासवर्ड बदलून मोबाईल त्याच्या हाती दिला. त्यानं कॉल तर केला; पण मी पासवर्ड का बदलला, असं त्यानं मला विचारलं. मी त्याला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला; पण त्याला फार उशीर झाला होता. संशयाची ठिणगी पडली होती. आमची भांडणं व्हायला लागली. मी काही तरी लपवत असल्याचा आरोप त्यानं माझ्यावर केला. माझ्यावर विश्वास न ठेवल्याबद्दल मी त्याला दोष द्यायला लागले. त्याचा आपला एकच धोशा होता, ‘लपवण्यासारखं काहीच नाही ,असं म्हणतेस, तर मग तू पासवर्ड का बदललास?’
‘मी घाबरले होते,’ मी खुलासा केला.
त्यावर त्याचा प्रतिप्रश्‍न, ‘नेमकं कशासाठी आणि का घाबरलीस?’
‘माझ्या संभाषणांचा तू चुकीचा अर्थ लावशील आणि तुझा गैरसमज होईल अशी भीती मला वाटली,’ मी म्हणाले.
‘तसं असेल तर आत्ता पुन्हा मला फोन दे’ त्यानं आग्रही मागणी केली. मी नकार देऊ शकले नाही. त्यानं माझा मोबाईल त्याच्या ऑफिसमध्ये नेला. दुसऱ्या दिवशी तो परत आला तेव्हा बरंच काही बिनसल्याचं माझ्या लक्षात आलं.
‘माझंच म्हणणं खरं निघालं’ आल्या आल्या फोन आणि डबा माझ्या हाती देत तो म्हणाला, ‘माझ्या मित्रानं तुझ्या मोबाईलची पूर्ण फोरेन्सिक तपासणी केलीय. तुझे सगळे मेल्स आणि चॅट्‌स मी तपासलेत. मित्रपरिवारातल्या किमान दोघांशी तुझा खूपच निकटचा स्नेह होता, हे माझ्या लक्षात आलंय. तुझं वागणं वाजवीपेक्षा जास्त ‘मोकळं’ होतं हेही मला समजलंय. त्यांची नावं तुला ऐकायचीयत?’
‘असली संभाषणं वरवरची असतात आणि केवळ ‘त्या वेळेपुरत्या गप्पा’ यापलीकडं त्यात काही नसतं,’ हे माझं म्हणणं त्याला पटलं नाही. माझ्या संभाषणांचे प्रिंटआउट्‌स माझ्या हाती देत तो म्हणाला, ‘जा आणि हे वाच. हा ढळढळीत पुरावा असताना तुझ्या खुलाशांना काय अर्थ आहे? तू मला फसवत होतीस, हेच सत्य आहे. ही फसवणूक फक्त भावनिकच होती की शारीरिकही होती हे फक्त त्या देवाला माहीत.’  तो निर्वाणीच्या सुरात पुढं म्हणाला, ‘ते काहीही असो, आपण एकत्र राहू शकू असं मला वाटत नाही.’

त्यानं त्या प्रिंट्‌स त्याच्या आई-वडिलांना दाखवल्या. त्यांनी त्या वाचल्या आणि माझ्या आई-वडिलांना बोलावून घेतलं. त्यांच्यासमोर त्यांनी पुन्हा सगळ्या गोष्टींचा पाढा वाचला आणि ‘हिला तुमच्याचबरोबर घेऊन जा,’ असं त्यांना फर्मावलं. हे पत्र मी तुम्हाला माझ्या माहेरच्या घरून लिहीत आहे. काय करावं मला सुचत नाहीये. माझं वैवाहिक जीवन उद्‌ध्वस्त होण्याच्या बेतात आहे. सगळंच संपवावं असं मला वाटतंय.
आपली
XXX

या मेलचा माझ्यावर दोन कारणांमुळं परिणाम झाला. एक म्हणजे, मानवी आयुष्याची एक दुःखद कहाणी त्यात होती. दुसरी गोष्ट म्हणजे, त्यात असं काही तरी होतं, की जे मला माहीत होतं; पण ते मी मान्य करायचं टाळत होतो. आधुनिक तंत्रज्ञान आणि त्याची शक्ती लाभलेली विविध उपकरणं हळूहळू आपल्या मनाचा ताबा घेत आहेत आणि त्यातून आपण परंपरेनं ज्या नात्यांनी बांधले जात होतो आणि परस्परांशी संवाद साधत होतो, ते धागेच खंडित होत आहेत.

