मोमिन है वोही जो मंझिल तक, ईमान सलामत ले जाए ! (डॉ. यशवंत थोरात)

डॉ. यशवंत थोरात ythorat@gmail.com
रविवार, 18 डिसेंबर 2016

मनुष्यप्राणी दुर्बल असतो, हे जरी खरं असलं, तरी आणि जीवन त्याची वेळोवेळी कठोर परीक्षा घेत असतं, हेही सत्य असलं, तरी अशाच प्रसंगी माणसाच्या स्वत्त्वाची आणि सत्त्वाची कसोटी लागत असते. आयुष्याची वाटचाल करताना मोहाच्या निसरड्या जागा ठिकठिकाणी लागत असतात...मात्र, अशा मोहमयी परिस्थितीतही जो आपला प्रामाणिकपणा आणि सचोटी शाबूत राखतो, तोच ‘खरा माणूस’ होय.

मनुष्यप्राणी दुर्बल असतो, हे जरी खरं असलं, तरी आणि जीवन त्याची वेळोवेळी कठोर परीक्षा घेत असतं, हेही सत्य असलं, तरी अशाच प्रसंगी माणसाच्या स्वत्त्वाची आणि सत्त्वाची कसोटी लागत असते. आयुष्याची वाटचाल करताना मोहाच्या निसरड्या जागा ठिकठिकाणी लागत असतात...मात्र, अशा मोहमयी परिस्थितीतही जो आपला प्रामाणिकपणा आणि सचोटी शाबूत राखतो, तोच ‘खरा माणूस’ होय.

‘‘अ रे सर, तुम्ही काय करताय इथं?’ जाड भिंगाचा चष्मा घातलेल्या आमच्या नेहमीच्या चमूतल्या त्या तरुणानं मला विचारलं.
‘‘एलिमेंटरी, माय डियर वॉटसन’’ मी उत्तर देत पुढं म्हटलं ः ‘‘तू बघतोच आहेस की मी एटीएमच्या रांगेत उभा आहे. याचाच अर्थ मी इथं केस कापण्यासाठी आलेलो नसून, पैसे काढण्यासाठी आलेलो आहे.’’
चष्मेवाला मित्र जरा दुखावला. त्याचा चेहरा पडला.

‘‘जाऊ दे. तू खुळ्यासारखा प्रश्‍न विचारलास हे मान्य कर आणि छानपैकी हास बघू. इतरांना हसणे सोपे असतं; पण स्वतःला हसणं जमलं की व्यक्तिमत्त्वात एक प्रकारची परिपक्वता येण्यासारखं असतं ते.’’ मी म्हणालो.
माझ्या सल्ल्याकडं दुर्लक्ष करत त्यानं लांबलचक रांगेकडं इशारा केला आणि बोलणं सुरूच ठेवलं. तो म्हणाला, ‘‘केवढा गुंता झालाय. हा सगळा प्रकार म्हणजे गैरव्यवस्थापनाचा नमुना आहे.’’
पण मी काही त्याच्याशी संभाषण वाढवण्याच्या मनःस्थितीत नव्हतो.
‘‘आपण यावर नंतर बोलू या,’’ असे म्हणून मी तो विषय थांबवला.

काही दिवसांनी जाड चष्मेवाल्या तरुणासह त्याच्या मित्र-मैत्रिणींचा चमू माझ्या घरी आला. कट आखणाऱ्या एखाद्या टोळीसारखे त्यांचे चेहरे दिसत होते. त्यांच्या मनात काही तरी शिजत आहे, याची मला कल्पना आली. जाड चष्मेवाल्यानंच चर्चेला तोंड फोडलं. तो म्हणाला ः ‘‘गेला महिनाभर आमच्यावर अर्थशास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांकडून ‘निश्‍चलनीकरण’ (डीमॉनिटायजेशन) या शब्दाचा मारा सुरू आहे. यातले निम्मे तज्ज्ञ सरकारनं उचललेल्या या पावलाचं समर्थन करत आहेत, तर निम्मे त्याला विरोध करत आहेत.’’ या त्याच्या वाक्‍यावर सगळे हसले. शांतता पसरल्यावर मग चष्मेवाल्यानं ठेवणीतला बाण काढला. तो मला उद्देशून म्हणाला ः ‘‘इथं येताना आमची पैज लागलीय, की तुम्ही पुष्कळ पुस्तकं वाचली असलीत तरी निश्‍चलनीकरणावर वेगळं काही सांगू शकणार नाही.’’

