दहशतवादातून घेतलेले लढे आणि धडे

अनेक दहशतवादी हल्ल्यांतून बोध घेत इंग्लंडने ते रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या. सामान्य नागरिकांनी त्यासाठी लढा दिला. त्याकरिता जनजागृती महत्त्वाची ठरली.
terrorism
terrorismsakal

- वैभव वाळुंज

अनेक दहशतवादी हल्ल्यांतून बोध घेत इंग्लंडने ते रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या. सामान्य नागरिकांनी त्यासाठी लढा दिला. त्याकरिता जनजागृती महत्त्वाची ठरली.

भारतातील महत्त्वाच्या शहरांसारखा इंग्लंड देश सुरक्षेच्या दृष्टीने नेहमीच विविध हिंसक विचारधारेच्या दहशतवादी कृती घडवून आणणाऱ्या संघटना आणि संस्थांच्या रडारवर राहिलेला आहे. वेळोवेळी शहरांमध्ये झालेल्या दंगली असोत की चाकू अथवा बॉम्ब अशा साधनांनी करण्यात आलेले दहशतवादी हल्ले, इंग्लंडच्या एकूण परिस्थितीत हिंसक कारवायांपासून बचाव करण्यासाठी मोठी धडपड चाललेली दिसते.

लंडनसारखं शहर अनेकदा दहशतवादी हल्ल्यांच्या संकटाला बळी पडलं आहे. मात्र, असं असूनही विविध दहशतवादी हल्ले झाल्यानंतर इंग्लंडने त्यापुढील अशा अनेक घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या. दहशतवादी हल्ल्यांवर अंकुश आणला. मात्र, हे कसं घडलं याचा लेखाजोखा आणि शासकीय धोरणं ते अगदी शेवटच्या पातळीवर सामान्य नागरिकांनी केलेली तयारी, याकडे पाहणं फार रंजक आहे.

जगातील कोणतेही देश दहशत व दहशतवाद्यांच्या ताब्यातून सुटलेले नसताना इंग्लंडने मात्र काही प्रमाणात अशा घटनांवर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडच्या काळात विविध शहरांमध्ये चाकूचा धाक दाखवून किंवा तरुण मुलांकडून विविध मार्गांनी दहशतवाद व त्याचा अवलंब केल्याची एखाद दुसरी घटना ऐकिवात येतेच.

मात्र, त्यापलीकडे पाहिलं असता इंग्लंडने आपल्या भूमीवर घडणाऱ्या दहशतवादी कारवायांवर मोठ्या प्रमाणात अंकुश लावला आहे, असं दिसून येतं. अर्थात दहशतवाद कशाला म्हणणार, याची व्याख्या एकच एक नसली, तरी मोठ्या प्रमाणात घडणाऱ्या हिंसक कारवाया थांबवण्यात यंत्रणेला यश आल्याचं दिसतं. मात्र, ते यश फक्त शासन यंत्रणेचंच नसून त्यात सामान्य नागरिकांचा आणि त्याच बरोबरीने तंत्रज्ञानाचाही वाटा महत्त्वाचा आहे.

इतर कुठल्याही देशाप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना संशयास्पद गोष्टींपासून सतर्क राहण्याची सूचना केली जाते. हल्ले रोखण्यासाठी असे नियोजन करणाऱ्या संघटनांच्या प्रयत्नांना पहिल्या पातळीवरच रोखण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ, असे हल्ले करण्यासाठी सहसा संघटना टेहळणी किंवा अशा ठिकाणांना भेटी देऊन त्या जागांचं अवलोकन करून हेरगिरी करत असतात.

हल्ला करण्याच्या तयारीत असणाऱ्या पातळीवर जाण्यापूर्वीच अशा संघटनांना याच पातळीवर रोखण्याचा प्रयत्न केला जातो. वर्दळीच्या ठिकाणी गस्त ठेवणं, हालचाली न्याहाळणं आणि तंत्रज्ञांची मदत घेऊन संशयास्पद हालचाली रोखण्यावर लक्ष दिलं जातं.

