...जॉर्ज फर्नांडिस नसते तर !

...जॉर्ज फर्नांडिस नसते तर !

जॉर्ज फर्नांडिस नसते तर कोकणात रेल्वे येवूच शकली नसती हे विधान अतिशयोक्तीपूर्ण नाही तर वास्तव आहे. चार राज्यांची मोट बांधत स्वायत्त महामंडळ स्थापन करून कोकण रेल्वे साकारण्याचे सगळे श्रेय जॉर्ज यांच्याकडे जाते. या कार्याची जाणीव असलेला अख्खा कोकण आज त्यांच्या जाण्याने स्तब्ध झाला.

कोकण रेल्वेचे स्वप्न ज्या काळात साकारले त्याचा विचार करता हा प्रकल्प म्हणजे एक आश्‍चर्यच म्हणावे लागेल. याचे सरसकट श्रेय तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री मधु दंडवते यांना दिले जाते; पण यासाठी तितक्याच तळमळीने आत्मीयतेने झटलेले नेतृत्व म्हणजे तत्कालीन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष रामकृष्ण हेगडे आणि महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार होय. यातील दंडवते  कोकणचे प्रतिनिधीत्व करत होते. तर जॉर्ज मूळचे मंगळूरचे (कर्नाटक) आणि हेगडेही कर्नाटकचे. यामुळे दंडवतें इतकीच या प्रकल्पाबाबत फर्नांडिस आणि हेगडे यांना आत्मीयता होती.

कोकण रेल्वेचा मार्ग जॉर्ज यांच्या मंगळूरपासून अलिकडे 15 किलोमीटरवरील ठोकूर स्थानकापर्यंत साकारला गेला. प्रकल्पाची मागणी दंडवतेंनी लावून धरली, नियोजन स्तरावरील सहकार्य हेगडेंनी केले तर सर्वाधिक क्षेत्र असलेल्या महाराष्ट्रातील जमिन संपादन व इतर प्रक्रीयांना शरद पवारांनी साथ दिली; पण यात जॉर्ज फर्नांडीस नसते तर ही सगळी गणिते जुळूनच येणे शक्य नव्हते.

तो काळ पारंपारीक राजकारण आणि राज्य कारभाराचा होता. शासकीय व्यवस्थेच्या बाहेर जावून एखादी वेगळी संकल्पना राबविणे फार कठीण होते. रेल्वे बोर्ड नावाची व्यवस्था रेल्वे विश्‍वात खूप मजबूत मानली जायची. एखादा प्रकल्प साकारायचा असला तर रेल्वे बोर्डाच्या संमतीविना रेल्वे मंत्री सुध्दा काही करू शकत नव्हते. या काळात कोकण रेल्वेसाठी स्वायत्त महामंडळ स्थापन करण्याचे धाडस केवळ जॉर्ज फर्नांडिस यांच्यामुळे प्रत्यक्षात आले.

रेल्वेच्या इतिहासातील ही पहिली स्वायत्त व्यवस्थापन असलेली आस्थापना होती. रेल्वे बोर्डाच्या एकाधिकारशाहीला एकप्रकारे हे आव्हान होते. यातही महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि केरळ या चार राज्यांची मोट बांधण्याचे काम फर्नांडीस यांनी केले. महामंडळ झाले नसते तर रोहा ते ठोकूर या मार्गावर दर्‍याखोर्‍यांना पार करत इतक्या कमी वेळात रेल्वे धावणे केवळ अशक्य होते.

जॉर्ज यांच्यासारखे धडाडीचे ‘स्ट्राँग’ नेतृत्व नसते तर ही कल्पना आजही कोकण रेल्वेच्या बाबतीत कोकण वासियांना आजही अनिश्‍चिततेच्या हिंदोळ्यावर उभी करते. कोकण रेल्वेचा ‘कनेक्टीव्हीटी’च्या दृष्टीने खरा फायदा कोकणाला झाला. जॉर्ज यांच्यासारखे निस्वार्थी नेते होते म्हणून हे स्वप्न साकारले. दंडवते यांच्यानंतर कोकण रेल्वे साकारणारा आणखी एक तारा विखळला. अख्ख्या कोकण त्यांच्या जाण्याने स्तब्ध झाला.

साधेपणातील आत्मीयता
कोकणातील काही कार्यकर्ते, पत्रकार 2002 मध्ये दिल्ली अभ्यास दौर्‍यावर गेले होते. जॉर्ज फर्नांडिस तेव्हा संरक्षणमंत्री होते. हे सर्वजण सकाळीच जॉर्ज यांच्या भेटीला गेले. सदरा-लेंगा घातलेला जॉर्ज यांनी त्यांचे मनमुराद स्वागत केले. त्यांच्याशी भरभरून बोलले. जवळपास एक तास ते बोलत होते. त्यांचे साधेपण, विद्वत्ता, कोकणविषयीची आत्मीयता या संवादातील प्रत्येक क्षणातून जाणवत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com