उन्हात तळपणारी माणसं... (हेरंब कुलकर्णी)

हेरंब कुलकर्णी herambkulkarni1971@gmail.com
रविवार, 2 जून 2019

ज्या ज्या कामगारांना मी भेटलो, त्या त्या कामगारांची कामं वेगवेगळी; पण अमानुष कष्टांचा, उन्हात भाजण्याचा आणि कमी मजुरीचा सर्व कामांतला दुवा मात्र समानच.
भर उन्हात भाजणारी ही माणसं बघितली की "यांच्या वाट्याला येणारी दुःखं ही माणसांची दु:खं नाहीत' असंच वाटत राहतं...

ज्या ज्या कामगारांना मी भेटलो, त्या त्या कामगारांची कामं वेगवेगळी; पण अमानुष कष्टांचा, उन्हात भाजण्याचा आणि कमी मजुरीचा सर्व कामांतला दुवा मात्र समानच.
भर उन्हात भाजणारी ही माणसं बघितली की "यांच्या वाट्याला येणारी दुःखं ही माणसांची दु:खं नाहीत' असंच वाटत राहतं...

ऐन मे महिना. तापमान 42 च्या आसपास. हवामान खात्याचे अधिकारी टीव्हीवर अगदी सकाळीच सांगताहेतः " गरज असेल तरच बाहेर पडा.'
या सूचनेच्या मध्यमवर्गीय चौकटीचं हसू येत होतं. ज्यांना बाहेर पडण्याची गरज नाही ते आर्थिक सुरक्षितता लाभलेले घरात थांबतील; पण ज्यांना उन्हात जाण्याशिवाय पर्यायच नाही त्यांचं काय? असे उन्हात तळपणारे जीव बघावेत म्हणून सकाळी नऊ वाजताच बाहेर पडलो..ऊन्ह तापू लागलेलं. थंडगार कुल्फी विकणारी मुलं आठवली. त्यांच्यातही आता तीन वर्ग निर्माण झालेत. पायी गाडी ढकलत विकणारे, सायकलवर पेटी लावून गावोगावी जाणारे आणि मोटारसायकलवरून विकणारे. सायकलवर उन्हात फिरून कुल्फी विकणारे मला बघायचे होते. रोज भर उन्हात जड पेटी लावून रोज किमान 30 किलोमीटर ही मुलं फिरतात. यात अनेक मुलं परप्रांतीय आहेत. मी शोधत असताना उत्तर प्रदेशातून आलेला अजितसिंह मला भेटला. सायकलवर पेटी लावून निघालाच होता. "सोबत येऊ का' असं त्याला विचारलं.

मी माझ्या गाडीवर पाठीमागून जाणार होतो. त्यामुळे तो "हो' म्हणाला. तो पुढं व मी मागं. साडेनऊला सुरवात झाली. कुल्फीची पेटी किमान 20 किलो वजनाची. सायकल अतिशय जुनाट. तिला घंटी बसवलेली. गावाबाहेर पडलो. पहिल्या सहा किलोमीटरमध्ये त्याला एकही गिऱ्हाईक मिळालं नाही. पुढं अवघी दोन ते चार गिऱ्हाइकं. लांबून लहान मुलं दिसली की तो आशेनं घंटी वाजवायचा. खूप विरळ घरं असल्यानं तो घरं दिसली की थांबून घंटी वाजवायचा. एका तासात आम्ही 10 किलोमीटर दूर आलो होतो. अंगात बनियन नसल्यानं पाठीवर त्याचा शर्ट घामानं ओला झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. "थोडा वेळ माझी गाडी घे, मी सायकल घेतो' असं मी त्याला म्हणालो तर विनम्रपणे "नही बाबूजी' इतकंच ठाम उत्तर. मला गाडीवरून जाताना लाज वाटायला लागली. माझ्या शारीरिक कमजोरीची शरम वाटली. उन्हाची वेळ झाल्यानं लोक घरात बसले होते; त्यामुळे बाहेरही कुणी दिसत नव्हतं. त्यामुळे निरर्थक सायकल चालवत राहणं इतकंच तो करत होता. एके ठिकाणी त्याच्या गावाकडचा माणूस राहत होता. तो त्याच्याकडं थोडा वेळ थांबला. नंतर माझ्याशी बोलू लागला. उत्तर प्रदेशातल्या हरदोई जिल्ह्यातला. तीन वर्षांचा असताना आई कर्करोगानं गेली. वडील दारूच्या आहारी गेलेले. तेही वारले. वयाच्या सहाव्या वर्षीच अजितसिंह अनाथ झाला. दोन मोठे भाऊ इतर प्रांतांत काम शोधायला निघून गेले आणि गावात हा एकटाच राहिला. थोडीफार शेती होती ती नातेवाइकांनी वाट्यानं दिली. हा एकटाच घरात राहतो. हातानं स्वयंपाक करतो. शाळेत जातो. सुटीच्या दिवशी कामं करतो. शाळेला सुटी लागल्यावर तो इकडं महाराष्ट्रात आला. सायकलवर कुल्फी विकायला लागला. बिनआई-बापाचं ते अनाथ लेकरू उत्तर प्रदेशातून महाराष्ट्राच्या एका खेड्यात जगण्यासाठी करत असलेली धडपड बघून मन भरून आलं.

