संपला पाऊसकाळ ! (अरण्यगाथा)

शेखर नानजकर 
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

आभाळ निळं झालं. आज आभाळात एकही ढग तरंगत नाहीये. ज्येष्ठात पडू लागलेला पाऊस आत्ता गेला! चार महिने जंगलानं अंगावर पाऊस झेलला. डोंगर, दऱ्या, कपारी, सुळके, सडे, पाठारं, ओढे, झाडं, झुडपं, वेली, सगळं सगळं पाण्यानं नखशिखांत न्हाउन निघालं. बोटभर जागा कोरडी राहिली नाही. आभाळातून बदाबदा पडणारं पाणी, झाडावरून टपटप झुडपांवर पडत राहिलं. झुडपांवरून थेंब थेंब गवतावर पडलं. जमिनीत मुरत राहिलं. जमीनही आकंठ तृप्त झाली आणि तिनंही पाणी बाहेर टाकायला सुरुवात केली. चार महिने काहींना खूप जड गेले. काहींना स्वर्गात असल्यागत वाटलं.

आभाळ निळं झालं. आज आभाळात एकही ढग तरंगत नाहीये. ज्येष्ठात पडू लागलेला पाऊस आत्ता गेला! चार महिने जंगलानं अंगावर पाऊस झेलला. डोंगर, दऱ्या, कपारी, सुळके, सडे, पाठारं, ओढे, झाडं, झुडपं, वेली, सगळं सगळं पाण्यानं नखशिखांत न्हाउन निघालं. बोटभर जागा कोरडी राहिली नाही. आभाळातून बदाबदा पडणारं पाणी, झाडावरून टपटप झुडपांवर पडत राहिलं. झुडपांवरून थेंब थेंब गवतावर पडलं. जमिनीत मुरत राहिलं. जमीनही आकंठ तृप्त झाली आणि तिनंही पाणी बाहेर टाकायला सुरुवात केली. चार महिने काहींना खूप जड गेले. काहींना स्वर्गात असल्यागत वाटलं. सतत ढगांनी भरलेलं आभाळ, अंधारं, कुंद वातावरण, सतत पाणी, ओलं, चिखलानं माखलेलं वातावरण…. काहींना हे फारच भावलं होतं. काहींना मात्र त्या वातावरणाचा खूप त्रास झाला होता.

ओढ्याच्या पाण्यानं सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या. आपल्या अचाट ताकादिचं अफाट दर्शन करत ते रोरावत होतं. पालापाचोळा, काटक्या, फांद्या इतकंच काय मोठमोठ्या शिळा सुद्धा त्यांच्या ताकदीपुढे पाचोळ्यासारख्या उधळत होत्या. मोठमोठे ओंडके, दगड, खडक सुद्धा ओढ्यांनी वाहून आणले होते. पाण्याचा ओघ कमी झाल्यावर या त्या वळणाला ते कुठल्याश्या खडकांना अडकून विसावले होते. स्फटिकासारखं स्वच्छ पाणी अजूनही दुथडी भरून वाहत होतं. अजून ओल इतकी होती की खडकांवरसुद्धा शेवाळ्याचं पांघरुण होतं. चार महिन्याच्या पावसानं ओढा मुळापासून खरवडून निघाला होता. अजून काही दिवस पाण्याची धार कमी होणार नाही. कडेकपारीत साठलेलं पाणी अजून खालपर्यंत यायचंय. चार महिने धो धो धावूनही ओढे अजून दमल्यासारखे वाटत नाहीयेत.

ओढ्यात बेडकांचा आवाज आता मंदावलाय. वैशाखातच त्यांनी ओरडायला सुरुवात केली होती. ज्येष्ठात तर त्यांनी जंगलंच डोक्यावर घेतलं होतं. घश्याच्या पिशव्या टरटरून फुगवल्या. माद्यांना हाका मारूनमारून त्यांचे घसे कसे बसले नाहीत कुणास ठाऊक? खूप माऱ्यामाऱ्या केल्या. पाहिजे ती मादी मिळवली. मग माद्यांनी अंडी घातली. काहींनी पाण्यातच, तर काहींनी पाण्याजवळच्या झुडुपांच्या पानांवर घातली. काही दिवसात अंड्यातून पिल्लं बाहेर आली. पुढे त्यांचे बेडूकामासे झाले. शेपटी वळवळत पाण्यात पोहू लागले. आता त्यांच्या शेपट्या गेल्यात. आता ते बेडकांसारखेच दिसतात. पण अजून ती बळंच आहेत. बेडकांचं ओरडणं आता मंदावलय!

