जर्मनीतील पुस्तकजत्रा आणि साहित्यपुरस्कार

जर्मन, रशियन, फ्रेंच, स्पॅनिश, जपानी, पोलिश अशा परकीय भाषांमधील समकालीन साहित्याची
जर्मन
जर्मनsakal

जर्मन, रशियन, फ्रेंच, स्पॅनिश, जपानी, पोलिश अशा परकीय भाषांमधील समकालीन साहित्याची तोंडओळख या सदरात गेल्या काही लेखांमधून आपण करून घेतली. त्यापैकी समकालीन जर्मन साहित्याचा परिचय करून घेताना आधीच्या लेखांमधून कादंबरी, नाटक या साहित्यप्रकारांचा धांडोळा घेतला गेला. आजच्या लेखात जर्मनीतील दोन पुस्तकजत्रा आणि त्यांत समकालीन साहित्यासाठी दिल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या पुरस्कारांविषयीची माहिती घेऊ. प्रत्येक देशात साहित्यिकांना मानसन्मान मिळतात, पुरस्कार दिले जातात. लेखकाच्या साहित्याचं महत्त्व जरी फक्त पुरस्कारानं ठरत नसलं तरी पुरस्कार देणं म्हणजे लेखकाच्या कार्याची योग्य ती दखल घेणं, लेखकाच्या लेखनाला पोचपावती देणं आणि असा सन्मान करणं हे समाजाचं आणि शासनाचंही कर्तव्य आहे.

नुकताच, म्हणजे १७ ऑक्टोबर रोजी ‘फ्रांकफुर्ट बुक फेअर’मध्ये २०२२ या वर्षाचा ‘जर्मन बुक प्राईज’ हा अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार जाहीर झाला. किम द ला होरिझॉन यांच्या ‘ब्लुटबुख’ (ब्लडबुक) या पुस्तकाला तो मिळाला. विशेष म्हणजे, एका उभयलिंगी म्हणजे नॉनबायनरी (स्त्री किंवा पुरुष अशा दोन प्रकारांत विभागणी न होऊ शकणाऱ्या) व्यक्तीला हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे, तोही एका उभयलिंगी व्यक्तीच्या आयुष्याची गोष्ट सांगितलेल्या पुस्तकाला.

स्वित्झर्लंडच्या तीसवर्षीय किम द ला होरिझॉन (हे नाव त्यांनी २०१७ पासून घेतलं आहे) यांनी आपल्या कादंबरीतून स्वत:ची ओळख करून घेण्याचा आणि ती वाचकाला करून देण्याचा प्रयत्न केला आहे. हे त्यांच्यासाठी मुळीच सोपं नव्हतं. ही कादंबरी लिहायला त्यांना तब्बल दहा वर्षं लागली. कादंबरीतील मी - निवेदक - याच्या आजीला विस्मरणाचा रोग जडतो, ती आपला भूतकाळ विसरत असताना निवेदक मात्र भूतकाळातील आयुष्याचं, आपल्या लैंगिकतेचं, त्याविषयी मोकळेपणानं बोलता येत नसल्यानं झालेल्या घुसमटीचं, आजूबाजूच्या माणसांच्या अपेक्षांच्या दडपणाचं हे कथन शब्दात मांडू बघत आहे. त्या कथनाला त्यांना जी भाषा सापडली ती परीक्षकमंडळाला विशेष उल्लेखनीय वाटली आहे.

स्विस जर्मन भाषा आणि प्रमाण जर्मन भाषा यांचा संमिश्र वापर करताना बऱ्याचदा शब्दांच्या अर्थाविषयी निर्माण होणारी संदिग्धता किम द ला होरिझॉन यांनी जाणीवपूर्वक तशीच ठेवली आहे.

अशा पुस्तकाला पुरस्कार देताना ‘परिघाबाहेरच्या विषयावर जर उत्तम साहित्य कुणी लिहीत असेल तर त्याची दखल घेतली पाहिजे,’ हा व्यापक दृष्टिकोन मंडळानं घेतला असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. निवड करताना आशय, मांडणी, भाषा, रूपबंध या साऱ्याचाच मंडळानं कसा कटाक्षानं विचार केला हे त्यांनी नमूद केलं आहे.

