हॅप्पी दिवाली!

साऱ्यांची जेवणं, आवराआवर झाल्यावर दुपारी राधाने लाडू वळायला
हॅप्पी दिवाली!
हॅप्पी दिवाली! sakal

‘अय्या आई... कधी आलात?... कसं झालं मैत्रिणीच्या नातवाचं लग्न?... भेटल्या वाटतं सगळ्याजणी?...’’ राधानं ऑफिसमधून आल्या आल्या सासूबाईंवर प्रश्नांची उत्साही सरबत्ती सुरू केली. ‘‘अगं हो हो... आधी नीटसं आत तरी ये, फ्रेश हो. मग बसूया गप्पा मारत...!’’ ‘‘अहो आई, तुम्ही नव्हता ना, तेव्हा घरात कसंसंच वाटत होतं. पण आता तुम्हाला नुस्तं बघूनही मला एकदम फ्रेश वाटतंय. तरीही, आलेच!’’ म्हणत ती आत गेली. घरातले बाकी सारे यायला अजून अवकाश होता. त्यामुळे राधा आवरून येईपर्यंत सुधाताईंनी दोघींसाठीच मस्त चहा केला. सोबत, लग्नाहून परतताना मैत्रिणीने दिलेल्या चिवडा-लाडवाच्या पॅकेटमधलं एक फोडून प्लेटमध्ये घेतलं आणि त्या बाल्कनीतल्या बैठकीत आल्या.

आमच्यासाठी जणू काही तुमचं ते ‘गेट टूगेदर’च ठरलं बघ! आणि तुम्ही म्हणता तसं ते खूप एंजॉय पण केलं आम्ही... नुस्तं खाणं-पिणं आणि पोटभरेपर्यंत गप्पा गप्पा गप्पा! नाहीतर काय गं... कित्ती वर्षांनी भेटलो होतो... आणि इतक्या वर्षांतलं आपल्या जीवलग मैत्रिणींना काय काय सांगायचं राहिलेलं... शाळेतल्या आठवणी, संसारातले कडू-गोड अनुभव, नवरा-मुलं-नातवंडं-सुना-म्हातारपण-तब्येती... कित्ती काय काय विषय! पण खूप छान वाटलं गं सगळ्याजणींना बघून-भेटून... खूप समाधान वाटलं. बऱ्याच वर्षांनी एक वेगळी ऊर्जा मिळाली बघ! फक्त एक रुखरुख राहिली गं... सगळ्या भेटल्या; पण सरू तेवढी भेटली नाही बघ!...’’

हॅप्पी दिवाली!
नोबेल विजेती मलालाने केले लग्न; पती असर मलिक कोण?

‘‘का बरं?... तुमची पट्टमैत्रीण ना त्या? का नाही आल्या?... त्यांचं मोठं माहेर; पण निगर्वी-प्रेमळ वागणं, तुम्हा दोघींचं एकत्र हुंदडणं, दंगामस्ती करणं... कित्ती काय काय सांगत असता ना तुम्ही...’’ सुधाताई क्षणभर भूतकाळात जात पुन्हा वर्तमानात आल्या. ‘‘हो गं.. पण आता ती परिस्थिती राहिली नाही. लग्नात कुसुमकडून कळालं, तिचा एकुलता एक मुलगा काही वर्षांपूर्वी म्हणे अचानक अपघातात गेला. त्याचा धसका घेऊन तिचा नवरा अंथरुणाला खिळला. तिला एकटीला त्यांची काळजी घेणं वयामुळं जमेनासं झालं, तसं ते वृद्धाश्रमात राहायला गेले. पण दोनेक वर्षांत नवराही गेला आणि आता तिथे ती एकटीच असते! मला फार वाईट वाटलं गं तिचं हे सारं ऐकून...’’ ‘‘अरेरे... पण कुठल्या वृद्धाश्रमात आहेत त्या?... तिथला काही फोन वगैरे नाही का कोणाकडे?...’’ राधाने विचारलं तशा सुधाताई पुन्हा उत्साहाने म्हणाल्या... ‘‘अगं, कुसुमने शोधून आणला होता ना नंबर त्या वृद्धाश्रमाचा, मग तिथूनच आम्ही तिला फोन केला आणि गप्पाही मारल्या. बोलण्यातून जाणवलं, ती फार थकलीये... वयापेक्षा मनाने... म्हणून मग मी तिला म्हटलं, अनायासे दिवाळी जवळ आलीच आहे, तेव्हा येईन मी तुला भेटायला!! अगं राधा, तुला सांगते मी, मी भेटायला येते म्हटल्यावर ती एवढी खूश झाली... फोनवरूनही मला तिचा तो आनंद लख्ख जाणवत होता. राधा, दिवाळीत जाऊन येईन म्हणते मी तिला भेटायला... ए, पण तेव्हा मी तिच्यासाठी काय नेऊ? आपल्यातला फराळ घेऊन जाऊ का..?’’

