‘योगा एक्स्प्रेस’, गांधी आणि पदयात्रा

गांधीजींनी कधीही विमानप्रवास केला नव्हता. एकदाही नाही. ते नेहमी ट्रेननंच जायचे. मीही तसंच करीन. ‘ध्येया’पेक्षा ‘साधन’ महत्त्वाचं यावर गांधीजींचा ठाम विश्वास होता.
Mahatma Gandhi
Mahatma Gandhisakal
Summary

गांधीजींनी कधीही विमानप्रवास केला नव्हता. एकदाही नाही. ते नेहमी ट्रेननंच जायचे. मीही तसंच करीन. ‘ध्येया’पेक्षा ‘साधन’ महत्त्वाचं यावर गांधीजींचा ठाम विश्वास होता.

हजार मैलांचा रेल्वे प्रवास एका आरक्षणानं सुरू होतो. ‘नवी दिल्ली ते अहमदाबाद’ या ‘योगा एक्स्प्रेस’बद्दल पहिल्यांदा ऐकलं तेव्हा त्या गाडीनं प्रवास करण्याची इच्छा झाली. प्रश्न होता तिकीट मिळवण्याचा. माझा योगाभ्यास फक्त सैद्धान्तिक असूनही मी ‘योगा एक्स्प्रेस’कडं ओढला गेलो. साक्षात्काराच्या दिशेनं जाणारा तो मला ‘जलद मार्ग’ वाटला. आणि, जिथं गाडी पोहोचणार त्या ठिकाणाविषयीपण मनात आकर्षण होतं - अहमदाबाद : माझे तत्त्वज्ञनायक महात्मा गांधीजींनी जिथं पहिला आश्रम स्थापन केला आणि स्वातंत्र्यलढ्यात निर्णायक ठरलेला मिठाचा सत्याग्रह जिथून सुरू केला ते शहर.

भारतीय रेल्वेचं तिकीट मिळवण्याच्या पूर्वीच्या अनुभवाकडे दुर्लक्ष करत - न संपणाऱ्या रांगा आणि नोकरशाहीचा तो दुःस्वप्नासारखा प्रकार - मी मनाशी म्हणालो, ‘चला, आता तर डिजिटल-युग आहे’. मात्र, आश्चर्य याचं वाटलं की आधीचा तो ‘नरक’ आता ‘ऑनलाइन’ झाला होता. ऑनलाइन खातं काढायला तब्बल तीन तास लागले. आणि एवढं करून झाल्यावर समजलं, ‘योगा एक्सप्रेस’चं बुकिंग आधीच फुल्ल झालंय. कधीही हार न मानण्याच्या खऱ्या गांधीवादी भावनेतून प्रतीक्षायादीत माझं नाव नोंदवून टाकलं आणि पुढचा तपशील कळत राहावा म्हणून ‘अ‍ॅप’ डाऊनलोड केलं. तंत्रज्ञानात मी तसा मागास असूनही मी पंधरावरून आठव्या क्रमांकावर वेगानं पोहोचलो याचा आनंद झाला; पण नंतर तिथंच अडकून पडलो. ‘अहमदाबादला विमानानं का जात नाहीस? थोडं महाग पडेल; पण जलद पोहोचशील,’ मित्रानं सुचवलं. त्याचं म्हणणं बरोबर होतं; पण मला हवाई मार्गानं जायचं नव्हतं.

गांधीजींनी कधीही विमानप्रवास केला नव्हता. एकदाही नाही. ते नेहमी ट्रेननंच जायचे. मीही तसंच करीन. ‘ध्येया’पेक्षा ‘साधन’ महत्त्वाचं यावर गांधीजींचा ठाम विश्वास होता. कुठं पोहोचता हे महत्त्वाचं नाही; कसे पोचता ते महत्त्वाचं. म्हणून, विमानानं न जाता ‘योगा एक्सप्रेस’नंच जाण्याचा निर्धार केला; परंतु शेवटी मी आठव्या क्रमांकावरच अडकून पडलो आणि घरबसल्या प्रवासाचं नियोजन आखण्याचे प्रयत्न फसले.

