दोन देव, दोन वाटा !

शेन वॉर्नचा मृत्यू हा मनाला चटका लावणारा आणि धक्का देणारा होता. तो आयुष्य एखाद्या मैफिलीसारखं जगत होता, आयुष्याचं गाणं तल्लीनतेने गात होता; आणि सूर अचानक स्तब्ध झाले.
sachin tendulkar and shane warne
sachin tendulkar and shane warneSakal
Summary

शेन वॉर्नचा मृत्यू हा मनाला चटका लावणारा आणि धक्का देणारा होता. तो आयुष्य एखाद्या मैफिलीसारखं जगत होता, आयुष्याचं गाणं तल्लीनतेने गात होता; आणि सूर अचानक स्तब्ध झाले.

शेन वॉर्नचा मृत्यू हा मनाला चटका लावणारा आणि धक्का देणारा होता. तो आयुष्य एखाद्या मैफिलीसारखं जगत होता, आयुष्याचं गाणं तल्लीनतेने गात होता; आणि सूर अचानक स्तब्ध झाले. सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न हे गेल्या तीन दशकातले माणसाने क्रिकेटपटूंमध्ये शोधलेले दोन देव. सचिनने गावागावांतल्या मुलांनासुद्धा ते मोठे क्रिकेटपटू होऊ शकतात, हे स्वप्न दिलं. शेन वॉर्नने लेनस्पिन कलेला नवा आयाम दिला आणि जगभरातल्या तरुणांना लेगस्पिनर व्हायची स्फूर्ती दिली. सचिनने क्लासिकल फलंदाजी आणि आक्रमकता याचं एक असं कॉकटेल तयार केलं की, जे पूर्वी आपल्या देशात नव्हतं. शेन वॉर्न बरोबर उलट होता, टिपिकल ऑस्ट्रेलियन संस्कृतीतून आलेला. ऑस्ट्रेलियात लेगस्पिनरची परंपरा खूप मोठी आहे. बिल ओ’रायली, ग्रिमेट, बेनॉ वगैरे हे सर्व महान लेगस्पिनर ऑस्ट्रेलियाचेच. ओ’रायलीला तर डॉन ब्रॅडमन त्यांनी पाहिलेला सर्वोत्कृष्ट गोलंदाज मानायचे; पण या सगळ्यांना शेन वॉर्नने मागे टाकलं. एक लेगस्पिनर म्हणून नव्हे, तर खेळाडू म्हणून ज्याचा प्रभाव जगभरातल्या तरुणांवर पडलेला आहे, त्या दृष्टिकोनातून.

वॉर्न हा चतुरस्र लेगस्पिनर होता, लेगस्पिनरची सगळी आयुधं त्याच्याकडे होती. त्याच्याकडे लेग ब्रेक होता, गुगली होता, फ्लिपर होता. त्याच्याकडे टॉप स्पिन होता. फ्लिपर तर सापासारखा सळसळायचा. किंचित आखूड टप्प्याचा फ्लिपर वाटायचा आखूड टप्प्याचा; पण तो येऊन इतक्या भस्सकन दंश करायचा की, पूल मारायला सज्ज असलेल्या फलंदाजाची दांडी उडायची, किंवा पायावर बॉल लागायचा.

पण, त्याची सगळ्यात मोठी कुठली गोष्ट गाजली असेल, तर त्याचा तो मोठा टर्न; आणि फलंदाजाच्या मागून ‘चिपळ्या वाजवणं’ आणि ही त्याच्या गोलंदाजीची एक सोनेरी कडा होती.

