मखमली स्पर्श असलेली फलंदाजी

Rohit-Sharma
Rohit-Sharma

ज्या फलंदाजांसाठी मी पैसे देऊन मॅच पाहीन त्यात रोहित शर्माचा क्रमांक पहिला आहे. रोहितमध्ये काहीतरी वेगळं आहे. इतरांपेक्षा तो फलंदाजी इतकी सोपी करून टाकतो की, कधी कधी मला असं वाटतं, पेन बाजूला ठेवावं आणि या वयातही बॅट हातात घेऊन बॅटिंग करावं. जमून जाईल आपल्याला!

सोबर्स, रिचर्डस्, सचिन, सुनील, एबीडी वगैरे देवलोकातली मंडळी आपण सध्या बाजूला ठेवू या; पण मृत्युलोकात काही असे फलंदाज आहेत, ज्यांना पाहताना मॅचचं तिकीट हा भुर्दंड वाटत नाही, तर ती स्वखुशीनं दिलेली देणगी वाटते. त्यात, माझ्या यादीत विश्वनाथ येतो, रॉय डायस येतो, ऐन भरातला अझर येतो, इंग्लंडचा गावर येतो, पाकिस्तानचा झहीर अब्बास येतो आणि माझा लाडका अजित वाडेकर तर येतोच येतो. ही मंडळी फलंदाजी सोपी करून टाकत; पण ती कठीण आहे हे समोरचा फलंदाज पाहिला की आपल्याला जाणवत असे. विश्वनाथबरोबर जेव्हा यशपाल शर्मा खेळायचा ना तेव्हा विश्वनाथ मैदानाच्या हिरव्या कॅनव्हासवर पेंटिंग करतोय असं वाटायचं, तर यशपालची फलंदाजी हा सश्रम कारावास वाटायचा. रॉय डायस हा ज्या वेळी बॅटिंग करायचा, त्या वेळी त्याची बॅट पिसासारखी वाटायची आणि त्याच्या समोर खेळणाऱ्या मेंडिसची बॅट ही कुऱ्हाड वाटायची.
असो. पुन्हा रोहितकडे येतो.

हे सर्व सांगण्याचं कारण, की रोहित आज वन डेचा सार्वकालीन श्रेष्ठ फलंदाज आहे; पण कसोटी फलंदाज म्हणून तो अजूनही जागतिक दर्जाचा नाही. त्याच्याकडे गुणवत्ता जागतिक दर्जाची आहे; पण त्या गुणवत्तेचं प्रतिबिंब त्याच्या स्कोअरकार्डमध्ये पडत नाही. चेन्नईत त्यानं भिंगरी खेळपट्टीवर १६१ धावा केल्या. पहिल्या दिवशी. किंवा अहमदाबादला त्यानं शेतजमिनीवर अर्धशतक ठोकलं. ते पाहताना असं वाटत होतं की हा माणूस काचेवर खेळतोय. इतका तो आरामात खेळत होता. कसोटी फलंदाज म्हणून त्याची ३७ कसोटींची सरासरी ही ४६.५ आहे आणि त्यात आपल्या देशात त्याची सरासरी तब्बल ८१ आहे; पण परदेशात मात्र त्याची सरासरी फक्त २७ आहे. त्याला जर जागतिक दर्जाचं व्हायचं असेल तर जी परदेशातली सरासरी आहे ना, ती त्याला वरती न्यायलाच पाहिजे. 

तो तसा मूलतः मधल्या फळीतला फलंदाज. वन डेला तो आघाडीला गेला आणि प्रचंड यशस्वी झाला. मग त्याला कसोटीला आघाडीला जावं लागलं. तिथं नवा चेंडू खेळावा लागतो, नव्या दमाचे गोलंदाज असतात, खेळपट्टी नवीन असते, आक्रमक क्षेत्ररचना लावलेली असते, खेळपट्टीवर दव असू शकतं आणि स्विंग, बाऊन्स हे दोन पेपर सोडवणं हे सुरुवातीला तेवढं सोपं नसतं...पण तरीसुद्धा आघाडीच्या फलंदाजाला एका मर्यादेपर्यंत ते यशस्वीपणे सोडवावेच लागतात. ते सोडवण्यासाठी जर त्यानं आपला वेगवान गोलंदाजीविरुद्धचा बचाव अधिक पक्का केला तर हे पेपर त्याला जास्त सोपे जाऊ शकतील. 

