एका लग्नाची आपुलकी

‘मेड इन हेवन’ या वेबसीरिजच्या पाचव्या भागात मुख्य पात्र असलेली पल्लवी आणि तिचा वागदत्त वर विक्रम लग्न करण्याचा निर्णय घेतात तेव्हा विक्रमचे आई-वडील हिंदू पद्धतीनुसार लग्नविधी करण्याचे ठरवतात.
Marriage
Marriagesakal

- गिरीश वानखेडे

‘मेड इन हेवन’ या वेबसीरिजच्या पाचव्या भागात मुख्य पात्र असलेली पल्लवी आणि तिचा वागदत्त वर विक्रम लग्न करण्याचा निर्णय घेतात तेव्हा विक्रमचे आई-वडील हिंदू पद्धतीनुसार लग्नविधी करण्याचे ठरवतात. पल्लवीदेखील बौद्ध पद्धतीने लग्न करणार असल्याचे जाहीर करते. विक्रम पल्लवीच्या पाठीशी ठामपणे उभे राहत तिच्या निर्णयाचे समर्थन करतो आणि मग त्यांचे लग्न दोन्ही पद्धतीने होते. त्यावरून ‘मेड इन हेवन’चा पाचवा भाग चर्चेत आला आहे...

सध्या सर्वत्र एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे ‘मेड इन हेवन’ या वेबसीरिजच्या पाचव्या भागात दाखवण्यात आलेल्या पल्लवी मेनके नावाच्या पात्राची आणि ही कथा जिच्या खऱ्या आयुष्यावर बेतलेली आहे ती याशिका दत्त, सीरिजचे दिग्दर्शक निरज गायवान, तसेच या सीरिजची निर्मिती संस्था यांनी प्रसार माध्यमांवर केलेल्या टिपण्यांमुळे तयार झालेल्या वादाच्या भोवऱ्याची... या वादंगामुळे ही वेबसीरिज प्रकाशझोतात आली आहे.

या कथेचे मुख्य पात्र असलेली पल्लवी कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक तर आहेच, यासोबत ती सामाजिक कार्यकर्ता, लेखिकाही आहे. ती स्वतः दलित असून दलितांच्या प्रश्नांबाबतही तितकीच जागरूक आहे. तिचा वागदत्त वर विक्रम एक एनआरआय असून, तो जातपात मानत नाही.

ते दोघे जेव्हा लग्न करण्याचा निर्णय घेतात तेव्हा विक्रमचे आई-वडील हिंदू पद्धतीनुसार लग्नविधी करण्याचे ठरवतात. त्यावर पल्लवीदेखील आपण बौद्ध धर्माचे अनुयायी असल्यामुळे बौद्ध पद्धतीने लग्न करणार असल्याचे जाहीर करते. तिच्या या घोषणेनंतर विक्रमचे आई-वडील नाराज होतात; पण विक्रम मात्र पल्लवीच्या पाठीशी ठामपणे उभे राहत तिच्या या निर्णयाचे समर्थन करतो. आणि मग त्यांचे हे लग्न हिंदू आणि बौद्ध दोन्हीही पद्धतीने होते.

कोणत्याही चित्रकृतीमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा विवाह सोहळा चित्रित करण्यात आला आहे. ‘द हार्ट स्किप्ड अ बिट’ची कथा लिहिली आहे आलंकृता श्रीवास्तव, झोया अख्तर आणि रिमा कागती यांनी! वेबसीरिजच्या या भागाचे दिग्दर्शक आहेत निरज गायवान.

वेबसीरिजच्या या भागाचे कथानक जिच्या खऱ्या आयुष्यावर बेतलेले आहे त्या याशिका दत्त हिने मात्र आपल्याला या सीरिजमध्ये कुठेही योग्य क्रेडिट दिले नसल्याचे स्पष्ट करत आक्षेप नोंदवला आहे. याशिकाने निरज गायवान यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

या कथेची लेखिका आलंकृता यापूर्वी आपल्याला भेटली असून, तिला खाजगी आयुष्याबद्दल आपण बरीच माहिती दिली असल्याचेही याशिकाने सांगितले आहे. कहाणी कोणाचीही असो, त्या व्यक्तीला योग्य श्रेय दिले गेले पाहिजे, त्याबद्दल बोलले गेले पाहिजे, असे एक विश्लेषक म्हणून माझे प्रांजळ मत आहे.

