दुनिया बनानेवाले...

सृष्टीची उत्पत्ती कशी आणि का झाली? पृथ्वीबरोबरच आप, तेज, वायू, आकाश इत्यादी पंचमहाभूतांच्या असण्याचं प्रयोजन काय आहे? ‘जे पिंडी तेचि ब्रह्मांडी’ हे तत्त्व अंगीकारत वनस्पती, प्राणी-पक्षी, कीटक यांचं अस्तित्व कशासाठी आहे?
Duniya Bananewale song movie teesri kasam
Duniya Bananewale song movie teesri kasamSakal

- डॉ. कैलास कमोद

दुनिया बनानेवाले

क्या तेरे मन में समाऽऽई

तू ने काहे को दुनिया बनाऽऽई...

सृष्टीची उत्पत्ती कशी आणि का झाली? पृथ्वीबरोबरच आप, तेज, वायू, आकाश इत्यादी पंचमहाभूतांच्या असण्याचं प्रयोजन काय आहे? ‘जे पिंडी तेचि ब्रह्मांडी’ हे तत्त्व अंगीकारत वनस्पती, प्राणी-पक्षी, कीटक यांचं अस्तित्व कशासाठी आहे? त्यांचं एकमेकांवरचं अवलंबित्व का आहे? मनुष्याची जात तरी कशासाठी जगत असते?

या साऱ्यांचा निर्मिक कुणी एक आहे की अनेकांनी हे निर्माण केलंय? किंवा, हे कुणीच निर्माण केलेलं नाही व एक-दुसऱ्यावर अवलंबित असलेलं हे सगळं उत्स्फूर्तपणे निर्माण झालंय? ...असे प्रश्न खरं तर

संशोधकांचे-शास्त्रज्ञांचे. फार फार तर तत्त्वचिंतकांचे. त्यांच्या त्यांच्या परीनं ते या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करत आले आहेत. या प्रश्नांची संपूर्ण उत्तरं त्यांना सापडतील काय? सापडली तरी त्यासाठी किती काळ जाईल? कदाचित्, अशी उत्तरं कधीच सापडणारही नाहीत...काय घडेल याविषयी ठामपणे सांगणं कठीण आहे.

हे शोधण्यात सामान्य माणसाला रस नसला तरी या सगळ्याचं कुतूहल मात्र त्याच्या मनात मनुष्यजातीच्या निर्मितीपासूनच होतं, आहे आणि असेल. यथामती तो त्याविषयी तर्क लावत आलेला आहे. अगदी मनुष्याला निसर्गाचं आकलन होऊ लागलं तेव्हापासून ते आजतागायत हे कुतूहल आहेच आहे.

असाच एक सामान्य गाडीवान आहे हिरामण. आज त्याच्या बैलगाडीतून दूरच्या एका गावाला घेऊन जाण्यासाठी त्याला एक ‘सवारी’ मिळाली आहे. ती आहे एकटी स्त्री. हिराबाई तिचं नाव. निष्पाप, भोळा हिरामण गाडी हाकता हाकता तिच्याशी गप्पा मारतोय. समोरून कुणी गाडीवान येताना दिसला की ‘राम राम’ करून त्याच्याशीपण दोन शब्द बोलतोय.

शेजारून जाणारे काही गाडीवान त्या निर्जन रस्त्यावरून वाट कापताना स्वतःच्या विरंगुळ्यासाठी गाणी गुणगुणतात. त्या गाण्यांचं गाडीतल्या हिराबाईला कौतुक वाटतंय. ‘यहाँ हर कोई गीत गाता है’ असं ती हिरामणला म्हणते. मग हिरामणही तिला एक प्रेमकथा सांगता सांगता गाऊ लागतो :

दुनिया बनानेवाले...

काहे बनाए तू ने माटी के पुतले

धरती ये प्यारी प्यारी, मुखडे ये उजले

जग कशासाठी निर्माण केलंस असं हिरामण जरी निर्मिकाला विचारत असला तरी त्याच्या गाण्याचा रोख मुख्यत: मनुष्यजातीवर आहे; त्यातही माणसाचं मन आणि त्या मनातली प्रीतीची भावना यांतलं कोडं तो सोडवू पाहतो आहे.

‘माटी के पुतले’ हे शब्द अर्थातच माणूस या अर्थानं येतात. हे पुतळे तू का घडवलेस? या धरतीवर असे सुंदर सुंदर चेहरे का निर्माण केलेस? सौंदर्याची जणू जत्रा भरलीय असा तारुण्याला बहर तरी का आणलास? असे प्रश्न विचारता विचारता ‘गुपचुप तमाशा देखे, वाह रे तेरी खुदाऽऽई’ असंही तो निर्मिकाला सुनावतो आणि ‘तूसुद्धा कधी तरी प्रेम केलं असशीलच ना,’ असंसुद्धा पुढं तो त्याला विचारतो!

तू भी तो तडपा होगा मन को बनाकर

तूफाँ ये प्यार का मन मे छुपाकर

कोई छबी तो होगी आँखों में तेरी

ऑँसू भी छल के होंगे आँखों से तेरी

‘तू प्रेमिकांची मनं जुळवतोस...त्यांना एकत्र आणतोस...ते हसतात- बागडतात...जीवनाची स्वप्नं पाहू लागतात आणि एका क्षणी तू त्यांची ताटातूट करतोस...त्यांना दु:खाच्या खाईत ढकलतोस...वरून कुठून तरी सोंगट्या हलवत हे सगळे खेळ तू कशासाठी करतोस रे बाबा?’ असंही हिरामण हताशपणे विचारतो.

