

Indian athletics sprint revolution
esakal
‘शंभर मीटर किंवा ‘स्प्रिंट’साठी आवश्यक असलेले ‘जीन्स’ भारतीय खेळाडूंत नाही’, असे टोमणे गुरिंदरवीर सिंगला वयाच्या १३ व्या वर्षी a लागले होते. मात्र, हा भ्रम किंवा गैरसमज तोडण्यासाठी त्याने पुढील १२ वर्षे कठोर मेहनत केली आणि रांची येथे फेडरेशन करंडक ॲथलेटिक्स स्पर्धेत प्रथम १०.१७ सेकंद आणि अंतिम फेरीत १०.०९ सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम करून भारतीय धावपटूही वेगवान शर्यतीत भन्नाट कामगिरी करू शकतात, हे दाखवून दिले.
आंतरराष्ट्रीय पातळीवरही फक्त श्वेतवर्णीय धावपटूच शंभर मीटर शर्यतीत यश मिळवू शकतात, असा एक समज आहे. मात्र, हा समज चुकीचा आहे, हे खुद अमेरिकेचे महान धावपटू कार्ल लुईस आणि माजी विश्वविक्रमवीर लेरॉय बरेल यांनी २०१९ च्या दोहा जागतिक स्पर्धेच्या वेळी ‘सकाळ’शी बोलताना मान्य केले होते. त्यामुळे गुरिंदरवीरने केलेला राष्ट्रीय विक्रम ही घटना भारतीय ‘स्प्रिंट’मधील ‘माईलस्टोन’ ठरेल यात शंका नाही. लांब पल्याच्या शर्यतीत केवळ आफ्रिकी धावपटूच वर्चस्व गाजवू शकतात, हा मुद्दाही अविनाश साबळेने केनियाच्या धावपटूंवर मात करून खोडून काढला होता. अशी अनेक उदाहरणे आहेत. शरीरातील ‘रेड सेल’ (आरबीसी) किंवा ‘व्हाईट सेल’ (डब्ल्यूबीसी) मुळे एखादा धावपटू स्प्रिंटसाठी की मध्यम किंवा लांब पल्याच्या शर्यतीसाठी योग्य आहे, हे ठरवता येऊ शकते. मात्र, ठरावीक वर्णाचे किंवा भौगोलिक क्षेत्रात राहणारेच धावपटू विशिष्ट शर्यतीत वर्चस्व गाजवू शकतात, हा मुद्दा केवळ भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवरही अद्याप पूर्णपणे सिद्ध होऊ शकला नाही. भारतातच लेवी पिंटो, रामास्वामी गनासेकरन, आदिल सुमारीवाला, राजीव बालकृष्णन, अनिल कुमार यांनी शंभर मीटर शर्यतीत आपल्या काळात हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे कठोर मेहनत, योग्य व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, कणखर मानसिकता, निर्धार, ध्येयासाठी समर्पण या जोरावर कोणताही खेळाडू यशाचे शिखर गाठू शकतो, हे गुरिंदरवीर सिंगने विक्रम करून सिद्ध करून दाखवले.