एक गुणी मुलगी (फारुख शेख)

एक गुणी मुलगी (फारुख शेख)

बिबीताज म्हणाली ः ‘‘माझ्या आई-वडिलांनी मला खूप हिमतीनं, कष्टानं वाढवलं, शिकवलं आणि स्वतःच्या पायांवर उभं केलं आहे. या स्थळाला दोन्ही बाजूंनी संमती झाली, तर माझी एक विनंतीवजा अट राहील. ती म्हणजे लग्नानंतर मी माझे आई-वडील हयात असेपर्यंत दरमहा माझ्या पगारातला अर्धा पगार त्यांना देईन आणि याबद्दल मला कोणाचंही बंधन नको असेल. माझी अट मान्य असेल, तरच मी या स्थळाला होकार देईन.’’ बिबीताजकडून आलेली अनपेक्षित प्रश्नवजा अट ऐकून उपस्थितांत क्षणभर शांतता पसरली.

सो  लापूर हे मूळ गाव असल्यामुळं आमचं सोलापूरला जाणं हे नेहमीचंच. कधी गेस्ट लेक्‍चरसाठी, कधी नातेवाइकांच्या सुख-दुःखाच्या घटनांच्या निमित्तानं, तर कधी मित्रांसाठी! मूळ काम आटोपल्यानंतर एखाद्या तरी नातेवाइकाला किंवा मित्राला भेटायचं, हे आमचं आवडतं काम. नेहमी जमतंच असं नाही; पण खूप वेळा आम्ही घडवून आणतो. या वेळीही एका लग्नासाठी सोलापूरला जाण्याचं ठरलं, तेव्हा प्रवासात गप्पा मारताना आम्ही पत्नीच्या आतेभावाची म्हणजे इक्‍बालभाईंची भेट घेण्याचं निश्‍चित केलं होतं.

सोलापूरला पोचल्यावर लग्न आणि त्यानंतर जेवण आटोपून सर्व नातेवाइकांचा निरोप घेतला आणि त्यानंतर ठरल्याप्रमाणं आम्ही इक्‍बालभाईंच्या घरी पोचलो. आम्ही भेटायला येणार असल्याबद्दल त्यांना पूर्वसूचना दिली होती. त्यामुळं इक्‍बालभाई आणि त्यांचे कुटुंबीय आमची वाटच पाहत होते. घरी गेल्यानंतर एकमेकांच्या खुशालीची विचारपूस झाल्यानंतर मी इक्‍बालभाईंना त्यांच्या कामकाजाबद्दल विचारणा केली. त्यावर इक्‍बालभाई थोडे दुःखी दिसले. ‘‘सध्या प्रकृती ठीक नसल्यामुळं मी काम करत नाही,’’ असं त्यांनी सांगितलं. ‘काम न करता मग घर कसं चालतं,’ या माझ्या मनातल्या, न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर इक्‍बालभाईंनी लगेचच दिलं ः ‘‘मी सध्या काम करत नसलो, तरी माझ्या बिबीताजमुळं आज माझं घर चालायला मदत होते.’’ माझ्यासाठी हे सर्व समजण्याच्या पलीकडचं होतं. न राहवून मी त्यांना विचारलं ः ‘‘कसं?’’ त्यानंतर इक्‍बालभाईंनी सांगितलेली सविस्तर माहिती मी तन्मयतेनं ऐकतच राहिलो.