पूर्वीचे जे लेगस्पिनर असत, ते चेंडूला फ्लाइट देऊन फलंदाजाला कव्हर्समध्ये आउट करत. स्लिपमध्ये आउट करत; सिली पाइंट, सिली मिड ऑनला आउट करत. कुंबळेने तर सगळ्या विकेट्स तशाच घेतल्या. तुम्ही शेन वॉर्नला जर खेळताना पाहिलं, तर तुमच्या असं लक्षात येईल की, तो ओव्हर द विकेट किंवा राउंड द विकेट जाऊन त्या रफमध्ये तर चेंडू टाकतोच; पण तो लेगस्टंपच्या बाहेरून चेंडू इतका वळवतो की, फलंदाजाला तो बोल्ड झाल्यानंतर ती भुताटकी झाली असं वाटतं. त्याने गॅटिंगची जी विकेट काढलीय, त्याला बॉल ऑफ द सेंच्युरी म्हटलं जातं. असं म्हणतात की, अजूनही तो चेंडू गॅटिंगच्या स्वप्नात येतो आणि तो दचकून उठून बसतो.

सर डॉन ब्रॅडमन हा मोठा रत्नपारखी माणूस असावा. कारण १९९६ मध्ये वयाच्या ९० व्या वाढदिवसाला त्याने जगातून फक्त दोनच खेळाडूंना आमंत्रित केलं होतं. एक होता सचिन आणि दुसरा वॉर्न. त्यांनाही जाणवलं होतं की, हे दोघे क्रिकेटपटू युगप्रवर्तक आहेत.

या दोघांमधली लढाई मात्र सचिनने जिंकली. ‘चक्क माझ्या स्वप्नात सचिन येतो,’ असं वॉर्न म्हणायला लागला. शेन वॉर्नवर सिद्धू आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मणनेही विजय मिळवला. अर्थात, म्हणून शेन वॉर्नचं मोठेपण काही कमी होत नाही. पण गंमत पहा, सचिन आणि वॉर्न हे दोन युगप्रवर्तक खेळाडू वेगवेगळ्या वाटेवरून चालत गेले. जगाच्या ज्या नैतिकतेच्या कल्पना आहेत, त्या कल्पनांप्रमाणेच सचिन तेंडुलकर मैदानावर आणि मैदानाबाहेरचं आयुष्य जगला. सचिन तेंडुलकरला ‘लागा चुनरी मे दाग छुपाऊ कैसे?’ हे गाणं कधी म्हणायला लागलं नाही. वॉर्न बेबंद आयुष्य जगला, वॉर्नची चुनरी ही नुसत्या डागांनीच भरलेली होती; पण त्याने ती चुनरी लपवली नाही. किंबहुना मला असं वाटतं की, त्याने ती चुनरी मिरवली.

बिअर हा तर ऑस्ट्रेलियन संस्कृतीचा भाग आहे. आपण पाणी पिणार नाही एवढी ते बिअर पितात आणि मला असं वाटतं की, वॉर्न त्याच्या आयुष्यात पाण्यापेक्षा बिअरच जास्त प्यायला असेल. त्याचबरोबर सुंदर ललना हा त्याचा कमकुवत दुआ होता. या सवयींवर तो कधी ताबा मिळवू शकला नाही. उलट त्याला एकदा ठेच लागली की, तो सावरायच्या वगैरे भानगडीत पडायचा नाही, पुन्हा एखाद्या सुंदर दगडावर आपल्याला ठेच लागेल हे पाहायचा. त्याने कुणाचीच पर्वा केली नाही. मैदानावर दमदार परफॉर्मन्स देणं आणि बाहेर स्वच्छंद आयुष्य जगणं ही त्याची वृत्ती होती आणि ते करताना तो अनेक प्रयोग करायचा, त्यामुळे त्याला कधी ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व मिळालं नाही. त्याचा क्रिकेटचा मेंदू प्रचंड तल्लख होता, ते त्याने खेळताना दाखवलं आणि कॉमेंट्री करतानासुद्धा दाखवलं. त्याचा खेळ पाहिला, त्याची कॉमेंट्री ऐकली की एक जाणवतं की, तो ऑस्ट्रेलियासाठी एक महान कर्णधार होऊ शकला असता. पण तो झाला नाही आणि त्याने त्याची कधी पर्वाही केली नाही.

