कुस्करू नका या कलिका

कलाकौशल्यांसारख्या सर्जनशील कृतींसाठी तिथं पुरेसा वेळ दिला जात असे. त्याचबरोबर कोणत्याही शिकवणीवर्गात जायला विद्यार्थ्यांना मुळीच मुभा नसे
Education
Education sakal

अनंत घोटगाळकर

कविता बुरमळे या मुलीनं गेली दोन वर्षं राजस्थानमधल्या कोटा शहरातील सुप्रसिद्ध कोचिंग क्लासेसमध्ये व्यतीत केली (मुलीचं नाव बदललं आहे). महाराष्ट्राच्या ग्रामीण विभागातल्या छोट्याशा शहरातली ही मुलगी कोट्यातील एका वसतिगृहात राहत होती. आयुष्यातील दोन वर्षं आणि कोचिंग क्लासेसच्या फीचा भरमसाट पैसा खर्च होऊनही कविताला दुर्दैवानं कोणत्याही चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश काही मिळाला नाही.

कोचिंग क्लास आणि स्वयंअध्ययन करण्यासाठी तिचा दिवस सकाळी सहाला सुरू होई आणि रात्री नऊपर्यंत सुरूच असे. कोट्यात येण्यापूर्वीही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. सकाळी आठ ते साडेदहापर्यंत पालक तिला खासगी शिकवणीला पाठवत आणि मग दुपारी बाराला सुरू झालेली शाळा संध्याकाळी सहाला संपे.

खेळायला, बागडायला तिला वेळ म्हणून नसे. सगळं लक्ष स्पर्धात्मक परीक्षेवरच केंद्रित झाल्यामुळे तिचं बालपणच हरवून गेलं होतं आणि मन अत्यंत तणावग्रस्त बनलं होतं.

हा काही मुलांची प्रगती साधायचा एकमेव मार्ग नव्हे. मुलांना शिक्षण देण्याची अन्य प्रारूपंही आहेत. त्यायोगे सर्वांगीण शिक्षण देता येतं. देशभर विविध ठिकाणी अशी प्रारूपं आहेत खरी; पण त्यांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. त्यांचं अनुसरण आणि विस्तार होण्याची नितांत आवश्यकता आहे. या परिसरात आम्ही करत असलेल्या अशाच एका छोट्या प्रयोगाचं मी वर्णन करू इच्छितो.

फलटणचा प्रयोग

सन १९८१ मध्ये मी आणि माझी पत्नी अमेरिकेतून फलटण या महाराष्ट्रातील छोट्याशा शहरात राहायला आलो, तेव्हा आसपास दर्जेदार शाळा नव्हत्या. म्हणून आमची मुलगी शाळेत जाण्याच्या वयाची झाली तेव्हा जवळच मराठी माध्यमाची एक प्राथमिक शाळा उभारायला आम्ही हातभार लावला. नंतर याच प्रकारे तिथं एक हायस्कूलही झालं.

माझी थोरली मुलगी जसजशी पुढच्या वर्गात जाऊ लागली, तसतशी एकेका वर्गाची शाळेत भर पडत गेली. विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देणं हाच ‘कमला निंबकर बालभवन’ या आमच्या शाळेचा मूलभूत उद्देश होता, त्यामुळे चार भिंतींबाहेरच्या उपक्रमांसाठी आणि कलाकौशल्यांसारख्या सर्जनशील कृतींसाठी तिथं पुरेसा वेळ दिला जात असे. त्याचबरोबर कोणत्याही शिकवणीवर्गात जायला विद्यार्थ्यांना मुळीच मुभा नसे. अगदी सुरुवातीच्या काळात या शाळेसाठी मुलं मिळवणं कठीण गेलं. स्पर्धापरीक्षांवर आणि पाठांतरावर मुळीच भर न देणाऱ्या असल्या शाळेत आपल्या मुलांना पाठवायची कल्पनाच पालकांच्या अंगावर काटा आणत असे.

आमच्या प्राचार्य भारतीय नागरिकत्व प्राप्त केलेल्या; परंतु मूळच्या अमेरिकी होत्या. त्या घरोघरी जात आणि ‘आपली मुलं आमच्या शाळेत पाठवा,’ असं पालकांना आवाहन करत असत. आमच्या थोरल्या मुलीनं एसएससी बोर्डाच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवल्यानंतर मात्र आमच्या शाळेत दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचं मोल फलटणकरांच्या ध्यानात आलं. त्यानंतर आमच्या धाकटीनं बोर्डाच्या गुणवत्तायादीत स्थान मिळवताच लोकांना कळून चुकलं की, आमची शाळा शहरातील सर्वोत्कृष्ट शाळांपैकी एक नक्कीच आहे. आज आम्ही दरवर्षी प्रवेश देत असलेल्या २५ ते ३० जागांसाठी १५० ते २०० अर्ज आमच्याकडे येतात.