इक्‍बालभाईचं कुटुंब म्हणजे ते स्वतः, पत्नी आणि तीन मुली. इक्‍बालभाई पूर्वी सोलापूरच्या एका नामवंत सूतगिरणीत कुशल कारागीर म्हणून काम करत होते. कालांतरानं एक-एक करत बंद पडत चाललेल्या सूतगिरण्यांमध्ये त्यांची सूतगिरणीसुद्धा होती आणि त्यात इक्‍बालभाईंचं काम सुटलं. त्यानंतर इक्‍बालभाईंनी पडेल ती कामं करत कुटुंबाचा गाडा हाकला. अर्थात, त्यांना भक्कमपणे साथ होती त्यांच्या पत्नीची. त्यासुद्धा घरातच विड्या वळण्याचं काम करून पतीला साथ देत होत्या. अशा कष्टाळू दांपत्याची बिबीताज ही मधली मुलगी. इक्‍बालभाई कामावर असताना जमवलेल्या पैशांतून पाच वर्षांपूर्वी मोठ्या मुलीचं लग्न करू शकले. त्या वेळी बिबीताज आणि तिची लहान बहीण शाळेत शिकत होत्या. इक्‍बालभाई सांगत होते ः ‘‘बिबीताज अभ्यासात एकदम हुशार; पण खूपच शांत स्वभावाची मुलगी. घरातली सर्व कामं करून शाळेतला अभ्यास ती नियमितपणे करायची आणि जोडीला नमाज व कुराणपठणही ती नित्यनेमानं करत असे. तिच्या अभ्यासू वृत्तीमुळं दहावीला तिला सत्तर टक्के आणि पुढं बारावीत पंचाहत्तर टक्के मार्क्‍स मिळाले.’’
अशी ही मनमिळाऊ, अबोल स्वभावाची नाकी-डोळी छान दिसणारी बिबीताज शाळेत आणि नातेवाइकांत प्रिय अशीच होती. हळूहळू मोठ्या होत जाणाऱ्या दोन्ही मुलींकडं पाहताना इक्‍बालभाईची भविष्याबाबतची अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत होती. कारण गिरणी बंद पडल्यामुळं कायमस्वरूपाची नोकरी गेली होती आणि आता ते छोट्यामोठ्या कारखान्यांत बदली म्हणून काम करत होते. त्यातून मिळणाऱ्या पगारातून कसाबसा प्रपंच चालू होता; पण ‘पुढचं काय’ हा डोंगराएवढा प्रश्न इक्‍बालभाईंसमोर ‘आ’ वासून उभा होता.

एव्हाना बारावी पास झालेल्या बिबीताजनं पुढं डी.एड. करायचं ठरवलं आणि त्याच्या प्रवेशासाठी अर्ज भरला. प्रवेशपरीक्षेत उत्तीर्ण होऊन तिला मुंबईतल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. सुरवातीला थोडे दिवस नातेवाइकांकडं राहून स्थिर झाल्यावर बिबीताज मैत्रिणींबरोबर राहू लागली. वडिलांनी पाठविलेल्या जेमतेम पैशांमध्ये ती आपला खर्च कसाबसा भागवू लागली- कारण तिला वडिलांच्या परिस्थितीची जाण होती. बघताबघता दोन वर्षांचा शिक्षणाचा काळ संपला आणि बिबीताज चांगल्या गुणांनी डी.एड. उत्तीर्णही झाली. त्याच वेळी मुंबईत निघालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या जागेबाबत बिबीताजला माहिती मिळाली आणि मोठ्या उमेदीनं तिनं त्यासाठी अर्ज दाखल केला. शिक्षणानंतर सोलापूरला परत न जाता आपण मुंबईतच नोकरी करावी, ही तिची इच्छा जणू परमेश्वरानं ऐकली आणि बिबीताजला मुलाखतीसाठी बोलावणं आलं. बिबीताजनं अर्धी लढाई जिंकली होती. मोठ्या तयारीनं आणि हिमतीनं ती मुलाखतीसाठी गेली आणि विचारलेल्या प्रश्नांची आत्मविश्वासानं उत्तरं देऊन बाहेर पडली. आता तिला प्रतीक्षा होती निकालाची. या निकालावर तिच्या आयुष्याची दिशा आणि दशा ठरणार होती. आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बिबीताजच्या स्वप्नांना सत्यात उतरवणारा तो निरोप आला... बिबीताजची निवड झाली होती! तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. जणू तिनं पाहिलेल्या अनेक स्वप्नांना सत्यात उतरवण्याची ती संधी होती. शेवटच्या क्षणी काही महत्त्वाची कागदपत्रं उशिरा जमा करण्यामुळं तिच्या निवडीबद्दल थोडा गोंधळ झाला खरा; पण तिचा दृढ निश्‍चय आणि तिच्या आई-वडिलाचे आणि अनेकांचे आशीर्वाद कामी आले. तिची निवड निश्‍चित झाली.