‘‘पण पैज कशाची लागली आहे?’’ विचारलं. ‘‘वैभव हॉटेलमध्ये जेवण,’’ कुणीतरी उत्तर दिलं. ‘‘ते शाकाहारी जेवणाचं हॉटेल?’’ मी विचारलं. त्यांनी मान हलवून होकार दिला. ‘‘मग जमणार नाही. एक तर तांबडा-पांढरा रस्सा आणि सुकं मटण किंवा मग काहीच नाही,’’ मी त्यांना अचूक पकडलं!
‘‘निश्‍चलनीकरणाचं धोरण जाहीर झाल्यावर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ आणि अनागोंदी तर माजली आहेच; परंतु चलनव्यवस्थेचा तकलादूपणाही दिसून आला आहे...याचा अर्थ काय?’’ त्या मुलांच्या चमूमधल्या पहिलवानानं विचारलं.
‘‘सोपं आहे,’’ मी म्हणालो, ‘‘पंतप्रधानांनी आठ नोव्हेंबर रोजी देशाला संबोधित करण्यापूर्वी आपल्या खिशात होती ती संपत्ती. मात्र, सरकारच्या निर्णयामुळं ती संपत्ती एका क्षणात कागदांचे रद्दी तुकडे झाली.’’

‘‘हे अंशतः खरं आहे,’’ आमच्या चमूमध्ये नुकताच सहभागी झालेला हुशार करण म्हणाला, ‘‘सरकारनं नोटा बदलण्याची आणि बॅंकेत जमा करण्याची सुविधा दिली होती ना?’’
‘‘होय. मी कबूल केलं; पण त्यामुळं मी मांडत असलेला मुद्दा बदलत नाही. मला हे सांगायचं आहे, की कागदी चलनाला स्वतःचं असं मूल्य नसते. आधुनिक काळातलं चलन, मग ते कागदी असो वा प्लॅस्टिकचं, त्याला मूल्य येतं, ते केवळ सरकार तसं म्हणतं म्हणून.’’
‘‘त्यानं काय फरक पडतो?’’ कुणीतरी मागून विचारलं. त्यावर मी म्हणालो ः ‘‘तू असा प्रश्‍न विचारायला हवास, की नोटा हा मूल्य साठवण्याचा चांगला मार्ग आहे का आणि पूर्वीपासूनच तो चांगला मार्ग राहिलाय का?’’
‘‘मग याचं उत्तर काय?’’ करणनं विचारलं.

मी म्हणालो ः ‘‘अगदी सुरवातीला व्यापार आणि व्यवहार हे वस्तुविनिमयाच्या रूपात होत होते. म्हणजेच एका प्रकारचा माल व सेवांच्या बदल्यात दुसऱ्या प्रकारचा माल, अशा सेवा दिल्या जात होत्या. पुढं माणसानं वस्तुविनिमयाऐवजी सोनं व चांदी अशा मौल्यवान धातूंची नाणी वापरायला सुरवात केली आणि अशा रीतीनं चलनाचा वापर सुरू झाला. नाण्यामधल्या धातूला स्वमूल्य असल्यानं ही व्यवस्था बऱ्यापैकी स्थिर होती. समस्या एकच होती व ती म्हणजे नाणी बनवण्यासाठी गरजेच्या मौल्यवान धातूंचा पुरवठा कमी होता.’’
‘‘मग काय झालं?’’ मीनानं उत्सुकतेनं विचारलं.
‘‘तुम्ही सगळ्यांनी वास्को-द-गामा, कोलंबस, तसंच ज्यांनी पाश्‍चिमात्यांना जगाची दारं खुली केली, अशा महान शोधकांबाबत ऐकलं असेलच,’’ मी म्हणालो.
‘‘अर्थातच. आम्हाला माहीत आहेत ते...’’
सगळेजण एका सुरात म्हणाले. ‘‘मग तुम्हाला याचीही माहिती असेल, की पंधराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत जे शोध लागले किंवा जे व्यापारीमार्ग तयार झाले, त्याला युरोपमधल्या विविध देशांच्या सरकारांचे प्रोत्साहन व मदत कारणीभूत होती. मात्र, याचं कारण तुम्हाला ठाऊक आहे का?’’
‘‘सोन्याचा लोभ,’’ जाड चष्मेवाला उत्तरला.

