कुठलीही गोष्ट कधीच संपत नसते...! (डॉ. यशवंत थोरात)

डॉ. यशवंत थोरात ythorat@gmail.com
रविवार, 7 जानेवारी 2018

मला नातवंडांनी गोष्ट सांगण्याचा आग्रह केल्यानुसार मी त्यांना ‘मुंबईची गोष्ट’ सांगितली. नातवंडं गोष्टीत चांगलीच गुंगून गेली होती. गोष्ट आजच्यापुरती सांगून संपल्यावर मी त्यांना म्हणालो :  
‘‘चला मुलांनो, आता मजा करा. मी माझ्या कामाला लागतो.’’
त्यावर यामिनी म्हणाली : ‘‘नाही, अजून ‘गोष्ट’ संपली नाहीय.’’ मी उत्तरलो : ‘‘बेटा, कुठलीही गोष्ट कधीच संपत नसते, हे तुला एक दिवस समजेल...’’

मला नातवंडांनी गोष्ट सांगण्याचा आग्रह केल्यानुसार मी त्यांना ‘मुंबईची गोष्ट’ सांगितली. नातवंडं गोष्टीत चांगलीच गुंगून गेली होती. गोष्ट आजच्यापुरती सांगून संपल्यावर मी त्यांना म्हणालो :  
‘‘चला मुलांनो, आता मजा करा. मी माझ्या कामाला लागतो.’’
त्यावर यामिनी म्हणाली : ‘‘नाही, अजून ‘गोष्ट’ संपली नाहीय.’’ मी उत्तरलो : ‘‘बेटा, कुठलीही गोष्ट कधीच संपत नसते, हे तुला एक दिवस समजेल...’’

या  वर्षाची अखेरची संध्याकाळ शांतपणे घरात घालवण्याचा माझा विचार होता; पण इंग्लंडहून आलेल्या माझ्या मुली आणि त्यांना चिथावणी देणारी माझी पत्नी उषा माझा तो बेत उधळून लावण्याचा हरतऱ्हेनं प्रयत्न करत होती. मुंबईतल्या रस्त्यांवरच्या गर्दीत मला जायचं नव्हतं; पण त्यांच्या बहुमतापुढं शरण जाण्याखेरीज पर्यायही नव्हता. अचानक मला एक कल्पना सुचली.
‘‘ठीक आहे, मी यायला तयार आहे; पण गर्दीत राघव आणि यामिनी यांची काळजी कोण घेणार?’’ हा माझा बिनतोड सवाल होता. उषानं मुलींकडं बघितलं. त्यांनी त्यांच्या नवऱ्यांकडं. त्या दोघांनी एकमेकांकडं बघितलं. जाळ्याच्या मध्यभागी असलेल्या कोळ्यासारखा मी मला हवं असलेलं
उत्तर कधी येतंय याची वाट बघत होतो! आभा म्हणाली : ‘‘बाबा, मुळात तुम्हाला यायचंच नव्हतं.’’

१. अदितीनं आभाच्या सुरात सूर मिसळत म्हटलं : ‘‘खरंच गर्दीचा एवढा त्रास होत असेल तर मग तुम्ही मुलांबरोबर घरीच का नाही थांबत!’’ मी चेहऱ्यावर साळसूद भाव आणले. राघवनं आणि यामिनीनं या कल्पनेला जोरदार विरोध केला. दर्शकनं तडजोडीचा एक प्रस्ताव ठेवला.
‘‘आपण असं करू की सगळ्यांसाठी पिझ्झा आणि आइस्क्रीम मागवू. शिवाय, आजोबा तुम्हाला गोष्ट सांगतील.’’
२. सगळे घराबाहेर पडले आणि सुटकेचा नि:श्वास सोडून मी मुलांकडं वळलो. ‘‘हे बघा, आता तुमचे आई-बाबा बाहेर गेलेत. तुम्ही मोकळे आहात. Watch as much TV as you want. काम आहे. थोड्या वेळात पिझ्झा येईलच; मग आपण पार्टी करू,’’ म्हणालो.‘‘हो, पण ‘गोष्टीचं’ काय?, तुम्ही गोष्ट सांगायची असं ठरलं होतं,’’ राघव म्हणाला. ‘‘माझ्या गोष्टीपेक्षा टीव्ही नक्कीच अधिक चांगला आहे.’’
‘‘नाही, नाही,’’ यामिनी ठामपणे म्हणाली. ‘‘तुम्ही गोष्ट खूप छान सांगता,’’ राघवनंही तिच्या म्हणण्याला पुस्ती जोडत माझ्याविरुद्धची आघाडी बळकट केली.
‘‘आई-बाबा कुठं गेले असतील?’’ त्यानं विचारलं.‘‘गेट वे ऑफ इंडियावर स्वत:ला मूर्ख बनवून घ्यायला’’ म्हणालो.‘‘त्याला गेट वे ऑफ इंडिया का म्हणतात?’’ यामिनीनं विचारलं.

