कुबट कोपऱ्याचं भान...

शैलेश पांडे
रविवार, 18 जून 2017

"एज इज ऍन इश्‍यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर, इफ यू डोन्ट माइंड, इट डजन्ट मॅटर...' हे वाक्‍य मार्क ट्‌वेनच्या नावाने खपवले जाते. तसे ते कुणाचेही असो..., वयाची दखलच घेतली नाही तर त्याचा त्रास होत नाही, असा त्याचा दिलासादायक आशय. पण, वय शेवटी प्रत्येकाला असतेच. मनाने कितीही हिरवी स्वप्ने पाहिली तरी शरीराचे वय होतेच. शरीर थकतेच. हे थकणे, वय होणे आणि वयानुसार शारीरिक क्षमतांमध्ये न्यून येणे कुणालाही चुकलेले नाही. रोज पहाटे योगाभ्यास करणारा असो वा रोज झोपण्यापूर्वी दोन पेग घेणारा असो, मागे-पुढे आणि कमी-जास्त प्रमाणात शरीर थकतेच. साऱ्याच मर्त्य प्राण्यांना हा नियम लागू आहे.

"एज इज ऍन इश्‍यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर, इफ यू डोन्ट माइंड, इट डजन्ट मॅटर...' हे वाक्‍य मार्क ट्‌वेनच्या नावाने खपवले जाते. तसे ते कुणाचेही असो..., वयाची दखलच घेतली नाही तर त्याचा त्रास होत नाही, असा त्याचा दिलासादायक आशय. पण, वय शेवटी प्रत्येकाला असतेच. मनाने कितीही हिरवी स्वप्ने पाहिली तरी शरीराचे वय होतेच. शरीर थकतेच. हे थकणे, वय होणे आणि वयानुसार शारीरिक क्षमतांमध्ये न्यून येणे कुणालाही चुकलेले नाही. रोज पहाटे योगाभ्यास करणारा असो वा रोज झोपण्यापूर्वी दोन पेग घेणारा असो, मागे-पुढे आणि कमी-जास्त प्रमाणात शरीर थकतेच. साऱ्याच मर्त्य प्राण्यांना हा नियम लागू आहे. पण, वय झालेल्या माणसांप्रतिचे आपल्या कथित संस्कृतिप्रेमी देशाचे वागणे या नियमाचे अजिबात भान नसल्याचे सांगणारे आहे. दरवर्षीप्रमाणे "फादर्स डे'चे वातावरण निर्माण होत असताना एका स्वयंसेवी संस्थेचा साऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा अहवाल आला आहे. "हेल्पेज इंडिया' नावाची स्वयंसेवी संस्था नियमितपणे भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या स्थितीविषयी सर्वेक्षण करून अहवाल सादर करते. या अहवालातून ज्येष्ठांच्या स्थितीचे वास्तव आपल्याला कळत असते. "हेल्पेज'चा ताजा अहवाल सार्वजनिक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या हीन दर्जाच्या वागणुकीसंबंधीचा आहे.

तब्बल 44 टक्के ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी वाईट वागणूक मिळते, असे हा अहवाल सांगतो. काही लोकांनी लगेच त्यावर "रिऍक्‍शन' दिली आणि 100 टक्के ज्येष्ठांना वाईट वागणूक मिळत असल्याचे सांगून हा अहवाल केवळ अर्धसत्य सांगणारा ठरवला आहे, हा भाग वेगळा. 100 टक्के असे घडते, असे मानणे ही अतिशयोक्ती होईल. पण, मोठ्या प्रमाणात ज्येष्ठांना वाईट वागणूक मिळते, हे मात्र आपल्याला नाकारता येत नाही. भोवताली नजर फिरवली तरी या वास्तवाचे दर्शन घडल्याशिवाय आणि त्याच वेळी आपला कथित सुसंस्कृत समाज ज्येष्ठांच्या बाबतीत बऱ्यापैकी क्रूर असल्याचे वाटल्यावाचून राहत नाही.