माहिती-तंत्रज्ञानानं देशात वेग घेतला तेव्हा, मी वयाच्या चाळिशीत होतो. कॉम्प्युटरचं मला फारसं ज्ञान नव्हतं आणि होता होईतो मी तो टाळत असे. हे फार काळ चालणार नाही, हे लक्षात आल्यावर मी गरजेपुरता कॉम्प्युटर शिकलो. कालांतरानं थोडा सरावलो; पण कॉम्प्युटरबरोबरची माझी मैत्री तशी वरवरचीच राहिली. हळूहळू या नव्या तंत्रज्ञानाचा मी वापर करायला लागलो; पण तोही अत्यावश्‍यक असेल तेव्हाच. मी मोबाईल घेतला; पण तोही फोन करणं किंवा आलेला फोन घेणं एवढ्यासाठीच. मी अनेक पुस्तकं ‘डाऊनलोड’ केली; पण पुस्तक स्क्रीनवर वाचणं मला कधीच रुचलं नाही. मी अत्याधुनिक लॅपटॉप घेतला; पण एक चांगला टाइपरायटर म्हणूनच त्याचा वापर केला. मी इंटरनेटवर सर्फिंग करत होतो; पण फक्त आलेले मेल तपासण्यापुरतं आणि काही जुजबी माहिती मिळवण्यापुरतंच. माझी मुलं आणि नातवंडं ‘नेट’ला कशी खिळून बसतात, ते मी पाहिलेलं होतं. त्यांचं ‘नेट’वर अवलंबून राहणं मला धोकादायक वाटत होतं आणि ते पाहून मनात मला त्रासही होत होता. माझी पत्नी उषा हीसुद्धा या इंटरनेटची निष्ठावान भक्त होती; पण हे सगळं का घडतंय ते समजून घेण्याऐवजी मी स्वतःला पुस्तकात गाडून घेत होतो. एक प्रकारे वास्तवापासून दूर पळत होतो. या घडणाऱ्या बदलांची दखल घेण्याची वेळ आली आहे, असा इशाराच जणू त्या मेलनं मला दिला. ‘आता तरी वास्तवाकडं डोळे उघडून बघा,’ असंच तो मेल मला सांगत होता.

शोध घेतला तेव्हा मिळालेल्या माहितीनं मी हादरलोच. सोशल मीडियाची लोकप्रियता थक्क करणारी होती. ज्याला ‘सोशल मीडियाचा राजा’ असं म्हटलं जातं, ते फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या जुलै २०१७ च्या अखेरीस २.०१ अब्ज ग्राहकांपर्यंत पोचली होती. त्यांपैकी १.१५ अब्ज मोबाईल होते. हे ग्राहक दर सेकंदाला पाच नवी प्रोफाइल्स निर्माण करत होते. दर मिनिटाला पाच लाख प्रतिक्रिया नोंदवत होते आणि तीन लाख स्टेटस अपडेट करत होते आणि दररोज सुमारे ३० कोटी फोटो अपडेट करत होते. काही दिवसांपूर्वी फेसबुकच्या मासिक ग्राहकांची संख्या व्हॉट्‌स ॲप (५०० दशलक्ष), ट्‌विटर (२८४ दशलक्ष) आणि इन्स्टाग्राम (२०० दशलक्ष) यांच्या एकत्रित ग्राहकांपेक्षा जास्त होती. सोशल मीडियावरच्या इतर माध्यमांपेक्षा फेसबुकची लोकप्रियता आजही वादातीतपणे जास्त असली, तरी स्पर्धा वेगानं वाढत आहे हे सत्य आहे. जगभरातल्या ३५ भाषांतून ३२८ दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोचणारं ट्‌विटर हे माध्यम जगभरातल्या घडामोडी कमीत कमी वेळात जाणून घेणारं सगळ्यात वेगवान माध्यम ठरत आहे. लिंक्‍ड्‌ इनच्या सक्रिय मासिक ग्राहकांची संख्या ट्विटरपेक्षा कमी असली, तरी ती धक्कादायक गतीनं वाढत आहे. मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वापरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे सरासरी १३० फ्रेंड आहेत. त्याला दर महिन्याला किमान आठ नव्या फ्रेंड रिक्वेस्ट मिळतात. तो साधारण १३ ग्रुपचा सदस्य असतो आणि महिनाभरात सुमारे ६०० मेसेज पाठवतो!

