esakal | रणजी... आयपीएलची दासी!

बोलून बातमी शोधा

Ranji-Trophy}

खेलंदाजी
यावर्षी रणजी ट्रॉफी रद्द झाली. आयपीएलच्या युगात रणजीसाठी ज्यांचे डोळे पाणावले, त्यांत मी एक होतो. मी स्वतःला एक प्रश्न विचारला. ‘रणजीचं ऐतिहासिक महत्त्व संपलं का? ‘त्या ट्रॉफीची जागा आता म्युझियममध्ये आहे का?’ आम्हा मुंबईकरांसाठी, रणजी ट्रॉफी ही क्रिकेटची अस्मिता होती एके काळी.

रणजी... आयपीएलची दासी!
sakal_logo
By
द्वारकानाथ संझगिरी dsanzgiri@hotmail.com

यावर्षी रणजी ट्रॉफी रद्द झाली. आयपीएलच्या युगात रणजीसाठी ज्यांचे डोळे पाणावले, त्यांत मी एक होतो. मी स्वतःला एक प्रश्न विचारला. ‘रणजीचं ऐतिहासिक महत्त्व संपलं का? ‘त्या ट्रॉफीची जागा आता म्युझियममध्ये आहे का?’ आम्हा मुंबईकरांसाठी, रणजी ट्रॉफी ही क्रिकेटची अस्मिता होती एके काळी. सन १९९१ मध्ये मुंबई ही हरियानाविरुद्ध एका धावेनं हरली. खेळपट्टीवर दिलीप वेंगसरकर तर रडला; पण आमच्या प्रेस बॉक्सजवळ बसलेले माजी क्रिकेटपटू वगैरेंचेही डोळे ओलावले होते.

भारतीय क्रिकेट नावाच्या सम्राटाची रणजी ट्रॉफी ही पट्टराणी होती. कसोटीकडे रस्ता तिथून जायचा. मग सम्राटाच्या ताफ्यात दुलीप ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफी आली; पण रणजीचं महत्त्व कमी झालं नाही. पॉली उम्रीगर, विजय मांजरेकर यांच्यापासून ते संजय मांजरेकर, सचिन, द्रविड, गांगुलीपर्यंतचे खेळाडू याच राजरस्त्यावरून कसोटीत गेले.

वन डे क्रिकेट वाढलं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जाणारे इतर रस्ते तयार झाले. १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय सामने आणि भारतीय ए टीमचे दौरेही. आर. पी. सिंग, युवराज, विराटपासून ते आत्ताच्या, शुभमन गिलपर्यंतच्या खेळाडूंना या रस्त्यानं मदत केली. नंतर आयपीएल नावाची प्रेयसी, सम्राटाच्या ताफ्यात आली, पट्टराणी झाली आणि रणजीची अवस्था दासीची झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अर्थात्‌ त्याआधीच, रणजीचं महत्त्व कमी होत गेलं होतं. पूर्वी रणजीमध्ये देशातले सर्वोत्तम खेळाडू खेळत, त्यामुळे नव्या खेळाडूनं काढलेल्या धावा किंवा विकेट्‌सला किंमत होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट वाढल्यावर, सर्वोत्तम खेळाडूंना रणजी खेळायला वेळ मिळायचा नाही. पुढं वेळ मिळाला तरी ‘विश्रांती’ या सबबीखाली रणजी टाळली जाई. 

जेव्हा सर्वोत्तम खेळाडू खेळतात तेव्हा नवीन होतकरू खेळाडूंनाही, त्यांच्या खांद्याला खांदा लावून खेळता येतं. त्यातून मिळणारा अनुभव अनमोल असतो. मग ही सौंदर्यवती आली. तिनं ग्लॅमर आणलं. पैसा आणला. आंतरराष्ट्रीय खेळाडू आणले. जगातले उत्तम प्रशिक्षक आले. ज्ञान आणि अनुभव, आयपीएलच्या दिवसांत, पूर आलेल्या गंगेसारखे वाहायला लागले. त्यानंतर रणजी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे जाणारी गल्ली झाली, पुढं हमरस्त्याला मिळणारी, आणि आयपीएल ‘ऑक्सफर्ड स्ट्रीट’! 