‘‘खरं आहे; पण या लोभालाही चालना कशी मिळाली?’’ माझ्या या प्रश्‍नावर सर्वजण गोंधळले. मी स्पष्ट केलं ः ‘‘युरोपीय देशांच्या सरकारांना नाणी पाडण्यासाठी मौल्यवान धातूंची मोठ्या प्रमाणात गरज असल्यानं हा लोभ वाढत गेला आणि देवाचीही यात भूमिका होती!’’ शेवटच्या वाक्‍याचं सगळ्यांना आश्‍चर्य वाटलं. ‘‘खरंच?’’ मीरानं आश्‍चर्यानं विचारलं.
‘‘हो. आयर्लंड व अन्यत्र असलेल्या खाणींतून युरोपीय देशांना होणारा सोन्याचा पुरवठा किंवा जर्मनीतल्या समृद्ध खाणींतून होणारा चांदीचा पुरवठा मागणीपेक्षा कमी पडत होता. नाण्यांचा पुरेसा पुरवठा झाला नाही तर व्यापारी आणि आर्थिक व्यवहारांचा खराखुरा विस्तार होणार नाही, हे स्पष्ट होतं. सोनं आणि चांदी ही केवळ संपत्ती नव्हती, तर संपत्ती प्राप्त करण्याची साधनंही होती,’’ मी सांगितलं.

‘‘पण मग यात ‘देवा’चा संबंध कुठं आला?’’ कुणीतरी विचारलं.
‘‘सांगतो. त्या काळात कॅथॉलिक चर्च ही अत्यंत ताकदवान धर्मसंस्था होती. तिनं ख्रिस्तजगताचा प्रसार अन्य धर्मीय, तसंच ठिकठिकाणच्या स्थानिक रहिवाशांत करण्यासाठी राजसत्तेला प्रोत्साहन दिलं. त्यामुळं एका हातात बायबल आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन युरोपीय सरकारांनी शोधप्रवासांना पैसा पुरवला, नवे व्यापारीमार्ग शोधून काढण्यास उत्तेजन दिलं आणि जगाच्या विविध भागांत वसाहती करून तिथल्या स्थानिक जनतेला ख्रिस्ती बनवलं. त्यातून शाही वसाहतवादाचा शोषक अत्याचारही दिसून आला,’’ मी माहिती दिली.  
‘‘किती वाईट!’’ पहिलवान मित्र संतापून म्हणाला, ‘‘पण हा नवाच दृष्टिकोन आहे.’’
यावर मी म्हणालो ः ‘‘तर मग मी तुला आणखी एक उदाहरण देतो. हे सगळं घडण्यापूर्वी साधारणपणे एक हजार वर्षं आधी म्हणजे सातव्या शतकात चीननं अत्यंत क्रांतिकारी असा शोध लावला होता. तो म्हणजे सध्याच्या शैलीच्या कागदी चलनाचा. या प्रणालीची उत्तम बाजू म्हणजे हे चलन ज्या कागदावर छापलं, त्याला स्वतःचं असं काहीच मूल्य नव्हतं. या चलनाची मूल्यासह गुंतवणूक चीनच्या सम्राटानं ज्या प्रणालीअंतर्गत केली, तिनंच त्याचा विनिमय सोनं, चांदी किंवा रेशीम यांच्या बदल्यात करण्यास परवानगी दिली. ही यंत्रणा इतकी क्रांतिकारी होती, की युरोपनंही पुढच्या दहा शतकांनंतर तिचा अंगीकार केला. पुन्हा ती इतकी टिकून राहिली, की अलीकडं म्हणजे १९७१ पर्यंत जगातल्या बहुतांश देशांतले लोक एक औंस (२८ ग्रॅम) सोन्याच्या बदल्यात  ३५ अमेरिकी डॉलरचं रूपांतर सहजतेनं करू शकत होते.’’ ‘‘चिनी लोक खरंच हुशार आहेत,’’ जाड चष्मेवाला म्हणाला. त्याला उत्तर देताना मी म्हणालो ः ‘‘बरोबर आहे; पण भारतही त्या स्पर्धेत होता बरं. चौदाव्या शतकाच्या आसपास दिल्लीचा सुलतान मुहंमद बिन तुघलकानं साधारणपणे असंच केलं होतं. तो जरा विक्षिप्तच होता.’’

