विवादास कारण की...

आजकाल वारंवार अनेक चित्रपट वादांच्या भोवऱ्यात सापडत आहेत. सध्या ‘काली’ हा माहितीपट विवादाच्या केंद्रस्थानी आहे.
Movie
MovieSakal
Summary

आजकाल वारंवार अनेक चित्रपट वादांच्या भोवऱ्यात सापडत आहेत. सध्या ‘काली’ हा माहितीपट विवादाच्या केंद्रस्थानी आहे.

- गिरीश वानखेडे girishwankhede101@gmail.com

आजकाल वारंवार अनेक चित्रपट वादांच्या भोवऱ्यात सापडत आहेत. सध्या ‘काली’ हा माहितीपट विवादाच्या केंद्रस्थानी आहे. दर सहा महिन्यांनी एक नवा चित्रपट नव्या मुद्द्यावरून वादात सापडत असल्याचे आपल्याला ऐकू येते. भारतात पूर्वीपासूनच चित्रपटांवरून विवाद झाले आहेत. ते कधी धार्मिक, तर कधी जातीवर आधारित असतात. याशिवाय क्षेत्रीय, रुढी, परंपरा, ऐतिहासिक हे मुद्दे विवादासाठी आहेतच. यातून मराठी चित्रपट तर सोडाच, मराठी नाटकांचीही सुटका झालेली नाही. विवादात वाया जाणारी शक्ती आणि ऊर्जा विधायक कार्यात गुंतवू शकलो तर अनेक कल्याणकारी कामे होतील.

चित्रपट हा प्रत्येक भारतीयाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. आपण भारतीय चित्रपट पाहूनच नाती तयार करायला, त्यांचे संगोपन करायला, प्रेम करायला आणि ते व्यक्त करायला, आयुष्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे मार्ग शोधायला, आव्हाने स्वीकारायला शिकतो. मुळात चित्रपट म्हणजे काय? तर, चित्रपट म्हणजे दृश्य कलेचे माध्यम जे हलत्या प्रतिमांद्वारे मानवी भावना, अनुभव, कल्पना, धारणा, सौंदर्य यांचे कथन आणि दर्शन घडवते. सिनेमॅटोग्राफीचे लघुरूप ‘सिनेमा’ हा शब्द चित्रपट निर्मिती आणि चित्रपट उद्योग या कला प्रकारासाठी सर्रास वापरला जातो. चित्रपट हे त्या त्या भागातील माणसाच्या आयुष्याचे आणि समाजाचे प्रतिबिंब असतात. आंतरसांस्कृतिक संवाद प्रभावीपणे मांडण्याची क्षमता असलेले हे माध्यम मनोरंजनाबरोबरच प्रबोधनासाठीही उपयोगात आणले जाते. चित्रपट क्षेत्रात काम करणारे कलाकार, दिग्दर्शक, निर्माते हेदेखील समाजाचाच भाग आहेत. त्यामुळे ते समाजाच्या प्रथा-परंपरा, चांगल्या वाईट रीती, माणसांचे अनुभव चित्रपटातून मांडत असतात. चित्रपट निर्मिती करत असताना तो आकर्षक व्हावा किंवा त्यात नावीन्य यावे, यासाठी हे लोक आपल्या कल्पनाशक्तीनुसार वेगवेगळे अभिनव प्रयोग करत असतात; पण या प्रयोगातून कोणालाही दुखावणे हा त्यांचा उद्देश कधीच नसतो. कलाकाराचा प्रथम धर्म चित्रपट हाच असतो. त्यानंतर तो कुठल्या तरी धार्मिक विचारांचा पाईक असतो. त्यामुळे जेव्हा कधी एखाद्या चित्रपटावरून विवाद होतात, तेव्हा ते कोणत्याही कलाकाराने जाणीवपूर्वक केलेले नसतात. वैविध्यपूर्ण उत्तम कलाकृती तयार करणे हाच त्याचा एकमेव उद्देश असतो.

आजकाल वारंवार अनेक चित्रपट वादांच्या भोवऱ्यात सापडत आहेत. सध्या ‘काली’ हा माहितीपट विवादाच्या केंद्रस्थानी आहे. दर सहा महिन्यांनी एक नवा चित्रपट नव्या मुद्द्यावरून वादात सापडत असल्याचे आपल्याला ऐकू येते. असे नाही की भारतात हा प्रकार आत्ता सुरू झाला. भारतात पूर्वीपासूनच चित्रपटांवरून विवाद झाले आहेत. हे विवाद कधी धार्मिक तर कधी जातीवर आधारित असतात. याशिवाय क्षेत्रीय, रुढी, परंपरा, ऐतिहासिक हे मुद्दे विवादासाठी आहेतच. नजीकच्या काळात माय नेम इज खान, परझानिया, डर्टी पिक्चर, ओह माय गॉड, राम लीला, फना, लिपस्टिक अंडर माय बुरखा, वॉटर, फायर, पद्मावत, जोधा अकबर असे अनेक चित्रपट वेगवेगळ्या कारणांवरून वादात सापडले. इतकेच काय, आज-काल ओटीटीवरच्या महाराणी, मिर्झापूर, तांडव यांसारख्या वेबसीरिजही यात अडकल्या. यातून मराठी चित्रपट तर सोडाच मराठी नाटकांचीही सुटका झालेली नाही. मराठी नाटककार विजय तेंडुलकर यांच्या घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर, शांतता! कोर्ट चालू आहे या नाटकांवरून झालेला गदारोळ आपल्याला माहीत आहेच. मराठीतले सामना, सिंहासन, उंबरठा हे चित्रपट आणि त्यांचे वादातले मुद्दे आपल्याला आठवत असतीलच!