सुधाताईंच्या या प्रश्नावर राधा क्षणभर काहीशी वेगळीच विचारमग्न झाली नि लगेच म्हणाली... ‘‘आई, मी काय म्हणते... सरूमावशींना तिकडे वृद्धाश्रमात फराळ नेऊन देण्यापेक्षा... या दिवाळीला त्यांना आपण आपल्याच घरी घेऊन आलो तर... मी काढेन त्या वृद्धाश्रमाची परवानगी... डोन्ट वरी!’’ ‘‘...अगं, किती छान बोललीस तू... माझ्या डोक्यातच आलं नाही असं काही... माझी गुणाची गं बाळी!’’ आईसारख्या सासूने आपल्या लेकीसारख्या सुनेची अलाबला घेतली नि लग्गेच मैत्रिणीला तसा फोनही केला. सुधाताईंचा तो फोन आल्यापासून सरुआजी जाम खूश होत्या. कितीतरी वर्षांनी कुणाच्या तरी घरी जायचं होतं... कितीतरी वर्षांनी कुणीतरी इतक्या आपुलकीने घरी बोलवत होतं... वृद्धाश्रमातल्या निरस-एकाकीपणाला कंटाळलेलं त्यांचं मन घरचं सुख अनुभवायला किती किती आसुसलं होतं... आणि कुणाच्यातरी का होईना, पण घरात राहण्याच्या नुस्त्या विचारानंही त्यांचं मन समाधान पावल्याचं दिसत होतं...

हॅप्पी दिवाली!
राज्य सरकारचे एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचे अस्त्र

धनत्रयोदशी दिवशी सकाळी सकाळी सुधाताई आणि त्यांचा मुलगा गाडीतून त्यांना घरी घेऊन आले. आल्या आल्या राधाने पायांवर पाणी घालून हसतमुखाने त्यांचं स्वागत केलं. नातवंडांनी वाकून नमस्कार केले. राधाने मऊ उप्पिटासोबत छानसा चहा करून दिला आणि सांगितलं, ‘‘सरुमावशी, आता इथं अगदी हक्काने दिवाळी साजरी करायची हं.. अजिबात संकोच करायचा नाही!’’ त्यांना हवं-नको ते बघून, दोघी म्हाताऱ्या बालमैत्रिणींना गप्पा मारायला मोकळं सोडून ती घरच्या कामांकडे वळली. सरुआजी सुधाताईंना म्हणाल्या, ‘‘सुधे, गोड आहे गं सून तुझी, नशिबवान आहेस बयो!’’

दिवाळसणाची, फराळाची बरीचशी तयारी आधी झालीच होती. साऱ्यांची जेवणं, आवराआवर झाल्यावर दुपारी राधाने लाडू वळायला घेतल्याचं सरुआजींनी पाहिलं. अचानक त्या म्हणाल्या, ‘‘राधा, मी पण वळू का गं लाडू? चालेल तुला?.. अगं, हे दोघे गेल्यापासून गोडाधोडाचे पदार्थ मी कधी केले नाहीत बघ. म्हणजे, इच्छाच मेली गं काही करायची. ते दोघेही खाण्याचे शौकीन होते, त्यामुळे तेव्हा सारखं काहीतरी करून घालणं व्हायचं. पण आज मात्र कित्येक वर्षांनी तुला बघून, हे हसरं घर बघून, जरा उमेद वाटली बघ. म्हणून म्हटलं, वळू का मी पण लाडू?..’’ ‘‘अहो मावशी, विचारताय काय... या, बसा इथे...’’ म्हणत राधाने त्यांनाही आपल्यात सामावून घेतलं.

बाकी तयारीत, उरलेल्या खरेदीत दोन दिवस गेले. दिवाळसणाचा दिवस उजाडला. पहाटेच उठून राधाने दारात सुंदर रांगोळी काढली होती. ताटांत काढून ठेवलेल्या फराळाचा घमघमाट, उटण्याचा मंद सुगंध, दिव्यांची आरास या सगळ्यांनी घर उजळून निघालं होतं. घरभर छोट्या नीला-राघवच्या गमतीजमतींनी, राधा-रोहित या सगळ्यांच्या हसऱ्या आणि उत्साही चेहऱ्यांनी दिवाळी अजूनच तेजोमय जाणवत होती सरुआजींना. सगळ्यांची अभ्यंगस्नानं झाली आणि राधाने मुलं, सासूबाई, नवरा, सरुमावशी या सगळ्यांना एका ओळीत बसवलं. सगळ्यांचं औक्षण केलं नि सरुमावशींच्या हातात एक सुंदर साडी ठेवत सांगितलं, ‘‘मावशी, ही साडी मी आणि आईंनी खास तुमच्यासाठी आणलीये, तेव्हा आज ती नेसायचीच हं!’’

सरुआजींच्या डोळ्यांतून केव्हापासून थोपवलेल्या अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. स्वत:ला कसंबसं सावरत त्या म्हणाल्या, ‘‘राधा, तिकडे वृद्धाश्रमात कशाकशाची कमी नाही गं... औषध-अन्नपाणी.. सगळं सगळं वेळेत मिळतं. पण ते ना... सगळं तांत्रिक असतं गं! आपण पैसे भरलेले असतात, आम्हाला सांभाळा म्हणून, ते सांभाळणं असतं त्यांचं काम- नोकरी म्हणून... पण इथे, तुमच्या इथे आल्यावर... खूप वर्षांनी... हे घरपण, आपुलकी, माया भरभरून अनुभवतेय गं! आज एवढंच जाणवतंय... पैशांनी सगळी सुखं विकत घेता येतात; पण तू जी अंतरातली ओली माया दाखवलीस मला... ती ना, फक्त आणि फक्त घरातच झिरपत असते आणि ती फक्त आपल्या मायेच्या माणसांमध्येच दिसते! हा दिवाळसणच काय, साधं सरळ जगणंच विसरले होते मी... एक यांत्रिकपणा आला होता जगण्यात, वृद्धाश्रमात गेल्यापासून... पण तुम्ही मात्र मला पुन्हा एकदा घरपण अनुभवायला दिलंत. प्रेमाचा ओलावा फक्त आणि फक्त घरातच असतो, हे किती वर्षांनी तुझ्या अगत्यातून जाणवलं गं मला... पोरी, माझे अनंत आशीर्वाद आहेत तुला... तुम्हा सर्वांनाच...’’ सरुआजींच्या मनातील आनंद, समाधान त्यांच्या डोळ्यांतून पुन्हा वाहू लागलेलं दिसताच सुधाताई उठल्या. आणि हसत हसत राधावाली झप्पी आपल्या मैत्रिणीला देत त्या म्हणाल्या... ‘‘ए सरू, हॅप्पी दिवाली गं!!’’

- ॲड. दीपा चौंदीकर (दोडमणी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com