‘‘विक्षिप्त होता म्हणजे नेमकं काय?’’ मंदानं विचारलं.
‘‘अगं विक्षिप्त म्हणजे एक प्रकारे चंचल बुद्धीचा. त्यानं प्रथम राजधानी दिल्लीहून दक्षिणेत दौलताबादला हलवली. त्यानंतर युद्धखर्चासाठी राज्यातल्या चलनाबाबत चक्रावून टाकणारा निर्णय घेतला. सन १३२९ मध्ये त्यानं प्रातिनिधिक किंवा विसार म्हणून ‘टंक’ ही तांब्या-पितळ्याची नाणी काढली. ही नाणी त्याच्या राज्यात सोनं व चांदीच्या निश्‍चित किमतीसाठी बदलता येत होती. हा निर्णय क्रांतिकारी होताच; परंतु त्या काळाच्या पुढचाही होता. दुर्दैवानं जनतेवर त्याची सक्ती झाल्यानं त्याचं महत्त्व लोकांना समजू शकलं नाही. त्यांना आपल्याकडच्या सोन्या-चांदीच्या नाण्यांचं महत्त्व होतं आणि हा समज खूप घट्ट होता,’’ मी सांगितलं.  
मी पुढं म्हणालो ः ‘‘तुघलकाचं हे पाऊल योग्य अंमलबजावणीच्या अभावी फसलं. ‘प्रातिनिधिक चलन’ ही उत्तम कल्पना आहे; पण तिच्यात एक दोषही आहे. कागद, पितळ किंवा तांबं यांचं आंतरिक मूल्य अगदी कमी असतं. त्यामुळं असं चलन कुणीही बनवू शकतो. त्यातून त्या चलनाचा विनिमय सोनं व चांदी यांसारख्या मौल्यवान धातूंच्या बदल्यात करता आला तर त्या व्यवहारात फायदाच असतो. म्हणूनच आजची सरकारंही आपल्या कागदी चलनांची नक्कल करणाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी त्यात वॉटरमार्कसारखे उपाय योजतात.’’

‘‘ते जाऊ दे. तुघलकाच्या टंकांचं पुढं काय झालं?’’ मीरानं उत्सुकतेनं विचारलं.
मी सांगू लागलो ः ‘‘तुघलकाच्या सरकारनं काढलेल्या टंकांची निर्मिती काळजीपूर्वक केली गेलेली नव्हती. त्याचा फायदा तत्कालीन बदमाशांनी घेतला. नक्कल करून नाणी पाडण्याची सुरेख संधी चालून आली असताना ती ते कशी सोडतील? त्यांनी स्वतःकडचं तांबं-पितळ वापरून नाणी पाडली. या बनावट टंकांचा बाजारात पूर आला. एका समकालीन इतिहासकारानं नमूद केलं आहे, की त्या वेळी प्रत्येक घर जणू टांकसाळच बनलं होतं! यामुळं काय झालं, की चलनवाढ प्रचंड झाली. ही अंदाधुंदी रोखण्यासाठी तुघलक सरकारनं अखेर टंक मागं घेतले आणि ज्यांच्याकडं अस्सल टंक होते, त्यांना सोन्या-चांदीत भरपाई देण्याचं आश्‍वासन दिलं. दुर्दैवानं बनावट टंकांचं प्रमाणच इतकं प्रचंड होतं, की सरकारनं नाकारलेल्या अशा तांब्याच्या टंकांचे ढीगच्या ढीग दौलताबाद किल्ल्याबाहेर पुढची अनेक वर्षं पडून होते!’’

