esakal | सांगे कथा भरताची
sakal

बोलून बातमी शोधा

arvind-dsilva

खेलंदाजी
भारतीय क्रिकेट संघाचा राम हा सीतामाईच्या प्रसूतीसाठी मिथिलानगरीत गेला. त्यामुळे अयोध्येत रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून भरतानं राज्य केलं.

सांगे कथा भरताची

sakal_logo
By
द्वारकानाथ संझगिरी dsanzgiri@hotmail.com

भारतीय क्रिकेट संघाचा राम हा सीतामाईच्या प्रसूतीसाठी मिथिलानगरीत गेला. त्यामुळे अयोध्येत रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून भरतानं राज्य केलं. तो राज्यकारभार इतका चांगला झाला की अयोध्यानगरीत कुजबुज सुरू झाली : ‘राम हा तिन्ही लोकांतला सर्वश्रेष्ठ योद्धा असेल; पण राज्यकारभार करणं जेवढं भरताला जमतं तेवढं रामाला जमतं नाही.’

या कुजबुजीमुळे गुरू वशिष्ठ ऋषी बेचैन झाले. त्यांनी अयोध्याजनांना सांगितलं : ‘भरतानं हा राज्यकारभार चांगला केला. कारण, गेली काही वर्षं रामानं कष्ट घेऊन एक उत्तम संघ तयार केला होता. भरताला त्याचा फायदा झाला.’ अर्थात्, गोड बातमी घेऊन राम पुन्हा अयोध्येला परतला. त्यानं पादुका पायात घातल्या. तो आता सिंहासनावर बसायला सज्ज झालाय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मला एक जुना किस्सा आठवतोय. श्रीलंकेत मला अबू फुआद यानं सांगितलेला. तो त्यांचा माजी क्रिकेटपटू. त्याची जीभ आपल्या बिशन बेदीइतकीच फटकळ. त्या वेळी अरविंद डीसिल्वा त्यांचा राम होता. त्याला त्यांच्या अयोध्येच्या सिंहासनावर बसायची संधी मिळाली.

तो अबूकडे गेला. त्यानं अबूला विचारलं : ‘‘मी काय करू?’’
अबू म्हणाला :‘‘तुला काय व्हायचंय? महान फलंदाज की सामान्य कर्णधार?’’
त्याला अबूच्या बोलण्याचा रोख कळला. त्यानं महान फलंदाज व्हायचं ठरवलं. अर्जुना रणतुंगा दीर्घ काळ भरत झाला. त्यानं श्रीलंकन क्रिकेटला मोठे विजय मिळवून दिले. त्यात रामानं मोठा पराक्रम केला. महान खेळाडू चांगला कर्णधार होतोच अस नाही. रामाच्या हातून राज्य काढून घ्यावं असं कुणा सुज्ञाला वाटणार नाही; पण भरतानं आपलं नाणं खणखणीतपणे वाजवलं ते चांगलं झालं. त्याची गरज होती.

सप्तरंगचे आणखी लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा

भारत देशाच्या क्रिकेटमध्ये अनेकदा अस घडलंय, की एखादा खेळाडू नेतृत्वाला धक्का देऊ शकतो, अशी भीती निर्माण झाली की कर्णधाराच्या कैकेयी-मंथरा त्याला हटवण्यासाठी सज्ज होतात. काही वेळेला असंही घडलंय की एखादा तरुण खेळाडू कर्णधार होतो, त्याच्या हाताखाली मग बुजुर्ग खेळाडू असतात, ते त्याला डोईजड वाटतात...मग त्यांना शिताफीनं संघाबाहेर काढायचे प्रयत्न होतात. पतौडीच्या राजापासून रांचीच्या राजपुत्रापर्यंत अनेकांनी हे उद्योग केले.

आपल्या भरतालाही संघाबाहेर काढण्यासाठी मार्ग खोदला जात होता. त्यानं सुरुवातीला एक खंदा फलंदाज म्हणून नाव कमावलं. परदेशात तो जास्त धावा करतो अशी त्याची ख्याती पसरली. आपल्या कथेचा राम महान फलंदाज असेल; पण त्याची भारतातली कसोटीसरासरी ६८.४२ आहे आणि भारताबाहेर ४४.४२ आहे. भरतानं भारताबाहेरच्या जवळपास सर्व महत्त्वाच्या देशांत शतकं ठोकली आहेत. एकेकाळी तो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचा.
मग रांचीच्या राजपुत्रानं एकदा जाहीर केलं : ‘भरताला स्टाईक रोटेट करता येत नाही.’ 