मोहनदास गांधी कधी द्विधा मनःस्थितीत नसत. फक्त रेल्वे सोडून. दोन अमेरिकी महिलांनी एकदा त्यांना विचारलं : ‘तुम्ही रेल्वेला विरोध केला हे खरं आहे का?’ तेव्हा त्यांचं उत्तर होतं : ‘हो आणि नाही.’ ‘रेल्वे म्हणजे भारताला मुठीत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी तयार केलेला मार्ग,’ असं गांधीजींना वाटत होतं आणि रेल्वेच्या वेगाबद्दलही त्यांच्या मनात अविश्वास होता.

ते विचारत : ‘प्रवासाच्या अशा वेगवान साधनांएवढं जग चांगलं आहे का? यामुळं माणसाची आध्यात्मिक प्रगती अधिक वेगानं होणार आहे का? शेवटी, त्या प्रगतीतला तो अडथळाच ठरणार नाही का?’

आणि असं असूनही त्याच रेल्वेतून - तेही नेहमी तिसऱ्यावर्गाच्या डब्यातून - त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला, सर्वसामान्य लोकांना प्रभावित केलं आणि त्यांना एकत्र आणलं.तसं म्हटलं तर, एका रेल्वेप्रवासानंच गांधीजींचं जीवन आणिइतिहासाचं वळणही बदलून टाकलं. सन १८९३ मध्ये. ते दक्षिण आफ्रिकेत नुकतेच एक आठवड्यापूर्वी पोहोचले होते. महत्त्वाचा खटला चालवण्यासाठी त्यांच्या लॉ फर्मनं त्यांना डर्बनहून प्रिटोरियाला पाठवलं होतं आणि प्रवासासाठी रेल्वेचं पहिल्या वर्गाचं तिकीट काढून दिलं होतं. वाटेत एक गोरा प्रवासी डब्यात शिरला. त्यानं गांधीजींकडे एक नजर टाकली आणि कंडक्टरला बोलावलं : ‘तिसऱ्या वर्गाच्या डब्यात जाऊन बसा...’ कंडक्टरनं गांधीजींना सुनावलं. ‘पण माझ्याकडं तर पहिल्या वर्गाचं तिकीट आहे,’ गांधीजी म्हणाले. ‘असेल; पण इथं काळ्यांना प्रवेश नाही,’ कंडक्टर उद्गारला. तरीही आपली जागा सोडण्यास गांधीजींनी नकार दिला. शेवटी एका पोलिसानं येऊन त्यांना ट्रेनमधून बाहेर ढकलून दिलं. कडाक्याच्या थंडीची ती रात्र होती. गांधीजी कुडकुडू लागले.

भारतात परत जावं का यावर विचार करू लागले. पहाटेपर्यंत त्यांना उत्तर सापडलं : ‘अंगावर घेतलेली जबाबदारी पूर्ण करण्याआधी परत जाणं हा भ्याडपणा ठरेल. ज्या त्रासाला मला सामोरं जावं लागलं ती तर वरवरची गोष्ट झाली. तिच्या मुळाशी आहे तो काळा-गोरा रंगभेद. या रोगाचा समूळ नायनाट करायचा मी प्रयत्न करीन. त्यासाठी होईल तो त्रास सहन करीन.’

त्या एका क्षणी गांधीजींनी आपला मार्ग निवडला. त्याच मार्गावर ते आयुष्यभर चालत राहिले. पुढं काही दशकांनंतर अमेरिकी मिशनरी जॉन मॉट यांनी गांधीजींना ‘तुमच्या आयुष्यातला सर्वात ‘सर्जनशील’ अनुभव कोणता?’ असं विचारलं. तेव्हा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील त्या रेल्वेघटनेचा उल्लेख केला. ‘गांधीजींना कलेत रस नव्हता,’ असं काही चरित्रकार म्हणतात. हे खरंय की, गाधींजींनी क्वचितच कधी कादंबरी वाचली किंवा एखादी आर्ट गॅलरी पाहिली...पण तेवढ्यावरून ते सर्जनशील नव्हते असा निष्कर्ष काढणं चुकीचं होईल.