‘‘हे वर्णन ऐकताना छान वाटतं; पण आधुनिक इतिहासाची पार्श्‍वभूमी बघितली तर निश्‍चलनीकरणाचा वापर आर्थिक शस्त्रक्रियेचं साधन म्हणून कधी तरी झाला आहे का?’’ जाड चष्मेवाल्यानं विचारले. ‘‘होय,’’ मी उत्तर दिलं. म्हणालो ः ‘‘सोविएत संघ किंवा वायमार प्रजासत्ताक अशा देशांमध्ये चलनाचं मूल्य शून्य झालं असता त्यांनी हा उपाय योजला होता. तेव्हा तर त्या देशांमधली स्थिती इतकी वाईट झाली होती, की पिशवीभर नोटा दिल्यावर मुश्‍किलीनं पावाची लादी मिळे. या देशांनी ते प्रचलित चलन रद्द करून नवं जारी केलं; पण आपल्या अर्थव्यवस्थेपुढं मात्र सात नोव्हेंबर २०१६ या दिवशी अशी स्थिती होती का, हा वादाचा मुद्दा असू शकतो.’’

‘‘माझे बाबा म्हणतात, की निश्‍चलनीकरणाचं पाऊल ही छान युक्ती आहे,’’ पहिलवान म्हणाला. करणनंही त्याला दुजोरा दिला. ‘‘सर, तुमचं काय मत आहे?’’ कुणीतरी मला विचारलं. म्हणालो ः ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्हीवरून केलेली घोषणा आपण ऐकली-पाहिली असेल, तर असं लक्षात येईल, की इतक्‍या मोठ्या प्रमाणावर निश्‍चलनीकरणाची अंमलबजावणी करण्यामागचं कारण म्हणजे ‘भ्रष्टाचार, तस्करी व काळा पैसा यांच्याविरुद्धची लढाई,’ हे आहे. मात्र, अलीकडच्या काही दिवसांत पंतप्रधानांचा सूर थोडा बदलला असला आणि त्यांनी हे पाऊल भारतीय अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरणाची गरज व रोकडरहित समाजाकडं वाटचालीसाठी उचललं असल्याचं नमूद केलं असलं, तरी प्रथम उल्लेख केलेल्या तीन उद्दिष्टांनाच प्राधान्य मिळेल, हे स्पष्ट आहे.’’

‘‘तुम्ही यात काय नवं सांगत आहात? वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्याच तुम्ही पुन्हा सांगितल्यात,’’ जाड चष्मेवाला कुरकुरला. म्हणाला ः ‘‘हा पुढाकार चांगला की वाईट ते तुम्ही सांगत नाही.’’ - मी त्याला थांबवलं. म्हणालो ः ‘‘अरे दम धर. मी तपशिलानं सांगतो आहे. काळ्या पैशाची अर्थव्यवस्था स्वच्छ करणं, हे खरंच प्रशंसनीय उद्दिष्ट आहे. मात्र, प्रश्‍न हा आहे, की निश्‍चलनीकरणामुळं ते साध्य होईल का आणि किती प्रमाणात?’’