आता अशा गोष्टी आपल्याकडेही होतात किंवा पोलिसांची संख्या वाढवून वा लोकांच्या मागे ससेमिरा लावत त्यांच्या अधिकारांवर गदा आणत अशा यंत्रणा चालतात, असा युक्तिवाद केला जाऊ शकतो. अशा गोष्टी खऱ्या असल्या तरी येथील यंत्रणेत एक मूलभूत फरक आहे तो म्हणजे नागरिकांचा आणि यंत्रणेचा परस्पर सहभाग. गस्त घालण्यासाठी इथे पोलिसांची संख्या वाढवण्यात आलेली नाही, तर त्याविषयी नागरिकांनाच जागरूक करण्यात आलं आहे. नागरिक हे यंत्रणेचा भाग आहेत, असं समजून त्यांना शासनाकडून माहिती देऊ करणारे घटक म्हणून पाहिलं जातं.

शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था, हॉटेल आणि दुकानं अशा सर्वांना यंत्रणेकडून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या संशयास्पद हालचाली कशा ओळखाव्यात, सोप्या पायऱ्या वापरून त्यांचं वर्गीकरण कसं करावं आणि अगदी थोडाही धोका जाणवल्यास यंत्रणेशी संपर्क कसा करावा, याचं प्रशिक्षण दिलं जातं.

‘ॲक्शन काऊंटर टेररिझम’ नावाने ओळखला जाणारा कोर्स हा सर्वच नागरिकांना आपापल्या पातळीवर अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर काय करावं, याची माहिती देतो. त्यामुळे नागरिक हेच यंत्रणेचे डोळे म्हणून काम करतात. अगदी प्रत्येक जागी कॅमेरे न बसवता किंवा अण्णा भाऊ साठेंच्या शब्दात कावळ्यांइतके जागोजाग पोलिस रस्त्यावर न आणता लोक आणि यंत्रणा यांच्यातील संवादाला सोपं, सुखकर आणि आश्वस्थ करून हा परिणाम साधला जातो.

कोणताही नागरिक पोलिसांशी संवाद साधण्यास, अगदी लहानशी गोष्ट नजरेस आली, तर ती दाखवून देण्यास, प्रसंगी पोलिसांना उलट प्रश्न विचारण्यास कचरत नाही. यंत्रणेकडे अधिकारी म्हणून नव्हे; तर सेवा पुरवठादार म्हणून पाहिलं जातं. म्हणूनच मांजर झाडावर अडकली, जॅकेट विसरलं, रस्ता, बस वा ट्रेन चुकली, अस्वस्थ वाटू लागलं तरी पोलिसांची मदत घेणारे लोक दिसून येतात.

त्याला नीतिमत्ता किंवा नैतिकता म्हणून न पाहता फक्त सरळ व्यवहार म्हणून पाहिलं जातं. त्यासोबतच पोलिसांवर बॉडी कॅमेरा आणि इतर माध्यमांतून पाळत ठेवली जाते आणि त्यांच्याकडून नागरिकांशी गैरवर्तन होणार नाही, याची दक्षता घेतली जाते. त्यात लोकसंख्येचा मुद्दा चर्चेला येणं स्वाभाविक आहे. आपली लोकसंख्या प्रचंड असल्याने भारतात अशा गोष्टी असणं अशक्य आहे, असा दावाही फार काळ टिकणार नाही.

कारण त्यातील अनेक गोष्टी या परस्पर संवाद, प्रशिक्षण आणि सौहार्दावर आधारलेल्या आहेत. देशाची सुरक्षा राखण्यासाठी फक्त आक्रमक बनून चालत नाही. खऱ्या अर्थाने देशाच्या अंतर्गत रचनेला समजून नागरिकांना सुरक्षा व्यवस्थेचे भागीदार म्हणून पाहिलं असता ती आपसूक राखली जाते. म्हणून इथे २००६ नंतरचे अनेक मोठे हल्ले रोखण्यात यश आलं आहे.

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत ‘नीती व धोरण’ या विषयावर संशोधन करत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com