‘‘नको, आजोबा त्याचं एका प्रश्‍नात उत्तर देतील आणि पुन्हा सटकतील. मी त्यांना चांगलं ओळखतो. त्यापेक्षा तुम्ही आम्हाला मुंबईचीच गोष्ट सांगा,’’ राघव म्हणाला. ‘‘कुठल्याही मुद्द्यावर अखेरपर्यंत लढण्याचा माझा स्वभाव आहे.‘अरेबियन नाईट्‌स’मधल्या गोष्टीप्रमाणे माझीही गोष्ट पिझ्झा येताक्षणी थांबेल, मान्य आहे’’?-मी विचारलं.
‘‘ठीक आहे...आपण ऐनवेळी ठरवू’’ दोघंही म्हणाले.
३.‘‘तुम्ही मुंबईतच वाढलात का?’’ राघवनं विचारलं.
‘‘नाही, मी या शहरात लहानाचा मोठा झालो नाही; पण माझ्या नोकरीचा जास्तीत जास्त काळ मी इथं घालवला. मला हे शहर आवडत नाही; पण मी याचा आदर जरूर करतो. मी खरं तर ग्रामीण भागात वाढलेला. मला हिरवागार ऊस, जळणाऱ्या गोवऱ्यांचा वास, झुणका-भाकरी, ठेचा, गाई-बैलांच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज या गोष्टी आवडतात. या गोष्टी मिळाल्या म्हणजे सगळी मुंबई मिळाल्यासारखं मला वाटतं.’’
‘‘का?’’ यामिनीनं विचारलं. कारण, मुंबईची मला भीती वाटते. एखाद्या मोठ्या यंत्राच्या अगदी लहान भागासारखं अगदी छोटं झाल्यासारखं मला वाटतं. समुद्रानं वेढलेल्या सात बेटांवर मुंबई उभारली गेली. ही सातही बेटं एकमेकांना जोडल्यामुळं जे शहर उभं राहिलं ती आजची मुंबई.

