प्रवास सुपरस्टार पदापर्यंतचा...

राजेश खन्नामध्ये असं काय होतं, की तो पहिला सुपरस्टार झाला. माझ्या मते अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. पहिलं म्हणजे तो योग्य काळात अवतरला.
Actor Rajesh Khanna
Actor Rajesh KhannaSakal

राजेश खन्नामध्ये असं काय होतं, की तो पहिला सुपरस्टार झाला. माझ्या मते अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. पहिलं म्हणजे तो योग्य काळात अवतरला. ‘आराधना’ ही त्याच्या सुपरस्टार पदाची पहिली पायरी होती. ते वर्ष होतं १९६९ - ७०. दिलीप, राज, देव होते पण ते निवडक चित्रपटांत दिसत.

त्या काळात 'राज कपूरला हीरो म्हणून स्वीकारणं हे जरठबाला प्रेमाच्या स्तरावरचं होतं. ‘दीवाना’मध्ये सायराबानू त्याची नात वाटली. दिलीपकुमारही प्रौढ हीरो झाला होता. १९६४ मध्ये तो कॉलेजमध्ये शिकताना दाखवलाय. तेव्हा तो प्रौढ साक्षरता वर्ग वाटत होता.

देव आनंदनं आपला रोमान्स आणि देखणेपण टिकवलं होतं. राजेंद्रकुमार, मनोजकुमार शर्यतीच्या बाहेर होते. मनोजकुमार कधी हीरो म्हणून शर्यतीत होता असं मला वाटलंच नाही. ‘प्रिन्स’ नंतर शम्मी कपूरच्या लक्षात आलं होतं, की त्याचं फूटवर्क आता पूर्वी सारखं राहिलं नाही. हे त्यानं स्वतः कबूल केलं होतं. धर्मेंद्र पाय रोवून उभा होता पण एक ‘फूल और पत्थर’ सोडला तर तो शामळू भूमिकेत असायचा आणि त्याची हिंसक हीरोची सुरवात झालेली नव्हती.

मस्त रोमान्स, मस्त गाणी हा हिंदी सिनेमाचा आरसा होता. त्यात राजेश खन्ना बसला. हळुवार रोमान्स, स्टाइल, संगीत हे मिश्रण काॅलेज तरुण-तरुणींना वेड लावून गेलं. सुरवातीला राजेश खन्नाला कमी टोमणे सहन करावे लागले नाहीत. ‘बहारों के सपने’ सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी लोकं आशा पारेखची स्वाक्षरी घेण्यासाठी धडपडत होते.

हीरो राजेश खन्ना कुणाच्याही खिजगणतीत नव्हता. कुणीतरी काॅमेंट मारली, ‘हा हीरो नेपाळच्या गुरख्यासारखा दिसतो, बारीक डोळ्याचा.’ आराधनाच्या प्रीमियरला पूर्ण प्रकाशझोत शर्मिला टागोरवर होता. पण देव आनंद आला आणि त्यानं राजेश खन्नाला शेकहँड केला.

सिनेमा संपल्यावर देव आनंद राजेश खन्नाला एवढंच म्हणाला, ‘Dont worry. go home, sleep in peace, you will go far in this film industry.’ देव आनंदला दुसऱ्याचं भविष्य कळायचं पण आपल्यात डायरेक्टर व्हायची गुणवत्ता नाही हे नाही कळलं.

देव आनंदचा पडद्यावरचा रोमान्सच राजेश खन्नानं पुढे नेला. देव आनंदचा रोमान्स प्रेयसीला डिग्निटी देणारा, हळुवार प्रेम करणारा होता. राजेश खन्नाचाही तसाच रोमान्स होता. त्याचं ते मान हलवणं, डोळे मिचकावणं आणि देव आनंदसारखं मिलेनियम डाॅलर स्माइल.

राजेश खन्ना स्वतःही स्टाइल आयकाॅन झाला. त्यानं गुरुशर्ट आणला. गाॅगल नाकावर ठेवला. प्रेयसीच्या भावना जपत, तिच्या प्रेमाला फुंकर घालत रोमान्स केला. आराधनातला एयरफोर्समधला डाव्या खांद्यावर हेल्मेट घेऊन जाणाऱ्या राजेश खन्नाला पाहून देव आनंदला त्याचा मेजर वर्मा आठवला. त्याचाच आवाज किशोरकुमार राजेश खन्नासाठी गात होता. स्टाइल वेगळ्या होत्या, मार्ग तोच होता.

मग कुणीतरी मिठाचा खडा टाकला. एक बातमी आली राजेश खन्ना देव आनंदला ''लीप इयर स्टार'' म्हणाला. कारण चार वर्षांत त्याचा एखादा सिनेमा चालायचा. मग कुणीतरी बातमी दिली. देव आनंद म्हणाला, राजेशचा फाॅर्म आणि फेम अजून २५ वर्षांनी किती आहे पाहू या. पण देव आनंद खूप मोठ्या मनाचा होता. राजेश खन्ना हीरो असलेल्या ‘चमत्कार’ सिनेमाच्या मुहूर्ताच्या शाॅटला तो चिफ गेस्ट म्हणून गेला. १९७९ मध्ये ‘हमारी बहू अलका’च्या सेटवर दोघं कडकडून भेटले.