"रोज किती रुपये मिळतात?'' विचारल्यावर त्यानं हिशेब सांगितला. कंपनीकडून आलेला चोकोबार अजितसिंहला पाच रुपयांना मिळतो, हा तो 10 रुपयांना विकतो. स्थानिक कारखाना अडीच रुपयांना एक कुल्फी याप्रमाणे अजितसिंहला कुल्फ्या देतो. तो ती पाच रुपयाला एक अशी विकतो. थोडक्‍यात, निम्म्याला निम्मे पैसे मिळतात. इतकं फिरून रोज 500 ते 600 रुपयांची विक्री होते आणि 250 ते 300 रुपये सुटतात. त्यात नाश्‍ता, चहा, सायकलदुरुस्ती असे 50 रुपये रोज खर्च होतात. म्हणजे, कडाक्‍याच्या उन्हात 30 किलोमीटर सायकल चालवून घामाघूम होत केवळ 200 ते 250 रुपये मिळतात. त्यात जवळच्या गावात हातगाडीवर कुल्फी विकणारे जातात; त्यामुळे तिथं संधी नसते आणि मोटारसायकलवाले लांबची गावं करतात; त्यामुळे सायकलवर फार धंदा होत नाही. अधलीमधली घरं, वस्त्या इथंच विक्री होते. सकाळ-संध्याकाळ कुणी कुल्फी घेत नाही; त्यामुळे कडाक्‍याच्या उन्हातच विक्री करावी लागते. ऊन्ह वाढलं की शरीर कष्टी; पण मन आनंदी अशी या कुल्फीविक्रेत्यांची विचित्र स्थिती असते! इतकी जड पेटी घेऊन दिवसभर सायकलिंग केल्यानं पायाला गोळे येतात...डोळ्यांची जळजळ होते...पण तरीही दुसऱ्या दिवशी 250 रुपयांसाठी ते करावंच लागतं. मोटारसायकलवाल्याचे 100 ते 150 रुपये पेट्रोलवर जातात; त्यामुळे फार मिळकत होत नाही. हातगाडी उन्हात आठ ते 10 किलोमीटर लोटत विक्री करणं दमवणारं असतं. अजितसिंहसोबत 15 किलोमीटर फिरल्यावर तो कुल्फीच्या एका कारखान्यात थांबला. मालकानं मला बघितलं. मी बालमजुरीविरुद्ध तक्रारी पूर्वी केलेल्या असल्यानं त्यानं याच्या कानात काहीतरी सांगितलं असावं.