तुटून पडलेल्या फांद्यांवर भूछ्त्रांनी, अळंबीनी उगाचाच थोडा जिवंतपणा आणला होता. निरनिराळ्या रंगांची, आकाराची भूछत्र त्यांच्यावर जमेल तिथं उगवली होती. रसरसून तरारली होती. ओल्या कुजलेल्या पाचोळ्यात ती दिव्यासारखी चमकून दिसत होती. जमिनीवर आलेली भूछत्र बटणा एवढ्या आकारापासून तटाएवढ्या आकारापर्यंत वाढली होती. बुरश्या उगवल्या होत्या. मरून पडलेली एकाही गोष्ट त्यांनी सोडली नव्हती. खडकांवर दगडफुलं पसरली होती. पण भूछत्र आता मलूल पडली होती. त्यांचे पांढरे रंग आता मळकट झाले होते. छत्र्या आता मिटू लागल्या आहेत. भूछ्त्रांचं वैभव या वर्षीपुरतं तरी ओसरू लागलंय. वाळलेल्यांनी आता बीजं उधळली आहेत. त्याचं जीवनकार्य संपत आलंय.

जळवांनी गेले चार महिने उच्छाद मांडला होता. बेडकानपासून गाव्यांपर्यंत जमेल त्याचं रक्त त्यांनी शोषलं. बिबटेही त्यातून सुटले नाहीत. हालचाल करणारी कोणतीही गोष्ट त्यांनी सोडली नाही. पोटभर रक्त प्यायल्या! पण आता त्याही मलूल झाल्यात. ज्येष्ठासारखी तरारी आता त्यांच्यात दिसत नाही. ज्येष्ठातच गोगलगाई सुद्धा दिसू लागल्या होत्या. चार महिने त्याही दामादमानं फिरल्या. अजूनही दिसतात. पण त्यांचा मंदपणा जाणवत नाही. त्या मुळच्याच मंद! गोमांसारखी लगबग त्यांना नसते. गोमा फारच तडतड्या! वेगवेगळ्या रंगाच्या आणि आकाराच्या गोमा गेले चार महिने वळवळ फिरल्या, छोटे छोटे जीव पोटभर खाल्ले. आता त्या अधूनमधून दिसतात. काळ्या पाचोळ्यात, अंधाऱ्या जागी. शक्यतो उघड्यावर येत नाहीत. गांडूळही मधूनमधून दिसतात. पण शक्यतो अंधाऱ्या जागी!

गेले चार महिने या सगळ्याचं नंदनवन होतं. पाऊस होता, कुंद हवा, सर्दपणा, ओलेपण, अंधारलेलं, अगदी त्यांना हवं तसं! पण आता त्यांचे वरचे दिवस संपत आलेत. आता ऊन पडेल. हवा कोरडी होईल. मग ‘वर’ जगता येणार नाही. जमिनीखाली जावंच लागेल. पुढच्या पाऊसकाळापर्यंत!
मागच्याच वर्षी अनेक किड्यांनी अंडी दिली होती. कुठे पानांखाली, कुठे फांद्यांवर, कुठे आडोशाला, कुठे खडकांच्या सपाट्यान्मध्ये. आषाढात त्यातून आळ्या बाहेर आल्या होत्या. काही आळ्या होत्या, तर काही सुरवंट होते. आषाढात आलेली हिरवी फूट त्यांनी श्रावणापर्यंत खा खा खाल्ली. मग त्यांनी कोष केले आणि त्या सुप्त झाल्या. काही दिवसात त्यातून फुलापाखारं, पतंग आणि निरनिराळे किडे बाहेर पडले. ते उडून गेलेत. फाटके कोष फक्त झाडाला अजूनही चिकटून आहेत. भाद्रपदाच्या शेवटी फुलखारांनी जंगलं भरून गेलं होतं. ती दिवसा उडायची. रात्री पतंगांनी गर्दी केली होती. त्यांना मटकावून वेडे राघू खरंच वेडे झाले होते, कोतवालांनाही मजा आला होता. रात्री वाघळं, पतंग फस्त करत होती.

