गुरुबिन ग्यान न पावे (गौरी पाठारे)

gauri pathare
gauri pathare

गाणं आध्यात्मिक व अभ्यासात्मक अशा दोन्ही स्तरांवर वाढवत नेणं, त्याचबरोबर गाणं व्यवसाय म्हणून जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत व्यावसायिक नैतिकता पाळूनच व्यवसायाकडंही लक्ष देणं या कुठल्याही गायकाच्या जबाबदाऱ्या व आकांक्षा असतात. मीही त्या पार पाडण्याचा प्रयत्न करेन, हाच माझा भविष्याचा विचार आहे. विद्यादानाचीही मला आवड आहे. माझ्या सर्व पुढील पिढीस भरभरून प्रेम व आशीर्वाद...

माझ्या सांगीतिक प्रवासाबद्दल लिहिण्याएवढं काही उत्तुंग काम माझ्या हातून घडलंय असं अजून तरी नाही; पण प्रवास नक्कीच चालू आहे. आमच्या घरात मुलांच्या करिअरला ओळखून, आखून त्याप्रमाणे मुलांचा विकास घडवणं अथवा त्यांना समाजासमोर त्यापद्धतीनं आणणं इत्यादी गोष्टींवर कधीही भर नव्हता, त्याची गरजही नव्हती; पण जे शिकावंसं वाटतं ते शिकण्याचं, त्यासाठी मेहनत करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य वडिलांनी दिलं होतं. माझं बालपण पुण्यात गेलं. सर्व शिक्षणही पुण्यातच झालं. लहानपणी रेडिओवरील आशाताई, लतादीदी यांची गाणी हुबेहूब म्हणणं हाच माझा छंद असे. सिनेसंगीताएवढी शास्त्रीय संगीताची ओढही नव्हती मला; त्यामुळे काही चुकतंय, याची जाणीवही नव्हती. सभा-समारंभात, शाळेत कुणीही "गा' म्हणताच क्षणी मी भावगीत वा सिनेसंगीत गाऊ लागे. कुणी "गा' म्हणण्याची आतुरतेनं वाट पाही. कुणी "वन्स मोअर' तर कुणी शाबासकी देई तेव्हा मान ताठ होई मग माझी. मग साधारणतः वय वर्षं 11 च्या सुमारास पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडं गाणं शिकायला मी सुरवात केली. मग अतिशय शिस्तप्रिय व कडक; पण तितक्‍याच प्रेमळ अशा पिंपळखरे गुरुजींकडं मी पाच वर्षं शिकले. माझे समवयस्क गायक जेव्हा आश्वासक बालकलाकार म्हणून पुण्यात गात होते तेव्हा घरचा दैनंदिन माफक रियाज, शाळा व गुरुजींचा क्‍लास आटोपल्यावर सायकल चालवत मैत्रिणींबरोबर मौज-मस्ती करताना, तर कधी "सवाई' वा सुरेल सभेच्या कार्यक्रमांना आई-बाबांबरोबर जाणं, आई-बाबांच्या लोकसंग्रही वृत्तीमुळे व वैद्यकीय व्यवसायामुळे घरात ऊठबस करणाऱ्या कलाकार मंडळींचा सहवास एवढाच काय तो माझा संगीतक्षेत्रातला वावर होता. एके दिवशी माझ्या शाळेतले संगीतशिक्षक शरद करमरकर सर यांनी माझा आवाज ऐकून आई-बाबांना शाळेत बोलावलं. "खूप गाणं शिकवा हिला,' असं सांगून खूप प्रोत्साहित केलं. मग त्यांनी शाळेच्याच वेळात चार-पाच वर्षं माझ्यावर मेहनत घेऊन मला बहुतेक सर्व आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावला. बक्षिसं मिळवली. अशा रीतीनं माझा रंगमंचावर प्रवेश सुरू झाला.

मी दहावी ते बारावीच्या परीक्षांच्या काळात गाण्याचा क्‍लास थांबवून खूप अभ्यास करू लागले. गुरुजीही वयोमानानुसार थकले होते व तालमीत खंड पडू लागला. पुढं कोण होणार, या प्रश्नास "मी गायक होणार' हे उत्तर माझ्या मनात, डोक्‍यात वा स्वप्नातही नव्हतं. इंजिनिअर वा ग्रॅज्युएट व्हावं आणि संसार करावा मन लावून ही तारुण्यसुलभ तीव्र इच्छा होती. स्वयंपाक करायला तर खूप आवडायचा व घर सजवणं, आईच्या सर्व साड्यांवर हक्क सांगणं, कविता करणं, मनसोक्त गाणं हेच माझं आयुष्य होतं.