गांधीजी कलावंत होते; पण इतरांसारखे नव्हे. ‘निर्धार’ हा त्यांचा ब्रश होता, तर ‘मानवी हृदय’ हा कॅनव्हास.वाइटाच्या विरुद्ध उभं राहून चांगलं करणं यातच खरं सौंदर्य आहे.’ असं ते म्हणायचे. त्यांचं बरोबर होतं. हिंसेत कल्पनाशक्तीचं अपयश दिसतं; अहिंसेसाठी सर्जनशीलता असावी लागते.

तिकीट न मिळाल्यामुळं आणि आख्खा रविवार मोकळा असल्यामुळे मी ‘जुन्या बिर्ला हाऊस’कडे निघतो. तिथली नेहमीची शांतता माझ्या अंतरंगात उतरते. का कुणास ठाऊक, तिच्याकडे मी आपोआप ओढला जातो, जसा गांधीजींकडे. तिथली दूरवर पसरलेली हिरवळ मनाला भावते. गांधीजींच्या पायाच्या आकाराच्या त्या संगमरवरी खुणा आणि तो व्हरांडा - जिथं हेलकावणाऱ्या भारतीय नौकेला कसं हाकावं यावर चिंतन करत बसलेला महात्मा मला दिसतो.

काही ठिकाणं महान व्यक्तींच्या अलौकिक कर्तृत्वानं पावन झालेली असतात. उदाहरणार्थ : बोधीवृक्ष - ज्याच्या खाली बुद्धांना बोधप्राप्ती झाली. याउलट, काही स्थळं भयंकर हिंसाचारानं बरबटली जातात : गेटिसबर्ग, नॉर्मंडी इत्यादी ‘बिर्ला हाऊस’ या दुसऱ्या प्रकारात मोडतं. कारण, इथंच गांधीजींनी शेवटचं पाऊल टाकलं आणि अखेरचा श्वास घेतला.

आयुष्याच्या शेवटच्या दिवशीही ते नेहमीप्रमाणं पहाटे साडेतीनला उठले. जानेवारी महिन्यातली गारठलेली ती पहाट. त्यांची चुलतनात आणि साहाय्यक मनूनं त्यांच्या अंगावर शाल पांघरली. एकदा ते म्हणाले होते, ‘मला सव्वाशे वर्षं जगायचंय आणि स्वतःला निर्मळ बनवायचं आहे – भिजलेली काडी लाकडी ओंडक्याला कसं पेटवू शकेल?’ पांढऱ्या संगमरवरी खांबांच्या रांगांमधून चालत मी पुढं जातो,

जिथं गांधीजींनी प्राण सोडला होता. आजच्या पिढीतले बहुतेक भारतीय गांधीजींना इतकेच ओळखतात, जितके बहुतेक अमेरिकी नागरिक जॉर्ज वॉशिंग्टनना ओळखतात : एक अंधूक वडीलधारं व्यक्तिमत्त्व, ज्याचं नाव आदरानं घेतलं जातं आणि सर्वांच्या खिशातल्या पाकिटातील नोटांवर ज्यांचे फोटो असतात. गांधीजी मला का आवडतात असा माझा मलाच प्रश्न पडतो. मी कुणी तपस्वी नाही; दुरान्वयेही नाही. मी अहिंसा पाळतो; परंतु सातत्यानं नाही - कधी निष्क्रियपणे, तर कधी आक्रमकपणे. गांधीजी अगणित लोकांचे नेते होते. मी एकाचाही नाही; मी पाळलेल्या कुत्र्याचाही नाही. मृत्यूसमयी गांधीजींची संपत्ती खांद्यावरच्या छोट्या पिशवीत मावेल एवढीच होती. माझ्या संपत्तीसाठी नक्कीच जास्त जागा लागेल. तरीही गांधीजी माझ्याशी बोलतात आणि मी त्यांचं ऐकतो.