४. अगदी सुरवातीला ज्यांनी हे शहर वसवलं ते मुंबईचे मूळचे रहिवासी द्रविडी वंशाचे कोळी होते. नंतर हा भाग सम्राट अशोकाच्या साम्राज्यात समाविष्ट झाला. मौर्य साम्राज्याच्या लयानंतर हिंदू राजांच्या अनेक राजवटींनी सन १३४३ पर्यंत इथं राज्य केलं. त्यानंतर गुजराती सुलतानांची राजवट सुरू झाली. या काळात इथं अनेक वास्तू उभ्या राहिल्या. मुस्लिम धर्मगुरू हाजी अली यांचा दर्गा याच काळात बांधला गेला. सन १५४३ मध्ये प्रबळ पोर्तुगीजांनी शस्त्रांच्या बळावर या बेटांवर कब्जा मिळवला आणि या बेटांना ‘बम्बय्या’ असं नाव दिलं. त्याचा अर्थ ‘जहाज नांगरण्यासाठी उत्तम जागा’ असा होतो. समुद्रप्रवासात जसजशी वाढ झाली तसतसे युरोपातल्या अनेक सत्ता इथं आल्या. सन १६६२ मध्ये ब्रिटिश राजे दुसरे चार्ल्स यांना ब्रॅगान्झाची पोर्तुगीज राजकन्या कॅथरिन हिच्याशी केलेल्या विवाहाप्रीत्यर्थ पोर्तुगीजांकडून ही बेटं हुंडा म्हणून देण्यात आली. सहा वर्षांनंतर ही बेटं ईस्ट इंडिया कंपनीला १० पौंड दरानं भाड्यानं देण्यात आली. ब्रिटिशांनी या बेटांना ‘बॉम्बे’ असं नाव दिलं...पण त्या वेळी हे शहर काही व्यापाराचं फार मोठं केंद्र नव्हतं.
५. व्यापाराचं मोठं केंद्र होतं सुरत. सतराव्या शतकात ब्रिटिश तिथं गेले तेव्हा त्याना सुरत हे कापडाच्या उत्पादनासाठी उत्तम शहर असल्याचं लक्षात आलं. या कापडाच्या उत्पादनावर कंपनीनं युरोपची कापडाची मागणी पुरवू शकेल एवढा व्यापार वाढवला. अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यत जगातल्या कापूसव्यापाराच्या एक चतुर्थांश व्यापार भारतातून होत होता. या व्यापारातला भारताचा वाटा जसजसा वाढत गेला, तसतशी सुरतची भरभराट व्हायला लागली. लवकरच सुरत हे व्यापाराचं आणि आर्थिक व्यवहारांचं जागतिक केंद्र बनलं. या व्यापाराच्या केंद्रस्थानी होता तो सुरतमधला व्यापारी समाज आणि त्यातही सुरतमधले व्यापारी पेढीवाले श्रॉफ.
६. त्या काळात भारतात मोगलांचं साम्राज्य होतं. अकबरानं हे साम्राज्य वाढवलं आणि जहांगीर व शाहजहान यांनी ते अधिक मजबूत केलं. शांतता, राजकीय स्थैर्य, सुरक्षितता नांदत होती. मोगलांनी देशात रस्ते आणि महामार्गाचं जाळं उभं केलं, नाणी चलनात आणली आणि देशाला स्थिर चलन दिलं. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून सुरतचं व्यापारी महत्त्व वाढत गेलं आणि त्यातून सुरतमध्ये संपत्तीचा पूर आला. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर म्हणजे ब्रिटिश राजसत्तेनं जेव्हा मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला भाडेतत्त्वावर दिली, त्या वेळी भारताचा बहुतांश भूभाग औरंगजेबाच्या आधिपत्याखाली होता. त्या वेळच्या परिस्थितीमुळं भारतात देशी आणि विदेशी व्यापाराची भरभराट होत होती. औरंगजेबानं अफगाणांच्या आणि मराठ्यांच्या बरोबरचं खर्चिक युद्ध जर टाळलं असतं तर ही भरभराट अशीच कायम राहिली असती; पण या लढायांमुळं औरंगजेबावर फार मोठा आर्थिक ताण आला आणि तो त्याच्या मृत्यूपर्यंत म्हणजे सन १७०७ पर्यंत कायम राहिला.
७. औरंगजेबाच्या मृत्यूनं मोगल साम्राज्याचा अंत निश्‍चित झाला. त्यातून मोगलांच्या केंद्रीय अधिसत्तेचं विघटन सुरू झालं आणि देशातली अराजकता वाढली. याचा गैरफायदा घेऊन हैदराबाद, अवध आणि बंगालमधल्या व्यक्तिगत, प्रादेशिक सत्ता बळावल्या. त्याचबरोबर जाट, शीख, मराठा यांच्यासारख्या सामाजिक गटांनी राजकीय सत्ता मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. यात मराठे सगळ्यात प्रभावशाली ठरले. त्यांनी पाहता पाहता देशभर आपला दबदबा निर्माण केला.
८. व्यापारी भूमिकेतून पाहिल्यास या अराजकतेनं देशातलं व्यापारी-जाळं कमकुवत झालं. त्याचा परिणाम विदेशी व्यापारावर झाला. पश्‍चिम किनाऱ्यावर असलेल्या सुरतला त्याचा फटका बसला आणि त्यातूनच मुंबईला संधी मिळाली. ज्यांनी हे घडवून आणलं ते राजे किंवा सम्राट नव्हते, तर सुरतचे व्यापारी होते. आपल्या कृत्याचे एवढे दूरगामी परिणाम होतील आणि त्यातून भारतात ब्रिटिश राजवट अधिक बळकट होईल, याची त्यांना कल्पनाही नव्हती.