‘जर्मन बुक प्राईज’ हा पुरस्कार २००५ पासून दर वर्षी जर्मन प्रकाशक आणि पुस्तकविक्रेते यांच्या संघटनेतर्फे त्या त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट कादंबरीला दिला जातो. यासाठी जर्मनी, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड या तीन जर्मनभाषक देशांमधील जर्मन भाषेतील पुस्तकं विचारात घेतली जातात. प्रत्येक प्रकाशन एक किंवा दोन पुस्तकांची शिफारस करू शकतं. सात जणांचं परीक्षकमंडळ वीस पुस्तकांची पहिली यादी तयार करतं. त्यातून तयार होते अंतिम यादी, तिच्यात सहा पुस्तकं असतात, मग सर्वोत्कृष्ट ठरलेल्या कादंबरीची निवड ‘फ्रांकफुर्ट बुक फेअर’मध्ये जाहीर होते आणि त्याच समारंभात पारितोषिकही प्रदान केलं जातं. पारितोषिक तब्बल पंचवीस हजार युरोंचं असल्यानं ते महत्त्वाचं आहे; शिवाय, पुस्तकांची लाँग लिस्ट, शॉर्ट लिस्ट टप्प्याटप्प्यानं जाहीर होत सतत चर्चेत राहिल्यानं साहित्यरसिकांची उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहते, शेवटी ती शिगेला पोहोचते. सर्वोत्तम ठरलेल्या एका पुस्तकाच्या लेखकाला/लेखिकेला पंचवीस हजार युरो मिळतात, तर शॉर्ट लिस्टमधील इतर पाचजणांना प्रत्येकी अडीच हजार युरो दिले जातात. ‘पुरस्कार देणारं मंडळ हे प्रकाशक आणि पुस्तकविक्रेते यांचं असल्यानं याचा उपयोग ते व्यावसायिक कारणांसाठी करून घेतात,’ अशी टीकाही काही लोक करतात.

लाँग आणि शॉर्ट लिस्टमध्ये असलेली पुस्तकं विक्रीचे उच्चांक गाठतात हे खरं असलं तरी त्या त्या वर्षीच्या कादंबऱ्या त्यामुळे चर्चेत राहतात, नवीन साहित्याची दखल घेतली जाते आणि वाचकांना नवीन आशयाकडे, काही प्रश्नांकडे सजगपणे बघायला अशा साहित्यिक-चर्चा उद्युक्तही करतात.

फ्रांकफुर्टच्या पुस्तकजत्रेत जगभरातील प्रकाशक एकमेकांना भेटून स्वामीत्वहक्कांविषयीचे करारमदार करतात. पुस्तकजगतातील व्यावसायिकांना आपलं संबंधांचं, संपर्काचं जाळं तयार करता येतं, ते वाढवता येतं. दर वर्षी ऑक्टोबरमध्ये भरणारं ‘फ्रांकफुर्ट बुक फेअर’ आंतरराष्ट्रीय स्तरावरचं असतं. तिथं परदेशी प्रकाशनांचेही स्टॉल्स असतात. दरवर्षी एका देशाला विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केलं जातं, म्हणजेच त्या देशाचं ललित व ललितेतर साहित्य त्या वर्षी प्रामुख्यानं चर्चेत राहतं.

‘फ्रांकफुर्ट बुक फेअर’ हे मुख्यत: पुस्तकजगतातील व्यावसायिकांसाठी असतं. कोरोनाकाळात प्रत्यक्ष पुस्तकजत्रा भरू न शकल्यानं अनुवादित पुस्तकांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली. कारण, कोणतेही

करारमदार होऊ शकले नाहीत. ‘फ्रांकफुर्ट बुक फेअर’ला आलेल्या व्यावसायिकांच्या भेटी-गाठी, पत्रकारांबरोबरच्या बैठका संपल्यानंतर फक्त शेवटच्या दोन दिवसांत ते सर्वसामान्य वाचकांसाठी खुलं ठेवलं जातं; पण या फेअरमध्ये पुस्तकविक्री मात्र होत नाही. फेअरतर्फे आणि निरनिराळ्या प्रकाशनांतर्फे पुस्तकांविषयी चर्चा, लेखकांशी संवाद असे विविध कार्यक्रम आयोजिले जातात. एकूणच, फ्रांकफुर्ट बुक फेअर आकारानं अवाढव्य आणि पुस्तकनिर्मितीच्या दृष्टीनं खूपच महत्त्वाचं आहे.

***

‘फ्रांकफुर्ट बुक फेअर’प्रमाणेच लाइपत्सिग या गावातील पुस्तकजत्राही खूप प्रसिद्ध आहे. सन २००५ पासून ती दर वर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये भरते. हिचा माहोल ‘फ्रांकफुर्ट बुक फेअर’पेक्षा थोडा वेगळा असतो. उदाहरणार्थ : त्या जत्रेत वाचकाला पुस्तकं विकत घेता येतात; शिवाय चर्चा, लेखकांशी संवाद, साहित्याचं वाचन हे कार्यक्रम तर असतातच; पण लेखकांच्या एकमेकांशी गाठी-भेटी होतात, हल्ली तर ब्लॉग लिहिणाऱ्या अथवा डिजिटल माध्यमांद्वारे लेखन प्रसिद्ध करणाऱ्या लेखकांसाठीही तिथं वेगळी जागा करून दिली जाते.