"माझं वय 17 आहे'' असं तो मालकाला सांगत असताना मी ऐकलं आणि नंतर तो घाबरला. त्यानं पेटी तिथं लावली आणि दुसरी सायकल घेऊन "मै आया बाबूजी' म्हणत पसार झाला. मी अर्धा तास वाट बघितली व नाद सोडून दिला. त्या मालकानं घाबरवल्यामुळे बिचाऱ्याचा दिवसभराचा धंदा बुडाला होता. मला विलक्षण अपराधी वाटलं. संध्याकाळी मी त्याचं घर शोधत गेलो. तो चिंचा फोडत बसला होता. मला पाहून पुन्हा घाबरला. त्याची भीती मी काढली. माझ्या मनात अपराधी भावना होतीच, तेव्हा त्याचे आजचे बुडालेले 300 रुपये मी त्याला दिले. हे पैसे कष्ट करून मिळालेले नसल्यामुळे तेही तो घेईना. बळेच खिशात कोंबले. इतकी इमानदार, कष्टकरी माणसं ही. कुठून कुठं येणारी आणि क्षणाक्षणाला भीतीच्या वरवंट्याखाली जगणारी. पिचलेली माणसं...
***

अजितसिंह पळून गेल्यावर मग मी एका शेतात 20 ते 25 महिला-मजूर उन्हात काम करत होत्या तिथं गेलो. टोमॅटोच्या शेतात बांबूच्या तारेला टोमॅटोंच्या रोपांच्या दोऱ्या बांधण्याचं काम त्या करत होत्या. दुपारचा एक वाजला होता. उन्हामुळे सर्वत्र सामसूम होती. महिला दोऱ्या बांधत होत्या. त्या उन्हात चप्पलसुद्धा तापून चटके देत होती. एका हंड्यात पाणी ठेवलेलं होतं तेही गरम झालेलं. तरीही ते गरम पाणी त्या सारखं पीत होत्या. डोक्‍यावर काहींनी हॅट किंवा कॅप घातलेल्या. ऊन्ह कमी लागावं म्हणून हॅटच्या वा कॅपच्या खाली डोक्‍यावर लिंबाचा पाला घेतात, तसा तो त्यांनी घेतला होता. उन्हाचा तडाखा जास्त बसू नये म्हणून अंगात पुरुषांचे जुने शर्ट घातलेले होते. बायका काम करताना सारख्या बोलत होत्या...हसत होत्या...चटके विसरण्यासाठी!
""सकाळी खूप लवकर काम सुरू करून उन्हाच्या वेळी विश्रांती का घेत नाही?'' मी त्यांना विचारलं.
त्या म्हणाल्या ः ""घरची कामं करावीच लागतात आणि 10 किलोमीटरहून इथं यावं लागतं. त्यामुळे उन्हातच काम करावं लागतं.''
इतक्‍या तापलेल्या उन्हातल्या कामाचे त्यांना फक्त 200 रुपये मिळणार होते. याच उन्हात त्या कांदे भरण्याचंही काम करतात. निंदणी-खुरपणीचं
काम करतात.
""उन्हाचा नंतर काय काय त्रास होतो?'' असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं ः "" संध्याकाळी तळपायांची खूप आग होते...खूप थकवा येतो...डोळ्यांची जळजळ होते...मळमळतं...डोकं खूप दुखतं...कितीही थकलेल्या असलो तरीही दुसऱ्या दिवशी पहाटे उठावंच लागतं आणि जनावरांचं आवरून, घरचा स्वयंपाक आवरून घाईनं जीपमधून कामावर यावंच लागतं. पहाटे पाच ते रात्री 10 असं सलग काम...त्यात निम्मा दिवस या तळपत्या उन्हात...'' त्या सांगत राहिल्या...पुढचं ऐकण्याचा मला धीरच झाला नाही..कधी एकदा सावलीत जातोय, असं मला होऊन गेलं.
***