आमच्या मुलांना या शाळेचा आणि इथल्या शिक्षणाचा खूपच फायदा झाला. आमची थोरली मुलगी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेला गेली आणि आज तिथल्या एका प्रमुख व्यावसायिक कंपनीत ती संचालक म्हणून काम पाहत आहे. धाकटीनं ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’मधून ‘शिक्षण’ या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. आज ती आमच्या शाळेची विश्वस्त असून तिथं अध्यापनही करते.

बहुतेक सर्व शाळा स्पर्धापरीक्षांच्या अभ्यासाचं प्रचंड ओझं मुलांवर लादतात; परिणामी, मुलांना खेळायला थोडीही उसंत लाभत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत मुलं नुसती या वर्गातून त्या वर्गात शिरत असतात. यामुळे त्यांचं बालपणच हिरावून घेतलं जातं. या साऱ्या चक्रात एक आख्खी पिढीच्या पिढी आपण झापडबंद करून टाकतो. परीक्षा उत्तीर्ण होणं ही एकच एक गोष्ट त्यांच्या दृष्टीसमोर असते. चिंतन-मनन करायला किंवा अन्य एखाद्या सर्जक उपक्रमात रमायला त्यांना सवडही नसते किंवा आवडही नसते. त्यांची सर्जनशीलता उमलण्यापूर्वीच चिरडली जाते.

भय इथले संपत नाही

शाळा-कॉलेजातील किंवा स्पर्धात्मक स्वरूपाची परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रचंड दबाव मुलांच्या मनात एक कधी न संपणारं भय निर्माण करतो. अशा रीतीनं उराशी भीती बाळगतच आपल्या आयुष्याचा आरंभ करणारी पिढी आपण निर्माण करतो. जीवनभर पिच्छा न सोडणाऱ्या मानसिक अढी आणि समस्या या भीतीमुळे निर्माण होतात. या समस्या टोकाला जातात तेव्हा त्यातून आत्महत्या घडतात. आज मोठ्या प्रमाणात सर्वत्र हे आपल्या निदर्शनास येतच आहे.

दुसरी गोष्ट अशी की, मुलांना स्वाभाविकपणेच खेळायचं, बागडायचं असतं. अन्य बालसुलभ गोष्टीही त्यांना करायच्या असतात; पण असल्या गोष्टीत मुळीच वेळ न दवडण्याबद्दल पालकांचा आणि शाळेचा त्यांच्या मनावर दबाव असतो. मग त्या गोष्टी दडवण्यासाठी मुलं खोटं बोलू लागतात.

आपणच आपल्या मुलांना खोटं बोलण्याची सवय लावणं, ही अतिशय भीषण शोकान्तिका होय. घडत्या वयात जडलेली ही घातक सवय मग आयुष्यभर त्यांची पाठ सोडत नाही. या खोटेपणातून पुढं बेजबाबदार वर्तन, ताणतणाव यांची मालिकाच तयार होते, त्यातूनच पुढं भ्रष्टाचाराची सुरुवात होते.

अलीकडे वैज्ञानिकांना असं आढळून आलं आहे की, बालपणातील ताणतणाव आणि दबाव यांमुळे व्यक्तीच्या जनुकीय स्वभावात बदल घडून येतात. हे बदल पुढील आयुष्यात नाना तऱ्हेच्या विकारांना कारणीभूत होतात. अशा रीतीनं आपण मुलांच्या मनात आयुष्यभर त्रासदायक ठरणारा भयगंडच केवळ निर्माण करत नाही, तर त्यांच्या भावी आरोग्याचा आणि जनुकीय स्वभावाचा खेळखंडोबा करून टाकतो.

बहुतेक सर्व शालेय अभ्यासक्रमांत नीतिशास्त्राचा किंवा जबाबदार आणि सुजाण नागरिक घडवण्याच्या शिक्षणक्रमाचा समावेश अभावानंच आढळतो. परिणामी, आपण माणसं निर्माण करत नसून आत्मप्रेरणा नसलेली जिवंत प्रेतं निर्माण करत आहोत. ही मुलं कोणतीही कौशल्यं आत्मसात करत नाहीत, केवळ परीक्षा उत्तीर्ण होणं हेच त्यांचं एकमेव लक्ष्य असतं.