नियुक्तिपत्र हातात पडल्यानंतर बिबीताजला कोण आनंद झाला! तिनं सरळ सोलापूर गाठलं आणि घरी पोचून आई-वडिलांना घट्ट मिठी मारली. घरी सर्वांना अतिशय आनंद झाला. बिबीताजनं पाहिलेलं पहिलं स्वप्न पूर्ण झालं होतं- नव्हे, तिनं ते पूर्ण केलं होतं. तिच्यासाठी हे पहिलं स्वप्न म्हणजे तिनं पाहिलेल्या पुढच्या अनेक स्वप्नांची नांदी होती. ठरलेल्या तारखेला बिबीताज मुंबईत कामावर रुजू झाली. बघता बघता तिनं नोकरीतला पहिला महिना पूर्ण केला आणि पहिला पगारही हाती पडला! पहिल्या पगाराची रक्कम पाहून तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं. तिला तिचे वडील आणि त्यांचे कष्ट आठवले. वडिलांकडून तिला याआधी दरमहा जेवढी रक्कम मिळायची तेवढीच रक्कम तिनं पगाराच्या रकमेतून स्वतःसाठी ठेवली आणि बाकी सगळी रक्कम वडिलांच्या हातात दिली. मुलीचा पहिला पगार पाहून वडिलांना अभिमानानं गहिवरून आलं- कारण त्यांच्यासाठी केवळ ही एक मोठी रक्कमच नव्हती, तर त्यांच्या उतारवयाचा आधारही होता.

बिबीताजला नोकरी मिळून एक वर्ष पूर्ण झालं. सगळं आनंदात चालू होतं; पण इक्‍बालभाईंना त्यांचं अंतर्मन नेहमी एका गोष्टीची सतत आठवण करून देत होतं ः ‘मुलगी मोठी होत चालली आहे; तिच्या लग्नाचं पाहायला हवं.’ पत्नीशी चर्चा केल्यानंतर इक्‍बालभाईंनी ठरवलं, की या वेळी बिबीताज सोलापूरला आल्यावर तिच्याकडं किमान हा विषय तरी काढू. मुलगा बघून लग्न ठरेपर्यंत काही महिने जाणारच होते. त्यानंतर एका शनिवार-रविवारी बिबीताज सोलापूरला आली असता, इक्‍बालभाईंनी आपल्या पत्नीला सोबत घेऊन मुलीकडं तिच्या लग्नाचा विषय काढला. अनपेक्षितपणे विचारलेल्या प्रश्नामुळं बिबीताज थोडा वेळ गडबडून गेली; पण नंतर लगेच स्वतःला सावरून तिनं आईवडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ‘‘मी आता कुठं नोकरीला लागले आहे- अजून एक-दोन वर्षं जाऊ द्या, मग त्यानंतर बघू या,’’ असं ती म्हणाली; पण शेवटी ते मुलीचे आईवडीलच! कसं समजणार ही भाषा? त्यांनी आपला हेका सोडला नाही. शेवटी मुलगा शोधून साखरपुडा करून ठेवण्यावर सर्वांचं एकमत झालं आणि लग्न त्यानंतर पुढं एक-दोन वर्षांत करण्याचं ठरलं. बिबीताज परतीच्या प्रवासात केवळ आणि केवळ याच विचारात होती. खरं तर लग्न ठरतंय म्हटल्यावर मुलीच्या मनात आनंदाचे तुषार उडायला हवेत; पण बिबीताज याला अपवाद होती. उद्या लग्न झाल्यावर आई-वडिलांच्या उदरनिर्वाहाचं कसं होणार, हाच प्रश्‍न तिला छळत होता. सध्या प्रकृती साथ देत नसल्यामुळं वडिलांना काम करणं जमत नव्हतं. स्वतःच्या लग्नाच्या विचारांपेक्षा घरच्या चिंतेनं बिबीताज अस्वस्थ झाली.