उन्हात आणखी कोण काम करतंय, हे शोधायला निघालो. दूर तळपत्या उन्हात मला माणसं खड्डे खोदताना दिसली. जवळ गेलो तर इलेक्‍ट्रिक खांब बसवण्यासाठी ते खड्डे खोदत होते. वीजमंडळ हे काम ठेकेदारांना देतं. ठेकेदार मजूर नेमून हे काम करून घेतात. तीन ते चार फुटांचे खड्डे खडकाळ जमिनीत खोदताना ते मजूर घामानं भिजून गेले होते. अरुंद खड्ड्यातून जमिनीवर पालथं झोपून छोट्या खोऱ्यानं माती काढताना होणारी त्यांची कसरत बघवत नव्हती. खडकाळ जमीन त्यांचा घाम वसूल करत होती! एकमेकांशी बोलताना त्यांना धाप लागत होती. खड्डा पूर्ण झाल्यावर दूर ठेवलेला तो पोलादी खांब त्यांनी उचलला. तो उन्हानं गरम झाल्यानं चटके बसत होते. दीडशे किलो वजनाचा तरी तो खांब असावा. त्यांनी तो टेकवत टेकवत दुरून आणला. त्याच्या एका टोकाला जाड दोरीचा नाडा बांधला आणि पुन्हा ताकद लावून पारंपरिक गाणं म्हणत, ओरडत तो खांब त्यांनी खड्ड्यात टेकवला. मोठे दगड त्यात पटापट टाकले. बाकीच्यांनी त्या दोरीची टोकं हातात धरून ताण दिला होता. खड्ड्यातल्या दगडावर पहारीनं ठोके मारताना तो मजूर घामानं भिजून गेला होता; पण त्या कामाच्या तणावात तिकडं त्याचं लक्षही नव्हतं. खांब पक्का बसल्यावर छोट्या पाळण्यातून एकजण वर चढला, त्यावर बसला. इतक्‍या निमुळत्या ठिकाणी बसून काम करणं जोखमीचं होतं. त्यावर त्यानं वायर ओढली आणि उतरला. मग ते सगळे पुन्हा पुढच्या खड्ड्याकडं वळले. घाम पुसताना मी त्यांच्याशी बोललो. रोज सहा मजूर सहा ते आठ खांब वायरिंगसह उभे करतात. यावरून त्यांच्या कष्टाची कल्पना यावी. खड्डे खोदून, खांब उभे करून वायर ओढून देऊन वीज सुरू करण्यापर्यंत सगळी कामं हे तरुण मजूर करत होते. भर उन्हात हे काम करण्याची मजुरी होती फक्त 300 रुपये. त्यात ते रोज 50 किलोमीटर अंतरावरून दोघं दोघं मोटारसायकलवरून येत होते. म्हणजे पेट्रोलचा खर्च वजा जाता 225 रुपये मजुरी पडत होती. इतक्‍या कडक उन्हातून ओढलेल्या विजेच्या तारेतून अनेक घरात पंखे, कूलर फिरणार होते आणि तारा ओढणारी माणसं मात्र उन्हात भाजत होती.
मी त्यांना विचारलं ः "" ही कामं सकाळी किंवा संध्याकाळी उन्हं उतरताना का करत नाही?''
ते म्हणाले ः"" आम्ही 50 किलोमीटरवरून येतो; त्यामुळे सकाळी शक्‍य नाही आणि संध्याकाळी हे काम करताना वीज घालवली की लोक ओरडतात; त्यामुळे हे काम दुपारीच करावं लागतं.''
आज मी ज्यांना ज्यांना भेटलो, त्यांची त्यांची
कामं वेगवेगळी; पण अमानुष कष्टाचा, उन्हात भाजण्याचा आणि कमी मजुरीचा सर्व कामांमधला दुवा मात्र समानच.
कार्ल मार्क्‍स म्हणाला होता ः -"माणसांच्या वाट्याला माणसांची दु:खं यावीत, जनावरांची दु:खं येऊ नयेत.'
भर उन्हात भाजणारी ही माणसं बघितली की "यांच्या वाट्याला येणारी दुःखं ही माणसांची दु:खं नाहीत' असंच वाटत राहतं. आपण भर उन्हात सुटी घेत कूलर, एसीत झोपलेले असतो...आपल्या रजेचाही पगार बिनबोभाट जमा होणार आणि दुसरीकडं एकेका रुपयासाठी एकेका घामाचा थेंब देणारी ही माणसं...

अखेर यांनी या व्यवस्थेत गुन्हा तरी काय केलाय?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heramb kulkarni wirte peoples sorrow article in saptarang