प्रजासत्ताक लोकशाहीचा अर्थ आणि प्रासंगिकता

The essence of democracy and Republic India
The essence of democracy and Republic India

स्वातंत्र्य, बंधुता, स्त्री-पुरुष समानता ही मूल्ये भारतीयांनी स्वीकारली, जोपासली. त्यातून प्रजासत्ताक लोकशाही राष्ट्र म्हणून भारत देशाचा नावलौकिक जगभर झाला आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही राजव्यवस्था म्हणून भारत देशाचा उल्लेख होतो.

विसाव्या शतकात स्वतंत्र झालेल्या अनेक राष्ट्रांनी लोकशाही स्वीकारली, पण ही व्यवस्था रुजण्यापूर्वीच अल्पकाळातच मोडून गेली. लोकशाही स्वीकारली जाते. टिकविली जाते; पण ती रुजतेच असे नाही. असे का होते? कारण लोकशाही व्यवस्था ही माणसाची सहज प्रवृत्ती नाही. ती व्यवस्था माणसाच्या बौद्धिक आविष्कारातून प्रगटलेली, स्वीकारलेली, आचरणात आणलेली व्यवस्था आहे. त्यामुळे ही व्यवस्था मानवी मूल्यांनी स्थापित झालेली व्यवस्था आहे.

स्वातंत्र्य, समता, बंधुता, स्त्री-पुरुष समानता या मूल्यांच्या प्रगट विचार-आचारातून जी व्यवस्था निर्माण होते ती लोकशाही व्यवस्था.

माणसाची सहज प्रवृत्ती आणि बौद्धिक आविष्कार या दोन स्वतंत्र बाबी आहेत. सक्षम प्राणी शारीरिक क्षमतेच्या जोरावर कळपाचे रक्षण करतो व तो म्होरक्‍या होतो. सर्वजण त्याची सत्ता मान्य करून रक्षित होतात.

सक्षम नेतृत्वाच्या हाती सर्व सोपवून सुखाने जगणे ही माणसाची सहज प्रवृत्ती. राजा, प्रजा, राजेशाही याच प्रवृत्तीतून निर्माण होते. माणसाचे मन सुखलोलूप असते. सुरक्षितता, सुख, आराम, संपत्ती, संचय, संवर्धन रक्षण या माणसाच्या प्राथमिकता आहेत; परंतु माणूस फक्‍त शरीरानेच सक्षम नसतो तो बुद्धीनेही सक्षम असतो.

माणसाचे बौद्धिक, मानसिक आविष्कार सहज प्रवृत्ती व प्राथमिकतेच्या पुढे जाऊन मानवीय बौद्धिक, मानसिक, आविष्काराच्या व्यवस्था निर्माण करतात. स्वातंत्र्य, समता, बंधुता, स्त्री-पुरुष समानता ही मानवीय मूल्ये आहेत. ती विचार-आचार संस्कारातून रुजविली जातात. यातून प्रगट होणारे विश्‍व सांस्कृतिक विश्‍व असते. मानवीय सांस्कृतिक आदर्श राजव्यवस्था म्हणून प्रजासत्ताक लोकशाही व्यवस्था जगभरातल्या लोकांनी मान्य केली आहे.

आपल्या भारत देशात लोकशाही टिकून आहे. सहज प्रवृत्तीत स्वातंत्र्य हे शारीरिक सक्षम, सत्ता, संपत्ती शस्त्रास्त्र असणारे जास्त उपभोगतात. शारीरिक दुबळे, अल्पसंख्य, दरिद्री लोकांच्या स्वातंत्र्याचा संकोच करणे फार सहज शक्‍य असते. भाकरी, सुरक्षितता व लैंगिकता अशी अनेक कारणे देऊन स्वातंत्र्याच्या संकोच करणाऱ्या व्यवस्था निर्माण होतात. या व्यवस्थांमध्ये माणसांचे बौद्धिक आविष्कार बंदिस्त होतात, कुंठित होतात. समाजाचे नुकसान होते. समाजात माणसांच्या बौद्धिक आविष्काराला मुक्‍त अवकाश देणारी व्यवस्था निर्माण करावी लागते. त्यासाठी स्वातंत्र्याची जाणीव निर्माण करावी लागते.

स्वातंत्र्य बलवान करावे लागते. स्वातंत्र्य प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध अधिकार आहे हे विचार-आचारातून मान्य करावे लागतात. त्याचबरोबर समता, बंधुता, स्त्री-पुरुष समानता ही मूल्येही विचार-आचारातून मान्य करावी लागतात. यासाठी सहज प्रवृत्तींना आवर घालून आकार द्यावा लागतो. त्याग, करुणा, प्रेम यांचा स्वीकार करावा लागतो. मोह, काम, क्रोध यांना आवार घालावा लागतो.

व्यक्‍तिस्वातंत्र्याची जोपासना करताना सामूहिकता कल्याणाचे, स्वारस्याचे भान ठेवावे लागते. सामूहिक चारित्र्य निर्माण करावे लागते. दर वीस वर्षांनी नवी पिढी येते. लोकशाही टिकवून ठेवायची असेल तर लोकशाही मूल्यांचा सतत जागर ठेवणे आवश्‍यक असते. प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा हाच खरा अर्थ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com