हॉलीवूड चित्रपटदेखील अनेकदा अनेक मुद्द्यांवरून वादात सापडले. काहींवर तर बंदीदेखील घालण्यात आली. विलियम फ्रेडकिन यांच्या एक्झॉर्सिस्ट या चित्रपटात ईसाई धर्मगुरूची प्रतिमा मलिन केली म्हणून वाद झाला होता, तर केव्हिन स्मिथ यांच्या डॉग्मा या चित्रपटाबाबत वाद झाला होता. मेल गिब्सन दिग्दर्शित पॅशन ऑफ ख्राईस्ट या चित्रपटात येशूला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले; तसेच चित्रपटात खूप जास्त प्रमाणात हिंसा असल्याने या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी जगभरातून झाली होती. दिग्दर्शक डॅरेन अरोनोफ्स्की यांच्या नोव्हा या रसेल क्रो अभिनित चित्रपटावरूनही विवाद निर्माण झाला होता. २००४ साली आलेल्या सबमिशन या इस्लामी स्त्रियांच्या शोषणावर भाष्य करणाऱ्या लघुपटावर बंदी घालण्यात आली होती. द लास्ट टेंप्टेशन ऑफ ख्राईस्ट या विवादास्पद चित्रपटाच्या विरोधात जाळपोळ, गोळीबार झाला होता.

सध्या वातावरण तापले आहे ते कॅनडामध्ये राहणाऱ्या तमिळ वंशाच्या चित्रपट निर्मात्या लिना मणिमेकलाई यांनी तयार केलेल्या ‘काली’ या माहितीपटारून. या माहितीपटाच्या पोस्टरवर काली मातेच्या भूमिकेत असलेला कलाकार धूम्रपान करत असल्याचे दिसले आणि वाद सुरू झाला. काली हा केवळ माहितीपट आहे, व्यावसायिक चित्रपट नाही. कॅनडातल्या टोरांटो शहरातल्या आगाखान संग्रहालयात दर वर्षी होणाऱ्या ‘अंडर व टेंट’ या महोत्सवात यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या १८ माहितपटांमध्ये कालीचा समावेश होता. या माहितीपटातील काली मातेच्या भूमिकेतील कलाकार धूम्रपान करतोय, असे न समजता काली माता धूम्रपान करतेय, असे मानण्यात आले आणि काही धार्मिक संघटनांनी यावर आक्षेप घेत माहितीपटात बंदी घालण्याची मागणी केली. निषेध म्हणून काही संघटनांनी लिना यांच्याविरुद्ध ठिकठिकाणी एफआयार दाखल केले. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. मध्य प्रदेशात लुक आऊट नोटीस बजावण्यात आली; तर एका धर्मगुरूंनी लिना यांचा शिरच्छेद करण्याचा फतवा काढला. हे प्रकरण इथेच थांबले नाही, तर भारतीय राजदूतांनी कॅनडा सरकारला या माहितीपटावर बंदी घालण्याची विनंती केली.

याबाबत लिना यांचे म्हणणे आहे की, देवी-देवतांच्या भूमिका वठवणारे कलाकार नाटक किंवा चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान विरंगुळा म्हणून किंवा ताण कमी करण्यासाठी धूम्रपान करतात. आपण आपल्या लहानपणी काली मातेची भूमिका करणाऱ्या कलाकारांना कैक वेळा बिडी, सिगारेट ओढताना, गांजा ओढताना, दारू पिताना पाहिले आहे, असे त्या म्हणतात. आपल्या माहितीपटात देवतांचे चुकीचे चित्रण केलेले नसून, त्या भूमिकेतला कलाकार निव्वळ विरंगुळ्यासाठी धूम्रपान करत आहे. याचा देवाशी काहीएक संबंध नाही, असे लिना यांनी स्पष्ट केले आहे.

काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि चित्रपट अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी समाज माध्यमाद्वारे लिना मणिमेकलाई यांना पाठिंबा दिला आहे. सध्या देशात कट्टरवादी लोक आक्रमक पवित्रा घेत आहेत. सामान्य माणसाला कट्टरवादी भूमिका घ्यायला सांगणे हे व्यक्तिस्वातंत्र्याचे हनन असून या विरोधात आवाज उठवला पाहिजे, असे विचार महुआ मोईत्रा यांनी लिना यांच्या समर्थनार्थ मांडले आहेत. या माहितीपटाच्या समर्थनार्थ आता बरेच जण सरसावले आहेत.