‘‘कसं काय?’’ राघवनं विचारलं. प्रश्न विचारल्याशिवाय तो गप्प बसूच शकत नाही.‘‘हे असं घडलं,’’ मी म्हणालो : ‘‘अराजकता वाढली आणि व्यापाऱ्यांना आपल्या व्यापारासाठी योग्य वातावरणाची हमी देऊ शकेल अशा एखाद्या संरक्षकाची गरज भासायला लागली. त्याच्यापुढं तीन पर्याय होते. एक म्हणजे उतरणीला लागलेली मोगल सत्ता, ज्यांचा दबदबा वाढत होता असे मराठे आणि महत्त्वाकांक्षी ईस्ट इंडिया कंपनी. समग्र विचारानंतर सुरतमधल्या समुदायानं ईस्ट इंडिया कंपनीची निवड केली.
‘‘म्हणजे त्यांनी आपल्या लोकांच्या ऐवजी परकीयांची निवड केली?’’ राघवनं विचारलं. त्याच्यात ब्रिटिश नागरिकत्व आणि भारतीय राष्ट्रवाद यांचं एक आगळंवेगळं मिश्रण आहे!‘‘हा काही देशभक्तीचा मुद्दा नाही राघव,’’ म्हणालो. ‘‘काय आहे?’’ मी त्यानं विचारलं. मी त्याला सांगितलं : ‘‘व्यापार-उदीम हा केवळ निर्हेतुक प्रागतिकतेवर चालतो. त्यांचा निर्णय योग्य राजकीय अंदाजावर अवलंबून होता. ईस्ट इंडिया कंपनीची अडचणीच्या काळात आपल्या व्यापाराला सुरक्षा देण्याची आणि आपले पैसे चुकते करण्याची पूर्ण क्षमता आहे याची त्याना पूर्ण कल्पना होती.