मी दहावीत असताना माझी थांबलेली तालीम, गाण्याची आंतरिक ओढ व पं. जितेंद्र अभिषेकी बुवांच्या गाण्याचं मनावर पडलेलं गारूड यातून मग गुरुपौर्णिमा, सणवार इत्यादींच्या निमित्तानं बुवांच्या घरी जाऊ लागले. पुढील तीन वर्षं मग अभ्यास सांभाळून बुवांच्याच शिष्या माधुरीताई जोशींकडं अधूनमधून जाऊ लागले. पिंपळखरे गुरुजी व माधुरीताईंमुळे स्वरांवर जिवापाड प्रेम करण्याची तळमळ सुरू झाली. दोघंही स्वराला जबर पक्के. या दोघांचे तंबोऱ्यावर प्रेम करायला शिकवल्याबद्दलचे उपकार मी आजन्म विसरू शकणार नाही. या दोन्ही गुरूंबद्दल खूप हृद्य आठवणी आहेत माझ्या स्मृतीत.

आतापर्यंत माझे छोटे छोटे कार्यक्रम सुरू झाले होते. बारावीनंतर मी अभिषेकी बुवांकडं नेमानं जायला सुरवात केलीच. मग पदवीधर होईपर्यंतची तीन वर्षं मला त्यांच्या घरी दररोज दुपारी तालीम मिळू लागली. एक खूप भावुक असा काळ होता तो. पण रागभाव, स्वर व शब्दांशी लीलया खेळणारं बुवांचं गाणं ऐकणं व मनात साठवणं यापुढं कुठलंही प्रलोभन फिकं होतं. बुवांचा माझ्यावर जीव होता व माझ्याकडून सांगीतिक अपेक्षा होत्या, हे तर इतकं सुखद सत्य होतं. मी गाणारी होऊ शकते; किंबहुना मी पूर्ण वेळ गाणं करायला हवं आहे याची जाणीव मला या काळात झाली. माझ्या आयुष्यात उशिरा का होईना; मी बेदम रियाजाला सुरवात केली. बारावीपर्यंत वाया गेलेला रियाजाचा वेळ भरून काढण्यासाठी सात-आठ तास रियाज करू लागले. परिणामी, व्हायचं तेच झालं. आवाज सपाटून बसू लागला. मग अभिषेकी बुवांच्या सल्ल्यानुसार एक वर्ष उस्ताद सईदुद्दीन डागर यांच्याकडं कंठसाधनेचा अभ्यास सुरू केला. आवाजाच्या त्रासातून मुक्त होऊन स्वत:च्या आवाजाची ओळख मला डागरजींमुळे झाली. माझा पुणे विद्यापीठात पदवीदान समारंभ झाला, त्यासुमारास बुवा अत्यंत आजारी होते व त्या वेळी आईनं सुचवलं, की मी आता दुसरीकडं शिकावं. एकतर बुवांच्या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे व बाईनं बाईकडंच शिकावं म्हणजे आवाज घडतो व आवाजाचे त्रास होत नाहीत, असं तिचं म्हणणं होतं. मग आई-बाबा ती. पद्माताई तळवलकर यांना भेटून आले. बुवांशी विचारविनिमय केला व मला मुंबईला शिकण्यास पाठवलं. खूप बंड करून सरतेशेवटी "मी बुवांकडचं शिक्षण ते हयात असेपर्यंत सोडणार नाही,' या अटीवर मी तयार झाले. पुढील पाच वर्षं (1994-98) मग पद्माताई व बुवा यांच्याकडं मी शिकले. यावर "दोन गुरू करते' म्हणून खूप लोकांनी आक्षेप घेतला. आईनंही "आता बुवांकडील जाणं बंद कर, नाहीतर गाण्यात गल्लत होईल,' असं अनेक वेळा सांगितलं; पण ताईंकडं वीस दिवस व सुटी मिळाली की दहा दिवस पुण्यात बुवांकडं मी जाई. कधी कधी बुवांकडं दुपारच्या तालमी होत आणि मी पुण्यात सकाळीच आलेली असे. बुवा मी आलेय का पुण्याला याची चौकशी करत. मग पुढच्या तालमीला न चुकता गेले की "काय हो