विहीर सुंदर कोकणातली...! (हेमंत जोशी)

विहीर सुंदर कोकणातली...! (हेमंत जोशी)

एखादं चित्र आपण पाहतो... त्या चित्रामुळं बरंच काही आठवत राहतं. काही पाहिलेलं, काही न पाहिलेलं मनात जागं होतं. ते चित्र मनावर जादू करून जातं. वास्तवाचा धागा पकडून कल्पनाशक्ती स्वच्छंदपणे विहरू लागते. असंच काही जाणवलेलं, जाणवू पाहणारं व्यक्त होईल एका चित्रकाराच्या शब्दांतून. चित्रही त्याचंच आणि त्यावरचं भाष्यही त्याचंच. मात्र, हे रूढार्थानं ‘रसग्रहण’ वगैरे नसेल, तर तो असेल केवळ चित्रानुभव...चित्रकाराच्या चित्रवृत्तीचं बोट धरून वाचकांनीही थोडी ‘चित्रभ्रमंती’ करावी, हाच या साप्ताहिक सदरामागचा विचार...

काही वर्षांपूर्वी मी शनिवारी-रविवारी कोकणात पालशेतला लॅंडस्केप करायला जात असे. लाल मुरमाची माती, हिरवीकंच झाडी, नारळी-पोफळीची झाडं, आमराई, सोनचाफा, जांभ्या दगडातली घरं आणि जवळपास प्रत्येक घराच्या मागील दारी असलेल्या विहिरी...हे सगळं त्या वेळच्या माझ्या लॅंडस्केपमध्ये उतरलं. सर्जनशील मनाला खुणावणाऱ्या आणि चित्रवृत्तीला आव्हान देणाऱ्या अनेक प्रतिमांचं दर्शन त्या वेळी मला कोकणात घडलं. चित्रांसाठीचं हे सगळं ‘पोटेन्शियल’ काही वर्षांनी ‘प्रगतीच्या ओघा’त लोप पावणार, नष्ट होणार याविषयीची हुरहूरही मला तेव्हा जाणवत राहिली...

बऱ्याच चित्रांमधून न वगळता येऊ शकणारा किरमिजी, लाल, शेंदरी (जांभ्या दगडाची घरं, मंगलोरी कौलारू छपरं, मुरूम-माती यांचे रंग) या रंगांचा ठसठशीतपणा बाजूला सारून काहीतरी वेगळं करण्याची अगदी आयती संधी मला त्या वेळी मिळाली.
मी कोकणात नेहमी ज्यांच्या घरी उतरत असे, त्यांच्या घराला लागून असलेल्या वाडीतल्या विहिरीनं माझं लक्ष वेधून घेतलं. वाडीला त्या वेळी शिंपण चालू होतं. मी बांधामधून वाहणाऱ्या पाण्यातूनच वर आलो. उंच शिडशिडीत बांध्याच्या हिरव्या पोफळीच्या (सुपारीच्या) झाडांच्या गर्दीमधून एक जीर्ण होत चाललेली दगडी चिऱ्यांची विहीर दिसत होती. जुन्या काळातला वक्राकार घाट हे एकमेव सौंदर्यस्थान सोडलं तर बाकी सर्व गोष्टी तशा जरुरीपुरत्याच होत्या तिथं. विहिरीच्या वरच्या बाजूला धुणी-भांडी करण्याकरिता आंघोळीसाठीच्या जागेवर कोपऱ्यात मोटारपंप बसवलेला दिसत होता. थोडक्‍याशा दगडी चिऱ्यांच्या जोत्याच्या आधारावर आणि उरल्यासुरल्या लाकडी खांबांच्या मदतीनं एक जेमतेम छप्पर त्यावर होतं. डोक्‍यावरची बरीचशी कौलं एकतर विस्कळित झालेली होती किंवा काही उडूनही गेलेली होती.

ती म्हातारी विहीर उन्हानं कोरडी पडू नये म्हणून पोफळीची अनेक झाडं तिच्यावर झावळ्यांची गर्द सावली धरून होती. सभोवार आपल्या वयाशी मिळत्याजुळत्या झाडांकडं पाहत,  जवानीच्या ऐनभरात आलेल्या आंब्याच्या मोहराकडं पाहत आणि पोफळीच्या पिवळ्या-केशरी शिंपुटाकडं (लागलेल्या पोफळीचा घड  ः कोंडी) पाहत ती विहीर आला-वेळ घालवत होती. थोडा हात साफ करण्यासाठी मी दोन-तीन पेन्सिल-स्केचेस केली. वर मोटारपंपानं लावलेलं पाणी काही ठिकाणी बांध फोडत खळखळ करत धावत होतं अन्‌ तहान-भागल्या तृप्तीनं नारळी-पोफळी हलत-डुलत होत्या. मातीला पाणी मिळाल्यानं सगळं कसं छान गार गार झालं होतं. वाऱ्याची झुळुक ओल्या मातीचा गंध पसरवत होती. चांगला मूड जमून आला होता.

तेवढ्यात पाणी भरायला आलेली मुलगी - त्या विहिरीच्या मालकाची नात किंवा पणत असावी बहुतेक - पाणी भरता भरता ओहोळातल्या पाण्यात मजेत खेळत बसली. अंगांवर उडणाऱ्या तुषारांनी ती हरखून जात होती. त्या नातीशी की पणतीशी, कोण जाणे, विहिरीचा झालेला तो थेट स्पर्श... ते पाहून असं वाटत होतं, की आपल्याच नातवंड-पतवंडांचा अवखळपणा मोठ्या वात्सल्यपूर्ण नजरेनं पाहत असताना अनावर झालेले विहिरीचेच आंनदाश्रू त्या बांधातून जणू ओघळत होते. आजोबा, पणजोबा की खापरपणजोबांनी लावून दिलेलं पाणी पुरवण्याचं काम न चुकता, इमाने-इतबारे आणि मोठ्या प्रेमभावनेनं, वात्सल्यानं ही पाणकी (विहीर) किती वर्षं करत होती कोण जाणे!
त्या विहिरीचं चित्र रंगवायला बसलो. मी नक्की काय करतोय ते पाहायला त्या घरच्या काकू खाली आल्या. मग इकडच्या-तिकडच्या गोष्टी सांगता सांगता म्हणाल्या ः ‘‘खूप जुनी आहे ही विहीर. ‘ह्यां’च्या पणजोबांनी बांधलीय. या विहिरीला जिवंत झरे आहेत बरं का... हिचं पाणी कधीच आटत नाही!’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com