मागं वळून पाहिलं तेव्हा घटनांचा क्रम नेमकेपणानं ध्यानात आला. आमच्या करिअरच्या सुरवातीच्या दोन दशकांत प्रत्येक गोष्ट स्थिर, धीमी आणि नेमका अंदाज येणारी अशी होती. काही वेळा त्याचा कंटाळाही यायचा. नंतर माहिती तंत्रज्ञान आमच्यावर येऊन आदळलं तेव्हा आमच्या आयुष्यातल्या घडामोडींनी एकदम षटकाराचा वेग आणि उंची गाठली. आधी इंटरनेट आणि मग त्याचे ‘सगे-सोयरे’ एकापाठोपाठ एक आले. समोरासमोर किंवा फोनवर बोलणं ज्यांना शक्‍य नव्हतं, त्यांच्यासाठी लिखित निरोपाचा (टेक्‍स्ट मेसेज) पर्याय उपलब्ध झाला. आपल्यासारखेच जे अतिकामात अडकलेले किंवा सततच्या कामात जुंपलेले आहेत ते मित्र बनले. सोशल मीडियाच्या या युगानं सर्व माध्यमांमध्ये वेगानं वाढ झाली. यातून एक गोष्ट स्पष्ट होत होती व ती म्हणजे, एकमेकांच्या संपर्कात राहणं ही गोष्ट आम्हाला आवडत होती. आपल्या सामाजिक परिवारातले इतर लोक काय करताहेत, हे जाणून घेण्यात आम्हाला नक्कीच रस होता. त्यांना काय आवडतं आणि काय आवडत नाही, हे आम्हाला माहीत करून घ्यायचं होतं. प्रत्येक गोष्टीबद्दल या घटकांना काय वाटतं ते जाणून घेण्यात आम्हाला इंटरेस्ट होता.

आधुनिक तंत्रज्ञानानं हे सगळं आपल्याला दिलंच; पण त्याबरोबरच बोनस म्हणून आणखीही एक शक्ती दिली. तुम्हाला हवा त्याच्याशी, हवा तेव्हा आणि हवा तेवढा वेळ संपर्क ठेवा किंवा पाहिजे तेव्हा त्याला ‘डिसएंगेज’ करून या विश्वाच्या पोकळीत लुप्त व्हा, ही ती शक्ती होय. हे एक प्रकारचं नवं स्वातंत्र्य होतं. एखाद्याला प्रत्यक्ष न भेटता त्याच्याशी संपर्क ठेवणं आणि त्याच्याविषयी हवं ते जाणून घेणं हेच ते नवं अभिनव तंत्र. या नव्या तंत्रात त्या व्यक्तींना प्रत्यक्ष न भेटण्याची किंवा त्यांच्याबरोबर वेळ न घालवण्याची सोय होती, याचा प्रचंड परिणाम झाला. यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर केलेल्या एका पाहणीत अनेक तरुण, मध्यमवयीन आणि अगदी वृद्धांनीही असं सांगितलंय, की प्रत्यक्ष जीवनात त्यांना त्यांचा चेहरा किंवा व्यक्तिमत्त्व बदलण्याची फारशी सोय नव्हती; पण ‘फेसबुक’नं मात्र त्यांना त्यांचा चेहरा आणि व्यक्तिमत्त्व नखशिखान्त बदलण्याची सोय उपलब्ध करून दिली. त्यांना हवं तसं ते स्वतःला सादर करू शकत होते. ते त्यांना नवे चेहरे, आलिशान किंवा टुमदार घरं, स्थिर नोकऱ्या आणि उत्फुल्ल जीवन यांपैकी जे हवं ते देऊ शकत होते.  तंत्रज्ञानानं आपल्याला एक नवं अस्तित्व दिलं. थोडं वास्तव आणि थोडं काल्पनिक.

२०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कॅटफिश’ या लघुपटानं ते सत्य फार विदारकपणे जगासमोर मांडलं आहे. न्यूयॉर्कमधल्या नेव्ह शुलमान या तरुण छायाचित्रकाराची ही कथा आहे. एके दिवशी मिशिगनच्या ग्रामीण भागातल्या एका आठ वर्षांच्या ॲबी नावाच्या मुलीनं त्याच्या एका छायाचित्रावरून काढलेल्या एका पेंटिंगची कॉपी त्याला मिळते. नेव्ह आणि ॲबी फेसबुकवरून एकमेकांचे ‘फ्रेंड’ होतात. त्यांच्यात संवाद सुरू होतो. ॲबी तिच्या कुटुंबाची म्हणजे आई अँजेला, वडील व्हिन्स आणि मोठी बहीण मेगान यांची नेव्हशी फेसबुकवरून ओळख करून देते.

