क्षण ‘युरेका’चा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

आधी केले... मग सांगितले!

आधी केले... मग सांगितले!

काही वर्षांपूर्वीची ही घटना. त्यावेळी मी सोलापूर जिल्हा परिषदेत एका शाळेत शिक्षक म्हणून नवीनच रुजू झालो होतो. त्या वर्षी माझ्याकडं इयत्ता सहावीचा वर्ग होता. विशेष म्हणजे सर्व विषय आपणच शिकवायचे. शिवाय शाळेत सर्व प्रकारची जबाबदारी आपणच पार पाडावी लागत असे. इतर शाळांसारखे शाळेत शिपाई किंवा लेखनिकही नव्हते.
त्यामुळं शाळेची स्वच्छता, मैदानाची स्वच्छता, बाग, शाळेचा व्हरांडा आणि वर्ग या सर्वांची स्वच्छता आणि देखभालीची जबाबदारी अर्थातच त्या-त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांवरच येऊन पडत असे. त्यासाठी वर्गातल्या विद्यार्थ्यांचे गट करून वारांनुसार त्यांना जबाबदारीचं वाटप केलेलं असे. श्रमसंस्कार रुजवणं हादेखील त्यामागचा एक हेतू होता. 
एके दिवशी असाच वर्ग भरला. मी वर्गात पोचलो आणि पाहतो तर काय? टेबलखाली धूळ व कचरा, वर्गात बसायच्या बेंचेसखाली कचरा, खिडक्‍यांच्या मोकळ्या जागेत कचरा, कोपऱ्यांमध्ये जाळ्या झालेल्या. हे सर्व पाहून माझा संताप अनावर झाला. मी वर्गाला विचारलं असता, ‘‘सर माझा नाही, त्यांच्या गटाचा आज नंबर होता,’’ अशी टोलवाटोलवीची आणि उडवाउडवीची उत्तरं मला मिळू लागली. माझा राग अनावर होत चालला होता. सर्वांनाच शिक्षा करावी, असंही क्षणभर वाटलं. 
मात्र, रागावर नियंत्रण ठेवत मी एक वेगळाच उपक्रम लगेच राबवला. सर्व विद्यार्थ्यांना दप्तरांसह वर्गाच्या बाहेर व्हरांड्यात पाठवलं आणि मी स्वतःच झाडू हातात घेऊन वर्ग झाडायला सुरवात केली. ‘‘बनकर सर स्वतः वर्ग झाडताहेत,’’ ही बातमी संपूर्ण शाळेत पसरली. बघता-बघता इतर शिक्षक व्हरांड्यात जमा होऊन, ‘‘का रे, तुम्हाला काही वाटतं का? वर्ग स्वच्छ ठेवता येत नाही का?’’ असं बाहेर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना म्हणायला लागले. मी मात्र वर्ग स्वच्छ करण्याचा माझा कार्यक्रम कोणत्याच अटीवर बंद करायला तयार नव्हतो. मुख्याध्यापक आणि इतर शिक्षक, माझ्याच वर्गातले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी- सर्वांनी विनंत्या, आर्जवं केली; पण मी आज वर्ग स्वच्छ केल्याशिवय स्वस्थ बसणार नव्हतो. 
मध्येच वर्गातल्या मुली रडवेल्या होऊन यायच्या आणि म्हणायच्या, ‘‘सॉरी सर, पुन्हा असं होणार नाही; पण झाडू आमच्याकडं द्या.’’ मी मात्र त्यांना दुर्लक्षित करून माझं काम सुरूच ठेवलं होतं. अखेर वर्ग, दारं, खिडक्‍या, जाळ्या, बेंचेसखालचा कचरा सारं स्वच्छ केल्यानंतर मला समाधान वाटलं व माझा रागही पूर्णपणे शांत झाला होता.
‘शहाण्याला शब्दांचा मार’ म्हणतात ना, अगदी तसंच घडलं. दुसऱ्या दिवसापासून ते अगदी सहावीची ती बॅच सातवी पास होऊन निरोप समारंभापर्यंत पुन्हा मला कधीही वर्ग अस्वच्छ दिसला नाही. पश्‍चात्तापानं विद्यार्थ्यांना बरंच काही शिकवलं होतं व वर्ग स्वच्छ कसा ठेवावा याचा जणू मी एक नवीन शोधच लावला होता. 
- सुनील बनकर, मु. पो. डिंगरो, ता. जुन्नर, जि. पुणे

