

Goa Travel Experience
esakal
प्रणव सखदेव
गोवा हे असं ठिकाण आहे, जिथे एकाच वेळी संथ, लयदार जीवन आणि समुद्र, क्रूज, रात्रीचं फ्ली मार्केट, विविध प्रेक्षणीय स्थळं यांचा विलोभनीय असा मिलाफ झाला आहे. रोजच्या शहरी धावपळीने कावलेलं आणि त्याची सवय जडलेलं निबर मन तिथे गेलं की, आपोआपच निवांत, संथ होतं; पण तरी ते सुस्तावत नाही. असा अनुभव मला तरी नेहमी येतो.
त्यामुळे प्रवासाची कितीही नावड असली, तरी मला गोव्याला जायला आवडतं – गोव्याला किंवा समुद्रकिनारी प्रदेशात. (पण पहिल्यांदा मी जेव्हा हिमालयात गेलो तेव्हा मात्र माझं हे मत पूर्णतः बदललं. हिमालय, तिथली शिखरं, तिथलं वातावरण केवळ अद्भुत आहे, अद्भुत!) पण अर्थात गोवा हे गोवा हेही तितकंच खरं!
लग्न झाल्यानंतर एका दिवाळीच्या सुट्टीत मी आणि माझी बायको गोव्याला गेलो होतो. एके ठिकाणी राहायचं आणि प्रथेप्रमाणे एक स्कूटर भाड्याने घेऊन हवं तसं, हवं तेव्हा फिरायचं असं ठरवलं. फार आखीव काही नाही, आदल्या दिवशी थोडं नियोजन करायचं आणि सकाळी बाहेर पडायचं. इतकंच. वाटेल तसं. नो घाई, नो हे करू ते करू! सुशेगात!
तेव्हा ऑक्टोबरचा महिना होता. एके दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करून ठरवलं की, कलंगुट बीचवर जाऊ या. स्कूटरवरून निघालो. मध्येमध्ये वाटेत थांबत होतो. पोचलो तेव्हा सकाळचे साडेअकरा वगैरे वाजले असावेत. डोक्यावर सूर्य आलेला. चालत चालत किनाऱ्यावर गेलो नि समोर चमचमता समुद्र. बलाढ्य निळंसर-ग्रे अस्तित्व. त्याची गाज कानावर पडली. लाटा संथ गतीने किनाऱ्यावर येऊन आदळत होत्या. समुद्र शांत होता, भरती-आहोटी यांपैकी कसलीही ओढ नव्हती. एका लयीत लाटा येत-जात होत्या. मग दिसली ती वाळू, कोरडी आणि सोनेरी-पिवळीशी. त्या ऑक्टोबर हिटच्या उन्हात तिचा डोळ्यांना उष्णसा डाग लागला खरंतर. डोळ्यांवर सनग्लासेस होते, तरीही धग जाणवली.