हळूहळू नेव्ह आणि मेगान यांचा परिचय वाढतो आणि त्यांच्यात संवाद सुरू होतो. फेसबुकवरच्या तिच्या छायाचित्रातून दिसणारं तिचं सौंदर्य नेव्हला आकर्षित करतं. ती दोघं फोनवरून वारंवार बोलायला लागतात. ‘चॅट’द्वारे त्यांच्यात असंख्य मेसेजची देवाण-घेवाण होते. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात. मेगान तिनं केलेली गाणीही नेव्हला पाठवते.

पण मेगाननं पाठवलेली गाणी ही प्रत्यक्षात यू ट्यूबवरून घेतली आहेत हे नेव्हला एकदा अपघातानं कळतं. तिनं तिच्या कुटुंबाविषयी दिलेल्या माहितीतली विसंगतीही त्याच्या ध्यानात येते. त्याला संशय येतो. खरं काय ते शोधायचं तो ठरवतो. तो मिशिगनला जाऊन शोध घेतो तेव्हा त्याला समजतं, की मिशिगनमध्ये ‘ॲबी’ नावाची एक मुलगी आहे; पण ती चित्रं काढत नाही, तिला बहीण नाही; किंबहुना तिथं मेगान नावाची कुणीही मुलगी नाही. तो आणखी बारकाईनं शोध घेतो तेव्हा त्याला कळतं, की अगदीच सर्वसामान्य दिसणारी ॲबीची आई अँजेलाच या सगळ्या गोष्टी करत होती. फेसबुकवरची वेगवेगळी रूपं तिचीच होती. नेव्हला आकर्षित करण्यासाठी आणि त्याला आपल्या प्रेमात गुंतवण्यासाठी अँजेला हीच हे खेळ खेळत होती. तिनंच मेगान उभी केली होती. खरी माहिती समजली तेव्हा नेव्ह हादरलाच.

अँजेला आणि हे इतर सगळे जण केवळ वास्तवातच नाहीत, तर अशा व्यक्तिरेखांनी सोशल मीडियात धुमाकूळ घातलेला आहे, हेच हा लघुपट सांगतो. खोटी रूपं धारण करून या व्यक्तिरेखा फेसबुक किंवा तत्सम माध्यमातून प्रेमाचं नाटक करतात आणि माणसाच्या एकटेपणाचा किंवा इतरांच्या संपर्कात राहण्याच्या त्याच्या आंतरिक ओढीचा गैरफायदा घेतात. अँजेला किंवा तिच्या पठडीतले लोक हे अभिनेते किंवा जादूगार नाहीत, तर ती अशी माणसं असतात, की प्रत्यक्ष जीवनात त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळं किंवा त्यांच्या आयुष्यातल्या घटनांमुळं त्यांच्याशी कुणी संपर्क ठेवत नाही. त्यामुळं वेगळं रूप धारण केल्याशिवाय आपल्याला जोडीदार मिळणार नाही, असं या लोकांना वाटत असतं, असं मानसशास्त्रज्ञ सांगतात. थोडक्‍यात, अशी माणसं स्वतःच्या वास्तवाला घाबरणारी असतात. उतारवयामुळं नेव्हचं प्रेम आपल्याला मिळणार नाही; पण आकर्षक मेगान ते मिळवू शकेल, याची अँजेलाला खात्री असते. मानसशास्त्रज्ञ सांगतात, की मेगानची व्यक्तिरेखा खोटी आहे; पण अँजेलाच्या मेगानच्या रूपातल्या भावना मात्र खऱ्या आहेत. म्हणजे व्यक्तिरेखा खोटी; पण भावना मात्र खऱ्या आणि प्रामाणिक!

