भोरगिरी ते भीमाशंकर- गिरीभ्रमण...!

हर्षल निकम
मंगळवार, 23 मे 2017

अशीच आमची एक संस्था इनव्हेंचर ऍकेडमी ऑफ स्पोर्टस पुणे कै. बाबूराव सणस क्रीडांगण या ठिकाणी ऍथलेटिक्‍स (मैदानी खेळ) यासाठी वर्षभर निरनिराळ्या वयोगटासाठी राबवत आहेत. तसेच वार्षिक परीक्षा संपल्यानतंर सदर प्रशिक्षणांमध्ये आहार तज्ज्ञ वैद्यकीय तज्ज्ञ, विविध खेळातील तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे.

उन्हाळी सुट्ट्या सुरू लागल्यावर सर्व मुलांना व पालकांना वेध लागतात ते उन्हाळी शिबिरांचे. सध्या पुण्याच्या अनेक भागात ही उन्हाळी शिबिरे सुरू आहेत पण फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या पाल्याला अशा शिबिरामध्ये सहभागी करून खरंच त्याचा सर्वांगीण विकास होणार का? हा प्रश्‍न उपस्थित होतो. परंतु पुणे शहरात अनेक भागामध्ये अनेक मैदानांवर, जलतरण तलावावर बॅंडमिंटन कोर्टवर, टेनिस कोर्टवर तसेच अनेक कला संस्था वेगवेगळ्या हॉलवर वर्षभर अशी प्रशिक्षणे आयोजित केली जातात. सध्या आपली सर्वच मुले तांत्रिक युगामध्ये मोबाईल, संगणक यांच्या आहारी गेलेली दिसतात. त्यातून बाहेर काढण्यासाठी अशा कला संस्था व क्रीडा संस्था या मुलांना शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी व उद्याची सक्षम पिढी घडवण्यासाठी वर्षभर प्रशिक्षणे आयोजित करत असतात. 

अशीच आमची एक संस्था इनव्हेंचर ऍकेडमी ऑफ स्पोर्टस पुणे कै. बाबूराव सणस क्रीडांगण या ठिकाणी ऍथलेटिक्‍स (मैदानी खेळ) यासाठी वर्षभर निरनिराळ्या वयोगटासाठी राबवत आहेत. तसेच वार्षिक परीक्षा संपल्यानतंर सदर प्रशिक्षणांमध्ये आहार तज्ज्ञ वैद्यकीय तज्ज्ञ, विविध खेळातील तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. 

याचबरोबर मनोरंजनासाठी सहलीचे आयोजन केले जाते. या वर्षीसुद्धा आम्ही 7 मे 2017 रविवारी या दिवशी पहाटे 4.30 वाजता कै. बाबूराव सणस क्रीडांगण या ठिकाणावरून एव्हरेस्ट वीर चेतन केतकर व त्यांचे सहकारी तुषार विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वयोगट 6 ते 60 यांच्या पूर्ण टीमचे भोरगिरी ते भीमाशंकर ते 8 कि.मी. चे अंतर पूर्ण करण्याचे ठरवले. 

सदर मोहिमेसाठी 90 जणांचा सहभाग होता. पहाटे 5.00 वाजता आम्ही गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करून पुणे सोडले. बरोबर हिराबाग चौकातील गणेश अमृततुल्यचे स्वादिष्ट उप्पीट घेऊन आम्ही दरमजल करत पहाटेचा गार वारा घेत पुणे-मुंबई जुना रस्ता - नाशिक फाटा - भोसरी - मोशी - चाकण - राजगुरूनगर - चास - कमान - वाडा या मार्गाने 2 बसने 7.30 वाजता भोरगिरी या ठिकाणी पोहचलो. भोरगिरी गाव अतिशय निसर्गरम्य असून डोंगराच्याकुशीत वसलेले आहे. तेथील शंकराच्या मंदिरात बसून आम्ही सर्वांनी आमच्याबरोबर आणलेल्या नाश्‍त्याचा आस्वाद घेतला व लगेच आण्ही  8.30 वाजता भोरगिरीतून भीमाशंकरकडे जाण्यासाठी प्रयाण केले.

