esakal | ऑफ स्पिनचा ‘आश्विन’ महिना!
sakal

बोलून बातमी शोधा

ravichandran-ashwin

खेलंदाजी
आश्विन या नावाचा अर्थ आहे घोडेस्वार.
रविचंद्रन आश्विन सध्या पांढऱ्या घोड्यावर स्वार झालाय.
क्रिकेटच्या मैदानावर तो सूर्यासारखा चमकतोय आणि आपल्याला आनंदाचं चांदणं दाखवतोय!

ऑफ स्पिनचा ‘आश्विन’ महिना!

sakal_logo
By
द्वारकानाथ संझगिरी dsanzgiri@hotmail.com

आश्विन या नावाचा अर्थ आहे घोडेस्वार.
रविचंद्रन आश्विन सध्या पांढऱ्या घोड्यावर स्वार झालाय.
क्रिकेटच्या मैदानावर तो सूर्यासारखा चमकतोय आणि आपल्याला आनंदाचं चांदणं दाखवतोय!
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापासून एक वेगळा आश्विन पाहायला मिळतोय. एक गोलंदाज आश्विन, ज्यानं ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर अप्रतिम गोलंदाजी केली. ‘परदेशात तो यशस्वी होत नाही,’ हा डाग त्यानं परफॉर्मन्सच्या डिटर्जंटनं पुसट केला. स्टीव स्मिथला किंवा लाबुशेनला लावलेले लेगचे सापळे इतके सुंदर होते, की निष्णात शिकारी त्याच्याकडून, सापळा कसा लावायचा, ते शिकला असता.

ऑस्ट्रेलियात त्याच्यातला फलंदाज पुन्हा उभा राहिला. त्यानं हनुमंता विहारीबरोबर अशक्यतेच्या सीमारेषेवरून सामना वाचवला. इंग्लंड विरुद्ध चेन्नईच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात चेंडू भ्रमिष्टासारखा वागत होता; पण आश्विन खेळताना खेळपट्टी संगमरवरी वाटली. सध्या भारतीय क्रिकेट आश्विन महिन्यात आहे आणि आश्विन दिवाळी साजरी करतोय!
(सध्या त्याची फलंदाजी मी बाजूला ठेवतोय)

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय क्रिकेटमधली ऑफ स्पिनची परंपरा आश्विन एका वेगळ्या स्तरावर घेऊन चाललाय त्याबद्दल मला बोलायचंय. मी गुलाम अहमदला पाहिलं नाही; पण पुढं येरापल्ली प्रसन्ना, वेंकट राघवन, हरभजन, आश्विन या सगळ्यांना डोळे भरून पाहिलंय. ‘यातला सर्वोत्कृष्ट कोण,’ म्हटल्यावर प्रत्येकजण आपल्या पिढीतल्या खेळाडूचं नाव घेतो; पण प्रत्येक पिढीची आव्हानं वेगळी होती.

प्रसन्ना-वेंकटच्या वेळी वन डे क्रिकेट नव्हतं. त्यामुळे त्यांच्यावर वेगळे  संस्कार झाले. प्रसन्ना हा आदर्श ऑफ स्पिनर होता. एखाद्या एकलव्यानं मला विचारलं ‘कुणाला मी द्रोणाचार्य करू?’ तर मी प्रसन्नाचं नाव घेईन. चेंडूला दिलेली फसवी उंची, डीप होणारा चेंडू, मोठा टर्न, अप्रतिम फ्लोटर वगैरे अलंकार त्याच्याकडे होते. आणि बुद्धी इंजिनिअरची! मला एकनाथ सोलकर नेहमी सांगायचा : ‘प्रसन्ना चेंडू सोडायचा तेव्हा फर्‌ असा आवाज यायचा, इतका तो चेंडूला स्पिन द्यायचा. त्याला बॅट-पॅड झेलाचे बळी मिळत; पण फ्लाईटवर फसलेले कॅच देणारे, स्टंप होणारे फलंदाज पाहायला मिळतं. काही वेळा कव्हर ड्राईव्ह करताना बॅट-पॅडमधून चेंडू जाऊन बोल्ड झालेले फलंदाज दिसत.

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

वेंकट वेगळा ऑफ स्पिनर होता. हवेतून चेंडू वेगात यायचा. त्याचा सरळ वेगात येणारा चेंडू खतरनाक असायचा. दोघांनी परदेशात चांगले परफॉर्मन्स दिले; पण दुर्दैवानं त्या वेळी आपली फलंदाजी कमकुवत होती. भारतानं २०० केले की समोरच्याला १५० मध्ये खोलावं लागे. सुनील गावसकर आल्यावर आपली  परिस्थिती सुधारली. एकच गोष्ट चांगली होती व ती म्हणजे वेंकट, सोलकर, वाडेकर, आबिद यांच्यासारखे क्षेत्ररक्षक होते.