यातलं विदारक वास्तव हे आहे, की सोशल मीडियावर वावरणारा प्रत्येक जण थोड्याफार प्रमाणात हेच करत असतो. आपल्याला वाटतं तसंच आपण सादर व्हायला पाहिजे, यासाठी तो कायम धडपडत असतो. हीच सोशल मीडियाची किमया आहे. हे माध्यम आपल्याला आपल्यातला हवा तो भाग लोकांपुढं आणण्याची सोय उपलब्ध करून देतं आणि त्याच वेळी आपल्याला नको असलेला भाग वगळण्याची किंवा लपवण्याची मुभाही देतं. आपण आपले फक्त सुंदर फोटोच अपलोड करतो, आपल्या आयुष्यातले उन्नत क्षणच आपण दाखवतो. हॉटेलात, संग्रहालयात किंवा जहाजावर असं आपण कुठंही असलो तरी तिथले चांगले प्रसंगच आपण लोकांसमोर आणण्यासाठी धडपडतो. कुणी असं म्हणेल, की आपल्या रोजच्या जीवनात तरी आपण वेगळं काय करतो? आपण रोज अगदी हेच करत असतो. इतर माणसं त्यांच्यासाठी जे कपडे निवडतात, त्यावरूनच आपण त्यांची परीक्षा करतो ना? त्यांना हव्याशा वाटणाऱ्या अशा त्यांच्या ज्या गोष्टी ते निवडतात, त्याच आपण त्यांच्याकडून ऐकतो ना? आपल्याविषयी जी माहिती लोकांपर्यंत पोचावी असं त्यांना वाटतं, तीच माहिती आपण त्यांच्याकडून निमूटपणे ऐकतो ना? इतरांना आपल्याविषयी जी माहिती असते, ती आपणच त्यांना समजावी म्हणून निवडलेली नसते का? हो. अगदी बरोबर...पण यात एक गोष्ट मात्र विसरली जाते, की सोशल मीडियानं आपल्याला आपली अशी काल्पनिक किंवा खोटी प्रतिमा रंगवणं सोपं करून दिलंय. मग ही काल्पनिक प्रतिमा अनेकदा इतकी मोठी होते, की व्यक्तिगत स्वार्थासाठी, व्यापारी-स्वार्थासाठी किंवा राजकीय स्वार्थासाठी तिचा वापर होऊ शकतो.

इथं आणखी एका गोष्टीकडं बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. तंत्रज्ञान आपल्या काल्पनिक जीवनाचा पट वाटेल तसा बदलू शकतं. त्यामुळं आपण स्क्रीनवर जे पाहतो, तेच खरं जीवन आहे, असं आपल्याला वाटायला लागतं. त्यामुळं प्रश्‍न असा निर्माण होतो, की जे जीवन आपल्याला दाखवलं जातंय तसं जीवन खरोखरच आपल्याला हवं आहे का? प्रत्यक्ष माहितीवर आधारलेला पुरावा असं सांगतो, की तासन्‌तास लोकांच्या सहवासात राहणारी माणसंसुद्धा या सहवासाबद्दल किंवा संपर्काबद्दल असमाधान व्यक्त करतात. त्यांचा अनुभव समाधान देणारा नसतो. कारण, त्यातून त्यांची खरी चिंता दूर होत नाही. आपल्या मित्रांबद्दल आपल्याला खूप काही माहीत असतं; पण आपण आपली माहिती डिजिटल मीडियावर टाकताना त्यांच्या सुख-दुःखाचा विचार करतो का?
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीनं केलेल्या एका पाहणीची माहिती जॉन मार्कऑफ यांनी १६ फेब्रुवारी २००० च्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या एका लेखात दिली आहे. या अभ्यासातून त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे, की जे लोक इंटरनेटवर जेवढा जास्त वेळ खर्च करतात तेवढा आजूबाजूच्या लोकांसाठीचा त्यांचा वेळ कमी होतो. काल्पनिक जगात आपण जेवढा जास्त वेळ घालवू, तेवढा वास्तव जगातला आपला संपर्क कमी होईल. खरं म्हणजे हे वास्तव जगच आपल्याला खरी माणुसकी शिकवत असतं. आपल्या खऱ्या जीवनात किंवा ‘ऑनलाईन’ जीवनात आपण कुणाशी तरी जोडलेले असतो की एकटे असतो हा खरा प्रश्‍न आहे. आपल्या फ्रेंड्‌स ग्रुपमधले ‘फ्रेंड्‌स’ वास्तवातल्या त्या मित्रासारखेच असतात का, की जो तुमची हाक ऐकताच हातातलं काम टाकून मदतीसाठी धावत येईल? ‘चॅट’वरचे तुमचे मित्र तुमच्या सुख-दुःखाचे भागीदार बनतात का? जर एखाद्यानं ‘मी इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्‍ट झालो,’ अशी फेसबुकवर पोस्ट टाकली, तर त्यावर ६८ जणांनी लाईक केल्यामुळं मिळणारं समाधान तुमच्या पाच मित्रांनी प्रत्यक्ष भेटून केलेल्या अभिनंदनातून मिळणाऱ्या समाधानाच्या बरोबरीचं असतं का? प्रत्येक गोष्ट काही क्‍लिकच्या अंतरावर असणाऱ्या या अभूतपूर्व आणि डोळे दिपवणाऱ्या काल्पनिक जगाचा एक अपरिहार्य परिणाम असा होतो, की वास्तव जीवनातली जवळीक त्यातून हिरावून घेतली जाते. नेटवर जास्त वेळ खर्च करून आपण आपल्यातला जिव्हाळा आणि प्रेम घालवून बसतो. तुम्ही मागच्या सुटीत केलेल्या साहसाची कथा तुमच्या खऱ्या मित्राला सांगताना त्याच्या डोळ्यांत जी काळजी दिसेल, ती काळजी कुठल्याही ‘ऑनलाईन’ माध्यमानं तुम्हाला दाखवता येणार नाही. विशेषतः अशा मित्राला, की ज्याला यापूर्वी तुमच्यावर एकामागून एक आलेल्या सगळ्या संकटांची पूर्ण माहिती आहे.