सुरुवातीलाच मुलांच्या जोड्या करून चालत असताना शेतात चालू असलेली कामे बघून मुले आश्‍चर्यचकीत झाली. पहिला टप्पा जरा अवघड व चढाचा असल्याने काही जणांची यात दमछाक झाली. परंतु ही मुले वर्षभर मैदानावर सरावासाठी येत असल्याने व पर्वती तळजाईवर सराव करत असल्याने त्यांना खूप प्रयास करावा लागला नाही. पहिला टप्पा वर चढून गेल्यावर येळवली नावाची वाडी लागली. चेतन दादाने त्या ठिकाणी सर्वांना थांबवून भीमाशंकरच्या डोंगरावरील भ्रमणध्वनीचा मनोरा दाखवला; तसेच पावसाळ्यात या वाडीचा कसा संपर्क तुटतो ते सांगितले व आम्ही पुढे निघालो. मुलांनी सोबत दोन-दोन पाण्याच्या बाटल्या घेतल्या होत्या. सोबत पाण्याचे कॅनही होते.

निसर्गाचा, जंगलाचा, पक्षांच्या आवाजाचा आनंद घेत आम्ही पदरगड दिसणाऱ्या कड्याजवळ पोहचलो. चेतन दादाने परत या ठिकाणी माहिती सांगितली. त्यामध्ये त्याने पेठ किल्ला, तुंगी शिखर, गणपती घाट, तळकोकण या भागांची माहिती दिली.

तसेच लोणावळा ते भीमाशंकर या ट्रॅकची माहिती सांगितली. आमचा ग्रुप मोठा असल्याने तसेच  कड्याखाली खोल दरी असल्याने आम्ही 4 गटांमध्ये विभागणी करून या सर्व परिसराचा आनंद घेतला. ही सर्व माहिती ऐकत असताना काही मुलांना एक मोठी माशी चावत असल्याचे लक्षात आले; परंतु आम्ही सर्व वैद्यकीय कारणासाठी प्रथमोपचार साहित्य घेतले होते. छोट्या मुलांना या माशीचा त्रास होवू नये यासाठी कोणतेही किटक चावू नये यासाठी असणारा स्प्रे मारण्यात आला. आपल्या घरात असणाऱ्या माशीसारखी दिसणारी माशी ही आकाराने मात्र मोठी असते. तिचा चावा टाळण्यासाठी स्प्रे मात्र घेतल्याने मोठा फायदा झाला. आम्ही भीमाशंकरकडे पुढे निघालो. वाटेत वनविभागाने जंगलात राहणाऱ्या प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी केलेले तळे बघून आम्ही परत चालायला सुरुवात केली.

आज सूर्याने आमच्यावर मेहरबानीच केली होती. सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने वातावरणात सुखद गारवा होता. 6 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतचे सर्वच जण त्याचा आनंद घेत चालत होते. चेतन दादा सर्वांना शांत राहण्यास सांगत होता. याचे कारण जंगलातील वन्यप्राणी आवाजामुळे दिसणार नाही होते. आमचा ग्रुप मोठा असल्याने हे जरा अशक्‍यच होते. परंतु आमच्यातील पहिल्या ग्रुपला हरीण पळताना दिसले. आता उत्सुकता लागली होती महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू कधी दिसेल (शेकरू म्हणजे मोठी खार) आता गुप्त भीमाशंकरच्या वाटेकडे आम्ही सलागलो होतो. रस्ता उंच झाडीने वेढलेला होता. मोठी-मोठी झाडे होती. मध्येच काही मुलांना ससे दिसले. अधूनमधून पक्षांचे छान आवाज येत होते. 12.30 वाजता दुपारी आम्ही गुप्त भिमाशंकरला पोहचलो. काही मुलांना तेथे पोहचल्यावर शेकरूचे पहिले दर्शन झाले. ही खार बरीच मोठी होती परंतु अजूनही सर्वांना तिचे दर्शन झाले नव्हते.