‘मेड इन हेवन’चा पहिला सिझन मार्च २०१९ मध्ये आला होता. ही वेबसीरिज वेडिंग प्लानर कंपनी चालवणाऱ्या दोन तारा आणि करन या भागीदारांची आहे. हे आधुनिक आणि स्वतंत्र विचारांचे भागीदार सोबत राहतात. यातला करन मेहरा समलिंगी आहे, तर तारा खन्ना विवाहित आहे. ताराचा नवरा सफल कारखानदार आहे; पण त्याचे दुसऱ्या एका स्त्रीसोबत विवाहबाह्य संबंध आहेत.

करनचे गे असणे त्याची आई अजूनही स्वीकारू शकलेली नाही, त्यामुळे ती नेहमीच आजारी असते. याशिवाय त्यांचा एक इनव्हेस्टर आणि त्याची बायको जी यांच्या कंपनीचे अकाऊंट सेक्शन सांभाळते आणि त्यांचे दोन सहाय्यक त्यातला एक फोटोग्राफर असून, त्याला चित्रपट निर्मितीने पछाडले आहे.

दुसरी न्यू कमर असून ती एका चाळीत राहणारी आहे. त्यामुळे ती दक्षिण दिल्लीच्या या पैशांच्या झगमगाटाकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत असते. या वेबसीरिजच्या प्रत्येक भागाने काळानुसार आपण प्रगतिशील विचारप्रणाली अंगिकारली पाहिजे हे अधोरेखित केले आहे.

ही सीरिज महिला सशक्तीकरणावर, समलिंगी संबंधांवर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, जुन्या चालीरितींवर भाष्य करते. त्यामुळे इतर सीरिजच्या भाऊगर्दीत या सीरिजला विशेष स्थान प्राप्त झाले आहे. या सीरिजमधल्या मध्यवर्ती पात्रांच्या स्वतःच्या अशा मर्यादा, काळ्या बाजू आहेत.

प्रत्येक भागात होणाऱ्या लग्नातदेखील आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण झालेले प्रश्न मांडले गेले आहेत. जसे लग्नाच्या वेळी मुलगी व्हर्जिन नसणे, लग्नाच्या वेळी मुलीने इतर पुरुषाबरोबर संबंध निर्माण करणे, मुलांचा विरोध असताना वयाने ज्येष्ठ असलेल्या दोघांचे लग्न, समलिंगी पुरुषाचा लग्नाचा प्रयत्न, हुंडा प्रश्न, पत्रिका जुळवणी आणि पत्रिकेतला मंगळ असे अनेक मुद्दे जे भारतात लग्न संबंध जुळवताना आडवे येतात ते या सीरिजमध्ये मोठ्या खुबीने मांडण्यात आले आहेत.

यातील एका भागात असे दोन राजनैतिक परिवार दाखवण्यात आले आहेत, जे केवळ राजकारणात आपले वर्चस्व वाढवण्यासाठी कुटुंबातील मुला-मुलीचे लग्न जुळवतात. असे विविध मुद्दे मांडणाऱ्या पहिल्या सिझनने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती.

