लाड सरांची मुलं

दिनेश लाड सरांच्या दोन मुलांनी लंडन गाजवलं. एकानं नयनरम्य शतक ठोकलं. दुसऱ्यानं दोन अर्धशतकं दोन डावात ठोकली आणि निपचित पडलेल्या भारतीय फलंदाजीला उठून उभं केलं.
Shardul Thakur and Rohit Sharma
Shardul Thakur and Rohit SharmaSakal

दिनेश लाड सरांच्या दोन मुलांनी लंडन गाजवलं. एकानं नयनरम्य शतक ठोकलं. दुसऱ्यानं दोन अर्धशतकं दोन डावात ठोकली आणि निपचित पडलेल्या भारतीय फलंदाजीला उठून उभं केलं. वाटेवर, बिफी बोथमचा वेगवान अर्धशतकाचा विक्रम मोडला. लाड सरांनी त्याला विचारलं, ‘‘कसा बाद झालास’’ तो म्हणाला, ‘‘फटका मारावा की नाही ह्या द्विधा मनस्थितीत होतो.’’ सर म्हणाले, ‘‘पुढच्या डावात शतक ठोक.’’ त्याने शतक ठोकलं नाही. अर्धशतक ठोकलं. पण असं ठोकलं की वरच्या फळीतल्या फलंदाजांनी ते मिरवलं असतं.

मी रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर बद्दल बोलतोय. त्यांच्या ओव्हलवरच्या पराक्रमाबद्दल. त्यांचा परफॉर्मन्स पाहून, लंडनच्या क्राऊन ज्वेलस् म्युझियमला हे हिरे ठेऊन घ्यावेसे वाटले असतील. पण ते शोधले आणि त्याला पैलू पाडले लाड सरांनी.

दिनेश लाड, हे आचरेकर सरांचे शिष्य. मोठं क्रिकेट नाही खेळले, पण नजर जोहरीची, आणि मुलांवर प्रेम थेट आचरेकर सरांसारखं. त्यांनी, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, आपली क्रिकेटची शाळा बनवली. १९९९ मध्ये त्यांनी बारा वर्षाच्या, रोहितला एका सामन्यात ऑफ स्पिन टाकताना पहिलं. त्यांना मुलगा आवडला. त्यावेळी रोहित काकांकडे बोरिवलीत रहायचा. आणि त्याचे आई वडील, डोंबिवलीला रहात. लाड सरांनी रोहितच्या काकांना सांगितलं, ‘‘ ह्याला विवेकानंद स्कूल मध्ये घाला.’’ काकांनी विचारलं, ‘‘ तिथे फी किती?’’ लाड म्हणाले, ‘‘ महिना २७५ रुपये’’ काका म्हणाले, ‘‘बापरे! जमणार नाही. आता त्याची फी ३० रुपये आहे." पुढे त्यांनी सांगितलं ते धक्कादायक होतं.

ते म्हणाले, ‘त्याला क्रिकेटच्या एका कोचिंगसाठी ८०० हवे होते. आम्ही सहा भावांनी प्रत्येकी ५० रुपये काढले, वरचे, इतरांकडून कर्जाऊ घेतले आणि कोचिंगला टाकलं. कुठून आणणार महिना २७५ रुपये?’’

दिनेश लाड यांनी त्याला शाळेकडून फी माफ करून दिली. सुरवातीला त्याच्याकडे गोलंदाज म्हणून पाहिलं गेलं. एकदा सरांनी त्याला बॅटने नॉक घेताना पाहिलं आणि ते चमकले. त्याची ती सरळ बॅट, ते टायमिंग, पाहून त्यांना कळलं या मुलामध्ये चांगला फलंदाज लपला आहे. त्यानंतर नेटमध्ये रोहित पहिल्यांदा फलंदाजी करायला लागला. मग रोहितला त्यांनी स्वतःच्या इमारतीत जागा घ्यायला मदत केली. कोचमध्ये एक चांगला बाप असावा लागतो. आचरेकर सरांप्रमाणे तो लाडांमध्ये आहे.

मग रोहित एक एक पायऱ्या चढत गेला. रणजी, मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट, आयपीएल वगैरे. आयपीएलने त्याचं राहणीमान बदललं. तो बोरिवलीतून थेट पॉश हिल रोडला गेला. काही काळ त्या राहणीमानात वाहवला. पुन्हा लाडांमधला बाप जागा झाला. त्याने कान टोचले. आणि मग रोहितची आंतरराष्ट्रीय कारकीर्द बहरायला लागली. त्याच्या फलंदाजीच्या सौंदर्याने जग घायाळ झालं. पांढऱ्या चेंडूच्या खेळाचा तो सम्राट झाला. कसोटीत त्याने देशात, अफाट यश मिळवलं. पण परदेशी कसोटीत यश त्याच्याशी फटकून वागत होतं. लाल चेंडुशी सामना करण्यासाठी लागणार तंत्र, थोड मजबूत करायची गरज होती. पेशन्स, त्याच्याकडे कमी होत.

पण ह्या इंग्लंडच्या दौऱ्यावर त्याने स्विंग, सीमशी, चांगला सामना केला. ढगाळ वातावरणात, अँडरसन, रॉबिन्सन, वोक्सनी त्याला अवघड प्रश्न विचारले. त्याला उत्तर सापडत गेली. कधी सेट झाल्यावर उत्तर चुकत होत. शेवटी ओव्हलवर त्याने शतक झळकावलं. त्याचा पेशन्स पाहून एखादे संतही थक्क झाले असते. सुरवातीला असं वाटलं की त्याला बचाव आणि आक्रमण याचा सुवर्णमध्य सापडत नाही. ओव्हल कसोटीत शतक ठोकताना त्याने तो गाठला. लाल चेंडू खेळताना त्याने सातत्य दाखवलं तर तो सहज अगदी सहज, जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज होईल. कारण त्याच टायमिंग कुणाकडेही नाही.

शार्दूल पालघर मधला. त्याचे वडील शिक्षक आणि त्यांचा तिथे मळा होता. तिथल्या शाळेच्या मॅटिंग विकेटवर तो खेळायचा. म्हणून त्याचे पुल , स्क्वेअर कट मस्त. लाड सरांनी त्याला पेप्सी कपमध्ये पाहिला. त्याच्या वडिलांना सांगितलं " आमच्या शाळेत घाला." वडील म्हणाले, " अशक्य. पालघरहून बोरिवलीला यायचं म्हणजे, रोजचे सहा तास ट्रेनमध्ये. त्यात तो दहावीत जाणार होता. अभ्यास तितकाच महत्त्वाचा." सरांनी वीसपेक्षा जास्त फोन केले. प्रत्येक फोनला वडलांच उत्तर " नाही". शेवटी लाड सरांनी सांगितलं, " तुमचा मुलगा माझ्याकडे मुलासारखा रहील. मी अभ्यासावर लक्ष ठेवेंन." शार्दूलचे वडील मग तयार झाले. त्याने मग शालेय क्रिकेट गाजवायला सुरवात केली. हॅरिस शील्डमध्ये त्याने एका षटकात सहा षटकार ठोकले. तरीही लाडांच म्हणणं, " मला त्याच्यातला गोलंदाज अधिक भावला. फलंदाजी करताना तो फटके मारायचा, पण ती परिपूर्ण नव्हती. तो फटके मारताना वहावत जायचा. मुख्य म्हणजे तो गोलंदाजी वेगात टाकायचा."

त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही.पण संधीचे दरवाजे फटाफट उघडले नाहीत. रणजीत प्रवेश थोडा उशिराने झाला. आयपीएल मध्ये सुरवातीला प्रत्यक्ष मॅचमध्ये संधी कमी मिळाली. सरांनी बीकेसी वर नेट लावून त्याच्याकडून फलंदाजीचा सराव करून घेतला. तो चेन्नई सुपरकिंग्जमध्ये मग स्थिरावला. पण रुसलेलं नशीब, आणि रुसलेली बायको कधीतरी हसते. नशीब अचानक हसायला लागलं. तो गेल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर नेट बॉलर म्हणून गेला आणि अनपेक्षितरित्या थेट कसोटीचा दरवाजा पुन्हा उघडला. त्या आधी २०१८ मध्ये कसोटीचा दरवाजा त्याच्यासाठी उघडला होता, वेस्ट इंडीज विरूध्द. पण त्या आठवणी कटू होत्या. जेमतेम दहा चेंडू टाकल्यावर त्याला दुखापत झाली.

ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेन कसोटीत, मोठमोठे वेगवान गोलंदाज जायबंदी झाले. उदा. सामी, बुमराह, वगैरे आणि संधीने त्याच्या दरवाजावर थाप मारली. ती संधी त्याने सोडली नाही. शार्दूल म्हणजे सिंह. त्याच्याकडे मैदानावर सिंहाची तडफ, आत्मविश्वास, आणि आक्रमकता दिसते. ब्रिस्बेन कसोटीत त्याने पहिल्या डावात ३ बळी घेतले.

मग नेहमी प्रमाणे भारतीय फलंदाजी अडचणीत सापडली. अवस्था होती ६ बाद १८६.आणि समोर स्टार्क, कमिन्स, हॅजलवूड.ह्याने ११५ चेंडूत ६७ धावा केल्या. तिथून तो भारतीय संघासाठी प्राणवायु बनला. इतर फलंदाजांना श्वास घ्यायला त्रास झाला की तो फलंदाजीला प्राणवायू देतो. ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने चार विकेटस् काढल्या. वडील म्हणाले, " पांच विकेट्स का नाही काढल्यास"?. तो म्हणाला ," प्रयत्न करतो "

त्याने दुसऱ्या डावात चार बळी घेतले. तो वडलांना काय म्हणाला असेल ? सिराजने तेंव्हा पांच विकेटस् काढल्या होत्या. तो वडलांना म्हणाला," त्याचे वडील त्याला सोडून गेले आहेत. मला बरं वाटलं त्याला पांच विकेट्स मिळाल्या.’’ सानेगुरुजी खुश झाले असते अशी भावना पाहून. आता लंडनमध्ये त्याने दाखवलं, नरशार्दूलला आव्हान द्यायचा प्रयत्न केला की तो पोट फाडतो. गोलंदाजीच्या बाबतीत, तो काहीवेळा थोडा महागडा ठरतो. पण विकेट्स काढायची कुवत त्याच्याकडे आहे. ओवलवर काय जोड्या फोडल्या त्याने! वकील झाला असता तर घटस्फोट एक्स्पर्ट असता. त्याचा सोन्याचा हात आहे. मात्र टप्पा आणि दिशेवर अजून हुकूमत यायला हवी. जाफरने म्हटलं होत, " शार्दुल ने जर फलंदाजी गंभीरपणे घेतली तर तो चांगला फलंदाज होऊ शकतो". त्याचे ते सरळ ड्राईव्ह, पुल , फ्लिक, अंगावर रोमांच उठवणारे होते. त्याच्यातला फलंदाज दृष्ट लागावी इतका उठून दिसला. पण लागू नये त्याला दृष्ट. तो चांगला अष्टपैलू खेळाडू होऊ शकतो. पण आत्ताचं तुलना कपिल किंवा बोथम बरोबर नको. पंड्या बरोबर तर अजिबात नको. No failure but low aim is crime. दिल्ली दूर आहे, प्रवास आत्ता सुरू झालाय. नुकतंच पालघर स्टेशन गेलय. गाडी दिल्लीला पोहचेल तेंव्हा भारताला एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू मिळाला असेल. ऐकलंत? नियती तथास्तु म्हणाली.

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार व साहित्यिक आहेत )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com