आम्ही गुप्त भीमाशंकरचे दर्शन घेतले. त्या ठिकाणी फोटो काढून घरातून आणलेल्या पोळी-भाजी, पराठ्यांवर ताव मारला. मुले थोडी दमलीही होती. जेवण संपवून उठल्यावर, त्या ठिकाणी दाट झाडी असल्याने सर्व मुलांना भेटायला याव्या तशा 3 ते 4 शेकरू आल्या. ते पाहून सर्वच मुले खूप आनंदी झाली.

हे सर्व झाल्यावर आम्ही दरवर्षीप्रमाणे किल्ले स्वच्छता मोहीम राबवत असतो. तशीच गुप्त भिमाशंकर ते भिमाशंकर या पायवाटेवरील प्लॅस्टिक कचरा व हबॉटल्स साफ करायचे ठरवले. आमची टीम मोठी असल्याने गुप्त भिमाशंकर ते भिमाशंकर या वाटेवर असलेले प्लॅस्टिक रॅपर - लेज जी पाकिटे, गुटख्याच्या पुड्या, चॉकलेटची वेष्टने पाण्याच्या बाटल्या हे सर्व गोळा करत आम्ही भिमाशंकरला 2.30 वाजता दुपारी कधी पोहचलो हे कळले तर नाहीच. या सर्व उपक्रमात आमचे छोट्या गरिमा व तनिष्का या मुलीसुद्धा हिरारीने भाग घेत होत्या मला त्याचे विशेष कौतुक वाटत होते. भिमाशंकरला पोहचल्यावर आम्ही सर्व कचरा कचरापेटीत टाकला.

मुलांनी भिमाशंकर मंदिराजवळ हातपाय धुतले व त्यानंतर रांगेत जाऊन भिमाशंकराचे दर्शन घेतले. 9 कि.मी. अंतर चालून आल्यानंतर भिमाशंकराच्या मंदिरात बसण्याचा आनंद पर्वणी वेगळीच होती. पायऱ्या चढून आम्ही पार्किंगजवळ असणाऱ्या आमच्या बसेसकडे गेलो. त्या ठिकाणी सर्व मुलांना मोजून झाल्यावर बसमध्ये बसवून 3.20 वा. दुपारी घोडेगाव - मंचर - खेड घाट - राजगुरूनगर असा प्रवास करत आम्ही राजगुरूनगरमधील सिद्धेश्‍वर मंदिरात दर्शन करून आम्ही पोहे व चहा याचा आस्वाद याच ठिकाणी घेतला. याची व्यवस्था आमचे स्नेही रामदास रेटवडे क्रीडाशिक्षक - राजगुरूनगर यांनी केली. या ठिकाणी चेतन दादा व तुषार दादा यांनी केलेल्या नियोजनाबद्दल आभार मानण्यात आले. 5.30 वाजता संध्याकाळी आम्ही पुण्याकडे मार्गस्थ झालो. 7.45 वाजता आम्ही पुन्हा सणस क्रीडांगणाजवळ पोहचलो.

सर्व पालक या ठिकाणी वेळेत आल्याने सर्व मुले लगेच आपापल्या घरी गेली. या सर्व मोहिमेचे आयोजन हर्षल निकम व सुधाकर मेमाणे यांनी केले होते. अशी मोहीम ही पक्त मनोरंजनासाठी न होता सामाजिक बांधिलकी जपणारी तसेच शारीरिक क्षमता वाढवणारी या सर्व मुलांच्या आयुष्याला एक वेगळे वळण लावेल याबाबत नक्कीच खात्री देता येऊ शकेल.

Web Title: Harshal Nikam writes about trekking from Bhorgiri to Bhimashankar