---

कुंडीतला ‘मॅजिक मसाला’

मार्च, एप्रिल महिन्याचे दिवस होते. उन्हाळा वाढत चालला होता. गॅलरीतल्या कुंड्यांना न विसरता वेळेवर पाणी घालावंच लागे. माझ्या एका मोठ्या कुंडीत एक छान डेरेदार तुळस होती. इतर कुंड्यांमध्ये फुलांची झाडं होती. मार्च, एप्रिल महिने म्हणजे धावपळीचे. मुलांच्या परीक्षा, माझी नोकरीची धावपळ, उन्हाळी कामं हा उपक्रम सतत चालूच असे. एप्रिल संपता संपता मला जाणवलं, की तुळशीत बरीच लहान-लहान हिरवी रोपं उगवू लागलीत. कदाचित मंजुळा पडून त्या उगवत असतील, असं वाटून गेलं. ती हिरवळ छान वाटत होती. मे महिना संपला. रोपं मोठी झाली. कुंडी रोपांनी गच्च भरली; पण ही रोपं म्हणजे तुळशी नव्हत्या. वेगळीच रोपं वाटत होती; पण हे हिरवं सौंदर्य छान वाटत होतं. जूनमध्ये पावसाळा सुरू झाला. त्या वर्षी जरा जास्तच पाऊस पडला. त्यामुळं झाडांना पाणी घालण्याची गती मंदावली. 
अंदाजे २०, २२ जुलैनंतर त्या रोपांना भरपूर हिरव्यागार कळ्या आलेल्या माझ्या मुलांनी मला दाखवल्या. आता ही रोपं तुळशीपेक्षा उंच होऊ लागली होती. मला हे सर्व पाहून खूप आनंद झाला. सर्वच रोपांना खूप कळ्या आलेल्या होत्या. जुलै महिना संपला. ऑगस्टमध्ये एके दिवशी संपूर्ण कुंडी पांढऱ्याशुभ्र फुलांनी भरली. त्यावेळी मोबाईल नसल्यानं फोटो काढता आले नाहीत. सर्वांनाच वाटलं, की ही काही वेगळीच फुलझाडं आहेत. सर्व कुंडी पांढऱ्या फुलांनी डोलत होती. डोळ्यांना सुखद वाटत होतं. 
ऑगस्ट संपत आला. धावपळीमुळं त्या झाडांकडं जरा दुर्लक्षच झालं. एके दिवशी माझ्या मुलांनी मला ओरडून हाका मारायला सुरवात केली. मी गॅलरीत गेले. सर्व रोपांची फुलं गळून पडली होती आणि त्यांना पुन्हा हिरव्या कळ्या आल्या होत्या. आम्हाला काहीच समजेना. ही रोपं तुळशीपेक्षा मोठी झाली होती. तुळस मरू नये म्हणून मी छोटी रोपं काढून टाकली. दिवस जातच होते. सप्टेंबरमध्ये झाडांच्या कळ्या फारच मोठ्या झाल्या. त्यावेळी माझा मुलगा भूषण मला म्हणाला, ‘‘तू वर्षाचा कांदा, लसूण मसाला करत होतीस ना, तेव्हा मी मूठभर मिरच्यांच्या बिया चोरून तुळशीत टाकल्या. तू रागावशील म्हणून त्यावर माती टाकली; पण नंतर मी विसरलोच. या मोठ्या हिरव्या कळ्या म्हणजे हिरव्या मिरच्या आहेत. आहे ना तुझा मॅजिक मसाला?’’ मी तोंडावर हात ठेवून बघतच राहिले. सर्व रोपांना एक-एक इंचाच्या हिरव्या मिरच्या लगडल्या होत्या. सर्वांना खूप आनंद झाला. भूषण तर वेड्यासारखा नाचूच लागला. ही त्याचीच शेती होती. त्या वर्षी झाडांना चाळीस मिरच्या आल्या. त्या वर्षीपासून मी दर वर्षी मिरच्यांची रोपं तयार करून लावते. माझी मिरच्यांची शेती कुंडीतच फुलते. आता ‘युरेका, युरेका’ म्हणून नाचण्याची वेळ या मिरच्यांनीच माझ्यावर आणली. किती छान ना?
- विजया दाभाडे-पवार, पुणे

Web Title: eureka eureka column