मैत्री हळूहळू फुलतेय...

मैत्री हळूहळू फुलतेय...

जोडी पडद्यावरची
गौरव घाणेकर आणि अमृता पवार स्टार प्रवाहवरील ‘ललित २०५’मध्ये एकत्र काम करीत आहेत. त्यांच्या या सेटवरच्या गप्पा सांगताना अमृता म्हणाली, ‘‘गौरव या मालिकेत आला तेव्हा मालिकेचे १०० भाग झाले होते. आम्हाला समजलं, की आता गौरवची एंट्री होणार आहे तेव्हा थोडं टेन्शन आलं होतं, कारण आम्हा सगळ्यांचा चांगला रॅपो तयार झाला होता आणि नवीन कलाकार आला की, त्याच्याबरोबर पुन्हा केमिस्ट्री कशी जुळून येईल, तो कसा असेल, कोणत्या गोष्टीला कसा रिॲक्‍ट होईल, अशा अनेक शंका मनात येत होत्या. शिवाय संग्राम आणि वरदनं मला त्याच्याबद्दलची खोटी माहिती देऊन घाबरवलं होतं. गौरव खूप अबोल, शिस्तप्रिय आहे. कामाव्यतिरिक्त फारसं बोललेलं, हसलेलं, खिदळलेलं त्याला आवडत नाही. तो फक्त हिंदीतच बोलतो. मी तर सेटवर खूप बोलते, मग याच्याबरोबर कसं काम करणार, अशी भीती वाटली. सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे त्यांनी मला सांगितलं, की गौरवला मराठी वाचता येत नाही. त्याला उर्दू खूप छान येत असल्यानं त्याची स्क्रिप्ट उर्दूमध्ये लिहून येईल. मलाही हे खरं वाटलं. मी म्हटलं, ‘असा कसा सहकलाकार येतोय! कसं जमणार आमचं?’ पण पहिल्या दिवशीच तो आला आणि आमच्याशी खूप छान बोलला आणि पुढं एक-दोन दिवसांत खूप छान ॲडजस्ट झाला.’’

या अनुभवाविषयी गौरव म्हणाला, ‘‘सुरवातीला अमृताला भेटलो तेव्हा ती माझ्याशी फारशी बोलत नव्हती, पण आम्ही आमची जोडी लोकांमध्ये प्रसिद्ध व्हावी म्हणून सोशल मीडियावर फोटो वगैरे टाकायचं ठरवलं. तेव्हा बहुधा हळूहळू अमृताला कळलं की, तिला मी जसा वाटत होता तसा अजिबातच नाही. त्यानंतर आमची चांगली मैत्री झाली. अमृता खूपच चांगली आणि मेहनती आहे. अतिशय सकारात्मक विचार करणारी आहे.’’ 

चांगली मैत्री झाली की आपल्याला एकमेकांचे गुण-अवगुण कळायला लागतात. तुम्हाला एकमेकांमध्ये काय आवडतं आणि काय खटकतं, असं विचारल्यावर अमृता म्हणाली, ‘‘आमची मैत्री होऊन महिनाच झालाय त्यामुळे खटकण्यासारखं अजून तरी आम्हाला काही सापडलं नाही. गौरव खूपच मस्त आहे. सगळ्यांशी खूप अदबीनं बोलतो, खासकरून मुलींशी तो खूप मॅनर्सनं बोलतो, जे आज काल खूप दुर्मीळ झालंय. तो कमी बोलतो; पण मुद्देसूद बोलतो. खाण्यापिण्याच्या बाबतीत खूपच काटेकोर आहे. नॉनव्हेज खायला त्याला प्रचंड आवडतं. रोज संध्याकाळी तो आम्हाला विचारतो कोणाला काय खायचंय? ऑर्डर देऊन खातो म्हणून आम्ही त्याला ‘स्विग्गी बॉय’ नाव ठेवलंय. त्यावरूनही तो हेल्दी फूडच मागवतो. तो आम्हालाही हेल्थ टिप्स देतो. कधीकधी निष्पापपणे वेगळ्याच विषयांवर प्रश्न विचारतो, आता हे काय अचानक? अशी आमची रिॲक्‍शन असते! ‘माझं मराठी तितकं चांगलं नाहीये, मी चुकल्यास तू मला लगेच सांग,’ असं तो मला म्हणाला होता. मी पण त्याला हेच सांगितलं होतं की, तू खूप काम केलं आहेस. माझी आता कुठं सुरवात आहे, मीच चुकत असल्यास तू मला सांग. आम्ही एकमेकांना सीन्स चांगले होण्यासाठी काही गोष्टी सजेस्ट करत असतो.’’  यावर गौरव म्हणाला, ‘अमृता आणि माझ्या जास्त गप्पा चित्रपटावरून होतात. मी तिला सतत ‘हे बघ, ते बघ,’ सांगून हॉलिवूडच्या चित्रपटांची नावं सुचवत असतो. तीपण काही वेळेस सुचवते. ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे आम्ही दोघंही चाहते आहोत. या लास्ट सीझनमध्ये काय-काय होतंय यावर खूप चर्चा करतो. मी गोड फारसं खात नाही; पण अमृतानं करून आणलेला बीटरूटचा हलवा मला खूप आवडला. ती हल्ली स्वयंपाक करायला लागलीय, त्यामुळे आमच्यावर नवनवीन प्रयोग होत असतात. या सगळ्या गोष्टींमधून आमची मैत्री हळूहळू फुलतेय...’’

(शब्दांकन - अश्‍विनी सहस्रबुद्धे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com