९. कंपनीचं कार्यालय १६८७ मध्ये सुरतहून मुंबईला हलवलं. हा निर्णय दूरगामी परिणाम करणारा होता. मुंबई हे एक चांगलं नैसर्गिक बंदर आहे. कोलकात्याच्या तुलनेत मुंबईत ब्रिटिशांची उपस्थिती बरीच कमी होती. त्यामुळं वर्णवादाची भावनाही तेवढीच कमी होती. शिवाय, मुंबईमध्ये सुरतेच्या तुलनेत शांतता, सुरक्षितता आणि कायद्याचं राज्य अधिक प्रमाणावर होतं. व्यापाऱ्यांनी मुंबईकडं धाव घेतली. त्यांनी आपल्याबरोबर वैविध्य आणि व्यापारातली गतिमानता आणली. त्यापाठोपाठ पारशी व्यावसायिकांची जहाजबांधणीची गोदी तिथं सुरू झाली. गुजराती व्यापारी, जैन, श्रॉफ, मारवाडी बॅंकर्स, कोकणी मुस्लिम व्यापारी, बगदादी ज्यू आणि युरोपातले मुक्त व्यापारी मुंबईत आले. त्यामुळं मुंबईला आपोआपच एक वेगळ्या प्रकारचं बहुभाषक, बहुधार्मिक रूप मिळालं. त्याबरोबरच कष्ट करणारा कुणीही मुंबईत मोठा होऊ शकतो असा विश्वासही निर्माण झाला.
१०. पण मुंबईचा व्यापार वाढवणारी आणि तिला जागतिक व्यापारी-दर्जा देणारी खरी कुमक बाहेरून मिळाली. ती आली ती ब्रिटिश चहाच्या आणि चिनी अफूच्या प्रेमातून. ब्रिटिशांना चहा चीनकडून मिळत होता. चीनकडून चहा आयात करणं अतिशय महागडं होतं आणि त्यामुळं चहा फक्त श्रीमंत लोकांपुरताच मर्यादित राहिला होता.  १७८४ मध्ये चीनच्या चहावरचा कर कमी करण्यात आला. त्यामुळं ब्रिटनमध्ये चहाची मागणी भरमसाठ वाढली. त्यातून चहाची आयात वाढली आणि लाखो पौंडांचा चहा कॅंटॉन बंदरातून जहाजातून ब्रिटनकडं जायला लागला; पण या चहाची किंमत मान्य अशा वस्तुरूपात देणं आवश्‍यक होतं. चीनला ब्रिटिश मालामध्ये रस नव्हता. त्यांना चांदी हवी होती; पण चहाची मागणी इतकी प्रचंड होती, की त्या तुलनेत देण्याइतकी चांदी ब्रिटनकडं नव्हती. सरकारपुढं मोठा पेच निर्माण झाला. ब्रिटिशांनी आपल्या बुद्धिमत्तेनं एक वेगळीच शक्कल लढवली. चीनला ब्रिटिश मालात रस नव्हता; पण भारतात निर्माण होणाऱ्या कापूस आणि अफू या दोन गोष्टींबाबत मात्र चीनमध्ये प्रचंड मागणी होती. प्लासीच्या लढाईत ब्रिटिशांनी बंगाल प्रांत आपल्या साम्राज्याला जोडला आणि तोपर्यंत मोगलांच्या एकाधिकारात असलेल्या अफूच्या उत्पादनावर नियंत्रण मिळवलं. त्यामुळं गुजरातमधला कापूस आणि बिहार व माळवा या प्रांतातली अफू यांनी भरलेली जहाजं मुंबईहून कॅंटॉनला जायला लागली. भारताची अफू चीनला, चीनचा चहा ब्रिटनला आणि ब्रिटनचं राज्य भारतावर असं एक समीकरण यातून तयार झालं.

‘‘पण आजोबा, अफू तर नशा आणणारा पदार्थ आहे ना? तिचे फार भयंकर परिणाम होतात असं मी कुठंतरी वाचलं आहे,’’ राघव म्हणाला. ‘‘खरं आहे, बेटा; पण ब्रिटिश अफूकडं फक्त एक पदार्थ म्हणून पाहत होते, ज्याला चीनमध्ये प्रचंड मागणी होती. एका मोठ्या लोकसंख्येला व्यसनाच्या आणि मृत्यूच्या जाळ्यात अडकवण्यात आपण सहभागी आहोत, याचं त्यांना काहीच वाटत नव्हतं. असा व्यापार किंवा गुलामगिरी यात त्यांना काहीच चुकीचं वाटायचं नाही. चीनचा याबाबतचा दृष्टिकोन याच्या अगदी उलट होता. त्यांना अफूच्या व्यसमाधीनतेच्या दुष्परिणांची जाणीव होती. त्याची एक सामाजिक किंमत आपल्याला द्यावी लागेल हेही त्यांना माहीत होतं. या दोन परस्परविरोधी भूमिकांमुळं त्या काळात अफूवरून युद्धंही झाली आहेत. त्याच सुमारास ब्रिटिश सरकारनं चीनबरोबरच्या व्यापाराची ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी काढून घेतली. त्यामुळं भारतीयही या व्यापारात ब्रिटिशांच्या बरोबरीनं उतरले. जहाजबांधणीच्या व्यवसायात असलेल्या पारशी व्यापाऱ्यांचाही यात मोठा सहभाग होता.  १८४० मध्ये चीन आणि ब्रिटन यांच्यातल्या अफूयुद्धामुळं अफूचा व्यापार मंदावला तरी मुंबईची घोडदौड सुरूच होती.