कुठं होतात?' असं बुवा विचारत. बुवांनी मला "मिस' केलं? याचं अप्रूप वाटे. कितीही लहान स्त्रियांनापण बुवा "अहो-जाहो' करत. त्याचापण मनातून लटका राग येई. असो. पण मी बुवांकडचं जाणं सोडलं नाही. जगाची पर्वा केली नाही. गंमत अशी की या दोन्ही गुरूंना मी दोन्ही ठिकाणी जाते, हे मान्य होतं व दोघंही आतुरतेनं माझी वाट बघत. मिळतं का कुणाला इतकं भाग्य? आवाज, रियाज यांची बैठक आणि आवर्तनातली शिस्त ताईंकडं, तर रागविचार, भाषेची हाताळणी व केहेन यांचे संस्कार बुवांकडं असं एकमेकांस पूरक असं माझं शिक्षण होत राहिलं. मग जयपूर घराण्याच्या गायकीतला ठहेराव व विस्तृत गायकी यांची ओढ मला ताईंकडील तालमीत लागली; पण शेवटपर्यंत मी बुवांना व महत्त्वाचं म्हणजे बुवांनी मला कधीही दूर केलं नाही, हे देवाचे आभार. सात नोव्हेंबर 1998 रोजी बुवा देवाघरी गेले आणि मग पुण्यात जगण्यासाठी माझ्याकडं काहीच उरलं नाही. मग मुंबईच्या आणि गाण्याची आवड असलेल्या स्थळास होकार देऊन फेब्रुवारी 1999 मध्ये मी कायमची मुंबईस आले. इथून पुढील सर्व आयुष्यात मला ती. पद्माताईंच्या तालमीनं, प्रेमानं व आधारानंच तारलं. त्या माझ्या गुरू कमी; पण माऊली जास्त झाल्या. श्रद्धेचा विसावा कसा घ्यावा हे त्यांनी शिकवलं. बुवा हयात नसतानाही त्यांचं प्रेम गाताना अनुभवणं, दररोज भेट न होऊनही मनानं ताईंशी संधान पावणं म्हणजे काय याचे सजीव अनुभव ताईंच्या माझ्या आयुष्यात असण्यामुळे मिळाले. माझ्या गाण्यास बैठक मिळाली. पुढं पुरस्कार, मान-सन्मान, कौतुक मिळालं. मला व माझ्या गाण्याला लोकांनी भरभरून प्रेम व संधी दिली. सांसारिक जबाबदाऱ्या व लग्नानंतर 10-12 वर्षं काळ मोजून खूप काळ प्रकाशात नाही आले; पण गाणं चालूच राहिलं. एकदा प्रकाशात आल्यावर लोकांनी गेल्या काही वर्षांत खूप कौतुक केलं. ते सर्व माझ्या गुरूंच्या, आई-वडिलांच्या व कुटुंबीयांमुळेच शक्‍य झालं. घरात व शाळेत झालेले भाषेचे उत्तम संस्कार, सर्व गुरूंनी दिलेलं गाणं, निसर्गानं बहाल केलेलं मातृत्व आणि हातातील विविध कला...यापेक्षा अजून काय श्रीमंत व्हायचं? आता जयपूर घराण्याचे पं. अरुण द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अभ्यास चालूच आहे. गाणं आध्यात्मिक व अभ्यासात्मक अशा दोन्ही स्तरांवर वाढवत जाणं, त्याचबरोबर गाणं व्यवसाय म्हणून जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत व्यावसायिक नैतिकतेनंच; पण व्यवसायाकडंही लक्ष देणं या कुठल्याही गायकाच्या जबाबदाऱ्या असतात. त्या मीही पार पाडण्याचा प्रयत्न करेन, हाच माझा भविष्याचा विचार आहे. विद्यादानाचीही मला आवड आहे. माझ्या सर्व पुढील पिढीस भरभरून प्रेम व आशीर्वाद. परमेश्वर गाता गळा असेतोवरच आयुष्य बहाल करो, एवढं मात्र पदर पसरून मागणं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com