यावर पहिलवान मध्येच बोलला ः ‘‘काळी अर्थव्यवस्था, काळं उत्पन्न, काळा पैसा आणि काळी संपत्ती याबाबत माझा गोंधळ उडतोय. कुणी नीट स्पष्ट करून सांगेल का?’’ मी त्यालाही थोपवलं. म्हणालो ः ‘‘ते काळं जरा वेळ ठेव बाजूला. आपण आपल्याला माहीत असलेल्या गोष्टींपासून सुरवात करू या. कायदा पाळणारा, पापभीरू, प्रामाणिकपणे कर भरणारा सर्वसामान्य माणूस दर महिन्याला सामान्य रोजगारातून उत्पन्न मिळवत असतो. त्यातून तो काही भाग बचत करतो. ही बचत केलेली रक्कम म्हणजे संपत्ती. ती त्या धारकाची वैध मालमत्ता असते आणि ती रिअल इस्टेट, सोनं, शेअर मार्केट अशा अन्य मालमत्तांत गुंतवली जाते आणि थोडीशी रोख स्वरूपातही साठवली जाते. दुसरीकडं काळी संपत्ती किंवा काळा पैसा म्हणजे अशी संपत्ती असते, जी त्या व्यक्तीनं कर न भरता मिळवलेल्या उत्पन्नातून तयार झालेली असते. लाच खाऊन मिळवलेला पैसा हा मालमत्ता, सोनंखरेदी किंवा परदेशी मालमत्ताखरेदी करण्यासाठी गुंतवला जातो. हेसुद्धा काळ्या संपत्तीचंच उदाहरण. चलनाच्या मदतीनं असे काळे व्यवहार पडद्याआड राहून करता येतात. उत्पन्न, संपत्ती किंवा मालमत्तेवरचा कर चुकवणंही अनेक माध्यमांतून घडतं. करयंत्रणेतल्या काहींना हाताशी धरून त्यांच्या संमतीनंच कर चुकवण्याचे प्रकार घडतात. तिथं त्यांच्या सेवेबद्दल त्यांना मोबदला दिला जातो. भ्रष्टाचार इतका राजरोस झाला आहे की वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यानंतर ५० रुपये देऊन लोक निघून जातात, त्याचवेळी संरक्षण व्यवहारांतील लाचेपोटी पाच हजार कोटी रुपये दिले गेल्याचं वाचायला मिळतं. महान भारतीय तत्त्वज्ञ कौटिल्य अनेक शतकांपूर्वी म्हणाला होता ः ‘जिभेवर ठेवलेला मध न चाखणं जितकं अशक्‍य असतं, तितकंच पैशाचे व्यवहार करणाऱ्या सरकारी नोकरानं त्या पैशाची थोडीसुद्धा चव न चाखणं अशक्‍य असतं.’  कौटिल्याचं हे वचन मुळीच खोटं नाही. ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेनं भारतात केलेल्या अभ्यासात असं आढळून आलं आहे, की ६२ टक्के लोकांना सरकारी कार्यालयात आपलं प्रलंबित काम करून घेण्यासाठी लाच द्यावी लागण्याचा अनुभव आला आहे.’’

‘‘चला उशीर होतोय...शेवटचा प्रश्‍न विचारा,’’ मी म्हणालो. त्यावर चमूतली सामाजिक कार्यकर्ती असलेल्या मीनानं विचारलं ः ‘‘ ‘काळा पैसा हा काळ्या उत्पन्नाचा किंवा संपत्तीचा अगदी थोडा भाग आहे,’ असं तुम्ही म्हणत असाल तर मग निश्‍चलनीकरण करण्याची काय गरज आहे? सरकार काळा पैसा बाळगणाऱ्यांवर छापे टाकून, मालमत्ता व सोन्याचे मोठ्या रकमेचे व्यवहार तपासून किंवा भारतीयांनी परदेशी बॅंकांत उघडलेल्या खात्यांबाबत तिथल्या सरकारकडून माहिती मागवून हे उद्दिष्ट साध्य करू शकत नाही का? बेनामी व्यवहार किंवा मालमत्तेचे संशयास्पद व्यवहार करणाऱ्यांना जबर दंड ठोठावू शकत नाही का? निश्‍चलनीकरण करून अर्थव्यवस्था मंदावण्यातून किंवा सर्वसामान्यांना त्रास होण्यातून कोणता फायदा साधला जाणार आहे? महत्त्वाचं म्हणजे, यातून खरोखर लाभ होईल की ही निव्वळ आश्‍वासनेच राहतील?’’

