इंग्लंडचा ‘लॉर्ड’

भारतीय संघ आता इंग्लंडला जाणार. या दौऱ्यात आधी टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होईल आणि मग पाच कसोटी सामने. आपण इंग्लंडमध्ये कसोटीमालिका तीनदा जिंकली आहे.
Dilip Vengsarkar
Dilip VengsarkarSakal

भारतीय संघ आता इंग्लंडला जाणार. या दौऱ्यात आधी टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होईल आणि मग पाच कसोटी सामने. आपण इंग्लंडमध्ये कसोटीमालिका तीनदा जिंकली आहे. सन १९७१, १९८६ आणि २००७.

१९७१ चा विजय हा ऐतिहासिक होता. कारण, कोऱ्या पाटीवर यशाची पहिली अक्षरं त्या वेळी लिहिली गेली; पण १९८६ मध्ये तीन कसोटींच्या मालिकेत भारतीय संघानं इंग्लंडला चारी मुंड्या, सॉरी अकरा मुंड्या, चीत केलं होतं. १९८६ मध्ये केवळ पावसानं इंग्लंडला तिसऱ्या कसोटीत ब्राऊन वॉशपासून वाचवलं.

तेव्हा ‘लॉर्डस्’ला भारतानं पहिला कसोटी सामना जिंकला. क्रिकेटच्या मंदिरातलं ते यशाचं पहिलं महारुद्र होतं. इंग्लिश वातावरणात अत्यंत समतोल अशी भारतीय गोलंदाजी होती. उदाहरणार्थ : कपिलदेव, चेतन शर्मा, बिन्नी, मदनलाल, प्रभाकर वगैरे आणि मनिंदर आणि रवी शास्त्री फिरकी गोलंदाज; पण जिंकण्यासाठी धावांचा भक्कम पाठिंबा लागतो. ग्रीक देव ॲटलासप्रमाणे त्या मालिकेत धावांचा भार उचलणारा होता दिलीप बळवंत वेंगसरकर. या खेळाडूचं कधीच भरघोस कौतुक झालेलं नाही.

१९७९ मध्ये दिलीप पहिल्यांदा इंग्लंडला गेला होता, तेव्हा विजय मांजरेकरनं जाहीर केलं होतं की, ‘दिलीपचं तंत्र इंग्लंडमध्ये यशस्वी होऊ शकत नाही.’ त्या काळी मांजरेकरांचं वाक्य हे क्रिकेटच्या वर्तुळात वेदवाक्य मानलं जाई. ‘लॉर्डस्’वर पहिल्या कसोटीत दिलीप पहिल्या डावात शून्यावर बाद झाला तेव्हा अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानं दुसऱ्या डावात सामना वाचवताना विश्वनाथबरोबर शतकी भागीदारी केलीच; पण विश्वनाथच्या शतकाच्या तोडीस तोड असं स्वतःचं शतकही ठोकलं.

१९८२ मध्ये तो पुन्हा ‘लॉर्डस्’वर आला, शतक ठोकलं. १९८६ मध्ये पुन्हा आला. इंग्लंडमधल्या त्या ८६ च्या दौऱ्यावर तो भारतीय फलंदाजीचा ‘अर्जुन’ होता. त्याचा रथ कायम पुढं असायचा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्याचा कुणी कृष्णसारथी नव्हता. ‘कृष्ण’ही तोच आणि ‘अर्जुन’ही तोच.

त्या दौऱ्यापूर्वी ‘शारजा’त जी वन डेची स्पर्धा झाली होती, त्या वेळी त्याला चक्क वगळलं गेलं होतं. तिथं त्यानं शेवटच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक ठोकलं. ही तीच मॅच, जीमध्ये जावेद मियाँदादनं शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून मॅच आपल्या ताटातून पळवली होती. त्या वेळी राजसिंग यांनी दिलीपवर टीका केली होती. दिलीप त्या दौऱ्यावर सुरुवातीला नक्कीच दाबवाखाली असणार. राजसिंग हे त्या दौऱ्याच्या वेळी व्यवस्थापक होते; पण ती मालिका आणि दिलीपची शतकं मी कधीही विसरू शकणार नाही.

कारण, त्या वेळी आम्ही चारच भारतीय पत्रकार त्या दौऱ्यावर होतो. त्या वेळी भारतीय क्रिकेट संघ हा ‘थ्री स्टार हॉटेल’मध्ये राहत असे आणि आम्हालाही त्या ‘थ्री स्टार हॉटेल’मध्ये स्वस्तात जागा मिळत असे. त्यामुळे आम्ही संघाचा भाग असल्यासारखेच होतो. संघातील खेळाडूंची सुख-दुःखं आम्ही अत्यंत जवळून पाहिली आहेत. अन्यायाविरुद्ध बॅटनं बोलायची दिलीपची एक खुन्नसवृत्ती होती. अपमानानंतर तो सर्वशक्तीनिशी एकवटायचा. ‘लॉर्डस्’ला त्यानं नयनरम्य शतकाचा नजराणा पेश केला आणि तो डेनिस कॉम्प्टन, लेन हटन, सर जॅक हॉब्ज्, जेफ बायकॉटच्या मांडीला मांडी लावून बसला. दिलीप त्यांच्या क्लबमध्ये आलेला पाहून कॉम्प्टन आणि हटन यांना प्रचंड आनंद झालेला होता. त्यानं डिलीला मारलेला एक स्वेअर ड्राईव्ह ‘लॉर्डस्’च्या म्युझियमनं शक्य असतं तर जतन केला असता. त्यानं उजवा गुडघा किंचित जमिनीवर टेकवून तो मारला होता. तो इतका वेगात गेला की पॉईंट आणि थर्ड मॅनचे क्षेत्ररक्षक ‘पुतळे’ झाले होते. त्याचा तो डिलीला ९९ वर पोहोचताना मारलेला ऑन ड्राईव्ह मला आजही तसाच्या तसा आठवतो. ऑन ड्राईव्ह हा त्याच्या फलंदाजीचा खास अलंकार होता. तो चेंडू वेगात सीमापार गेला होता; पण आमचं मन त्याआधीच सीमापार जाऊन त्या चेंडूची वाट पाहत होतं. कारण, त्यानंतर दिलीप आणि शतक यांमध्ये फक्त एकाच धावेचं अंतर होतं. हे अंतर त्यानं चेंडू ढकलून विजेच्या वेगानं पार केलं. त्या संध्याकाळचे दिलीपचे शब्द आजही आठवत आहेत : ‘‘लॉर्डस्’ची खेळपट्टी उचलून घरी घेऊन जावीशी वाटते.’’

