इंजिनीअरिंग केलं म्हणून काय झालं?

शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

इंजिनीअरिंग केल्यानंतर वेगळ्याच क्षेत्रात अनेकजण करिअर करताना दिसतात. मग वेगळं काही करायचं होतं तर इंजिनीअरिंग का केलं? असा प्रश्न बऱ्याच वेळी या लोकांना विचारला जातो. आज 'इंजिनीअर्स डे' च्या निमीत्ताने अशाच काही इंजिनीअर्सनी सांगितलीय त्यांची कारणं आणि त्यांचे इंजिनीअरिंगचे अनुभव. 

इंजिनीअरिंग केल्यानंतर वेगळ्याच क्षेत्रात अनेकजण करिअर करताना दिसतात. मग वेगळं काही करायचं होतं तर इंजिनीअरिंग का केलं? असा प्रश्न बऱ्याच वेळी या लोकांना विचारला जातो. आज 'इंजिनीअर्स डे' च्या निमीत्ताने अशाच काही इंजिनीअर्सनी सांगितलीय त्यांची कारणं आणि त्यांचे इंजिनीअरिंगचे अनुभव. 

वैभव तत्ववादी, अभिनेता
मी पुण्याच्या सीओईपी कॉलेजमधून इंजिनीअरिंग केलं. खरंतर अॅक्टिंगमध्ये करिअर करायचं,  हे सुरूवातीपासूनच ठरवलं होतं. पण या क्षेत्रात आपल्याला कोणी गॉडफादर नाही हेही मला माहित होतं. शिवाय हे बेभरवशाचं क्षेत्रं आहे. त्यामुळे इथे जर फार काही जमलं नाही तर, पोटापाण्याची काहीतरी सोय करायला हवीच होती. म्हणून इंजिनिरींग करुन करिअर सुरक्षित करायचं असं मी ठरवलं आणि सीओइपीमध्ये प्रवेश घेतला. त्या चार वर्षात मी एक कलाकार म्हणून घडलो. शिवाय  माणूस म्हणूनही माझी जडणघडण झाली. मला चांगले मित्र मिळाले तेही याच काळात. त्यामुळे इंजिनीअरिंग हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. खरं सांगू का, तर इंजिनीअरिंग इज अॅन अॅटिट्यूड. इथला अभ्यासक्रम,कॉलेजमधलं वातावरण, असाइनमेंट्स, सबमिशन, प्रोजेक्ट्स यातून तो अॅटिट्युड माझ्यात येत गेला. इंजिनीअरिंग करत असतानाच माझी नाटकं.. त्याची तालीमही चालूच होती. त्यामुळे कॉलेजला असताना माझ्या मित्रांनी मला एकदा कॅम्पस इंटरव्ह्यूला जाऊ दिलं नव्हतं. इतकंच नव्हे, तर हा इंटरव्ह्यू कसा होतो, हे बघण्यासाठी एकदा गेलो असता एचआरला सांगून मला बाहेर काढलं होतं. त्यांनी त्यावेळी तिथून बाहेर काढलं म्हणून मी आज अभिनयात करिअर करू शकलो असेन.

प्रशांत गावंडे,प्रशासकिय अधिकारी
औरंगाबादच्या इंडो-जर्मन टूलरुममधून मेकॅनिकल इंजिनीरिंग पूर्ण करत मी सध्या भारतीय महसूल सेवेत कार्यरत आहे. 2003 मध्ये इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर 3 ते 4 वर्ष मी टाटा मोटर्स, महिंद्रा ग्रुपसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम पाहिलं. खरंतर प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा होतीच. दरम्यानच्या काळात जमेल तसा अभ्यासही सुरु ठेवला होता. पण, तो पुरेसा नव्हता. शेवटी 2007मध्ये नोकरी सोडून पूर्णवेळ स्पर्धा परिक्षेची तयारी करायला घेतली आणि 2012 मध्ये यूपीएससीमधून भारतीय महसूल सेवेत माझी निवड झाली. आता स्पर्धा परीक्षा द्यायची होती तर इंजिनीअरिंग का केलं असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो, आमचं घर शेतीवर अवलंबून होतं. त्यामुळे इंजिनीअरिंग करुन स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्णय मी आधी घेतला. इंजिनीअर्स दुसऱ्या क्षेत्रात गेले, म्हणजे त्यांची 4 वर्षे वाया गेले असं बोललं जातं. पण असं नसतं. उलट  उच्चशिक्षित तरुण प्रशासकिय सेवेत येणं कधीही चांगलंच. आता बाहेरच्या देशातील इंजिनीअरिंग आणि आपल्याकडचं हे क्षेत्र यात फरक आहे. पदवी घेउन बाहेर पडताना आपल्याकडच्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास कमी असतो. नोकरीचा प्रश्न, पगार कमी यामुळेही आज अनेक मुलं इतर क्षेत्राकडे वळताना दिसतात. त्यामुळेही कदाचित इतर सर्वच क्षेत्रात इंजिनीरिंग केलेली मुलं आपल्याला पाहायला मिळतात. इंजिनीअर असण्याचा माझ्या कामात मला नक्की फायदा होतो. 

निरंजन टकले, पत्रकार
मी खरंतर पत्रकार. पण इलेक्ट्राॅनिक्स इंजिनीअरिंग करुन मी यात आलो. पुण्यातल्या वाडिया कॉलेजमधून मी इंजिनीरिंअग पूर्ण केलं. मी इंजिनीअर झालो, तेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते. तो काळ तंत्रज्ञान क्रांतीचा होता. सीडाॅटसारख्या संस्थेसोबत मी काम करायचो. पुढे हा प्रोजेक्ट बंद झाला. नोकरीही सुटली. मग स्वतःचा उद्योग सुरु केला. त्याकाळात सरकारं बदलली. खरंतर मीडियाने तेव्हा आपल्या ताकदीने ही सरकारं उलथवली होती. त्याचा परिणाम व्यवसायावर झाला. दोन वेळा अशाप्रकारे करिअर करायला गेलो आणि नुकसान झालं. या सर्वात माध्यमं महत्वाची भूमिका बजावतात हे माझ्या लक्षात आलं होतंच. मग आपण पत्रकारितेतच यावं असा निर्णय मी घेतला. सुरूवातील वेध नावाचं एक लोकल केबल चॅनल सुरु केलं. त्यामुळे पत्रकारितेत जम बसत गेला. चांगलं इंजिनीअरिंगचं करिअर सोडून पत्रकारितेत का जातोयस, असा प्रश्न मला अनेकांनी विचारला. पण मी ठाम राहिलो. माझ्या मते इंजिनीअरिंग केल्यामुळे  मनाचं इंजिनीअरिंग होतं. त्याचा उपयोग नंतरच्या काळात होतो. इंजिनीअरिंग केल्यामुळे अॅनालॅटिकल स्ट्रेंथ वाढते. त्यामुळे नंतर कोणत्याही क्षेत्रात जरी काम केलं तरीही या माईंडसेटचा उपयोग होतो. पत्रकारिता करतानाही मला याचा उपयोग झाला. 

Web Title: esakal yogesh bankar writes about different carriers and engineers