मी म्हणालो ः ‘‘हे बघा मॅडम. मी एक प्रश्‍न म्हटलं म्हणजे एकच प्रश्‍न. तुम्ही तर अनेक प्रश्‍नांची फैर झाडलीत! असो. तुमच्या शंकेला एकच एक उत्तर नाही; पण निश्‍चलनीकरण केलेल्या १२ कोटी रुपयांच्या नोटा बॅंकांत किंवा रिझर्व्ह बॅंकेकडं परत आल्यानंतर सरकारनं आता मोठ्या रकमा खात्यात भरलेल्यांची शोधमोहीम सुरू केली आहे. ही मोहीम प्रामाणिकपणे व काटेकोरपणे राबवली तर त्यातून करांचं उत्पन्न वाढेल.’’

‘‘याचा अर्थ प्रामाणिकपणा हा यातला कळीचा मुद्दा आहे,’’ मीना उद्गारली. मात्र, लगेच तिनं विचारलं ः ‘‘सर, पण सरकारी अधिकारी लाच का घेतात?’’
- ‘‘मला माहीत नाही,’’ मी उत्तरलो आणि पुढं सांगू लागलो ः ‘‘माझ्या आयुष्यात मला लाच देण्याचा प्रयत्न एकदाच म्हणजे १९७८ मध्ये झाला. तत्कालीन सरकारनं एक हजार रुपये आणि दहा हजार रुपये मूल्याच्या नोटा रद्द केल्या होत्या. मी त्या वेळी रिझर्व्ह बॅंकेत एक कनिष्ठ अधिकारी होतो. नोटा बदलून घेण्याच्या काउंटरवर गर्दी होत असल्यानं मदतीसाठी तिथं माझी नेमणूक झाली होती. शेवटच्या दिवशी घरी परतताना मला कुणीतरी सांगितलं, की रुबाबदार कपड्यांमधली एक व्यक्ती हातात भेटवस्तू घेऊन माझी वाट बघत होती आणि माझ्याशी संपर्क साधल्याचंही सांगत होती. मी चक्रावून गेलो; पण नंतर ते गूढ उकललं. हा माणूस एक नामवंत चित्रपट निर्माता होता. तो मला म्हणाला होता, की त्याचं पूर्ण युनिट चित्रीकरणासाठी दूरवरच्या प्रदेशात होतं आणि त्यामुळं त्यांना निर्धारित मुदतीत त्यांच्याकडच्या उच्च मूल्याच्या नोटा बदलून घेता येत नव्हत्या. ही रक्कम अंदाजे ४६ लाख रुपये होती. इतकं सांगितल्यावर तो सूचकपणे मला म्हणाला, ‘गरज असेल तर ‘योग्य ती व्यवस्था’ करणं शक्‍य होईल.’ खोटं का बोलू? माझ्याही मनात क्षणभर मोहानं प्रवेश केला; पण लगेचच माझ्या अंतर्मनातून सद्‌सद्विवेकबुद्धीचा फटकाराही मला बसला. माझ्या आई-वडिलांना आदर्शानं आणि मूल्यांशी प्रामाणिक राहून जीवन जगताना मी पाहिलं होतं. परिणामी, मी त्या गृहस्थाला जरा अशिष्ट भाषेतच खडसावलं आणि ‘पोलिस कोठडीत जायचंय का?’ असंही सुनावलं. तो माणूस मला शांतपणे म्हणाला, ‘थोरातसाहेब, विश्‍वास ठेवा. आमचं युनिट खरोखरच दूरवरच्या प्रदेशात आहे आणि त्यामुळं चलनबदलाच्या अखेरच्या तारखेच्या आत आम्हाला ते बदलून घेणं शक्‍य झालं नाही. आम्ही काही ना काही मार्ग काढू. तुम्ही रागावू नका. तुमच्यासारख्या अत्यंत प्रामाणिक माणसाशी भेट झाल्याचा मला खूपच आनंद झाला आहे. माझी एकच विनंती आहे. आजच्यासारखेच आयुष्यात सदैव प्रामाणिक राहा.’ ’’