मुंग्यांना मात्र पाऊसकाळ अवघड गेला. पावसानं बाहेर पडणं अवघड केलं होतं. पण त्यांनी त्याची बेगमी आधीच केलेली होती. हिरव्या पानांचे तुकडे करून त्यांनी बिळात आणून ठेवले होते. त्यावर आपली लाळ लाऊन ठेवली होती. काही दिवसांनी त्या पानांवर बुरशी उगवली. ती बुरशी खावून त्यांनी दिवस काढले होते. पण या काळात त्यांनी खूपच काम केलं होतं. राणी मुंगीनं याच काळात हजारो अंडी घातली. ती अंडी मुंग्यांनी दुसऱ्या खोलीत नीट लाऊन ठेवली. काही दिवसात त्यातून आळ्या बाहेर आल्या. मुंग्यांनी त्यांना बुरशी खायला घालून वाढवलं. बिळात पाणी येऊ नये याची व्यवस्था केली. आतलं तापमान कायम राहावं म्हणून बिळाचं तोंड कमीजास्त केलं. हळूहळू आळ्या वाढल्या. त्यांनी कोष केले. त्यातून मुंग्या बाहेर आल्या. आता पाऊस थांबलाय. मुंग्यांची मोठी फौज जंगलावर हल्ला करायला सज्ज आहे.

मधमाशांनी मात्र आशा ठिकाणी आपली पोळी बांधली होती, की जिथे पावसाचा फारसा त्रास नव्हता. पण पावसात फिरून मध गोळा करणं त्यांना जिकीरीचं होतं. त्यात पाउसकाळात फुलं फारशी उमलत नाहीत. ज्येष्ठ, आषाढ तसेच गेले. श्रावणात ऊन पडलं. पण फुलं भाद्रपदात फुलली. सोनकी फुलली, तेरडा फुलला, कोरांटी फुलली. माळच्या माळ फुलांनी पांघरून गेले. मग मधमाश्या उधळल्या! त्यांनी फुल अन फुलं धुंडाळलं. सगळ्या फुलात मकरंद नव्हता! त्यांनी मकरंद असलेली फुलं शोधली. त्यातला थोडा मकरंद खाल्ला. बराचसा बरोबर घेतला. दूरवर वाहून आपल्या पोळ्यात आणला. साठवला. आपल्या आळ्यांनाही भरवला.

आता पाऊस संपलाय. अजून फुलं उमलतील. पण थंडी पडेपर्यंतच! मग पुढचा हंगाम चैत्रात येईल.

पाउसकाळात सांदिकोपऱ्यात, फटींमध्ये, बिळात पाणी शिरलं. सापांना बाहेर पडावंच लागलं. पण त्यांना त्याचं दुखः नव्हतं. त्यांच्या मिलनाचा काळ आला होता. नर वासाचा मग काढत माद्यांच्या मागे फिरू लागले. एकेका मादिमागं चारपाच नर फिरू लागले. नरांच्यात मारामाऱ्या होऊ लागल्या. ताकदीनं कमी पडलेले नर मैदान सोडून पळू लागले. विजयी नर मादीकडे जाऊ लागले. माद्या उगाचच आढेवेढे घेऊ लागल्या. पण शेवटी जमलं! ज्येष्ठ आणि आषाढभर असंच चाललं होतं. मग माद्यांनी अंडी दिली आणि त्या कुठेतरी निघून गेल्या. काही दिवसांनी अंड्यातून पिल्लं बाहेर आली. त्यांनी आई बाप पहिलेच नव्हते. पण त्यानं फारसं काही बिघडलं नव्हतं. बाहेर आलेली पिल्लं इतस्ततः विखुरली. पुन्हा एकमेकांना कधीच न भेटण्याकरता! कात टाकत टाकत आता ती थोडीशी वाढलीत. पहिल्या दिवसापासून स्वतःच शिकार करतात. त्यातून आता पाऊसही संपलाय!

(उर्वरीत ‘संपला पाऊसकाळ’ पुढच्या भागात....) 
 

Web Title: Forest after rains