प्रस्थापित आकाराला आव्हान! (हेमंत जोशी)

हेमंत जोशी hemantjoshi023@gmail.com
रविवार, 1 एप्रिल 2018

"प्रस्थापित' आणि "आव्हान' म्हटलं की अनेकांच्या भुवया उंचावल्या जाण्याची शक्‍यता असते; परंतु मला हे आव्हान वेगळ्या अर्थानं मांडायचं आहे. त्यात अधोरेखित होत असलेला "विरोध' मला या मांडणीत आणायचा नाही. त्यातही प्रस्थापित म्हटल्यावरसुद्धा हा उल्लेख कुणा एकाच्या व्यक्तिगत स्वरूपातही मला अपेक्षित नाही, तर तो कलास्वाद, निर्मिती यांबद्दलचा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

"प्रस्थापित' आणि "आव्हान' म्हटलं की अनेकांच्या भुवया उंचावल्या जाण्याची शक्‍यता असते; परंतु मला हे आव्हान वेगळ्या अर्थानं मांडायचं आहे. त्यात अधोरेखित होत असलेला "विरोध' मला या मांडणीत आणायचा नाही. त्यातही प्रस्थापित म्हटल्यावरसुद्धा हा उल्लेख कुणा एकाच्या व्यक्तिगत स्वरूपातही मला अपेक्षित नाही, तर तो कलास्वाद, निर्मिती यांबद्दलचा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

दृश्‍यकलेच्या कुठल्याही विषयात ठरून गेलेल्या, सिद्ध झालेल्या, प्रमाणित झालेल्या, स्वीकारलेल्या अनेक गोष्टी आहेत... निरनिराळ्या परंपरा, वास्तववाद, अमूर्तवादी चित्रण, क्‍यूबिझम, सर्-रिऍलिझम, इम्प्रेशनिझम, एक्‍स्प्रेशनिझम असे अनेक ईझम्स...एक जमून गेलेलं तंत्र... इत्यादी इत्यादी. ही सगळी
ओझी डोक्‍यावर सांभाळत सांभाळत चित्रकार मार्गक्रमण करत असतो. तरीही काहीतरी नवनिर्मिती करण्याची आंतरिक ऊर्मी त्याला स्वस्थ बसू देत नाही. अनेकदा वाट्याला निराशा येते, प्रयत्न फसतात, पुनःपुन्हा फसतात! होत जाणाऱ्या किंवा न होत जाणाऱ्या चित्रासमोर कैक तास, कधी कधी दिवस दिवस
हतबल अवस्थेत उभं राहावं लागतं. मात्र, ती अवस्था म्हणजे त्याच्या अंतर्मनातला चित्रसंवादच असतो. ते अवकाश एखाद्या मृगजळाप्रमाणे त्याला पुढं पुढं नेत असतं. एखाद्या अवचित क्षणी तो कस्तुरीमृग त्याच्या साक्षात्‌ समोर उभा ठाकतो आणि तो निर्मीतिगंध त्याला वेडावून टाकतो, "चित्रांकित' करतो. तिथं काही रेषाच असतात, काही नुसते रंगच असतात, काही आकार असतात, कुठलीही पृष्ठभूमी असते...कुठलाही पोत असतो...आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंतरिक समाधान असतं! अनेकदा फुटपाथवर, हायवेवरून जाताना फळविक्रेत्यांनी आपल्या टोपल्यांमधून, तसंच
रिकाम्या जागेवर फळांच्या सुंदर रचना केलेल्या दिसतात. मोसंबी, सीताफळ,
कलिंगड अशी साधारणत: गोलाकार फळं; पण त्यांची रचना एखाद्या पिरॅमिडप्रमाणे, त्रिशंकूप्रमाणे केलेली आढळते. कलिंगडाची खाप अर्धचंद्राकृती कापलेली असते. गिऱ्हाइकाला त्याचा लालसरपणा आणि चव दाखवण्यासाठी. चित्रकलेशी काहीही संबध नसलेला तो माणूस एका त्रिकोणी पिरॅमिडसारखा भाग सुरीनं सराईतपणे अलगद बाजूला काढतो. मग, मला वाटतं, या गोलाकार कलिंगडाच्या रचनेत पिरॅमिडचा आकार रचता येतो, त्रिकोणी खाप होऊ शकते, तर हे कलिंगडच
चौकोनी का होऊ शकत नाही? रंगवून पाहिलं तर...! आकार बदलला आणि चित्रार्थ तोच उरला.
***
आमच्या इथं गणेशोत्सवात चित्रशाळा/स्पर्धा (??) घेतल्या जायच्या.
नंतर नंतर कुठलाच विषय न देता "जे हवं ते चित्र काढा,' असं सहभागी मुलांना सांगितलं जायचं. त्या
बालकलाकारांसोबत त्यांचे पालक उपस्थित असायचे.
ते मला येऊन सांगायचे ः ""अहो, काहीतरी देखावा, खेळणारी मुलं, मोर
असा काहीतरी विषय द्या ना. आम्ही तशी मुलांची तयारी करून घेतलेली असते'' (मला
वाटतं, माझ्यासारख्या सर्वांना असा एखादा अनुभव नवीन नसावा). पालकांची ही "मागणी' ऐकून मला तेव्हा मोठी गंमत वाटायची.
एका मुलानं सर्व आकारांचे - चौकोनी, त्रिकोणी, गोलाकार, लांब , हिरवे, पिवळे, लाल, पट्टे
असलेले - मासे काढले होते. त्या मुलानं आजवरच्या त्याच्या त्या छोट्याशा आयुष्यात
पाहिलेल्या आकाराचा, रंगाचा एकही मासा काढलेला नव्हता. विशेष म्हणजे,
पाण्याच्या बुडबुड्यात "तो मासा आरशात आपलं प्रतिबिंब पाहतोय' असं त्यानं दाखवलं
होतं. चित्र काढण्यासाठीचा तो पेपर हाच त्या माशांच्या टॅंकचा आकार! या मुलाची चित्रं पाहून मला आश्‍चर्य वाटलं नाही; आश्‍चर्य वाटलं ते त्याच्या पालकांनी जे काही सांगितलं त्याचं! ते अगदी
कळकळीनं म्हणाले ः ""तुम्ही थोडं शिकवा हो त्याला. माशांची चित्रं ही अशी काढायची असतात का? ऐकत म्हणून नाही! असं काहीतरी करतो म्हणून याला चित्रकलेत मार्क कमी मिळतात आणि
याचा नंबर खाली जातो!'' पालकांच्या या म्हणण्यावर काय बोलावं तेच मला समजेना. प्रस्थापित आकारांना, रंगांना आव्हान देण्याचं त्या मुलाचं त्या वयातलं ते धाडस खरंतर हेवा वाटावं असंच
होतं. कारण तो प्रस्थापित, सिद्ध झालेल्या गोष्टी "फॉलो' न करता त्याचं
स्वतःचं "इमॅजिनेशन' "फॉलो' करत होता...
***
या "चित्रपंढरी'च्या वाटेवरून चालणारे वारकरी अनेक आहेत. स्वतःतला शोध
घेण्यासाठीसुद्धा एक वेगळी मुशाफिरी करण्याची धाडसी वृत्ती दाखवणारेही
आहेत. ते अंतिम ध्येयापर्यंत पोचतातच असं नाही; पण त्या प्रवासात त्यांचं
"विठ्ठलरूप' त्यांना कुठल्याही आकारांत, रंगांत कधीही दिसू शकतं !

Web Title: hemant joshi write article in saptarang