वय झाल्यावर माणसं अधिक एकाकी होतात. अधिक हळवी होतात. मंदिरांच्या बाकड्यांवर किंवा बाग-बगीच्यांमध्ये सकाळ-संध्याकाळ वेळ घालवायला येणाऱ्या ज्येष्ठांचे आपसातले बोलणे जरा लक्षात घ्या. त्यातली अर्धीअधिक माणसं विनाकारण समकालीन राजकीय-सामाजिक विषयांवर तावातावाने बोलत असतात. त्यांच्या जीवनातले रिकामपण भरून काढण्याचा प्रयत्न असतो तो. पण, मध्येच त्यांचे वैयक्तिक जगणे डोकावत असते. कुणाच्या मुलाचा, मुलीचा, सुनेचा किंवा जावयाचा विषय येतो. क्वचितप्रसंगी आपल्या अपत्याकडून मिळणारी आस्था-प्रेम हा त्यातल्याच बहुतेकांच्या असूयेचा विषयही ठरतो. पण, बहुतेकदा थोड्याफार फरकाने अनेकांची कहाणी सारखी असते...घरी आणि दारीही!...आमचे एक डॉक्‍टर मित्र आहेत. ते ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीचे विशेषज्ञ. रोगनिदानात अव्वल. पण, हा माणूस आपल्या समाजाच्या ज्येष्ठांप्रतिच्या अनास्थेमुळे चिंतित असतो. ""त्या ज्येष्ठाच्या चेहऱ्यावर मला त्याचे आजार दिसत असतात...कुणाला असह्य वेदना होत असतात, कुणाचे इन्फेक्‍शन वाढलेले असते, कुणाचे सांध्यांचे दुखणे असह्य पातळीवर गेलेले असते तर कुणाला आणखी काहीतरी व्याधी असते.

वाढलेले वय हीच एक व्याधी असते. पण, अनेक घरांमध्ये असा खटाटोप सुरू असतो, की डॉक्‍टरने यावे आणि जुजबी तपासून म्हातारबोवांना किंवा बाईंना सांगावे- "तुम्हाला काहीही झालेले नाही!''... त्या ज्येष्ठाची फसवणूक आणि डॉक्‍टरची परस्पर बोळवण. खर्च लागू नये म्हणून. त्या ज्येष्ठाने कमावलेल्या संपत्तीचा आस्वाद घेत असलेली औलाद हे करीत असते. त्या ज्येष्ठाच्या नावावर असलेल्या घरात राहणारी मुले-बाळे आणि सुना हे करीत असतात. ज्यांनी रक्ताचे पाणी करून आपल्या मुलांना जगण्याच्या स्पर्धेत धावण्यालायक बनविलेले असते, त्यांचीच स्वतःची मुले आपल्या आईबापांना जगण्याच्या स्पर्धेतून पार बाद करीत असतात. त्यांच्याशी निष्ठुरपणे वागत असतात. स्वतःच्या घरात राहणाऱ्या ज्येष्ठांच्या वाट्याला येणारा छळ हा सुना किंवा जावयांच्या तुलनेत स्वतःच्या मुला-मुलींकडून अधिक असतो, असे सांगणारा एक अहवाल यापूर्वी आला होता. म्हणजे स्वतःच्या घरात हेच हाल आहेत. घरांचे कैदखाने आणि वृद्धाश्रमांची दुकाने झालेली असताना चव्हाट्यांवर नाइलाजास्तव निघाल्यावरदेखील ही पिकली पाने अवहेलनेचा सामना करतात, हे त्यांनी कुणाला सांगायचे? अनेकांनी त्यामुळे स्वतःला घरातली खोली (हीसुद्धा प्रत्येकाच्या नशिबात नसते...अनेकांच्या प्राक्तनी घर असलेच तर त्या घरातला कुबट वास येणारा कोपरा, मळकट बिछाना, कळकट ताट-वाट्या असे सारे असते...) किंवा कोपऱ्यापुरते कोंडून घेतलेले असल्याचे भीषण वास्तवही हा अहवाल सांगतो.

