बुगटे आलूर भेटीत जॉर्ज फर्नांडिस बोलले मराठीत

बुगटे आलूर भेटीत जॉर्ज फर्नांडिस बोलले मराठीत

देशातील मंत्री मंडळामधील ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी केंद्रीय संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे मंगळवारी ( ता. 29) निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देशाची मोठी हानी झाली आहे. ते हुक्केरी तालुक्यातील बुगटे आलूर येथील प्राथमिक कृषी पतीन संघाच्या इमारतीच्या उदघाटनास सन 1997 साली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या निधनाने बुगटे आलुकरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. शिवाय गावात ठिकठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात आली. 

ज्येष्ठ कामगार नेते म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे पाहिले जाते. कामगारांच्या बद्दल नेहमीच त्यांच्या मनात न्यायाची बाजू होती. बुगटेआलूर येथील श्रीपाद हळबे यांच्यामुळेच त्यांना या गावात येणे शक्य झाले. केंद्रीय संरक्षण मंत्री असतानाच 1997 साली येथील पीकेपीएस संघाच्या नूतन इमारतीचे उदघाटनाच्या निमित्ताने ते बुगटे आलूर येथे आले होते. त्यांच्याच हस्ते इमारतीचे उदघाटन झाले. सुमारे दोन तासाहून अधिक काळ त्यांनी या गावात वेळ घालविला होता. 

जॉर्ज फर्नांडिस यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात 'बुगटे आलूरसह परिसरातील भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला होता. या भागात नोकरी-व्यवसाय नसल्याने लोकांची होणारी हेळसांड व्यक्त केली होती. या भागातील होतकरू तरुणांनी भारतीय सैन्य दलासह संरक्षण क्षेत्रात भरती होण्याचे आवाहन देखील त्यांनी केले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि युवकांचे टॅलेंट संरक्षण क्षेत्रात महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील रांगडा युवक याकामी आवश्यक आहे.

शेतकऱ्यांच्या मुलांनी केवळ पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीचे तंत्र समजावून घेतले पाहिजे. तरच या देशातील अन्नदाता टिकून राहणार आहे. देशाला अन्नधान्य पुरवणारा शेतकरी विकासापासून वंचित राहू नये, यासाठी पीकेपीएसच्या केवळ इमारती नको शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना राबविल्या पाहिजेत. शेतकरी जगला तरच देश वाचणार आहे. याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. यासह विविध विषयावर त्यांनी बुगटे आलूरकरांना मार्गदर्शन केले होते. 

अस्खलित मराठी भाषण
जॉर्ज फर्नांडिस हे केंद्रीय संरक्षण मंत्री असतानाच बुगटे आलूर येथे उदघाटनाच्या निमित्ताने आले होते. ते केंद्रीय मंत्री असल्याने सहाजिकच हिंदीमध्ये आपले भाषण करतील, असा ग्रामस्थांचा समज होता. पण व्यासपीठावर उभे राहताच त्यांनी थेट ग्रामस्थांना नमस्कार हा मराठी शब्द उच्चारून संपूर्ण भाषण मराठीतून केले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला होता. एकंदरीत ते केंद्रीय मंत्री असले तरी मराठी भाषेतून भाषण करून मराठीशी असलेली नाळ कायम ठेवली होती. 

पीकेपीएस इमारतीच्या उदघाटन निमित्ताने जॉर्ज फर्नांडिस हे गावात आले होते. या काळात आपण ग्रामपंचायतीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होतो. त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलेली शेतकऱ्या विषयीची असलेली कळवळा आजही आठवते. त्यांच्यासारखा द्रष्टा नेता देशाने गमावला आहे. त्यांना भेटण्याचा योग आला हेच आपले भाग्य समजतो. '
- प्रदीप आलूरकर, 

माजी ग्रामपंचायत अध्यक्ष, बुगटे आलूर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com