इकडं इक्‍बालभाईंनी ताबडतोब वरसंशोधनाची जोरदार सुरवात केली. नातेवाईक, मित्रमंडळी, समाजबांधवांमध्ये आपल्या मुलीसाठी मुलगा सुचविण्यास सांगितलं. काही दिवसांतच एक स्थळ आलं- जे इक्‍बालभाई आणि त्यांच्या मंडळींना पसंत पडलं. इक्‍बालभाईंनी निरोप पाठवला आणि मुलगी दाखवायचा कार्यक्रम ठरला. मुलगा सधन कुटुंबातला आणि सुशिक्षित होता आणि घरचा काही व्यवसाय बघत होता. बिबीताजला बघायला मुलासह त्याच्या घरातली काही मंडळी आली होती.
मुस्लिम समाजात मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम आजही खूप घरगुती, छोटेखानी स्वरूपात आणि जास्त गाजावाजा न करता केला जातो. अशाच या कार्यक्रमात चहापानानंतर बिबीताजला बोलावण्यात आलं आणि नेहमी विचारतात तशा प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. त्याला तिनं योग्य ती उत्तरं दिल्यानंतर ती आत जाईल, अशी पाहुण्यांना अपेक्षा होती. मात्र बिबीताजनं मोठ्या आत्मविश्वासानं; पण नम्रपणे विनंती केली ः ‘‘मला काही विचारायचं आहे, विचारू का?’’ अनपेक्षितपणे आलेल्या या प्रश्नामुळं पाहुण्यांसह तिचे आई-वडीलसुद्धा चकित झाले. पाहुण्यांनी बिबीताजला प्रश्न विचारायची परवानगी दिली.

मोठ्या अदबीनं बिबीताज म्हणाली ः ‘‘माझ्या आई-वडिलांनी मला खूप हिमतीनं, कष्टानं वाढवलं, शिकवलं आणि स्वतःच्या पायांवर उभं केलं आहे. या स्थळाला दोन्ही बाजूंनी संमती झाली, तर माझी एक विनंतीवजा अट राहील. ती म्हणजे लग्नानंतर मी माझे आई-वडील हयात असेपर्यंत दरमहा माझ्या पगारातला अर्धा पगार त्यांना देईन आणि याबद्दल मला कोणाचंही बंधन नको असेल. माझी अट मान्य असेल, तरच मी या स्थळाला होकार देईन.’’ बिबीताजकडून आलेली अनपेक्षित प्रश्नवजा अट ऐकून उपस्थितांत क्षणभर शांतता पसरली. बिबीताजच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अभिमान होताच; पण तिनं स्पष्टपणे घातलेल्या या अटीमुळं त्यांना संकोचही वाटला. आलेली पाहुणे मंडळी एकमेकांकडं पाहू लागली. मुलाच्या वडिलांनी प्रसंगावधान राखून शांततेचा भंग केला आणि म्हणाले ः ‘‘अरे वा! खूप चांगले विचार आहेत तुझे. आई-वडिलांचा तू इतका विचार करतेस, हे पाहून आम्हाला खूप बरं वाटलं. मात्र आम्हाला एकंदरीत सर्व बाबींवर विचार करायला वेळ लागेल. आमचा निर्णय आम्ही लवकरच तुम्हाला कळवू.’’

पाहुणे गेल्यानंतर इक्‍बालभाईंनी बिबीताजला जवळ घेत डबडबलेल्या डोळ्यांनी तिला म्हटलं ः ‘‘किती विचार करतेस तू आमचा. इतका समजूतदारपणा तू कोठून शिकलीस?...पण बेटा तू आमचा इतका विचार करू नकोस. तुझी अशी अट कोणीही मान्य करणार नाही आणि तुझ्या लग्नाला खूप उशीर होईल. तू असा विचार करणं सोडून दे. आमची काळजी करू नकोस. मी करीन काही तरी नोकरी; पण तू तुझे विचार बदल. तू तुझ्या आयुष्याचा विचार कर.’’ त्यावर जवळच उभ्या असलेल्या आईला बिलगत बिबीताज उत्तरली ः ‘‘लहानपणापासून बघते मी. तुम्ही आमचा सांभाळ किती प्रेमानं केलात. आमचे हवे-नकोत ते सर्व लाड तुम्ही पुरवलेत. स्वतःचा जरासुद्धा विचार न करता पडेल ती कामं करून, त्रास सोसून तुम्ही आमच्यावर संस्कार केले. मी मुंबईत शिकायला असताना माझ्या खर्चासाठी तुम्ही पैसे देत होता, तेव्हा ते घेताना मला काय यातना व्हायच्या, हे कसं सांगू? ते पैसे कमवण्यासाठी तुम्ही जीवापाड मेहनत करत होता, त्यामुळं मी तुम्ही दिलेल्या पैशांतला एक-एक पैसा खर्च करण्यापूर्वी दहा वेळा विचार करत असे- कारण तुमचे ते कष्ट माझ्या नजरेसमोर येत. तुम्ही माझ्यावर केलेल्या चांगल्या संस्कारांमुळंच आज मी चार पैसे कमवत असताना मला पण वाटतंय, की तुम्ही आता आराम करावा. प्रकृतीकडं लक्ष द्यावं. माझ्या जागी तुमचा मुलगा असता, तर त्यानं हे केलंच असतं ना? त्यामुळं तुम्ही मला कृपाकरून हे करायला नाही म्हणू नका.’’