पुढचं ‘लीड्स’वरचं शतक तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासातल्या महान शतकांपैकी एक आहे असं मी मानतो. लक्षात घ्या, मॅच तीन दिवस आणि एका ओव्हरमध्ये संपली. खेळपट्टी अशी होती की इंग्लंडच्या पहिल्या डावात पाच बळी घेणाऱ्या बिन्नीला जेव्हा मी विचारलं की, ‘तू नेमकं काय केलंस?’ तेव्हा तो म्हणाला होता, ‘मी एकच केलं की, मी चेंडू ऑफ स्टम्पच्या आसपास टप्प्यावर टाकण्याचा प्रयत्न केला. उरलेली सर्व जादू ही खेळपट्टीची होती.’

दुसऱ्या दिवशी १७ विकेट्स पडल्या होत्या त्या मॅचमध्ये आणि सुनील गावसकर संध्याकाळी मला म्हणाला होता की, ‘११४ कसोटींच्या आजपर्यंतच्या माझ्या कारकीर्दीत पहिल्या दोन दिवसांत बॅटिंग संपण्याचा प्रसंग कधी आला नव्हता. तो आज आला.’ या खेळपट्टीवर दिलीपनं पहिल्या डावात ६१ आणि दुसऱ्या डावात नाबाद १०२ धावा केल्या.

इतर खेळाडू हे ‘लीड्स’च्या त्या सीम स्विंगला आंदण दिलेल्या खेळपट्टीवर बॅटिंग करत होते आणि दिलीप लंडनच्या हिथ्रोवरच्या धावपट्टीवर खेळत होता असं वाटत होतं. त्याच्या शतकानं प्रचंड खूश झालेला यॉर्कशॉयरचा खडूस सर लेन हटन त्या दिवशी संध्याकाळी मला म्हणाला की, ‘विजय मर्चंट, सुनील गावसकर यांच्या फलंदाजीबद्दल मला जेवढा आदर वाटतो, तेवढाच दिलीप वेंगसरकरबद्दल वाटतो.’

दिलीपच्या स्टान्सचा फोटो ‘लॉर्डस्’ला ‘आदर्श स्टान्स’ म्हणून भिंतीवर लावलेला आहे. मुंबई किंवा वेस्ट झोनविरुद्ध जेव्हा जेव्हा कपिलदेव खेळलाय तेव्हा तेव्हा त्याला सर्वात जास्त समाधान हे दिलीपची विकेट काढल्यावरच मिळालंय. वेग, स्पिन, स्विम असो किंवा भिंगरी खेळपट्टी असो, दिलीपच्या बॅटनं वर्चस्व गाजवलेलं आहे. त्याचं ते बेदी, प्रसन्न आणि चंद्रशेखरला फेकून देऊन इराणी ट्रॉफीत केलेलं शतक तर सर्वांनाच आठवतंय. सुधीर नाईक मला म्हणाला होता, ‘त्यानं लाँग ऑन आणि लाँग ऑफला असे षटकार मारलेत जे पूर्वी त्या तिघांना कुणीही मारले नव्हते.’

१९८७ मध्ये त्यानं १६६ ची खेळी श्रीलंकेविरुद्ध कटकला केली होती. ती खेळपट्टीला ‘आखाडा’ होती. त्या खेळपट्टीवर दिलीपनं १६६ धावा केल्या. सुनील गावसकरनं जी शेवटची खेळी पाकिस्तानविरुद्ध केली त्या खेळीचं नेहमीच कौतुक होतं. सचिन तेंडुलकरनं पाकिस्तानविरुद्ध चेन्नईला केलेली खेळी ही, फिरकी गोलंदाजी कशी खेळावी, याचं प्रात्यक्षिक होतं. दिलीपची ती १६६ ची खेळीसुद्धा या खेळींच्या मांडीला मांडी लावून बसणारी होती. मात्र, दिलीपला जो प्रकाशझोत मिळायला हवा तो कधीच मिळाला नाही, हे दुर्दैव. मात्र, मी एक नक्की सांगेन की १९८६ चं भारताचं यश हे दिलीप वेंगसरकरचं यश होतं. तो नुसता ‘लॉर्ड ऑफ लॉर्डस्’ नव्हता तो ‘लॉर्ड ऑफ इंग्लड’ होता.

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com