गांधीजी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होतं; पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ते लढवय्ये होते. ते ब्रिटिशांविरुद्ध लढले. परकीयांमधल्या आणि स्वकीयांमधल्या कट्टरतेच्या विरोधात ते लढले. आपलं म्हणणं ऐकून घेतलं जावं म्हणून ते लढले. तरी पण त्यांची खरी लढाई लढण्याच्या पद्धतीत बदल व्हावा यासाठी होती. जिंकणं-हरणं यात त्यांना रस नव्हता; न्याय्य आणि योग्य पद्धतीनं लढणं त्यांच्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचं होतं. हिंसाविरहित जगाचं त्यांनी स्वप्न पाहिलं; पण ते ताबडतोब खरं होणार नाही याचं भान येण्याइतपत ते वास्तववादी होते. म्हणून चांगल्या रीतीनं लढावं कसं आणि तसं लढणंच कसं फलदायी ठरू शकतं हे त्यांनी शिकवलं. लढल्यानंतर दोन्ही बाजू योग्य तोडग्यावर येऊ शकतात, एवढंच नव्हे तर, त्याहूनही अधिक काहीतरी घडू शकतं - एखादा असा उपाय सापडू शकतो जो त्यांना लढल्याशिवाय सापडलाच नसता. गांधीजींच्या दृष्टीनं लढणं वाईट नाही; चांगलंच आहे. फक्त चांगल्या पद्धतीनं कसं लढायचं ते कळलं पाहिजे.

‘ब्रिटिशांनी भारताला दुबळं बनवून सोडलेलं आहे,’ असं गांधीजींना वाटत होतं, म्हणून भारताला त्यांनी असं राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न केला, ज्याचं पुरुषत्व आणि सामर्थ्य हिंसाचारात नव्हे तर, अहिंसेत आहे. अंगात धैर्य आणि पुरुषत्व नसलेला माणूस कधीही निष्क्रिय प्रतिकार करू शकत नाही, असं ते म्हणत. हिंसेबद्दल त्यांच्या मनात तिरस्कार होताच; परंतु भ्याडपणा त्यांना जास्त घृणास्पद होता. हिंसा आणि भित्रेपणा यात निवड करण्याचा प्रसंग आला असता तर त्यांनी एक वेळ हिंसेची निवड केली असती; भित्रेपणाची कधीच नाही. भेकड माणूस हा पूर्ण माणूस नसतो असं त्यांचं ठाम मत होतं.

आध्यात्मिकदृष्ट्या गांधी ‘सर्वाहारी’ होते. ख्रिश्चन धर्मापासून इस्लामपर्यंत अनेक धर्मांचा त्यांनी ‘आस्वाद’ घेतला; परंतु त्यांची भूक भागवली भगवद्गीतेनं. लंडनमध्ये कायद्याचं शिक्षण घेत असताना त्यांनी पहिल्यांदा आध्यात्मिक रचना वाचली. दोन ब्रिटिश थिऑसॉफिस्ट्सनी त्यांना गीतेबद्दल विचारलं तेव्हा ‘मी ‘भगवद्गीता’ वाचलेली नाही,’ असं त्यांनी संकोचत कबूल केलं होतं. मग, एडविन अरनॉल्डनं केलेलं गीतेचं इंग्लिश भाषांतर त्या तिघांनी मिळून वाचलं आणि त्यानंतर भगवद्गीता हा त्यांचा प्रेरणास्रोत आणि आधार बनला. ते म्हणायचे : ‘जेव्हा शंका मनाला छळतात, जेव्हा घोर निराशा डोळ्यांत डोळे घालून पाहते, जेव्हा आशेचा एकही किरण क्षितिजावर दिसत नाही, तेव्हा मी भगवद्गीतेकडे वळतो आणि मनाला आधार देणारा श्लोक मला सापडतो. मग दुःखानं चौफेर घेरला गेलेलो असूनही मी स्मितहास्य करायला लागतो.’

