'बायकोचा खर्च' अन् 'नवऱ्याचा उत्साह' दोन्ही आणा आटोक्यात; वाचा आवर्जून

get in controle on wifes habit of spending money and husbands excitement
get in controle on wifes habit of spending money and husbands excitement

प्रश्‍न - लग्न झाल्यानंतर मी नवऱ्याला खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, नवऱ्याला असे वाटते की, मी कुणालाच समजून घेत नाहीये. अशावेळी काय करावे? 
उत्तर - तुम्ही दोघेही वेगळ्या संस्कारात वाढले असल्याने विचारामधील फरक समजून घेणे व त्याप्रमाणे दोघांनी वागणे अपेक्षित आहे. तुमचं नातं जोपर्यंत परिपक्व होत नाही, तोपर्यंत तुमचा असा समज होणे सहाजिकच आहे. नवऱ्याप्रमाणेच इतरांचा स्वभाव, अपेक्षा व विचार समजून घेऊन त्यानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणला तर अपेक्षित बदल घडून येतील व तुमचे नाते अधिक घट्ट होईल. 

प्रश्‍न - बायको, कुणाचेच ऐकत नाही. ती म्हणते, माझ्या मनासारखे लग्न झालेले नाही. मला जेवढे सांगितले होते, तेवढे तुमच्याकडे नाहीये. मी फसवले असे तिचे म्हणणे आहे. पण मी तिला परिस्थितीची पूर्ण कल्पना दिली होती. 
उत्तर - लग्नानंतर सुरवातीच्या काळात अडथळे, विरोध व संघर्षाचा सामना करीत संसाराचा रेटा चालू ठेवायचा असतो. पत्नीच्या अपेक्षेनुसार तुमच्या परिस्थितीमध्ये बदल घडण्यासाठी थोडा कालावधी जाऊ देणे गरजेचे आहे. तिच्या इच्छा, आकांक्षा व गरजा पूर्ण होऊ लागल्या, की तिला फसवले गेले असे वाटणार नाही. एकदा या परिस्थितीचा स्वीकार झाला, की इतर गोष्टींना वाव राहणार नाही. बदलण्याची मानसिकता ठेऊन त्या दिशेने पुढे जाणे आवश्‍यक आहे. त्यासाठी नातं अधिक घट्ट होण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. 

प्रश्‍न - बायकोला खूप उधळपट्टी करण्याची सवय आहे. मला हे लग्नानंतर कळाले. तिला नेहमी मोठा रुबाब दाखवायला आवडतो. परिस्थिती नसतानादेखील मी तिला लग्नानंतर बाहेरच्या देशात फिरायला नेले. तिचे ते क्षण स्पेशल व्हावे, यासाठी ती इच्छा मी पूर्ण केली. पण प्रत्येक वेळेस तिला मैत्रिणींपेक्षा जास्त चांगल्या वस्तू, बाहेर फिरणे हवे असते. 
उत्तर - लग्नापूर्वीच्या आपल्या सवयी, आवडी-निवडी, स्वभाव, मित्रमैत्रिणी या गोष्टीला लग्नानंतर किती स्थान द्यायचे हे प्रत्येकाला ठरवावे लागते. आपल्या आई-वडिलांची परिस्थिती, त्यांनी केलेले लाड हे लग्नानंतर तसेच असतील असे गृहीत धरता येणार नाही. आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून त्याप्रमाणे तडजोड केली म्हणजे वाद होणार नाही. अपेक्षा पूर्ण झाल्या म्हणजे नाते टिकते, असा समज करून घेण्यापेक्षा अपेक्षांना मुरड घालणे जास्त गरजेचे ठरते. 

प्रश्‍न - नवऱ्याला कशाचाच उत्साह नसतो. माझे घरच्यांशी खूप छान सूर जुळले आहेत, परंतु नवऱ्याशी जुळवणे कठीण जात आहे. घरचे म्हणतात, तो तसाच आहे. फार लक्ष नको देऊस, तुला फिरायला जायचे असल्यास तू जाऊन येत जा. पण असे कसे चालेल, मला तो सोबत हवा असतो. खर्च करणेही त्याला आवडत नाही. मी आर्थिक बाबतीत स्वावलंबी आहे, त्यामुळे त्याचाही भार त्याच्यावर टाकत नाही. मी खर्च करते, आपण जाऊ बोलले तरी तो तयार होत नाही. काय करावे कळत नाही. 
उत्तर - प्रत्येकाचा स्वभाव हा आपल्यासारखा असेलच असे नाही. जोडीदाराच्या स्वभावाशी मिळते-जुळते घेतले तर संसार बहरत जातो. आता जमणे कठीण आहे, असे वाटले तर दोघांच्या सहवासाने ते सहज जमते. दोघांच्या अपेक्षा भिन्न आहेत, पण त्या साध्य करण्यासाठी दोघांत संवाद वाढत राहणे गरजेचे आहे. नवऱ्याचा स्वभाव, त्याच्या आवडीनिवडीचा स्वीकार केला म्हणजे आपली निराशा होणार नाही. नवऱ्यामध्ये सुद्धा तुमच्या मनासारखा बदल घडवून आणणे शक्‍य आहे. पण त्यासाठी धीर धरणे व वेळ पडल्यास समुपदेशकांचे मार्गदर्शन आवश्‍यक ठरते. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com