क्रिकेट संपल्यानंतरसुद्धा त्याच्या वागण्यात बऱ्याच वेळेला विचित्रपणा असे. तो ज्या पद्धतीने आयुष्य जगला, ज्या पद्धतीने आयुष्याची गाडी त्याने बेभान सोडलेली होती, त्यावरून एक जाणवत होतं की, कधीतरी अपघात होणार होता, तो अपघात झाला. आजच्या तरुण पिढीला मला एवढंच सांगायचंय की, तुम्ही वॉर्नमधला क्रिकेटपटू घ्या, वॉर्नमधला स्वछंदी माणूस नव्हे, तो तुम्हाला परवडणारा नाहीये. झालंय काय की, आयपीएलमुळे क्रिकेटपटूंच्या हातात भरपूर पैसा आलेला आहे आणि एकदा पैसा आला की, इतर गोष्टीही तुमच्या आयुष्यात येतात, मग सिगारेट असेल, मद्य असेल किंवा मदनिका; आणि मी पाहतोय की, काही तरुण खेळाडू त्या मोहात पडलेले आहेत. त्यांना फक्त आयपीएल हवंय आणि ही मैदानाबाहेरची मजा. त्यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की, शेन वॉर्नने सर्व फॉरमॅटमध्ये कर्तृत्व गाजवलं आणि मग तो स्वच्छंद आयुष्य जगला. ही मुलं आता स्वच्छंद आयुष्य जगताहेत आणि करिअरकडे लक्ष देत नाहीयेत. माझं नेहमीच असं म्हणणं आहे की, शेन वॉर्नकडून तुम्ही फक्त गोलंदाजी घ्या, त्याच्या इतर गोष्टी नाहीत.

मला वॉर्नला पाहिलं की, सर फ्रॅंक वॉरेलची आठवण येते. त्यांच्या त्या काळातल्या कथासुद्धा वॉर्नएवढ्याच सुरस आणि चमत्कारिक होत्या; मैदानावरच्या आणि मैदानाबाहेरच्यासुद्धा. त्यांनीही मैदानावर आणि सामाजिक जीवनात एक प्रचंड मोठा ठसा उमटवला, कृष्णवर्णीय जनतेला मान वर करून जगायला शिकवलं; पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वालासुद्धा दोन बाजू होत्या. एका बाजूला एक उंच, सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ आणि अतिशय देखणी फलंदाजी करणारा फलंदाज; दुसऱ्या बाजूला एक बेबंद आयुष्य. सर फ्रॅंक वॉरेलसुद्धा वयाच्या ४१ व्या वर्षी गेले, त्यांना ल्यूकेमिया झाला होता; पण त्यांचं क्रिकेटपटू म्हणून आणि सामाजिक कार्यात असलेलं स्थान इतकं मोठं होतं की, त्यांची मेमोरियल सर्व्हिस ही थेट इंग्लडच्या पार्लमेंटमध्ये केली गेली. आज शेन वॉर्नलासुद्धा ऑस्ट्रेलियात त्याच्या इतर सर्व गोष्टी विसरून तसाच मोठा मान मिळतोय. त्याची मेमोरियल सर्व्हिस मेलबॉर्नच्या एमसीजीमध्ये लाखभर लोकांच्या समोर होणार.

वॉर्न त्याच्या या मैदानाबाहेरच्या गोष्टींमुळे फारसा लक्षात राहणार नाही, तो कायम लक्षात राहील तो त्याच्या घाटाच्या वळणाप्रमाणे वळणाऱ्या चेंडूमुळे. त्या उडवलेल्या दांड्या, त्याचं ते आनंदाने ओरडणं, त्याची ती आक्रमकता आणि त्याने पुनरुज्जीवित केलेली लेगस्पिनची कला यामुळेच. दोन महान खेळाडूंच्या ह्या दोन वेगळ्या वाटा आहेत.

(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि साहित्यिक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com