घननिळ्याचा सूर... 

हेमंत जुवेकर
बुधवार, 26 जुलै 2017

श्रावणाचं असं खासं गाणं कोणतं, किंवा श्रावण म्हटलं की कुणाला कोणतं गाणं आठवतं असं जर विचारलं ना, तर खूप गाणी येतील समोर. एकापेक्षा एक भन्नाट. पण खात्री आहे की सर्वाधिकांना आठवेल ते श्रावणात घननिळा बरसला... 
या गाण्याचं श्रवणसुख आगळंच. 

एकादा दिवस इतका छान असतो की त्या दिवशी सकाळीच एक छानसं गाणं मनात येतं वस्तीला. श्रावणासारख्या ऋतुमध्ये तर असे अनेक दिवस असू शकतात. तसे ते असावेतच, याचसाठी आहे हा शब्दातून मांडलेला श्रवणानंद! 

श्रावणाचं असं खासं गाणं कोणतं, किंवा श्रावण म्हटलं की कुणाला कोणतं गाणं आठवतं असं जर विचारलं ना, तर खूप गाणी येतील समोर. एकापेक्षा एक भन्नाट. पण खात्री आहे की सर्वाधिकांना आठवेल ते श्रावणात घननिळा बरसला... 
या गाण्याचं श्रवणसुख आगळंच. 

अर्थात काही कदाचित असेही असतील ज्यांना इतरही गाणी आठवतील. पण, रेडियो कालखंडात (एफएम नव्हे...आकाशवाणीच्या) जे वाढलेत आणि ज्यांनी हे गाणं श्रावणसरीच्या साथीत ऐकलंय... खात्री आहे, त्यांना हे आणि हेच गाणं आठवणार. 
शेवटी गाणं म्हणजे तरी काय, एक आठवणच की. गाण्याबरोबर आपली एखादी आठवण जोडलेली असली ना, की ते गाणं कधी अचानक कानावर पडलं की खूप भारी वाटतं आपल्याला. कारण कानात ते सूर आणि मनात हुरहूर असं काहीसं होतं. 
आणि "श्रावणात घन निळा बरसला' या गाण्याच्या सुरुवातीला वाजणारी सतार आणि पाठोपाठ वाजणारी बासरी तसंच काहीतरी करते. बाकी मर्यादीत वाद्यमेळातून असा स्वर्ग निर्माण करण्याचं श्रीनिवास खळेंचं कसब मात्र अमर्याद. काय गोड केलंय त्यांनी हे गाणं. पण, श्रावणगारवा अंतःकरणापर्यंत पोहचवणारं हे गाणं चक्क लोकलच्या चिक्क गर्दीत निर्माण झालंय म्हणे... 

म्हणजे सांगतात असं, की कवी मंगेश पाडगावकर आणि श्रीनिवास खळे दोघेही आकाशवाणीवर होते. खळे आणि पाडगावकर लोकलने एकत्रच व्हीटीला जात (तेव्हा ते व्हीटीच होतं!) त्यांना श्रावणासाठी गाणं करायचं होतं नी डेडलाईन आली तरी ते होत नव्हतं. एकदा पाडगावकर माटुंग्याला लोकलमध्ये बसले आणि बसल्याबसल्याच त्यांना दोन ओळी सुचल्या. 

श्रावणात घननिळा बरसला रिमझीम रेशीमधारा 
उलगडला पानातून अवचित हिरवा मोरपिसारा 

 

स्टेशनवर श्रीनिवास खळे त्याच डब्यात चढले. त्यांच्याकडे या दोन ओळी पाडगावकरांनी सोपवल्या. व्हीटीला पोहचेपर्यंत आणखी एक कडवं पूर्ण झालं. तेही त्यांनी खळेकाकांकडे सोपवलं आणि ट्रेनमधून उतरण्याआधीच खळेकाकांकडे त्याची चाल तयार होती... मग पाडगावकरांनीही ते झटक्‍यात पूर्ण केलं आणि... 

जागुनि ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी 
जिथे तिथे राधेला भेटे, आता श्‍याम मुरारी 
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा 

रंगाच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी 
निळया रेशमी पाण्यावरती थेंब-बावरी नक्षी 
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा 

पाचूच्या हिरव्या माहेरी, ऊन हळदीचे आले 
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरु झाले 
मातीच्या गंधाने भरला, गगनाचा गाभारा 

यातलं "पाचूच्या हिरव्या माहेरी येणारं हळदीचं उन आणि मातीच्या गंधाने भरलेला गगनाचा गाभारा' काय मस्त वाटतात ना. एक दिसतं नी दुसरं जाणवतं... 

पानोपानी शुभशकुनांच्या कोमल ओल्या रेषा 
अशा प्रीतीचा नाद अनाहत, शब्दावाचून भाषा 
अंतयार्मी सूर गवसला, नाही आज किनारा 

अनेक संगीताच्या कार्यक्रमातून हे गाणं सादर होतंच होतं. पण त्या प्रत्येकवेळी हे गाणं ऐकताना मुळ गाणं अधिकाधिक आवडत जातं. लताबाई, खळेकाका आणि पाडगावकरांची कमाल प्रत्येकवेळी नव्याने जाणवते.

Web Title: Hemant Juwekar writes about Shravan and nature