हे सगळं ऐकून तिचे आई-वडील आपल्या अश्रूंचा बांध रोखू शकले नाहीत. इतक्‍या उच्च विचारसरणीची पोर आपल्या पोटी जन्माला आली, याचा त्यांना सार्थ अभिमान वाटला. बघून गेलेल्या पाहुण्यांकडून दोन-तीन आठवडे उलटूनसुद्धा काहीही निरोप आला नाही. परंतु याची ना बिबीताजला खंत होती, ना तिच्या आई-वडिलांना तमा. त्याच वेळी बिबीताजच्या आईकडच्या जवळच्या नात्यामधून एक स्थळ आलं. मुलाचा म्हणजेच महंमद सईदचा स्वतःचा ॲल्युमिनिअम स्लायडिंग विंडोजचा व्यवसाय होता.
नातं जवळचं असल्यामुळं बिबीताज आणि तो एकमेकांना लहानपणापासूनच ओळखत होते. त्यामुळं पसंती-नापसंतीचा प्रश्नच नव्हता. आपापसांत चर्चा करून आणि बिबीताजची संमती घेऊन इक्‍बालभाईनी त्यांना होकार कळवला. त्यानंतर दोन्ही पक्षांनी पुढची बोलणी करण्यासाठी बैठक घ्यायचं ठरवलं. त्यात सईदही उपस्थित होता. त्या वेळी बिबीताजनं आपली अट पुन्हा सर्वांसमोर मांडली. विशेषतः मुलासमोर. त्यावर क्षणाचाही विलंब न करता सईदनं होकार देत सांगितलं ः ‘‘अल्लाच्या कृपेनं मी माझ्या व्यवसायातून एक कुटुंब चालवू शकीन एवढे पैसे नक्कीच कमावतो आणि आपल्या मुस्लिम धर्माच्या शरियतीप्रमाणे माझ्या होणाऱ्या पत्नीच्या कमाईवर मी अधिकार गाजवणं हे धर्माविरुद्ध असेल. त्यामुळं लग्नानंतर तू तुझ्या पैशांचा विनियोग कसा करायचा, हे तू मला सांगायचीही आवश्‍यकता मला वाटत नाही.’’ सईदच्या या विचारांना त्याच्या घरच्यांनीही संमती दर्शवली. सईदकडून आलेला सविस्तर होकार ऐकून बिबीताजचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिच्या विचाराशी जुळणारा नव्हे, तिच्या विचारांची कदर करणारा मुलगा तिला सईदच्या रूपात भेटला होता. दोन्ही घरांत आनंदाचं वातावरण होतं. त्याच वेळी साखरपुडासुद्धा उरकून घेण्यात आला. योगायोगाची गोष्ट म्हणजे त्याच वेळेला महिन्यापूर्वी बिबीताजला पाहून गेलेल्या पाहुण्यांकडूनही होकार आला; पण त्यांना खूप उशीर झाला होता. नियतीनं जे ठरवलं, तेच घडणार होतं.