सेहवाग हा तसा जन्मजात आघाडीचा फलंदाज नव्हता. सेहवाग हा काही तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम नव्हता; पण त्यानं या आघाडीच्या क्रमांकाशी स्वतःला जुळवून घेतलं. त्यानं आक्रमक क्षेत्ररक्षणाच्या चिंधड्या उडवल्या. ज्या वेळी आक्रमक क्षेत्ररचना असते, त्या वेळी तुम्हाला ड्राइव्ह करायलासुद्धा भरपूर मोकळी जागा उपलब्ध असते. फक्त ती करायची वृत्ती पाहिजे. ते फटके तुमच्याकडे पाहिजेत आणि ते मारायची जोखीम घ्यायची तयारीही. 

रोहितकडे ती वृत्तीही आहे आणि ते फटकेही आहेत. सेहवागपेक्षा रोहितचे फटके हे अधिक सुंदर आणि पाहायला मस्त वाटतात. ड्राइव्ह हे त्याच्या फलंदाजीच सौंदर्यस्थळ आहे. तो जेव्हा ड्राइव्ह मारतो ना, तेव्हा तो बिलियर्डस् खेळतोय असं वाटतं. इतक्या मुलायमपणे तो चेंडू सीमापार जातो. 

ज्या वेळी संदीप पाटील ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला, सन १९८१ मध्ये, तेव्हा वासू परांजपे यांनी त्याला सांगितलं होतं, ‘तू आक्रमक फलंदाज आहेस, त्यामुळे तुला फटके खेळायलाच हवेत; पण लिली-पास्को या गोलंदाजांना तू अर्धा तास पाहून घे. बस्स. त्याच्यानंतर दिवसभर ते तुला पाहत बसतील.’ 

एक्झॅक्टली असं खरं तर रोहितलाही सांगता येईल. पहिला अर्धा तास तू गोलंदाजी पाहून घे आणि नंतर दिवसभर सर्वजण तुला पाहत बसतील, इतकं सौंदर्य तुझ्या फलंदाजीत आहे. एकदा तो सेट झाला की मग तो मोठ्या धावसंख्येकडे जातो. त्याची शतकंसुद्धा मोठी असतात! आणि त्याच्या खेळीचा जो टेम्पो असतो तो कमी-जास्त होत नाही. त्याच्या टेम्पोचा ग्राफ हा अक्षरश: समांतर असतो. ते पाहताना मला पाकिस्तानमध्ये बॅटिंग करणारा झहीर अब्बास आठवतो. त्याच्या खेळीला एक विशिष्ट टेम्पो होता, जो कधीच कमी-जास्त व्हायचा नाही. 

रोहितकडे सगळेच फटके आहेत. तो षटकारही चेंडूला टिचकी मारल्यासारखे मारतो. त्याला चेंडू फार लवकर दिसतो आणि तो इतक्या उशिरा खेळतो की तो आळसावलेला वाटतो! महान फलंदाज म्हणून मिरवण्याचीच ही गुणवत्ता आहे. देव गुणवत्तेचं ताट पुढे ठेवतो; पण तो जेवण भरवत नाही. ते जेवण आपल्याला आपल्या हातानंच जेवायचं असतं. ते जर नीट जेवता नाही आलं, तर तो त्या गुणवत्तेच्या ताटाचा अपमान असतो.

रोहित हा सध्या जवळपास ३३ वर्षांचा आहे.  मी वेंगसरकरला ऐन तिशीत महान फलंदाज झालेला पाहिलेलं आहे. रोहितला स्वतःला महान फलंदाज म्हणून मिरवायचं असेल तर हीच संधी आहे. याच काळात त्याला फलंदाजीवर लक्ष ठेवून स्वतःतल्या गुणवत्तेला न्याय देता येईल. नाही तर मग ती संधी पुन्हा त्याला कधीच मिळणार नाही.

त्याच्या फलंदाजीच्या पेंटिंगनं कसोटी क्रिकेटच्या सर्वात भव्य आर्ट गॅलरीत दिमाखानं मिरवावं ही आमची अपेक्षा आहे.

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com