हरभजन आला तेव्हा तो १८ वर्षांचा होता. तो मग ‘दुसरा’ शिकला. एकदा हरभजन सांगत होता : ‘मला सकलेन करतो ते करावंसं वाटलं. मी सुरुवातीला आऊट स्विंगसारखा चेंडू टाकायचो. सकलेन क्रॉस सीम टाकायचा. तो वेगात जायचा, माझ्या आऊट स्विंगपेक्षा. मी त्याला पाहून ‘दुसरा’ शिकलो.’ पण त्यामुळे त्याच्या ॲक्शनबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. तो एकदा मदत मागायला प्रसन्नाकडे गेला.  प्रसन्नानं त्याला विचारलं : ‘किती पैसे देणार?’

त्यानंतर त्यानं गरज पडली तेव्हा कुंबळे, शेन वॉर्न, मुरली यांचा दरवाजा ठोठावला आणि तो पैशाशिवाय उघडला गेला. सन २००१ ची ऑस्ट्रेलियाविरुद्धची ऐतिहासिक मालिका त्यानं ३२ बळी घेऊन जिंकून दिली. पुढं तो भारतात यशस्वी होत राहिला; पण भारताबाहेर यश कमी मिळालं. त्याची ती फसवी फ्लाईट, लूप, कमी झालं. चेंडूची दिशा जास्त बचावात्मक झाली. त्यामुळे परदेशात विकेट्स मिळणं थोड कठीण गेलं. 

एक पिढी दुसऱ्या पिढीला स्फूर्ती देते. हरभजननं अनवधानानं आश्विन तयार केला. तो आघाडीचा फलंदाज होता. हरभजनला पाहून त्याला ऑफ स्पिनर व्हावंसं वाटलं. त्याच्यातला फलंदाज अजून किती जागरूक आहे ते तो अलीकडे जास्तच दाखवत असतो.

तो वन डे आणि टी-२०च्या युगातला. त्याची छाया त्याच्या गोलंदाजीवर आहे. टी-२० मुळे तो नवा चेंडू वापरायला शिकला. तो म्हणतो : ‘मी ‘दुसरा’च्या भानगडीत पडलो नाही. कारण, तो टाकताना हात वाकवावाच लागतो आणि थ्रोच्या व्याख्येत तुम्ही अडकून जायची शक्यता असते.’

पण मग त्यानं इतर आयुधं शोधली. कॅरमबॉल आत्मसात केला. आता तर तो चेंडूच्या शिवणीशी खेळ करतो. त्याच्या वेगात वैविध्य असतं. दिशा त्याची जास्त आक्रमक आहे आणि कुठल्या फलंदाजाची विकेट कुठं घ्यायची याची आखणी पक्की असते. तो आयटी इंजिनिअर आहे आणि इंजिनिअरची बुद्धिमत्ता आणि विश्र्लेषणात्मक मन त्याच्या गोलंदाजीत दिसतं. त्याचं देशातलं यश विक्रमी आहे; पण परदेशात तो सामने जिंकून देत नव्हता. सन २०१८ मध्ये सौदम्प्टनला जो सामना त्यानं भारताला जिंकून द्यायचा तो मोईन अलीनं इंग्लंडला जिंकून दिला. भयंकर राग आला होता मला; पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात बदल दिसला. फलंदाजाप्रमाणे गोलंदाजानंसुद्धा सर्वत्र यश मिळवणं गरजेचं असतं. असो. एक गोष्ट सांगावीशी वाटते.

ऑफ स्पिनरसमोर डावरा फलंदाज आला की त्याचे हात शिवशिवतात; पण वाडेकर आला की प्रसन्ना तंबूत जायचा. इतका त्याचा धसका प्रसन्नानं घेतला होता.

हरभजन म्हणतो : ‘त्याला सर्वात त्रासदायक फलंदाज लारा, फ्लॉवर आणि हेडन हे वाटले. सर्वच डावरे; पण आश्विननं २०० पेक्षा जास्त बळी डावऱ्या फलंदाजांचे घेतले आहेत. अगदी मुरलीधरनचे २३ टक्के बळी डावरे आहेत.
आश्विननं वाडेकर, सॉबर्स, लॉईड, लारा हेडन यांना कशी गोलंदाजी टाकली असती ते पाहायला मला आवडलं असतं. त्याच्या काळात वरच्या दर्जाचे डावरे फलंदाज चटकन आठवणारे म्हणजे संगकारा, वॉर्नर, गेल, कूक वगैरे. वॉर्नरला त्यानं कसोटीत नऊवेळा बाद केलंय. सन २०१५ मध्ये त्यानं श्रीलंकेत संगकाराला चार वेळा बाद केलं. टी-२० तून कसोटीसाठी दर्जेदार फिरकी गोलंदाज तयार होऊ शकतो हे त्यानं दाखवून दिलं. तो प्रसन्नासारखा क्लासिकल नसेल; पण प्रत्येकानं गावसकर, बेदी, प्रसन्ना यांच्यासारखं क्लासिकल असावं अस कुठाय? 
(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil