

Untouchability
esakal
प्रियदर्शन
देशातील विविध प्रकरणांमध्ये दलित, मागासवर्गीय, आदिवासी, स्त्रिया आणि तरुण यांच्या वेदना आणि असंतोष सामावलेले आहेत. या सर्वांच्या वेदना आणि असंतोषाला राहुल गांधी आवाज देण्याचा प्रयत्न करत आहेत.
हल्दवानी येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर व्यासपीठाचे ‘शुद्धीकरण’ करण्याच्या नावाखाली जो धार्मिक विधी करण्यात आला, त्याचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. काँग्रेसने याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांचा दावा असा आहे की, या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल करायला हवा. विशेष म्हणजे, हल्दवानीमध्ये स्वतः राहुल गांधी यांच्याविरोधातच एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी शुद्धीकरणाचा संबंध अस्पृश्यतेशी जोडला आणि जातीसूचक टिप्पणी केली, अशी तक्रार करण्यात आली आहे. शुद्धीकरण करणाऱ्यांकडून एक युक्तिवाद असाही केला जात आहे की, या प्रक्रियेत स्वतः दलित आणि मागासवर्गीय लोकही सहभागी झाले होते. पण हा युक्तिवाद स्वीकारण्याजोगा आहे का? कायदा असे सांगतो का की जातीच्या आधारावर अस्पृश्यता किंवा अपमान तेव्हाच झाला असे मानले जाईल, जेव्हा उच्चवर्णीय लोक अशी कृती करतील? मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यक्रमानंतर व्यासपीठाचे शुद्धीकरण करण्यात आले, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या जातीय ओळखीवर केलेले आघात नाही का? ज्या राज्यघटनेत सर्व प्रकारची अस्पृश्यता आणि भेदभाव नष्ट करण्याची भूमिका मांडण्यात आली आहे, त्या राज्यघटनेची ही थट्टा नाही का?