११. मुंबईच्या प्रगतीच्या पुढच्या टप्प्यालाही बाहेरूनच मदत मिळाली. हजारो मैल लांब असलेल्या एका देशाच्या प्रमुखानं घेतलेल्या एका निर्णयामुळं मुंबईचं भाग्य बदललं. अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरी नष्ट करण्याचा कायदा केला आणि त्यातून उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत १८६० मध्ये यादवी युद्ध भडकलं.
‘‘अमेरिकेतलं यादवी युद्ध आणि मुंबईची प्रगती याचा काय संबंध आहे,’’ यामिनीनं विचारलं.
‘‘चांगला प्रश्न आहे,’’ मी म्हणालो, ‘‘अमेरिकेत कापसाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर होत होतं. या पिकाला मोठ्या प्रमाणावर मजूर लागतात. अमेरिकेतल्या या कापसाच्या शेतीची मालकी गोऱ्या लोकांकडं होती; पण तिथं काम मात्र आफ्रिकेतून आणलेल्या गुलामांकडून करवून घेतलं जात असे. या व्यवसायात सुमारे १५ लाख मजूर होते आणि त्यांना अत्यंत हीन, अमानवी वागणूक दिली जायची. यादवी युद्ध सुरू झालं आणि अमेरिकेतून ब्रिटनला होणारा कापसाचा पुरवठा थांबला. आता ब्रिटनपुढं फक्त भारत हाच एकमेव पर्याय होता. अमेरिकी युद्धापूर्वी इंग्लंड भारताकडून अवघ्या २० टक्के कापसाची आयात करत होता. आता भारतातल्या कापसाची मागणी एकदम वाढली. मागणी आणि पुरवठा यातल्या असंतुलनामुळं कापसाच्या किमती एकदम आभाळाला भिडल्या. ही आपल्याला सुवर्णसंधी आहे, असं प्रेमचंद रायचंद या गुजराती व्यापाऱ्याच्या लक्षात आलं. प्रेमचंद गुजरातमध्ये गेले आणि इंग्लंडमधल्या कापडगिरण्यांना ज्या प्रकारचा कापूस लागतो, त्या कापसाची लागवड करण्यासाठी त्यांनी तिथल्या शेतकऱ्यांना  प्रेरित केलं. शेतकऱ्यांनीही त्यांना उत्तम प्रतिसाद दिला. पुढच्या हंगामात अमेरिकी कापसाची जागा भारतीय कापसानं घेतली. त्यामुळं भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या कापसाच्या व्यापारात प्रचंड वाढ झाली. हा सगळा कापूस मुंबई बंदरातूनच इंग्लंडला जात होता.

१२. व्यापार वाढल्यामुळं अन्य शहरांचाही विकास झाला आणि नवी शहरं निर्माण झाली. या शहरांमधून लोक कामधंद्यासाठी मोठ्या प्रमाणावर पश्‍चिम भारतात आणि विशेषत: मुंबईत यायला लागले. काहीजण खलाशी बनले, तर काही जणांनी व्यापारी-जहाजांवर काम मिळवलं. अनेकांनी कापसाच्या आणि अफूच्या शेतांवर मजूर म्हणून काम मिळवलं आणि या मजुरांच्या टोळ्या गुजरात आणि माळवा भागात गेल्या. त्यातले अनेकजण पुन्हा बंदरावर आले. त्याच्या पाठोपाठ अनेक लघुउद्योजक आणि कुशल कामगारही आले. ते प्रथम कामगार म्हणून आले आणि त्यांनी नंतर स्वत:चेच उद्योग सुरू केले. मुंबईतलं जीवनमान फारसं चांगलं नसलं तरी गोदीतल्या आणि कारखान्यातल्या रोजगाराच्या संधीमुळं अनेक लोक मुंबईकडं आकर्षित झाले. कापडगिरण्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या. शहरात प्रचंड पैसा यायला लागला. एका रात्रीतून अनेकांचं नशीब बदलायला लागलं. कापसाचा सट्टेबाजारही सुरू झाला. यात अगदी रस्त्यावरचे पानवालेही पैसे लावत असत, असं म्हटलं जातं. यादवी युद्ध संपेपर्यंत मुंबईनं कापसाच्या व्यापारातून ७० दशलक्ष पौंड कमावले होते. हा पैसा जमीन निर्माण करण्यासाठी गुंतवण्यात आला. अनेक खासगी कंपन्यांनी समुद्रात भर घालून जमीन निर्माण केली. त्यातूनच मुंबई एक आधुनिक शहर म्हणून उदयाला आलं.