गाणं गाता गाता मधून मधून तो हिराबाईला ती प्रेमकथा गद्यातही ऐकवत असतो. गोष्टीतल्या महुआचं कुणावर तरी प्रेम होतं; पण तिच्या सावत्रआईनं एका ‘सौदागरा’शी तिचं लग्न लावून दिलं. आयुष्यात मनुष्य जे इच्छितो ते घडेलच असं नाही. आयुष्य हे घटित-अघटित यांची, सुख-दु:खांची गोधडी आहे असं जीवनातलं सत्यच गोष्टीरूपातून हिरामण सांगतोय. तेही त्याच्या अनुभवातून आलेलं आहे.

‘तीसरी कसम’ या सिनेमातलं हे गाणं. क्लिष्ट शब्दांचं अवडंबर न माजवता अतिशय साधे-सरळ विचार, साध्या शब्दांत लिहिले आहेत गीतकार हसरत जयपुरी यांनी. हे गाणं रेडिओवर ऐकताना आपल्याला भावतं ते केवळ शब्दरचनेमुळे नव्हे तर, त्याचं हलकंफुलकं संगीत आणि जोडीला मुकेश यांचा स्वर या बाबींमुळेही.

‘भैरवी’ रागातली चाल देऊन संगीतकार शंकर-जयकिशन यांनी आपलं नेहमीचं ऑर्केस्ट्रेशन बाजूला ठेवत संगीताला ग्रामीण बाज दिला आहे. इंटरल्यूडला बासरीची सुरावट तर फारच गोड आहे. ग्रामीण ढोलकचा चांगला वापर केला गेला आहे.

आणि, मुकेश! स्वर कुठंही उंच न्यायचा नाही अशी स्वत:ची मर्यादा सांभाळून त्यांनी हे साधे शब्द तितक्याच साधेपणानं स्पष्ट उच्चारांतून आपल्यापर्यंत पोहोचवले आहेत. गाण्याच्या श्रवणीयतेत त्याचा मोठा वाटा आहे. शेवटाला लता मंगेशकर यांच्या स्वरातला एक अंतरासुद्धा काळजाला भिडतो.

गाडी हाकता हाकता हिरामण हे गीत गातो. हिराबाई उत्सुकतेनं त्याचा गाणारा चेहरा न्याहाळत असते. एका हाताच्या बोटांनी दुसऱ्या हातावर ताल धरत दाद देऊ लागते. मध्येच तो एखाद्या झाडाखाली गाडी थांबवून भावविवश होत स्वत:शीच बोलल्यासारखा गातो तेव्हा तीपण नजर खाली झुकवून अंतर्मुख होत ऐकत असते.

तिच्या मनातले तरंग हे कदाचित तिच्या स्वत:च्या भूतकाळातल्या घडामोडींशी साम्य दर्शवत असावेत असं तिचा अभिनय पाहून जाणवतं. असे मनातले भावदर्शक प्रसंग गाण्यात अनेक आहेत. हिरामणचं गीत जिथं थांबतं तिथून हिराबाई तेच गीत पुढं नेते. हा प्रसंग तर अफलातून...

आणि, हा प्रसंग साकारतोय राज कपूर. भोळेभाबडेपणा हा तर त्याचा स्थायीभाव! गाण्याच्या प्रत्येक प्रसंगातल्या शब्दरचनेत त्याचा मुद्राभिनय जणू विरघळून एकरूप होत जातो. तो गद्यात बोलतो तेव्हाचा आवाज स्वतः राज कपूरचाच आहे. ‘जवान हो गई थी महुआ...’ असे शब्द तो उच्चारतो. त्या उच्चारांतूनही तो आपली व्यथा अचूक व्यक्त करतो.

धोतर, बंडी, गमछा, गळ्यात काळा गंडा अशा ग्रामीण वेशातला निष्पाप-निरागस खेडूत काय वठवलाय त्यानं! मन लावून त्याचं गीत ऐकत स्वत:शीच विचार करणारी हिराबाई अर्थात् वहीदा रहमानही त्याच्यासमोर कसोटीला उतरते. क्षणाक्षणात बदलणारे चेहऱ्यावरचे भाव तिनं छान दर्शवले आहेत.

कॅमेरामननं एके ठिकाणी साईड पोझनं तिचा क्लोजअप् घेतलाय. फार सुंदर दिसते ती त्या क्लोजअपमध्ये. खेड्यातली निर्जन वाट, त्या वाटेवर धावणारी धमणी (वर आच्छादन असलेली बैलगाडी), मध्येच एखादं वडा-पिंपळाचं झाड, एखादा तलाव असं भोवतालचं ग्रामीण वातावरण जिवंत वाटतं. दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचा ग्रामीण जीवनाचा अभ्यास आणि दिग्दर्शीय कसब वाखाणण्याजोगं.

‘तीसरी कसम’ हा १९६६ मधला ‘राष्ट्रपती पुरस्कार’प्राप्त सिनेमा होता. गीतकार शैलेंद्र या सिनेमाचे निर्माते होते; पण त्यातली काही गाणी स्वत: लिहून काही गाणी आपले सहकारी हसरत जयपुरी यांच्याकडून त्यांनी लिहून घेतली हे विशेष. ‘मारे गए गुलफाम’ या फणीश्वरनाथ रेणू यांच्या गाजलेल्या कादंबरीवर आधरित हा सिनेमा आहे.

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com