जेव्हा राजेश खन्नाचा पडता काळ सुरू झाला, तेव्हा देव आनंदनं त्याची समजूत घातली. देव आनंद त्याला म्हणाला, ‘why are you losing confidence, you are brilliant actor, Look at me, my ups and downs. you termed me leap year hero. Have confidence and march forward, future is yours.’ राजेश हे विसरला नाही. २००८ च्या 'आयफा' ॲवाॅर्ड फंक्शनला त्यानं खाली वाकून देव आनंदला नमस्कार केला. राजेशनं कबूल केलं, देव आनंद माझा आयडाॅल होता. त्याची काॅपी करण्याचा मी काही सिनेमांत प्रयत्न केला

हिंदी सिनेमात नट किंवा नटीनं मारलेल्या डायलाॅगवर पब्लिक खूश असतं. शोलेची तर चक्क डायलाॅगची कॅसेट निघाली होती. प्रत्येक नटाची किंवा नटीची एक वेगळी शैली असते. सोहराब मोदींचा आवाज एवढा जबरदस्त होता की त्यांच्या सिनेमाला अंध व्यक्ती येऊन बसत. दिलीपकुमारच्या आवाजातलं मार्दव, दर्द, चढउतार अप्रतिम असे. काही वेळा, साधी वाक्यही काय डायलाॅग आहे म्हणून गाजायची.

अशोककुमार, संजीवकुमार अत्यंत नैसर्गिकपणे संवाद म्हणत. देव आनंदच्या संवादाचा वेग पाहून त्याला शाळेत स्वल्पविराम, पूर्णविराम न शिकवल्याची माझी खात्री झाली. राजकुमारचा आवाज भिडायचा. पण दादागिरीचे आणि प्रेमाचे संवाद म्हणायची त्याची एकच स्टाइल होती.

अमिताभचा आवाज त्याचं माॅड्युलेशन, त्यातला दर्द, कधी चिड कधी कडवटपणा, तर कधी विनोदी शैली भावते. राजेश खन्नाचे संवादही गाजले. चांगल्या संवादाचं मातेरं करायची कुवत जशी एखाद्या नटात असते, तशी एखाद्या साध्या वाक्याला अर्थपूर्ण संवादाचं रूप द्यायची ताकदही नटात असते. ''l hate tears'' हे तीन शब्द राजेश खन्नाने असे काही उच्चारले की ते अजरामर झाले.

‘अमर प्रेम’ सिनेमाचे संवाद पूर्णपणे इंग्लिशमध्ये लिहिले होते. ते हिंदीत भाषांतरित केले होते. हा संवाद तेवढा इंग्लिशमध्ये ठेवला होता. राजेश खन्नाने अमिताभला मारलेला ''जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहीये'' हे गुलजारजींच वाक्य अर्थपूर्ण आहेच पण राजेश खन्नाने ते असं उच्चारलंय की ते विसरताच येत नाही. राजेश खन्नाच्या आवाजात मार्दव आहे, साॅफ्टनेस आहे आणि एक वेगळेपण आहे. ते मनाला भिडतं.

'राजेश खन्ना' 'अमिताभ' show down 'आनंद' पासून सुरू झाला. अमिताभनं जाहीरपणे कधीही राजेश खन्नावर टीका केली नाही. किंबहुना अमिताभ असं म्हणाला, ‘मी, राजेश खन्नाबरोबर काम करतोय म्हटल्याने माझं महत्त्व वाढलं. आनंदची भूमिका हा माझ्यासाठी देवाचा आशीर्वाद होता.’’ तो असंही म्हणतो, ‘‘ मला तो साधा आणि शांत वाटला. स्पेनसारख्या देशांतून त्याला फॅन्स भेटायला यायचे. अशा गोष्टी सहसा घडत नसत.’

त्या वेळी अमिताभ राजेश खन्नाच्या खिसगणतीतही नव्हता. आनंदमधील डाॅक्टर बॅनर्जीची भूमिका संजीवकुमारला देण्याच्या विरोधात राजेश खन्ना होता. आनंदमध्ये सर्व सहानुभूती राजेश खन्नाकडे होती. आनंद हसायचा, तेव्हा प्रेक्षक रडायचे. फ्रॅक कॅप्रासारखा महान दिग्दर्शक म्हणायचा नट रडतो, तेव्हा ती ट्रॅजेडी नसते. प्रेक्षक रडतात तो खरा ट्रॅजिक सिनेमा आणि तरीही आनंद सिनेमात अमिताभ लक्षात राहिला.