ते म्हणायचे : ‘गीता हे एक असं रूपक आहे जे आजच्या माणसाच्या हृदयातसुद्धा काय घडतं आहे ते दाखवतं. खरं रणांगण आतच असतं. अर्जुनाचा सामना समोरच्या शत्रूशी नव्हताच; स्वत:शी होता. “गीता युद्धाबद्दल नव्हतीच मुळात, अहिंसेला अप्रत्यक्षपणे उद्देशून केलेलं ते काव्य होतं.” असा गांधींचा निर्वाळा होता. महाभारत युद्धात पांडवांचा विजय झाला की नाही हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं नव्हतं. कारण त्यांच्या दृष्टीनं परिणाम महत्त्वाचा नव्हता; प्रक्रिया महत्त्वाची होती.

आपली लढाई सर्वोत्तम लढाई ठरावी म्हणून सर्व शक्तीनिशी ते लढले. परिणामावर लक्ष ठेवून केलेल्या संघर्षापेक्षा प्रक्रियेवर लक्ष दिले तर त्याचा परिणाम अधिक चांगला होतो असा त्यांना विश्वास होता. म्हणूनच भारताचं स्वातंत्र्य हे त्यांचं ध्येय नव्हतं. भारताला स्वातंत्र्यासाठी लायक बनवणं हे त्यांचं ध्येय होतं. तसं बघितलं तर, अहिंसा ही गोष्ट नवीन नव्हती; पण तिचा गांधीजींनी केलेला वापर नवा होता. फार तर आहाराच्या – शाकाहार - नियमापुरती शिल्लक राहिलेल्या अहिंसेला गांधींनी एक शस्त्र -अत्याचाराविरुध्द लढण्याचं वैश्विक शस्त्र - बनवलं. या नवीन तंत्राला ते आधी "पॅसिव्ह रेझिस्टन्स (निष्क्रिय प्रतिकार) असं म्हणायचे. परंतु त्यासाठी अधिक चांगलं नाव हवं हे त्यांच्या लवकरच लक्षात आलं. मग त्याला “सत्याग्रह” हे नाव त्यांनी दिलं.

काही टीकाकारांना वाटतं तशी अहिंसा ही एक युक्ती नव्हती - जी एखाद्या कपड्यासारखी हवी तेव्हा वापरली आणि फेकून दिली. गांधींसाठी ते एक तत्त्व होतं. गुरुत्वाकर्षणाच्या नियमासारखं. कधीही मोडता येणार नाही असं. निष्क्रीय असं त्यात काहीच नव्हतं - त्यांच्यातही. सतत ते काहीतरी करत राहायचे : चालणं, प्रार्थना करणं, नियोजन करणं, सभा घेणं, पत्रव्यवहाराला उत्तरं देणं, खादीचं कापड कातणं. त्यांच्या विचारात सुद्धा गतीशीलता होती. त्यांच्या सावध डोळ्यांतून आणि पारदर्शी चेहऱ्यावर ती झळकायची. त्यांचा चेहरा "चमचमणारा आरसा" आहे असं त्यांना भेटणारे लोक म्हणायचे. “तुमच्या तत्त्वज्ञानाचं सार सांगा” असा एका पत्रकारानं आग्रह धरला तेव्हा त्याला उत्तर देण्यापूर्वी गांधी थोडं अडखळले आणि शेवटी इतकंच म्हणाले : "मी बौद्धिक लेखनासाठी जन्मलेलो नाही. प्रत्यक्ष कृती हेच माझं कार्यक्षेत्र आहे." गांधींचे विचार सर्वकाळ आणि सर्वत्र लागू होऊ शकत नाहीत असं म्हणून ते झुगारणं चुकीचं ठरेल. कदाचित गांधींचा प्रेमाचा नियम गुरुत्वाकर्षणासारखा कमी आणि इंद्रधनुष्यासारखा जास्त आहे : ती अशी नैसर्गिक घटना असते जी कधीकधी आणि विशिष्ट परिस्थितीतच घडते. परंतु जेव्हा घडते तेव्हा तिच्यापेक्षा सुंदर असं जगात काहीच नसतं. त्यांच्या अहिंसक चळवळीची तुलना एकदा गांधींनी युक्लिडच्या रेषेशी केली होती - रुंदी नसलेली रेषा. कोणत्याही मानवाने ती आजवर कधी काढलेली नाही; ना पुढे कधी काढली जाईल. ती अशक्य आहे. तरीही त्या काल्पनिक रेषेप्रमाणेच गांधींच्या आदर्शांनाही निरंतर मूल्य आहे. कारण त्यातून प्रेरणा मिळते आणि पुढेही मिळत राहील.