या सीरिजचा दुसरा सिझन १० ऑगस्टला प्रदर्शित झाला. हा सिझन पहिल्या सिझनपेक्षा आणखी जास्त प्रगतशील विचार मांडणारा आहे. या सिझनमध्ये वेडिंग प्लॅनर म्हणून काम करणाऱ्या ताराचा घटस्फोट, तर करनच्या आयुष्यात समलिंगी संबंधांमुळे आलेले वादळ, त्यांचा सहाय्यक फोटोग्राफर आणि ती दुसरी मुलगी यांचे परस्पर प्रेमसंबंध आणि त्यातल्या अडचणी... अशी अनेक वळणे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

या सिझनच्या पहिल्या भागात आपण अशा वधूला भेटणार आहोत जिच्यात आपल्या सावळ्या रंगामुळे न्यूनगंड निर्माण झाला आहे. तिच्या आधुनिक विचारांच्या वागदत्त वराने तिला ती आहे तशी स्वीकारले असले तरीही ती मात्र रंग उजळण्यासाठी नाना उपाय करत राहते.

दुसऱ्या भागात अशी जोडी आहे जे लग्न करायच्या बेतात आहेत, पण त्यातला पुरुष खूप जास्त रागीट आणि आक्रमक आहे आणि तो त्या मुलीला मारत असतो. लग्नापूर्वी जेव्हा हे सगळ्यांना कळते तेव्हा हा प्रश्न तारा आणि करन कसे हाताळतात यांची ही गोष्ट आहे.

आणखी एका भागात लग्नापूर्वी गरोदर असलेल्या मुलीची गोष्ट आपण पाहणार आहोत. नंतरच्या भागात एका सुखाने संसार करणाऱ्या मुस्लिम कुटुंबातील पुरुष जेव्हा दुसरे लग्न करून आणखी एक बायको घरात आणतो, तेव्हा त्याची पहिली बायको एकाहून जास्त लग्नांना परवानगी देणाऱ्या मुस्लिम विवाह कायद्याविरोधात कसा लढा देते याची कहाणी आहे.

एक भाग आपल्या आजच्या लेखाचा मुख्य विषय असलेली पल्लवी आणि तिचा बौद्ध पद्धतीने होणारा विवाह सोहळा, त्यासाठी तिने घेतलेला स्टॅंड यांचे वर्णन करणारा आहे. एक भाग एका लेस्बिअन जोडीचे लग्न आणि त्यातल्या अडचणींवर भाष्य करणारा, तर शेवटचा भाग वेडिंग प्लॅनर करनच्या आईचा मृत्यू, त्याचे ताराला सोडून आपल्या गे पार्टनरबरोबर राहायला जाणे आणि त्याच्याबरोबर न पटल्यामुळे ताराकडे परतून येणे यांसारख्या गोष्टींसह ही सीरिज पुढे नेणाऱ्या वेडिंग प्लॅनर कंपनीतील सर्वांच्याच आयुष्यात येणारे चढ-उतार, त्यांच्या मर्यादा, त्यांचे अवगुण, त्यांच्या काळ्या बाजू याचे खुमासदार शैलीत चित्रण करण्यात आले आहे. त्यामुळे या सीरिजचे दोन्ही सिझन खऱ्या अर्थाने आधुनिक जीवनशैली आणि तिचा साधक-बाधक आढावा घेणारे ठरले आहेत.

समाज प्रबोधनासाठी अशा चित्रकृतींची वरचेवर निर्मिती होणे गरजेचे आहे. पहिल्या सिझनच्या दिग्दर्शनाची धुरा झोया अख्तर, रिमा कागती आणि आलंकृता श्रीवास्तव यांनी सांभाळली होती. मात्र दुसऱ्या सिझनमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवत निरज गायवानदेखील या चमूत सहभागी झाले आहेत आणि त्यांनी या संधीचे सोने करत या सिझनच्या गुणवत्तेत भर घातली आहे.

त्यांच्या दिग्दर्शनात तयार झालेली, एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांना पसंत करतात, पण सोबतच त्यांचे आई-वडीलदेखील एकमेकांना पसंत करतात, अशा आशयाची कहाणी एकदम झकास आहे. निरज गायवान यांची कथा मांडण्याची शैली आणि संवेदनशीलता खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. प्रेक्षकांना त्यांचे हे सृजन यापुढेही पाहायला मिळेल, ही सदिच्छा!

(लेखक प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com