प्रवेशपरीक्षा पार करून आयआयटीज्, वैद्यकीय महाविद्यालयं, व्यवस्थापकीय शिक्षण देणाऱ्या संस्था यांत प्रवेश मिळवणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांना आपापल्या विषयांचंही फारसं ज्ञान असत नाही, असं मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. परीक्षा कशा पास व्हाव्यात, या एकाच गोष्टीत त्यांनी प्रावीण्य संपादन केलेलं असतं.

अगदी दर्जेदार समजल्या जाणाऱ्या महाविद्यालयांतही अध्यापनाची गुणवत्ता अपेक्षेपेक्षा फारच कमी असल्यामुळे आपापल्या व्यवसायासाठी पुरेशी पात्रता मुळीच अंगी नसलेल्या अभियंत्यांची आणि डॉक्टरांची पिढी आपण निर्माण करत आहोत. देशाच्या दृष्टीनं हे काही चांगलं लक्षण नाही. परीक्षेसाठी घोकंपट्टी करण्यावर भर दिल्यानं मुलं स्वतंत्र विचार करायला शिकतच नाहीत, त्यांचं कुतूहल कधी जागं होत नाही.

त्यांच्या व्यावसायिक शिक्षणातही हाच कित्ता गिरवला जातो. त्यामुळे आपल्या देशात विज्ञान, इंजिनिअरिंग किंवा अन्य विषयांत संशोधक अथवा विचारवंत फारच कमी प्रमाणात निर्माण होतात.

संभाव्य उपाययोजना

या समस्येची उकल राष्ट्रीय आणि व्यक्तिगत अशा दोन्ही पातळ्यांवर करायला हवी. राष्ट्रीय पातळीवर आपण प्रत्येक क्षेत्रातील शिक्षणसंस्थांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढवायला हवी; या

शिक्षणसंस्थांना संपूर्ण स्वायत्तता दिली गेली पाहिजे. तिथल्या शिक्षणाची गुणवत्ता राखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील देखरेखयंत्रणा स्थापन व्हायला हवी. संपूर्ण देशासाठी एकच एक परीक्षा मंडळ असलं पाहिजे. शिवाय, सर्व पातळ्यांवरील सर्व शिक्षणक्रमांत मानव्यशास्त्रांचं, सामाजिक शास्त्रांचं, तसंच उत्तम नागरिक घडवण्याचं अध्यापन सक्तीचं असायला हवं.

शिक्षणाच्या बागेत तऱ्हेतऱ्हेची हजारो फुलं फुलू द्यावीत. निकोप स्पर्धा झाल्यामुळे आणि उत्तम शाळांची मागणी वाढल्यामुळे आपोआपच गुणवत्तेत वाढ होईल. त्यायोगे आपण स्वतंत्र विचार करू शकणारी आणि परिसराविषयीचं, तसंच जीवनाविषयीचं अपार कुतूहल जागं असलेली अधिकाधिक मुलं घडवू शकू. त्याशिवाय, या मुलांसाठी लाभदायक रोजगारनिर्मितीच्या नवनव्या वाटा आपल्याला निर्माण कराव्या लागतील. त्यासाठी केवळ इंजिनिअरिंग आणि वैद्यक या दोन क्षेत्रांपलीकडे जावं लागेल. या साऱ्यांचे मूर्त परिणाम दिसायला बराच काळ जावा लागेल. तथापि, राष्ट्राच्या भावी प्रगतीसाठी शिक्षणक्षेत्रातील या सुधारणा हाती घ्याव्याच लागतील.

व्यक्तिगत पातळीवर आपल्यापैकी प्रत्येकाला काम करावं लागेल. मुलांना सुयोग्य वर्तनाचे आणि प्रामाणिकपणाचे धडे देणं, हे आपणा सर्वांचंच कर्तव्य आहे. महान भारत घडवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. मात्र, हे सारं सांगणं जितकं सोपं तितकंच करणं कठीण आहे. कारण, स्वतःचं वर्तन सर्वार्थानं सुयोग्य असेल तरच आपण सद्‍वर्तनाचे धडे आपल्या मुलांना देऊ शकू. म्हणून भारताचं भवितव्य घडवण्याची सुरुवात आपण स्वतःपासूनच करायला हवी.

कविताप्रमाणेच भारतभरातील कितीतरी मुलं या चक्रात वर्षानुवर्षं भरडली जात आहेत. का पण? का? स्वतंत्र निर्णयक्षमतेचा अभाव असलेली, एकमितीय व्यक्तित्वाची असली पिढी घडवत राहणं हा आपण आगीशीच खेळत असलेला खेळ होय.

(लेखक फलटण येथील ‘निंबकर ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट’चे संचालक आहेत.)

अनुवाद : अनंत घोटगाळकर

anant.ghotgalkar@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com