वाचक आणि लेखक इथं केंद्रस्थानी असतात. लाइपत्सिग हे फ्रांकफुर्टच्या मानानं छोटं शहर पुस्तकजत्रेच्या काळात पुस्तकमय होऊन जातं. ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजिले जातात.

या पुस्तकजत्रेतही पुस्तकांच्या विविध प्रकारांसाठी पुरस्कार दिले जातात.

साहित्याविषयी बोलायचं तर ललित साहित्य, ललितेतर/वैचारिक साहित्य आणि उत्तम अनुवादित पुस्तक हे पुरस्कार दिले जातात. तेही साहित्यविश्वात महत्त्वाचे मानले जातात. सन २०२२ चा ललित साहित्याचा पुरस्कार तोमार गारदी या बर्लिनमध्ये राहणाऱ्या, जर्मनमधून लेखन करणाऱ्या इस्रायली लेखकाच्या कादंबरीला मिळाला. ही कादंबरी दोन भागांत आहे, दोन वेगळ्या कथा आहेत आणि त्या कलाकारांच्या आयुष्याच्या कथा आहेत.

पहिला भाग त्यांनी त्यांच्या साध्या जर्मनमधून लिहिला आहे. तोमार गारदी हे त्यांचं स्वत:चंच नाव असलेला कलाकार हे मुख्य पात्र आहे, स्थलांतरित व्यक्तीची नवीन देशातील ओळख, तिथं सतत परका, उपरा असल्याची भावना आणि राजकारण हे विषय ते हाताळतात, त्यात हलका विनोद आहे; शिवाय परिकथेत शोभून दिसावीत अशीही पात्रं येतात...म्हणजे बोलणारा कुत्रा, वनाचा देव इत्यादी. दुसऱ्या भागात गोष्ट सांगितली आहे ती एकोणिसाव्या शतकातील इंडोनेशियातील एका चित्रकाराची, त्यानं केलेल्या धाडसी प्रवासाची. ती त्यांनी मूळ हिब्रू भाषेत लिहिली आणि कादंबरीत त्याचं आने बिर्केनहाउअरनं केलेलं जर्मन भाषांतर समाविष्ट करण्यात आलं आहे. दोन्ही कथांमधील कलाकार आपल्या स्वप्नांचा शोध घेताना दिसतात.

सन २०२० आणि २०२१ या दोन्ही वर्षांत कोरोनामुळे फ्रांकफुर्टप्रमाणेच लाइपत्सिग येथील पुस्तकजत्राही भरू शकली नव्हती. आणि, युरोपमध्ये जेव्हा कोरोनाच्या शेवटचा टप्पा होता, म्हणजेच २०२२ च्या मार्चमध्ये पुरेशा प्रतिसादाअभावी ऐन वेळी लाइपत्सिगची पुस्तकजत्रा रद्द करावी लागली; परंतु पुस्तकांसाठीचे पुरस्कार मात्र जाहीर झाले आणि प्रदानही करण्यात आले. या पुरस्कारांसाठीही सात जणांचं परीक्षकमंडळ असतं, ते पहिली मोठी यादी, नंतरची शॉर्ट लिस्ट असं करत पुस्तकांची निवड करतं, समकालीन साहित्याच्या पुरस्कारासाठी कादंबरीखेरीज इतरही साहित्यप्रकार विचारात घेतले जातात. हा लाइपत्सिग पुस्तकजत्रेचा पुरस्कारही चांगला घसघशीत वीस हजार युरोंचा असतो. शिवाय, नामांकन मिळालेल्या पुस्तकांनाही प्रत्येकी एक हजार युरो मिळतात. या वर्षी पुरस्कार मिळालेलं अनुवादित पुस्तकही ललित साहित्यापैकी आहे. अने वेबर यांनी त्याचं फ्रेंचमधून जर्मनमध्ये भाषांतर केलं आहे.

जर्मनीत साहित्यासाठी इतरही अनेक पुरस्कार दिले जातात; परंतु पुस्तकजत्रांशी संबंधित आणि प्रतिष्ठेचे समजले जाणारे हे दोन पुरस्कार तेथील लेखकांना आणि वाचकांना महत्त्वाचे वाटतात आणि ते खूप काळ चर्चेतही राहतात.

(सदराच्या लेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’तून जर्मन भाषेच्या आणि साहित्याच्या प्राध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या असून, ‘केल्याने भाषांतर’ या भाषांतराला वाहिलेल्या त्रैमासिकाच्या संपादक आहेत. अनेक जर्मन कथा, कादंबऱ्या, नाटकं यांचं त्यांनी मराठीत भाषांतर केलं आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com