१३. यादवी युद्ध संपलं आणि अमेरिकेतून अटलांटिकमार्गे लॅंकेशायरला स्वस्त कापसाचा पुरवठा पुन्हा पूर्ववत सुरू झाला. त्यामुळं मुंबईचा फुगा फुटला. कापसाचा बाजार गडगडला आणि किमती कोसळल्या. एका अभूतपूर्व भीतीनं सगळं शहर हवालदिल झालं. उद्योगपतींनी त्यांचे शेअर्स विकायला काढले; पण बाजारात खरेदीदारच नव्हते. अनेक कंपन्या बंद पडल्या. बॅंकांचं दिवाळं निघालं. शेअर्स आणि स्टॉक मार्केटवर आधारलेले उद्योग पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. सन १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी ईस्ट इंडिया कंपनीवर गैरव्यवस्थापनाचा आरोप झाला आणि त्यातून मुंबईची मालकी पुन्हा ब्रिटिश सरकारकडं गेली. १८६२ मध्ये हे शहर समुद्रात भराव घालून निर्माण केलेल्या जमिनीवर वसलं होतं आणि तेव्हापासून मुंबई वाढतच राहिली.

१४. अचानक बेल वाजली. पिझ्झा आणि आइस्क्रीम येऊन पोचलं होतं.
‘‘चला मुलांनो, आता मजा करा. मी माझ्या कामाला लागतो,’’ मी म्हणालो. ‘‘नाही, अजून ‘गोष्ट’ संपली नाहीय,’’ यामिनी म्हणाली.‘‘बेटा, कुठलीही गोष्ट कधी संपत नसते, हे तुला एक दिवस समजेल’’ मी म्हणालो.
‘‘म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे?’’ राघवनं विचारलं. ते शेक्‍सपिअरनं ‘मॅकबेथ’मध्ये अधिक चांगल्या शब्दांत सांगितलं आहे. नाटककार वि. वा. शिरवाडकर यांनी त्याचा फार चांगला अनुवाद केलाय.
या रोजच्या धावपळीत ‘उद्या’ येतच असतो आणि आपले सगळे‘ काल’ अंत पावतात.
जा, नश्वर दीपा विझून जा
जीवन म्हणजे फक्त एक हलतीचालती सावली...
एक नालायक नट
रंगमंचावर डामडौलानं वावरणारा
आणि अल्पावकाशानं
चिरंतन विस्मृतीत विझून जाणारा...
जीवन म्हणजे कुण्या महामूर्खानं सांगितलेली कथा...
आवाजानं आणि आवेशानं भरलेली...
पण अर्थशून्य !
राघवनं ते वाक्‍य ऐकलं आणि तो शांतपणे म्हणाला : ‘‘आजोबा, मला कधी कधी वाटतं, की तुम्ही खरोखर म्हातारे व्हायला लागला आहात; पण ही गोष्ट मात्र पुन्हा केव्हातरी पूर्ण केलीच पाहिजे’’
म्हणालो : ‘‘पुढच्या वेळी नक्की!’’

Web Title: dr yashwant thorat write article in saptarang