थोडक्‍यात, फार उशीर होण्याआधीच सोशल नेटवर्कवरची आपण वाढवलेली मैत्री ही खरी मैत्री आहे का, हे आधी लक्षात घ्या. वेगानं मिळणाऱ्या प्रतिसादांतून निर्माण होणारी ही ‘फ्रेंडशिप’ भावनांच्या प्रतिबिंबातून फुलणाऱ्या मैत्रीपेक्षा वेगळं काही देऊ शकते का? की ती फ्रेंडशिप त्या प्रतिसादासारखीच वरवरची असते? सर्व नात्यांमध्ये जिला अत्युच्च स्थान दिलं जातं त्या मैत्रीचा स्तर या ‘फ्रेंडशिप’मुळं खाली घसरत आहे का? यंत्रमानवाबरोबर जीवन व्यतीत करण्याच्या युगाकडं तर आपला प्रवास चाललेला नाही ना? केवळ करमणुकीसाठी निर्माण झालेलं हे भासमान जग हेच उद्याचं आपलं जग किंवा विश्व बनणार नाही ना?
सत्य हे आहे, की फेसबुकवरचे ते सगळे ‘लाईक्‍स’, ‘वॉव्ज्‌’ आणि ‘लव्ह्‌ज’ आपली अशा प्रतिसादाबद्दलची भूक आणखी वाढवतात. भासमान जग ही कधीही न संपणारी अशी मेजवानी आहे, की जिथं कधीच समाधान होत नाही. समोरासमोर येण्यातला आनंद फेसबुक कधीच देऊ शकणार नाही. तुम्ही इंटरनेटवर मनापासून कितीही प्रेम केलंत तरी ते मागून येऊन तुम्हाला कधीही मिठी मारणार नाही.

माझ्या लेखाची पहिली वाचक असलेली माझी पत्नी उषा हिला मी हा लेख दाखवला. तिनं तो शांतपणे वाचला. शेवटी मात्र तिच्या चेहऱ्यावर एक प्रश्‍नचिन्ह उमटलं. मी कुतूहलानं तिच्याकडं पाहत होतो. ‘ज्या मुलीनं तुम्हाला मेल केला होता तिचं काय झालं?’ तिनं नेमकेपणानं तिची शंका मांडली. ‘त्या मुलीच्या कहाणीचं पुढं काय झालं, हे यात काहीच आलेलं नाही. तुम्ही वाचकांच्या मनात हा प्रश्‍न असा अर्धवट सोडू शकत नाही,’ ती म्हणाली. तिचा प्रश्‍न रास्त होता. मी लेखाची सुरवात तिच्या मेलनं केली होती; पण शेवट करताना तिचा उल्लेख केला नाही; पण मी तसं विनाकारण केलेलं नाही. शेवटी, लेखक हा वाचकांचा विश्‍वस्त असतो; डिटेक्‍टिव्ह नव्हे. कल्पित कथेव्यतिरिक्त तो स्वतःचं असं काही लिहू शकत नाही. त्याला संबंधितांनी विश्‍वासात घेऊन जे सांगितलंय, तेही तो त्यांची परवानगी असल्याशिवाय लिहू शकत नाही.
पहिल्या मेलनंतर मला तिच्याकडून काहीच समजलं नाही. आमचा संपर्कही नाही. मी तिला फोन करायला नको होता; पण मी केला. तिच्या आईनं फोन उचलला. मी तिची चौकशी केली; पण तिच्या आईनं फोन कट केला. नंतर फोन बंदच झाला. बस, इतकंच!

Web Title: dr yashwant thorat write article in saptarang