पुढं सहा-आठ महिन्यांत मुहूर्त काढून बिबीताज-सईदच्या लग्नाची तारीख निश्‍चित करण्यात आली. इतर मुलींप्रमाणं बिबीताजसुद्धा भावी आयुष्याच्या स्वप्नांत रंगून गेली आणि यातच लग्नाची तारीख कधी जवळ आली, हे तिलासुद्धा कळलं नाही.
इक्‍बालभाईंनी जमा केलेली थोडीफार रक्कम बिबीताजच्या लग्नात कामी आली. लग्न पारंपरिक पद्धतीनं करायचं ठरलं. पै-पाहुण्यांनी घर गजबजून गेलं. निकाहची वेळ सकाळी ११ वाजताची होती. रितीरिवाजाप्रमाणं काझीसाहेब, गवाह म्हणजे दोन्ही पक्षांचे साक्षीदार आणि दोन्ही घरांतली ज्येष्ठ मंडळी यांनी निकाहनाम्यावर सह्या करून व इतर मजकूर भरून लग्नाची कार्यवाही पूर्ण करायला सुरवात केली. प्रथेप्रमाणं सर्वांत शेवटी त्यावर मुलाची आणि नंतर मुलीची मंजुरी आणि सह्या घेतल्या जातात. साक्षीदार आणि ज्येष्ठ मंडळी बिबीताजची मंजुरी आणि सही घेण्यासाठी गेली असता, तिनं सह्या करण्यापूर्वी त्या मंडळींना आणि काझीसाहेबाना विनंती केली ः ‘‘लग्नानंतर माझे आई-वडील हयात असतील, तोपर्यंत माझा अर्धा पगार मी देण्याबद्दलची अट मला या निकाहनाम्यात समाविष्ट करायची आहे- जी आम्हा उभयपक्षांनी याआधीच मंजूर केली आहे.’’ अट ऐकून अचंबित झालेले काझीसाहेब विचारात पडले- कारण यापूर्वी त्यांनी असा प्रसंग अनुभवला नव्हता. काझीसाहेबांनी ताबडतोब दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठांसोबत आणि साक्षीदारांसोबत चर्चा केली आणि सर्वानुमते त्यांनी बिबीताजच्या त्या अटीला निकाहनाम्यात समाविष्ट केलं. सर्व संबंधितांच्या त्यावर सह्या घेतल्या आणि त्यानंतर हा सोहळा मोठ्या आनंदाच्या वातावरणात पार पडला.

लग्न लागल्यानंतर जेवण करून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी केवळ एकच चर्चा होती- ती म्हणजे आई-वडिलांचा विचार करून बिबीताजनं उचललेल्या निर्णयाची. लग्नाच्या शुभेच्छा देताना मंडपात इक्‍बालभाईंना भेटणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या गुणी मुलीचीच तोंडभरून स्तुती करत होती. इक्‍बालभाई मला घडलेला घटनाक्रम मोठ्या अभिमानानं सांगत होते. ते सांगत असलेले प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर जसेच्या तसे येत होते आणि अचंबित होऊन मी त्यांचे शब्द कानात साठवत होतो. घरातले संस्कार आणि दिलेलं शिक्षण मुलांना कोणत्या पातळीवर घेऊन जाऊ शकतात याचं बिबीताज हे एक आदर्श उदाहरण होतं. वृद्धापकाळात आई-वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी फक्त मुलांचीच नसून, वेळप्रसंगी आम्ही मुलीसुद्धा ही जबाबदारी मोठ्या हिमतीनं पार पाडू शकतो, हेच बिबीताजनं जगाला दाखवून दिलं. या निर्णयात तिचं कौतुक जितकं आहे, तितकंच किंबहुना त्यापेक्षाही थोडं जास्त कौतुक तिच्या पतीचं आहे. कारण त्यानं कधीही या निर्णयाबाबतीत ‘वर’ असल्याचा ‘वरचढपणा’ दाखवला नाही- उलट परिस्थितीची जाणीव ठेवून पत्नीच्या भावनांची कदर राखली.

...इक्‍बालभाई ही आगळीवेगळी कहाणी सांगत असताना त्याच वेळेस चहाचा ट्रे घेऊन बिबीताज आमच्यासमोर आली. तिच्याकडं अभिमानानं बघत तिला सॅल्यूट करण्यासाठी माझा हात वर गेला, हे मलाही समजलं नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com