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

रणजीमध्ये केलेल्या २०० धावा किंवा १० बळी, आयपीएलमधल्या तीन-चार चांगल्या खेळी किंवा स्पेल्सपुढं फिक्या पडायला लागल्या. आयपीएल खेळाडूंच्या हातावरच्या रेषा बदलायला लागल्या. वॉशिंग्टन सुंदर दोन वर्षं रणजीच्या संघात नव्हता; पण त्यानं कसोटी सामने खेळले. नटराजन रणजीमध्ये किती बळी घेतो कुणाला माहीत नाही; पण आयपीएलमधल्या त्याच्या यॉर्कर्सवर खूप बोललं गेलं. सूर्या यादव आयपीएलमध्ये धावा करून गेला आणि त्याचा सूर्योदय झाला. 
पूर्वी खेळाडू त्याच्या रणजी संघानं ओळखला जायचा. आता आयपीएलच्या मालकाच्या कुंकवानं ओळखला जातो. ही भारतीय क्रिकेटसम्राटाची पट्टराणी पाहून जगाचे डोळे दिपले. जगानं आयपीएलसारखी सौंदर्यवती शोधण्याचा प्रयत्न केला; पण मधुबाला एकदाच जन्माला येते. आम्ही जुन्या मंडळींनी सुरुवातीला नाकं मुरडली. वन डे आणि विशेषतः कसोटीक्रिकेट संपलं, अशी खूणगाठ बांधली.

चार षटकं टाकून चांगला गोलंदाज कसा तयार होणार? आणि कसोटी फलंदाज तर अशक्य! पण लक्षात आलं की वनडेत काही फरक पडला नाही. आपण चांगल्यापैकी जिंकत गेलो. कसोटीवर नक्की परिणाम होईल अस वाटलं; पण सध्या तर बरं चाललंय. चार षटकांच्या आयपीएलमधून बुमराह चक्क आपला कसोटीतला हुकमी एक्का झाला. आश्विनचं रणजी-रेकॉर्ड चांगलं आहे; पण त्यानं शिडी वापरली आयपीएलची. गेल्या पाच-सहा वर्षांत कसोटीत आलेले आयपीएलच्या ‘ऑक्सफर्ड स्ट्रीट’वरूनच आले.

थिअरी चुकली का?
नाही...पण चांगला खेळाडू, फॉरमॅटबरोबर जुळवून घेतो, जे सचिननं केलं. विराटनं केलं. ए. बी. डीव्हिलियर्स हे त्याचं उत्तम उदाहरण. गोलंदाजांनी नवे चेंडू शोधले ते कसोटीत उपयोगी पडले. 

आयपीएलमधली फलंदाजी म्हणजे ‘बनी तो बनी, नही तो अब्दुल गनी...’ पण चांगला फलंदाज चांगलं मूलभूत तंत्र घेऊन आला तर आयपीएलवृत्तीला थोडं बाजूला ठेवून फलंदाजी विकसित करू शकतो. आयपीएलच्या तरणतलावामध्ये पोहणारा पंत हा कसोटीच्या समुद्रात यशस्वी होईल अस फक्त देवाला आणि रवी शास्त्रीला वाटत होतं; पण कसोटीत त्याची फटक्यांची निवड अधिकाधिक चांगली होत गेली आणि तो यशस्वी होताना दिसतोय, त्यामुळे यापुढे कसोटीचा बाजारसुद्धा ‘ऑक्सफर्ड स्ट्रीट’वर भरणार. 

माझी पिढी आणि आयपीएलकडं कसं पाहते? मेरेलिन मन्रोचा सिनेमा पाहत होतो तसं. कसोटी सामना आमच्यासाठी मीनाकुमारी किंवा नूतन वगैरेचा असतो.
आम्ही काही गमावलं का? क्लासिकल फलंदाजी करणारे सुनील, सचिन, द्रविड यांसारखे फलंदाज आणि प्रसन्ना, बेदी, सुभाष गुप्ते, शिवलकर यांसारखे गोलंदाज. परवा पहिल्या कसोटीत रूटची क्लासिकल फलंदाजी पाहून केवढा तृप्त झालो! पण आता ही दृश्ये कमी कमी होत जाणार.

पण हा परिणाम केवळ भारतावरच नव्हे, तर अवघ्या जगावरच आहे. आपण काही गमावतोय, काही नवं पाहतोय.
मग रणजी ट्रॉफीचं काय? कुणी तरी तिला तरुण करायला हवं. (रणजीमध्ये पैसा नाही असं नाही. खेळाडूला दिवसाला पस्तीस हजार मिळतात. मॅच लवकर संपली तर पुढच्या दिवसाचे पैसेही मिळतात. पूर्वी ‘मॅच लवकर संपली तर पैसे नाही,’ असा प्रकार होता.) 

पण रणजी राहणार. कारण, ती भारताच्या तळागाळात गेलीय. सर्वाधिक खेळाडू तिथे खेळतात. पण ती आयपीएलची दासीच राहणार.
(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil