वीज नको, सूर्य व्हा

ही १९८६ ची गोष्ट आहे. भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. ऑक्सफर्डला एक सामना होता आणि मी इंग्लंडचा माजी कर्णधार माईक स्मिथची गप्पा-कम-मुलाखत घेत होतो.
Surya Prithvi and Sanju
Surya Prithvi and SanjuSakal

ही १९८६ ची गोष्ट आहे. भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. ऑक्सफर्डला एक सामना होता आणि मी इंग्लंडचा माजी कर्णधार माईक स्मिथची गप्पा-कम-मुलाखत घेत होतो. आम्ही बोलत असताना अझरुद्दीननं जवळपास ऑफ स्टंप बाहेरचा चेंडू स्वेअर लेगमधून सीमारेषेकडे पिटाळला. माईक स्मिथनं डोळे विस्फारले.

माईक स्मिथ मला म्हणाला : ‘हे असे फलदांज तुम्हाला मिळतात कुठून?’

तिथून भारतीय फलंदाजीला भरती येतच गेली. सचिन आला, द्रविड आला, लक्ष्मण आला, गांगुली आला, सेहवाग आला, विराट आला, रोहित शर्मा आला आणि आता कदाचित पंत...

हे आठवायचं कारण म्हणजे, आयपीएलमधल्या काही तरुण भारतीय फलंदाजांची फलंदाजी पाहून, मी एकदा माईक स्मिथप्रमाणे स्वतःलाच प्रश्न विचारला होता : ‘हे फलंदाज येतात तरी कुठून?’

ते फलदांज होते पृथ्वी शॉ, संजू सॅमसंग, सूर्या यादव, देवदत्त पडिक्कल... आणखी दोन-चार...

तो सूर्या यादव येतो आणि पहिल्याच चेंडूवर डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाला एक्स्ट्रा कव्हरवरून इनसाईड आऊट शॉट मारतो. आणि पुढच्याच षटकात वेगवान गोलंदाजाला असा ऑन ड्राईव्ह मारतो की ‘माझी बॅट सर्वत्र राज्य करते’ हे जणू त्याला दाखवायचंय. पृथ्वी शॉ आल्या आल्या पहिले चार चेंडू चार दिशांना खणखणीतपणे मारू शकतो. संजू सॅमसंगचं टायमिंगच असं आहे की, बऱ्याच वेळा त्याची बॅट चेंडूला फ्लाईंग किस देतेय असं वाटतं आणि लाजलेला चेंडू गवताला गुदगुल्या करत सीमापार जातो!

दुःख याचं होतं की, बऱ्याचदा हे सर्व क्षणभंगुर ठरतं. त्याचं महत्त्वाचं कारण असं की, फलंदाजी म्हणजे नुसते फटके किंवा टायमिंगची दैवी देणगी नव्हे. मोठा फलंदाज व्हायला ती हवीच. ती नसेल तर फलंदाज महान होऊ शकत नाही; पण त्यापलीकडे अनेक गोष्टी आहेत आणि आजची पिढी या गोष्टींना फारसं महत्त्व देत नाही, असं मला बऱ्याचदा वाटतं.

पृथ्वी, संजू, सूर्या या तीन फलंदाजांना देवानं एवढं ऐश्वर्य दिलंय; पण त्यांच्या कारकीर्दीचं उद्दिष्ट काय, असा प्रश्न मला पडतो. म्हणजे त्यांना फक्त आयपीएल खेळून, पैसे मिळवून खूश राहायचं की पुढं जायचं? आपली कारकीर्द सार्थकी लावायची वगैरे विचार त्यांच्या मनात येतो की नाही?

संजू सॅमसंगला तर आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्येसुद्धा परफॉर्मन्स देणं जमलेलं नाहीये. तो टी-२० तच खूश आहे. सूर्या यादवनं आता कुठं वन डे इंटरनॅशनलचा उंबरठा ओलांडलाय. बराच मोठा पल्ला शिल्लक आहे. पृथ्वी शॉनं कसोटी क्रिकेट गाजवलं आणि नवीन महान खेळाडूचे पाय पाळण्यात दिसले असं वाटत असतानाच तो अपयशी ठरत गेला. त्याचं करिअर हे सापशिडीच्या खेळासारखं वाटलं मला. काही क्षणांत तो शिडी चढत वर गेला, चुका केल्या आणि सापाच्या तोंडातून थेट पुन्हा खाली आला...पण पृथ्वी शॉबाबत निदान मागच्या गुन्ह्यांचं प्रायश्चित्त घेण्यासाठी वय तरी त्याच्या बाजूला आहे. संजू सॅमसंगतर टी-२० पुरताच राहणार असं दिसतंय. निदान सूर्या यादवला तरी टी-२० किंवा आयपीएलपेक्षा मोठी स्वप्नं पडावीत.

आता खेळाडूंची महत्त्वाकांक्षा कमी झालीय की काय? म्हणजे खेळाडूंना कष्ट करून कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळवणं हे हवंय की नको? की त्यांना आयपीएलमध्ये आणि टी-२० मधून मिळणाऱ्या पैशावर आणि लोकप्रियतेवर खूश राहायचंय?

सुनीलचा काळ सोडून द्या, त्या वेळी वन डे क्रिकेटसुद्धा तसं पाळण्यात होतं; पण सचिनपासून पुढं येणाऱ्या सगळ्या महान खेळाडूंनी दोन किंवा तिन्ही फॉरमॅटमध्ये पराक्रम करण्याचा प्रयत्न केला. मग तो सचिन, पॉँटिंग, लारा, एबीडी, जयसूर्या, अरविंद डिसिल्वा, द्रविड किंवा विराट असो...त्यांच्याकडे प्रामुख्यानं महान फलंदाज म्हणून पाहिलं गेलं. कारण, ते महान कसोटीपटू होते. वरील तीन खेळाडूंनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की, टी-२० च्या खेळाला महानतेच्या कोष्टकात फारशी जागा नाही. तसं जर असेल ना, तर कायरन पोलार्डसुद्धा महान फलंदाज होईल.

क्रिकेटचे हे फॉरमॅट साधारणतः संगीताच्या फॉरमॅटसारखे आहेत. चित्रपटसंगीत हे टी-२० सारखं आहे. नाट्यगीत हे वन डे सारखं आहे आणि शास्त्रीय संगीत हे कसोटीक्रिकेटसारखं आहे.

एकदा मन्ना डे यांना विचारण्यात आलं होतं : ‘तुम्ही एवढी सुंदर शास्त्रीय गाणी गाता, तर तू शास्त्रीय संगीतातच करिअर का नाही केलंत? तुम्ही सुद्धा महान शास्त्रीय गायक झाला असतात...’

ते म्हणाले होते : ‘मी तसा विचार केला होता; पण माझ्या असं लक्षात आलं की, मी जर चित्रपटांत गायलो तर मला अधिक नाव मिळेल. मला अधिक पैसे मिळतील. उलट, मोठा शास्त्रीय गायक होता होता माझं तारुण्य संपून जाईल. मी आयुष्याच्या शेवटाला येईन.’ कदाचित हेच आकर्षण टी-२० बद्दल आजच्या पिढीला आहे.

मला या वरच्या तीन खेळाडूंना एवढंच सांगायचंय, की क्रिकेट म्हणजे फक्त फटके किंवा फक्त टायमिंग नाहीये. मोठं व्हायला टेंपरामेंट लागतं. धीरोदात्तता लागते. गवंडी जसा एकावर एक वीट ठेवून भिंत उभी करतो तशी धावेवर धाव घेऊन धावेची भिंत वेळप्रसंगी फलंदाजाला उभारावी लागते. जर विकेट टर्निंग असेल तर फिरणाऱ्या चेंडूचं मन ओळखावं लागतं! जर विकेटवर गवत असेल तर स्विंगशी आणि सिमशी दोस्ती करावी लागते. विकेटमध्ये जर बाऊन्स असेल तर बाऊन्सवर स्वार व्हावं लागतं. कसोटी क्रिकेट खेळताना, गोलंदाजावर आणि क्षेत्ररचनेवर कुठल्याच प्रकारचं नियंत्रण नसल्यामुळे किंवा जाचक कायदे नसल्यामुळे फलंदाजाची सगळ्यात जास्त कसोटी लागते आणि म्हणूनच ती महानतेची कसोटी आहे, असं मी मानतो.

हे जे तिघं आहेत त्यांना वीज व्हायचंय की सूर्य हे त्यांनी ठरवावं. वीज क्षणात चमकून जाते, विजेचा कडकडाट होतो, त्या वेळी आपल्याला एक वेगळं, मस्त, दिव्य असं काही पाहिल्यासारखं वाटतं; पण ते क्षणभंगुरच असतं. पावसाळा गेला, विजा थांबल्या की आपण ते विसरून जातो. एरवी, आपल्या लक्षात राहतो तो रोज तळपणारा सूर्य किंवा रोज रात्री दिसणाऱ्या चांदण्या. देवाकडून सढळ हातानं गुणवत्ता मिळालेल्या या तीन फलंदाजांनी फक्त वीज होण्यातच धन्यता मानू नये, त्यांनी सूर्य किंवा चांदण्या होण्याचा प्रयत्न करावा. पंतनं तो केला आणि तो यशस्वी होताना दिसतोय.

एकदा रवी शास्त्री मला म्हणाला होता : ‘‘संदीप पाटीलच्या गुणवत्तेची ४० टक्के गुणवत्ता जरी मला मिळाली असती तरी मी महान फलंदाज झालो असतो.’’

रवी शास्त्रीचं टेंपरामेंट, जिद्द, हुशारी, महत्त्वाकांक्षा यांपैकी ४० टक्के या खेळाडूंना मिळाले तरी ते मोठे फलंदाज होतील.

मात्र, दुर्दैवानं या असल्या ‘वाटाघाटी’ फक्त काल्पनिक असतात!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com