शशी कपूरने त्याच्या बायकोच्या गोऱ्या नातेवाइकांना आनंद पाहायला पाठवलं. त्यांना वाटलं, अमिताभच, राजेश खन्ना... ते शशी कपूरला म्हणाले, ‘‘लंबूने काम चांगलं केलंय.’’ त्या सिनेमाचा क्लायमॅक्स. हा मी पाहिलेल्या काही उत्कृष्ट क्लायमॅक्स मधला एक होता. विशेषतः अमिताभचा राजेश खन्नाच्या अचेतन शरीराकडं पाहून ओरडायला लागतो तो शाॅट. अमिताभनं आदल्या दिवशी हा सीन हृषीदांकडं मागितला पण त्यांनी दिला नाही.

अमिताभने तो तयार करून यावा असं त्यांना वाटत नव्हतं. त्यांचं म्हणणं, ते दिग्दर्शकाला आवडत नाही कारण त्यात बदल करणं कठीण असतं. त्यांना उत्स्फूर्तता हवी होती. पूर्णपणे फ्रस्टेट झालेला डाॅक्टर बॅनर्जी राजेशच्या अचेतन शरीराकडे पाहून ओरडायला लागतो तो शाॅट अमिताभने अप्रतिम केलाय.

आनंदच्या प्रीमियरनंतर देवयानी चौबळने राजेश खन्नाला सांगितलं, ‘या लंबूपासून सावध राहा. तो तुझी छुट्टी करेल.’ राजेश खन्नानं तिला विचारलं, ‘त्याच्यामध्ये खास काय आहे?’ ती म्हणाली, ‘त्याचे डोळे पाहिलेस? त्याचा आवाज ऐकलास?’ पुढे राजेश खन्ना जया भादुरीबरोबर बावर्चीत काम करत होता. अमिताभ तिला भेटायला यायचा. ते दोघं त्या वेळी प्रेमात होते.

एकदा राजेश खन्ना जयाला म्हणाला, ‘तू या माणसाबरोबर कशाला फिरतेस, तुझं काही भलं होणार नाही.’ तो अमिताभला साधं हॅलो ही म्हणायचा नाही. एकदा जया चिडून राजेशला म्हणाली, ‘एक दिवस तो कुठे असेल आणि तू कुठे असशील ते पाहा.’ बावर्चीनंतर जयानं ठरवून टाकलं पुन्हा राजेश बरोबर काम करायचं नाही. तो स्वतःला जवाहरलाल नेहरू समजतो.

त्याच सुमारास हृषीदांच्या ‘नमक हराम’ या सिनेमात दोघं एकत्र आले. शूटिंग सुरू झालं, तेव्हा राजेश खन्ना सुपरस्टार होता. पण ‘आनंद’मुळं अमिताभची दखल घेतली जात होती. मी तुम्हाला ‘नमकहराम’ची कथा सांगत नाही. कारण तुम्ही तो सिनेमा नक्की पाहिला असणार. पण मग हळूहळू दोघांमध्ये ठिणग्या उडायला लागल्या. दोन मित्रांची भूमिका दोघं करत असले, तरी शेवटी दोघांपैकी कोण मरणार हे हृषीदांनी कुणाला सांगितलं नाही.

पण राजेश खन्नाची तोपर्यंत पडद्यावर मरण्याची हौस वाढली होती. ज्या सिनेमात तो मरतो तो सिनेमा हिट होतो असं त्याला वाटायचं. हृषीदांनी कहाणीचा शेवट बदलून त्याचा हट्ट पुरवला, त्यामुळं अमिताभ दुखावला. ‘नमकहराम’ प्रदर्शित झाला त्याआधी 'जंजीर' प्रदर्शित झाला आणि अचानक अमिताभ स्टार झाला. तो ‘अँग्री यंग मॅन’ची प्रतिमा घेऊन आला. ती लोकांना भावली. ‘नमकहराम’नं त्या प्रतिमेला खतपाणी घातलं.

‘नमकहराम’मध्ये राजेश खन्नानं चांगला अभिनय करूनही अमिताभ भाव खाऊन गेला. गंमत पाहा काळ कसा करवट बदलतो. ‘जंजीर’ येण्यापूर्वी काही डिस्ट्रिब्युटर हृषीदांना म्हणाले, ‘अमिताभला आधी हेयरस्टाइल नीट करायला सांगा. तो माकडासारखा दिसतो. त्याला कान आहेत की नाही ते कळत नाही. ‘जंजीर’ आला आणि डिस्ट्रिब्युटरना त्याचे जास्त शाॅट्स हवे झाले.

पोस्टरवर त्याला राजेश एवढीच जागा द्यायला पाहिजे असा हट्ट धरला गेला. अमिताभची हेयरस्टाइल पाॅप्युलर झाली. मुंबईच्या सलूनमध्ये बोर्ड लागले. राजेश खन्ना हेयरस्टाइल दोन रुपये. अमिताभ हेयरस्टाइल साडेतीन रुपये. त्यानंतर राजेश खन्ना हृषीदांना म्हणाला, ‘माझी वेळ संपत आलीये. हा नवा सुपरस्टार होणार.’’

(लेखक चित्रपट आणि क्रीडा क्षेत्राचे अभ्यासक असून त्यांची या विषयांवरची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com