तारुण्याचा किंवा देहातल्या ताकदीचा माज असलेल्यांचा घरांमध्येच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणांवर, रस्त्यांवर, चौकांवर चाललेला हैदोस हा ज्येष्ठ नागरिकांपुढचा मोठा प्रश्‍न आहे. कुठल्या तरी ज्येष्ठ नागरिकाची नातवंडे असलेले तरुण चारचाकी वाहने आणि बाइक्‍स इतक्‍या जोरात आणि विचित्रपणे रस्ते व गल्ल्यांमधून चालवितात, की छाती दडपून जावी. बोलायची सोय नाही. समजावून सांगण्याची सोय नाही. "जा रे म्हातारड्या' किंवा "आम्हाला अक्कल शिकवू नका', अशी मुजोरी करण्यात ही पिढी पटाईत आहे. मध्यस्थांना मारहाण करण्यापर्यंत मजल जाण्याचे हे दिवस आहेत. रस्त्यांवर पुरेशी दिवाबत्ती, ज्येष्ठांना चालता येईल असे चांगले-मोकळे रस्ते, मुताऱ्या या साऱ्या गोष्टी आपल्या देशात स्वप्नवत आहेत. रस्त्यावर चालणाऱ्या ज्येष्ठांना धड वागविणारे लोकसुद्धा अत्यल्प असावेत, हे आपल्या संस्कृतिप्रेमाचे केवढे मोठे उदाहरण! ज्या संस्कृतीत नारीपूजेला सर्वाधिक महत्त्व दिले गेले, तिथे नारीवर सर्वाधिक अत्याचार. ज्येष्ठ नागरिकांचेही तेच. बोलायला अनुभवाचे संचित वगैरे म्हणायचे, पण ज्येष्ठांशी वागताना वाईटच वागायचे, याला संस्कार म्हणायचे का? आपल्या समाजाच्या दृष्टिकोनाचे काही प्रश्‍न आहेत. ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या त्या दृष्टिकोनातून आलेल्या आहेत.

स्त्री म्हणून जन्माला येण्यात कोणतेही न्यून नाही, हे जसे आपल्या मनावर शाळेत किंवा घरात, उक्ती वा कृतीतून बिंबविले जात नाही, त्याचप्रमाणे म्हातारपण कुणालाही चुकलेले नाही, हे भान देण्याचा कोणताही प्रयत्न होत नाही. त्यामुळे स्त्रीबद्दल माणूस म्हणून खरा सद्‌भाव बव्हंशी लोकांच्या मनात निर्माण होत नाही, तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत घडते. आपण कधीच म्हातारे होणार नाही, याच मस्तीत बहुसंख्य माणसं वावरत असतात. त्यांच्या वाट्याला शरीर थकल्यावरचे दिवस येतात तेव्हा त्यांनीही नव्या पिढीकडे तितकेच हताशपणे पाहायचे असते. त्यापेक्षा आता सुधारलेले काय वाईट?... मुले अनुकरणशील असतात. आईवडिलांकडे पाहून ते शिकत असतात. आपण आपल्या आईवडिलांशी जसे वागतो, तसेच आपली मुले आपल्याशी भविष्यात वागणार आहेत, याची खूणगाठ तारुण्याची किंवा शारीरिक ताकदीची मस्ती चढलेल्या प्रत्येकाने आताच बांधून घ्यावी. आपल्या वयस्क बापाच्या घामाची दुर्गंधी ज्या मुलांना येत असेल, (त्यांच्या मुलांनी त्यांना घरात ठेवले तर...) त्यांच्यासाठीही तसाच कुबट कोपरा ठरलेला आहे, हेही त्यांनी लक्षात ठेवावे. "फादर्स डे' किंवा "मदर्स डे'ला सोशल मीडियावरून मातृ-पितृभक्तीला पूर आलेला असतो. त्या पुरातले दोन थेंब प्रत्यक्षात वाहू द्या ना...घरात आणि घराबाहेरही पिकल्या पानांना जरा सांभाळा ना!

 

Web Title: fathers day old father shailesh pande