सन २०१६ मध्ये तो शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला. एकदा राम जखमी झाला. भरतानं पादुका गादीवर ठेवल्या आणि संघाला चक्क ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून दिला. दुसऱ्या डावात दबावाखाली आक्रमक फलंदाजी करून तो जिंकला. भरताच्या नेतृत्वाचं कौतुक झालं. कुणाला तरी ते झोंबलं.

सन २०१७- १८ मध्ये त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डेमध्ये कलकत्ता : ५६, इंदोर : ७०, बंगलोर : ५३, नागपूर : ६१ अशा धावा केल्या. तिथून तो दक्षिण आफ्रिकेत गेला. डर्बनला ७९ धावा केल्या. नंतर पुढं तीन डावांत तो अपयशी ठरला आणि मग नाबाद ३४. ती तारीख होती १६ फेब्रुवारी २०१८. त्यानंतर त्याच्यासाठी वन डेचा दरवाजा बंद करण्यात आला. आता फक्त एकाच फॉरमॅटचा दरवाजा उघडा होता. कसोटीचा दरवाजा. खरं तर तो २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये खेळायला हवा होता. चार क्रमांकाची जागा बेवारशी होती. धवनला दुखापतीमुळे बाहेर जावं लागलं. भरत इंग्लंडमध्ये होता; पण तो कुणाला तरी नको होता.

फक्त एका फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या फलंदाजांवर दबाव येतो. मुळात कसोटी सामने कमी होतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला मिळत नाही. फॉर्म गेला तर तो परत मिळवायला दुसरा फॉरमॅट नसतो. त्यात पाचव्या क्रमांकावर खेळायचं म्हणजे तारेवरची कसरत. कधी दुसरा नवा चेंडू, कधी खालच्या फलंदाजांना घेऊन भागीदारी करणं. अशा वेळी अपयश जास्त मानसिक त्रास देतं. विशेषतः कुणीतरी बाहेरचा दरवाजा दाखवायला सज्ज आहे ही भीती मनात असताना. 

भरत त्या दडपणातून गेला; पण पुन्हा बाहेर आला आणि पुन्हा पादुका मिळाल्यावर त्यानं अपयश आणि संकट यांचंच रूपांतर संधीत केलं व तो त्यांच्यावर स्वार झाला. इतिहास नव्यानं लिहिला. त्यानं एक गोष्ट ध्यानात ठेवावी. भरत नेहमी पादुका ठेवूनच राज्य करतो. त्याला राम होता आलं तर आनंद आहे; पण ते सोपं नाही. 

आजच्या वशिष्ठ ऋषींना त्रेता युगातसुद्धा भरतच व्हावं लागलं होतं. ते नाही राम झाले; पण भरतावरचा दबाव आता गेला असेल. यापुढे त्यानं धावांमध्ये अधिक सातत्य आणावं. ३०, ४० च्या फेऱ्यातून बाहेर पडावं.राम का मोठा? त्याच्या फलंदाजीत सातत्य आहे. एकदा सेट झाला की तो सहसा लवकर विकेट देत नाही. भरतानं फक्त भरत होण्यात सुख मानू नये. त्यानं मोठा फलंदाज व्हावं.

दोन महत्त्वाच्या गोष्टी.
या कथेतल्या राम, भरत, वशिष्ठ आदींचा रामायणातल्या मंडळींशी काहीही संबंध नाही. ती उदात्त स्वभावाची, देवतुल्य माणसं होती. केवळ प्रसंगसाधर्म्यासाठी या कथेतल्या व्यक्तींना त्यांची नावं दिली आहेत. ही कथा काल्पनिक आहे. प्रत्यक्ष जगातल्या व्यक्तींशी तुम्हाला त्यांचं साधर्म्य आढळलं तर तो योगायोग समजावा.
(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil