बस इच्छाशक्ती हवी !

नीरज चोप्राने आपलं सुवर्ण पदक मिल्खासिंगला अर्पण केलं. तो फ्लाईंग शिख आज हयात असता तर ते पदक अधिक पिवळं झालं असतं.
Neeraj Chopra and Milkha Singh
Neeraj Chopra and Milkha SinghSakal

नीरज चोप्राने आपलं सुवर्ण पदक मिल्खासिंगला अर्पण केलं. तो फ्लाईंग शिख आज हयात असता तर ते पदक अधिक पिवळं झालं असतं. अगदी योग्य देवतेला त्याने सुवर्णफुल चढवलं. १९५२ मध्ये लष्करी कवायतीला कंटाळून मिल्खासिंग यांनं धावपटू होण स्वीकारलं. एकदा त्याच्या प्रशिक्षकांनी सांगितलं ‘‘उद्या तुला ४०० मीटर्स शर्यतीत भाग घ्यायचा आहे.’’ त्याला काही कळलं नाही. प्रशिक्षक त्याला म्हणाला, ‘‘तुला मैदानाला एक फेरी मारायची आहे.’’

त्याने शर्यत ६३ सेकंदात जिंकली.

१९५६ मध्ये तो ऑलिंपिकला गेला. तिथे इतरांचा दर्जा पाहून तो अवाक् झाला. त्याने ४०० मीटर्स मध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱ्या अमेरिकेच्या चार्ल्स जेंकिन्सला गाठलं. त्याला मिल्खासिंगने सल्ला विचारला. त्याने आपला ट्रेनिंग प्रोग्राम देऊन टाकला. भारतात परतल्यावर एकलव्याच्या निष्ठेने त्याने सराव केला.

१९६० मध्ये रोम ऑलिंपिकमध्ये त्याने ४०० मीटर्स ४५.९ सेकंदात पूर्ण केले ऑलिंपिक रेकॉर्ड मोडला. पण त्याचं कास्य पदक एक दशांश सेकंदाने गेलं. कारण जग आणखीन पुढे गेलं होतं. तो त्यावेळी अमेरिका किंवा युरोपात असता तर सुवर्ण पदक विजेता झाला असता.

तेंव्हा देश स्वतंत्र होऊन काहीच वर्ष झाली होती. इंग्रजांनी लुटलेल्या देशापुढे इतर प्रश्न होते. मग १९६१ मध्ये पटियाळला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स ची स्थापना झाली. १९८२ मध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अस्तित्वात आलं. जग पुढे जात राहिलं. भारतही पुढे गेला. पण जग आणि भारत ह्यातलं अंतर कमी होत गेलं नाही. उलट वाढलं. आज आपण ७ पदकं जिंकली. आनंद उत्सव करतोय. त्यात चूक काही नाही.

इतिहास घडला, तर तो साजरा व्हायला हवा. पण शॅपेनची नशा उतरल्यावर गंभीरपणे काही गोष्टींचा विचार करायला हवा.

लंडन ऑलिम्पिकमध्ये २०१२ साली सहा पदकं ,२०२१ साली सात ही प्रगती आहे. त्यात एक सुवर्ण असल्यामुळे ती वलयांकित आहे. पण दोन पावलं आपण पुढे गेलो, जास्त नाही. वाटेत २०१६ ला रिओ ऑलिंम्पिक मध्ये चार पावलं मागे गेलो होतो. आपल्याला फक्त दोन पदकं मिळाली होती. त्यावेळी आपल्याला आपला आधीचा सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्राने जागं केलं होतं. त्याने इंग्लंडच् उदाहरण. दिलं होत. त्याने म्हटलं ‘‘इंग्लंडला प्रत्येक पदकासाठी ५.५ दशलक्ष पौंड खर्च होतो. असा खर्च केल्याशिवाय पदकं मिळत नाहीत’’

ही आकडेवारी तेंव्हा तिथल्या ‘गार्डियन’या वर्तमानपत्राने मांडली होती. त्या ऑलिंपिकमध्ये त्यांना ६७ पदकं मिळाली होती. आज त्यांना टोकियोमध्ये ६५ पदक मिळाली आहेत. त्यात २२ सुवर्ण आहेत. एका पदक विजेत्या मागे ५० कोटी.!

आपण तेव्हढे पैसे कधीच खर्च करत नाही. आपलं यावर्षीच बजेट २८ लाख कोटी रुपये आहे. त्यात खेळासाठी मिळाले २ हजार ८५२ कोटी. म्हणजे ०.१ टक्का झालं. त्यात कोरोनामुळं ते २ हजार ५३७ कोटी वर आणलं गेलं. यापूर्वीचा आढावा घेतला तर जाणवेल की सरकार कुठलंही असो ह्यापेक्षा जास्त पैसा खर्च केला गेला नाही. केंद्र सरकारबरोबर राज्य सरकार सुध्दा बजेट मध्ये तरतूद करते. पण ती सुद्धा ०.१ टक्क्या पेक्षा जास्त नसते. काही पुरस्कर्ते मदत करतात. पण तरीही इंग्लंडच्या तुलनेत हा खर्च काही नाही.

पण ह्यावेळी एक वेगळी गोष्ट झाली. ''टॉप'' म्हणजे ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम’ अंतर्गत, ज्यांच्याकडून पदकाच्या अपेक्षा आहेत त्यांच्यावर खर्च केला गेला. त्यांना परदेशी प्रशिक्षक देणं, देशाबाहेर प्रशिक्षणासाठी पाठवणं,

त्यांची महागडी आयुध, त्यांना विविध स्पर्धेत भाग घ्यायला पाठवणं वगैरे गोष्टी त्यातून झाल्या. त्याचा फायदा झालेला दिसतोय. विशेषतः चोप्राने सुवर्ण पदक मिळवलं. त्याच्यावर खर्च केलेले ४.५ कोटी. उपयुक्त ठरले. त्यामुळे असं वाटतं की आज मिल्खासिंग असता तर तो सुवर्ण पदक घेऊन आला असता. पण त्यांना ५० कोटीला सुवर्ण पदक पडतं, आपल्याला फक्त ५ कोटीला म्हणून कॉलर वर करून फिरण्यासारखं काही नाही. त्यांची २२ सुवर्ण आहेत. ती का आहेत हे समजून घेतलं पाहिजे. ब्रिटनकडे, १५ ते ३५ वयोगटात १.८ कोटी माणसं आहेत. आणि आपल्याकडे तब्बल ४० कोटी.! म्हणजे आपली खाण मोठी आहे. पण हिरे तिथे दगडाच्या रुपात पडून राहतात. एखादा स्वतःला पैलू पाडून वर येतो. मग त्याच्याकडे लक्ष जातं, मग त्याच्यावर खर्च होतो.आपण मॅट्रीकसाठी वर्गातल्या बोर्डात येऊ शकतील अशा मुलांना बाहेर काढतो. त्यांच्यावर मेहनत घेतो. तसं हे आहे.

ऑलिंपिकमध्ये पदक मिळवण्यासाठी सुरवात चौथीपासून व्हायला लागते. त्यासाठी गुणवत्तेचा शोध घ्यायची यंत्रणा लागते, इन्फ्रा स्ट्रक्चर लागतं. ते असेल तर एखादी राणी रामपाल कितीही गरीब असली तरी तिला दुधात पाणी घालून ते प्यावं लागणार नाही, किंवा तुटक्या हॉकी स्टिकने खेळावं लागणार नाही.मग मणिपूरच्या जंगलातल्या एखाद्या मिराबाईला ट्रक ड्रायव्हर ची मदत लागणार नाही. चिखलातून उगवलेल्या कमळांच्या गोष्टी ऐकायला चांगल्या असल्या तरी त्या देशाला ललामभुत नसतात.

दुसरं म्हणजे सर्व खेळांवर लक्ष केंद्रित करून पैसे खर्च करायची गरज नाही. ज्यात मेडल मिळू शकतात असे खेळ निवडले पाहिजेत. आणि हळू हळू ते खेळ वाढवत नेले पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवड ही विज्ञानावर आधारित हवी. ती करणारी माणसं तज्ञ हवी. नेमके मला काय म्हणायचं आहे त्यासाठी एक किस्सा सांगतो.

पन्नास पंचावन्न वर्षापूर्वी रुमानियात बेला करोली नावाचा कोच, जिम्नॅस्टिक्ससाठी मुली शोधायला गेला. एका शाळेतून सहा वर्षाच्या दोन मुली त्याने शोधल्या. पुढे त्यातली एक नादिया कमान्सी नावाचा चमत्कार झाली. दुसरी रुमानियातली प्रख्यात बॅले डान्सर झाली. नजर अशी पाहिजे.

दहा पंधरा वर्षापूर्वी इंग्लंडने ‘sporting giants’ या उपक्रमात शाळांमध्ये जाऊन गुणवत्ता शोधण्याचा प्रयत्न केला. खेळाडूंच्या आवडीपेक्षा, त्यांचं शरीर, त्यांची क्षमता, ह्यानुसार त्यांनी कुठला खेळ स्वीकारावा, आणि कोण पदक देऊ शकेल हे ठरवलं गेलं. एक उदाहरण देतो. तिथे एक हेलेन ग्लोवर नावाची मुलगी होती. तिची आवड होती, धावणं, टेनिस, पोहणं,आणि हॉकी. पण तिला रोईंग खेळ स्वीकारण्याची विनंती करण्यात आली. लोकशाही राष्ट्रात विनंती करतात, चीनमधे बळजबरी होऊ शकते. तिने लंडन ऑलिंम्पिक मध्ये रोविंगमध्ये सुवर्ण पदक मिळवलं. अशा किती तरी कथा मी न थकता सांगू शकतो. आणखीन एक ऐका. त्यावेळच्या पूर्व जर्मनीने डॉ मेडर यांना मॅरॅथॉन जिंकणारा खेळाडू शोधायला सांगितलं. दूर पल्ल्याच्या शर्यती धावणाऱ्या सर्व खेळाडूंच्या चाचण्या घेऊन त्यांनी माहिती कॉम्प्युटरमध्ये घातली. कॉम्प्युटरने त्यांना सिरपिंस्की ची निवड करून दिली. ही गोष्ट ७३ ची. त्याने ७६ च्या मॉट्रीयल ऑलिंपिकमध्ये मॅरॅथॉन मध्ये सुवर्ण पदक मिळवलं. आणि १९८० या वर्षींसुद्धा.

५० वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज विज्ञान किती पुढे गेलंय.! विज्ञानाला नवा श्रीकृष्ण मानून, ह्या विज्ञानाची गीता आपण वाचली पाहिजे. आणि एक गोष्ट करायला हवी. समाजात क्रीडा संस्कृती तयार व्हायला हवी. मुळात खेळ आनंदासाठी खेळायचा, फिटनेस साठी खेळायला हवा हे रुजायला हवं. मग स्पर्धा वगैरे. मुलांची निवड करायची तर निदान त्यांना खेळायची गोडी तरी हवी.

शाळेला मैदान हवीत. शहरात मैदान वाढली पाहिजेत. मोठ्या शहरात जागा गार्डन्स साठी राखीव ठेवतात आणि मग हळूच बिल्डरच्या ती घशात जाते. आणि मग खेळ करीअर म्हणून स्वीकारणाऱ्या खेळाडूंचया भविष्याची तरतूद किमान नोकरीच्या रूपाने व्हायला हवी. हे जादूची काडी फिरावल्याप्रमाणे एका क्षणात होणार नाही. एक दशक जाईल.

सरकारला बजेट मधली तरतूद वाढवावी लागेल, पण सर्व पैसे सरकार खर्च करू शकणार नाही. पुरस्कर्ते पुढे यायला हवेत. खेळाडूंना फक्त सरकारी नोकऱ्या उपलब्ध होऊ नयेत. खासगी कंपन्यांनी त्यात रस घेतला पाहिजे. पूर्वी राजे महाराजे कलाकारांना पदरी ठेवत. तस खेळाडूंना खासगी उद्योगांनी पदरी ठेवलं पाहिजे. अमेरिकेत खेळाडूंचा सर्वाधिक भर पुरस्कर्ते उचलतात.

क्रिकेट मध्ये पैसा कुठून आला? तसं मॉडेल ऑलिंपिकसाठी तयार करायला हवं. सारं शक्य आहे. इच्छाशक्ती हवी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com