गांधी रुसोप्रमाणेच आयुष्यभर चालायचे. पण रुसोच्या उलट त्यांची चाल जलद आणि सहेतुक होती. एका सच्च्या आंदोलकांची निर्धारी चाल होती. १९३० मध्ये एका सकाळी गांधी आणि त्यांचे ऐंशी अनुयायी अहमदाबादमधल्या त्यांच्या आश्रमातून दक्षिणेकडे समुद्राच्या दिशेने निघाले. दिवसातून बारा मैलांचं अंतर कापत; कधी कधी त्याहून जास्त. शेवटी समुद्रकिनाऱ्यावर पोहोचेपर्यंत ऐंशी अनुयायांचे हजारो झाले. अरबी समुद्रात आंघोळ करून ब्रिटिश कायद्याचा भंग म्हणून नैसर्गिक मिठाच्या साठ्यातून मूठभर मीठ त्यांनी हातात घेतलं. आणि तो मिठाचा मोर्चा भारतीय स्वातंत्र्याच्या वाटेवरचं एक महत्त्वाचं वळण म्हणून नोंदला गेला. त्या एका कृतीने गांधी इतिहासाच्या दारातून भारताच्या हृदयात शिरले आणि एक दंतकथा बनले. निषेध करणं, परिणामांचा विचार न करता चुकीच्या गोष्टींबद्दल नाराजी व्यक्त करणं ही तर मानवजातीइतकीच जुनी गोष्ट आहे. आपली सभ्यता आणि संस्कृतीत जे मौल्यवान आहे ते ऑरवेलप्रमाणे उभे राहण्याच्या आणि म्हणण्याच्या आवेगातून आलेलं आहे : “दोन अधिक दोन बरोबर चार”. एकदा ते मान्य झालं की बाकीचं सगळं ओघानंच येतं”. सॉक्रेटिसनं आपल्या शिकवणुकीचा त्याग करण्यापेक्षा विष पिणं पसंत केलं. गांधीजींनी आपल्या सत्त्यासाठी गोळ्या झेलल्या.

आज कुठेतरी भारतामध्ये एक तरुण अनेक लोकांच्या सोबतीनं ते गृहीतक सिद्ध करण्यासाठी चालतो आहे : जन्म, जात, पंथ आणि धर्म हे भेद बाजूला ठेवून सगळे एकत्र आले तर १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र भारताचा झेंडा म्हणून लाल किल्ल्यावरील आकाश सजवणारे ते इंद्रधनुष्य पुन्हा एकदा आकाशात प्रकट होईल आणि आपल्याला आठवण करून देईल की गांधीजींनी ज्या भारताची कल्पना केली होती तो ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’च्या तत्त्वज्ञानावर आधारित होता.

घराच्या दिशेनं मागे फिरण्यासाठी मी वळतो पण प्रत्यक्षात रेल्वे स्टेशनची वाट धरतो. तिकीट काढण्यासाठी आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी जिथं तो तरुण करुणा आणि सद्भावनेच्या अखंड साखळीत तमाम भारतीयांची मनं सांधण्यासाठी पदयात्रा काढतो आहे .

(अनुवाद : डॉ. रघुनाथ कडाकणे)

(raghunathkadakane@gmail.com)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com