‘‘वा. तुमचं वागणं खरोखरच प्रशंसनीय होतं,’’ कुणीतरी म्हणालं. ‘‘नाही,’’ मी म्हणालो, ‘‘मी मार्ग चुकण्यापासून वाचलो असलो, तरी मला क्षणभर मोह झाला, हे सत्य होतं. डॉन ब्रॅडमन या महान क्रिकेटपटूला एकदा विचारले गेलं की ‘फलंदाज म्हणून आपण किती चांगले आहोत,’ असं तुम्हाला वाटतं? त्यावर त्यानं शांतपणे उत्तर दिलं की, ‘समोरून येणारा पुढचा चेंडू जितका चांगला असेल, तितकाच चांगला मी फलंदाज आहे.’ लक्षात घ्या. हा विचार वैयक्तिक प्रामाणिकपणासाठी लागू केला तर सखोल ठरतो. कुणीही कायमस्वरूपी बांधिलकीची हमी देऊ शकत नाही. एकात्मता आणि प्रामाणिकपणा हे गुण प्रत्येक दिवशी, प्रत्येक प्रसंगात सिद्ध करावे लागतात. ब्रॅडमनच्या वाक्‍यानुसार, पुढचा मोहाचा प्रसंग तटवून लावेपर्यंतच प्रत्येकजण प्रामाणिक असतो. पुढं काय होईल, हे कुणालाच सांगता येत नाही.’’

आमचे संभाषण संपलं आणि सगळेजण निघून गेले. त्या रात्री मला जाणवलं, की मी पैज हरलो आहे. माझं हॉटेलमधलं जेवण चुकलं असलं तरी घरच्या जेवणात मात्र मस्त तांबडा-पांढरा रस्सा होता. मी पत्नी उषा हिची प्रशंसा केली. त्यावर ती म्हणाली की ‘हे जेवण काही मी बनवलेलं नाही. तुम्हाला कुणीतरी डबा आणून दिलाय. सोबत एक चिठ्ठीही आहे.’ बघितलं तर मीनानं मला डबा आणून दिला होता. चिठ्ठीत लिहिलं होतं ः
दुश्वार हयात की राहों से गुजरे है बहुत इन्सां लेकिन
मोमिन है वोही जो मंझिल तक, ईमान सलामत ले आए।
(आयुष्याची वाटचाल करताना मोहाच्या निसरड्या जागा ठिकठिकाणी लागत असतात...मात्र, अशा मोहमयी परिस्थितीतही जो आपला प्रामाणिकपणा आणि सचोटी शाबूत राखतो, तोच ‘खरा माणूस’ होय.)

या काव्योक्तीच्या खाली सगळ्यांनी सह्या केल्या होत्या. माझे डोळे भरून आले.
उषानं मला विचारलं ः ‘‘काय झालं?’’‘‘काहीतरी डोळ्यांत गेलंय,’’ मी सांगितलं आणि दूरवर नजर टाकत मी स्वतःशीच म्हणालो ः ‘आपण दुर्बळ आणि घाबरट आहोत, हे खरं आहे. जीवन आपली कठोर परीक्षा घेतं, हेही सत्य आहे; पण अखेरीस ब्रॅडमनप्रमाणे आपल्याला पुढच्या चेंडूचा सामना करावाच लागतो. त्यामुळं पवित्रा घ्या आणि पुढच्या चेंडूचा मुकाबला शक्‍य तितक्‍या कौशल्यानं करा!

Web Title: dr yashwant thorat's article in saptarang