भारतात चित्रपटांवरून गोंधळ होणे हे काही नवीन नाही, पूर्वीदेखील हे घडले आहे. मग आताच या घटना आपल्याला ठळकपणे का जाणवत आहेत? याचे मुख्य कारण म्हणजे प्रतिक्रिया देण्यात आलेला कडवटपणा आणि कट्टरवाद. आजकाल चित्रपटांवर सातत्याने धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप केले जात आहेत. हॉलीवूडमध्येही चित्रपटाबाबत विवाद झाले आहेत. धार्मिक उन्माद हॉलीवूडमध्येही आहे. पण, तो बॉलीवूडच्या तुलनेत कमी आहे. भारताच्या तुलनेत तिथे वृतपत्रांना अधिक स्वातंत्र्य आहे. तिथली वृत्तपत्र अधिक लोकशाहीवादी आहेत. तिथली वृत्तपत्रे प्रसंगी राष्ट्राध्यक्षांवरही विनोद करतात, देवांवरही विनोद करतात; पण त्यापेक्षाही जास्त शासन व्यवस्था, राजनैतिक व्यवस्था, प्रशासन यावर खिलाडूवृत्तीने विनोद करतात, टीकाही करतात. समाजही याचे वादात रूपांतर न करता ते खिलाडूवृत्तीनेच स्वीकारतो. ही मोकळीक भारतात दिसत नाही. भारतात मागच्या ८/१० वर्षांत असहिष्णुता वाढीस लागली आहे. तुलनेत हॉलीवूड मात्र मागच्या ८/१० वर्षांत याबाबतीत शांत झाले आहे. त्यामुळे आपण भारतीय जगापेक्षा वेगळे भासू लागलो आहोत. पूर्वी सामंजस्याने प्रतिक्रिया देणारे भारतीय आता असंयमी होत आहोत आणि असंयमी असलेले जग शांत, समजूतदार भूमिका घेत आहे. भारतीय मात्र जगाच्या विरुद्ध दिशेने वाटचाल करीत आहेत.

काली माहितीपटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे प्रकर्षाने जाणवते की आपण मुक्त विचारांची कास सोडून मूलतत्त्ववादी बनू लागलो आहोत. आपली सहनशीलता कमी होत चालली आहे. प्रत्येक कलाकृती आपण तुलनात्मक दृष्टीने पाहून आवडली, नाही आवडली असे वर्गीकरण करण्याचा अट्टहास करत आहोत. भारतातही पूर्वी कलाकार, दिग्दर्शक यांना स्वातंत्र्य होतं, त्यांच्या कलाकृतीचा आदर केला जायचा. समाजात त्यांना मान असायचा जो आता राहिला नाही. आता कलाकारांबद्दल असलेल्या आदराची जागा धर्मांधता, रुढी-परंपरा यांनी घेतली आहे. आपण वरचेवर परंपरावादी, पूर्वग्रहदूषित होत चाललोय. आजकाल लोक कलाकृतींचा आनंद लुटण्याऐवजी त्यात वादांचे मुद्दे शोधण्यात धन्यता मानत आहेत. हे खूपच दुर्भाग्यपूर्ण आहे. विवादात रस घेण्याचा वाढता कल, रोजच्या जीवनात अशा विषयांवर चर्चा करणे या गोष्टी लाजिरवाण्या आहेत. या सर्वांच्या विरोधात अभिजन आणि सहिष्णू वर्गाने आवाज उठवला पाहिजे..

विवादात वाया जाणारी विचारशक्ती आणि ऊर्जा इतर विधायक कार्यात गुंतवू शकलो तर अनेक कल्याणकारी कामे होतील. वाद-विवादासारख्या गोष्टी आपल्याला मागे खेचतात, पतन घडवतात. म्हणूनच, आपण कलाकार आणि त्यांच्या कलाकृतीकडे लक्ष दिले पाहिजे, त्यांच्या त्रुटीकडे नाही. त्रुटी किंवा मतभेद मोठ्या मनाने स्वीकारले पाहिजे.

शेवटी सिनेमा म्हणजे काय? तर कॅमेऱ्याला जे समाजात घडताना दिसत आहे त्याचीच प्रतिमा. मग, चित्रपटातल्या घटना अमान्य करून कसे चालेल. प्रसिद्ध हिंदी गीतकार आणि शायर लुधियानवी म्हणतात, ‘‘गम ए हयात कहां से लाए खुशी के गीत, जिंदगी को वही देंगे जिंदगी से जो पाएंगे हम!’’ याप्रमाणेच, समाजात जे घडताना दिसेल चित्रपट तेच मांडतील. मग यात चित्रपटांचा काय दोष?

(लेखक देशातील आघाडीचे फिल्म समीक्षक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com